प्रतापगड नंतर आता किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी गडकोट प्रेमी, विविध हिंदूत्ववादी संघटनांनी जिल्हा प्रशासन, वनविभाग, पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेवून महाशिवरात्रीपूर्वी अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. नी दुसऱ्या दिवसापासून रोज काही ना काही हटवले जावू लागले आहे. इतके सारे घडले म्हटल्यावर श्रेयवाद थांबणे शक्यच नव्हते. तो दिसूही लागला आहे. अशातच विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या मोहिमेचे अभिनंदन करणारी ‘हिंदूत्ववादी सरकार’ अशा आशयाची एक पोस्ट भाजपने पक्ष चिन्हासह समाज माध्यमात पाठवली. ते पाहून विशाळगडावरील अतिक्रमणे हटाव मोहिमेचे शिलेदार, ठाकरे गटाच्या युवा आघाडीचे जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे चकित झाले. त्यांनी इरसाल शब्द वापरून ‘..यावर कमळ कुठनं आलं ‘ अशी त्या समूहात विचारणा केली. त्यावर हास्याच्या इमोजी दिसू लागल्या. या प्रश्नात कोठेच नसताना भाजप श्रेय घेत असल्याने त्यांची कोंडी करण्याच्या या प्रकाराची खुमासदार चर्चा सुरू राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

..तर आम्हाला नाही गरज

नवी दिल्ली महापालिकेतील ‘आप’च्या यशामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदकेजरीवाल चर्चेत आले आहेत. या निकालानंतर केजरीवाल – राजू शेट्टी यांच्या संदर्भातील एक किस्सा स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी समाज माध्यमात कथन केला. पंजाब निवडणुकीत ‘आप’ला मिळालेल्या यशानंतर शेट्टी यांनी केजरीवाल यांना सदिच्छा भेटीसाठी निरोप पाठवला. पण केजरीवाल यांनी ‘शेट्टी आप मध्ये मध्ये प्रवेश करणार असतील तर भेट देतो,’ असा भलताच निरोप दिला. खरे तर केजरीवाल – शेट्टी यांचे संबंध जुने. इंदापूर येथे गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबियांना सांगली येथे केजरीवाल यांच्या हस्ते सन्माननिधी देण्याचा मोठा कार्यक्रम स्वभिमानीने आयोजित केला होता. लोकपाल आंदोलनातही दोघांचा सहभाग होताच. पुढेही सारख्या भेटी होत्या. याच किस्श्यावर अनौपचारिक गप्पा मारताना हा विषय छेडला असता शेट्टी यांनी ‘ अभिनंदन करण्यासाठी भेटायचे तर थेट पक्षात प्रवेश करा म्हणतात. ही कसली अट ? अशी अट असेल तर ते गेले उडत. आम्हाला तर कुठे गरज आहे.’ असे म्हणत यांनी भेटीच्या अटीची वासलात लावली.

पंढरपूर कॉरिडॉर अन् भाजपची कसोटी

वाराणसीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारच्या सूचनेवरून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी २०३० कोटी ७० लाख रूपये खर्चाचा विकास इराखडा तयार केला आहे. परंतु हा कॉरिडॉरच रद्द व्हावा म्हणून पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. या कॉरिडॉरमध्ये रस्ते रूंद होत असताना त्यात काही जुनी मंदिरे, मठ, दुकाने, घरे जातील आणि शेकडोंचे संसार उघडय़ावर पडतील, या भीतीमुळे संबंधित बाधित कुटुंबीयांनी कॉरिडॉरला तीव्र विरोध दर्शविला आहे. सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. अशा प्रकारे पंढरपूर कॉरिडॉरला मत  कारणाची आडकाठी येत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही पंढरपूर कॉरिडॉर  रद्द होण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापुरात गुरव समाजाच्या राज्य अधिवेशनाच्या व्यासपीठावर पंढरपूर कॉरिडॉरच्या विषयावर शासनाची भूमिका स्पष्ट करणे भाग पडले. कॉरिडॉरसाठी कोणालाही विस्थापित व्हावे लागणार नाही. सर्वाना विश्वासात घेऊनच पंढरपूर कॉरिडॉरची निर्मिती होणार असल्याचा निर्वाळा फडणवीस यांनी स्वच्छ शब्दात दिला आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून पंढरपूरचे भाजपचे नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधींचा कॉरिडॉरविरोध मावळण्याचा दावा केला जातोय.

(सहभाग : दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, एजाज हुसेन मुजावर)

political situation in maharashtra, chavadi, maharashtra politics news, maharashtra political crisis, maharashtra news

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra politics news maharashtra political crisis political situation in maharashtra zws
First published on: 15-12-2022 at 02:07 IST