– गिरीश कुबेर

‘‘आव्हान ही एक संधी आहे, तिचा लाभ घ्या,’’ अशी केवळ शब्दसेवा करणारे आणि प्रत्यक्षात ही संधी साधून आव्हानकाळात वेगळे काही करून दाखवणारे यातला फरक समजून घेण्याची ही आणखी एक संधी.

रिशी सुनक हे इंग्लंडचे अर्थमंत्री आहेत. आज त्यांनी आपल्या देशातल्या लहान-लहान उद्योग/ व्यावसायिकांसाठी ‘‘बाऊन्स बॅक लोन स्कीम’’ अशा नावाची एक नवीन योजना पार्लमेंटमध्ये जाहीर केली. करोना साथीत हे लघुउद्योजक देशोधडीला लागण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यांना वाचवण्यासाठी ही योजना. तिचा अंमल ४ मेच्या सोमवारपासून सुरू होईल. इंग्लंडमधला कोणताही लहान व्यापारी, लघुउद्योजक तिचा फायदा घेऊ शकेल. त्यासाठी त्याला कोणत्याही सरकारी कार्यालयात जावं लागणार नाही की काही कागदपत्रं दाखल करावी लागणार नाहीत. त्यानं करायचं ते इतकंच..

सुनक यांनी जाहीर केलेल्या संबंधित यंत्रणांकडे ऑनलाइन अर्ज करायचा. त्यानंतर पुढच्या २४ तासांच्या आत अर्जदाराच्या खात्यात त्याने मागितलेली कर्जाऊ रक्कम जमा होईल. किमान दोन हजार पौंड्स (साधारण १.८९ लाख रुपये) ते कमाल ५० हजार पौंड्स (साधारण ४७.२२ लाख रुपये) या टप्प्यात त्याला हवं तितकं कर्ज तो मागू शकेल. ते लगेच त्याच्या खाती जमा होईल इतकंच या योजनेचं मोठेपण नाही. तर या कर्जावर पहिले १२ महिने कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही. ‘‘हे लघुउद्योजक ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. त्याला धक्का लागून चालणार नाही. या कसोटीच्या काळात या उद्योजकांहाती पैसा नाही, असं होऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे,’’ असं सुनक ही योजना जाहीर करताना म्हणाले. त्यांनी उद्योजक, लघुउद्योजक यांच्यासाठी घेतलेला हा एकमेव निर्णय नाही. या सर्वाना विविध सरकारी अनुदानं, करसुट्टी आणि कर्मचारी राखण्यासाठी त्यांच्या वेतनासाठी मदत असं बरंच काही त्यांनी याआधी जाहीर केलेलं आहेच. त्यात या नव्या योजनेची भर.

करोनाकाळ सुरू झाल्यापासून अर्थविश्वासाठी सुनक यांनी जाहीर केलेली आर्थिक मदत किती असेल? १५०० कोटी पौंड (साधारण १.४२ लाख कोटी रुपये) इतकी. देशाच्या तिजोरीत कराच्या रूपानं भरीव परतफेड करणाऱ्या नागरिकांच्या नोकऱ्याच वाचल्या नाहीत तर देशाला महसूल कसा मिळणार, असा त्यांचा साधा प्रश्न आहे. म्हणून देशातल्या विविध आस्थापनांत काम करणाऱ्या ४० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचाव्यात म्हणून त्या आस्थापनांच्या मालकांसाठी ६०० कोटी पौंडांची (साधारण ५६ हजार ६६६ कोटी रुपये) अनुदान योजना काही आठवडय़ांपूर्वी जाहीर केली. त्यात ऋणको उद्योगांच्या सर्व कर्जासाठी सरकार धनकोंना आवश्यक ती सर्व हमी देईल, अशी योजना आहे. यातही पहिले वर्षभर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारलं जाणार नाही, अशी तरतूद आहे. ही र्कज कोणाकोणाकडून घेता येतील याचीही यादी सुनक यांनी जाहीर केली आणि या कर्जाच्या अर्जाचंही प्रमाणीकरण केलं गेलंय. म्हणजे प्रत्येकाचे अर्ज सारखे. उगाच यात हे आहे आणि त्यात ते नाही अशी कटकट नको.

रिशी सुनक जन्माने ब्रिटिश आहेत. पंजाबी. त्यांचे वडील त्या देशातले स्थलांतरित. रिशी अवघे चाळिशीत आहेत. इतक्या लहान वयात ब्रिटनचं अर्थमंत्रिपद म्हणजे तशी कौतुकाची बाब. या पदास शोभेल असं शिक्षणही त्यांचं आहे. राजकारणात तसे ते उशिरा आले. हुजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री (काय घनगर्द आवाज होता त्यांचा) विल्यम हेग यांच्या यॉर्कमधल्या रिचमंड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रिशी करतात. आणि या रिशी यांची दुसरी ओळख म्हणजे ‘इन्फोसिस’चे नारायणमूर्ती यांचा हा जावई. त्यांची कन्या अक्षता आणि रिशी स्टॅनफर्ड विद्यापीठात एकत्र शिकत होते.

सुनक यांचे प्रमुख, म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना स्वत:ला करोनानं गाठलं. ते रुग्णालयात होते. त्या काळात आणि त्याच्या आधीपासून सगळे अर्थविषयक निर्णय हे रिशी सुनक घेतायत. इतक्या मोठय़ा घोषणा अर्थमंत्रीच करतायत हे पाहताना हरखून जायला होतं. ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या पुनर्बाधणीसाठी सुनक जे काही करतायत त्याचं चांगलंच कौतुक तिकडच्या माध्यमांत होतंय.

ता.क.: दरम्यान, आपल्याकडेही लघुउद्योजकांसाठी केंद्र सरकारकडून काही मदत योजना जाहीर केली जाणार असल्याची वदंता कानावर येते. तीबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित यंत्रणांनी कानावर हात ठेवले. यासंदर्भात चर्चा सुरू आहे.. असे सांगण्यात आले.

@girishkuber