संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येणार म्हणून इंडिया इंटरनॅशनल सेंटरवर कडक सुरक्षा व्यवस्था होती, लोकांच्या बॅकपॅक तपासणं, लॅपटॉप आहे का याची शहानिशा करून घेणं; मग तपासणी पूर्ण झाल्याचा स्टिकर लावणं वगैरे सर्व सोपस्कार. पण अवघे दोन दिवस आधी इथंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येऊन गेले, त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था तुलनेत कमी होती. तपासणीचे एवढे सोपस्कार कोणी केले नव्हते. मग, राजनाथ यांच्यासाठीच इतकी सुरक्षा कशाला? चौकशा केल्यावर कळलं की, शहा अचानक आलेले होते! राजनाथ यांचा कार्यक्रम निश्चित असल्यामुळं सुरक्षा यंत्रणेला ठरलेली तपासणीची पद्धत अवलंबावी लागली होती… शहा अचानक आले होते आणि नव्हते, असं दोन्हीही होतं. मोदींच्या शासनकाळाची दोन दशकं यावर चर्चासत्र होणार याची घोषणा झाली तेव्हा अमित शहा यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन होणार हे ठरलेलं होतं. त्यामुळं शहांचं येणं अचानक नव्हतं. पण प्रत्यक्ष उद्घाटनाच्या दिवशी शहा येण्याची शक्यता कमी असावी, कारण केंद्रीय गृहमंत्र्यांसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था तिथं नव्हती. कदाचित ऐनवेळी शहांनी मन बदललं असावं. कदाचित मोदींवर त्यांना पडद्यावर नव्हे, प्रत्यक्षच बोलायचं असावं. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल वाजवण्याआधी दिल्लीत मोदींचं त्यांना कौतुक करायचं असावं. कारण काहीही असेल पण, शहा कार्यक्रमाला आले, त्यांनी खूप वेळ भाषण केलं.

शहांच्या आधी देवेंद्र फडणवीस बोलले, त्यांचं भाषण नीटनेटकं आणि आटोपशीर होतं. भाषण संपवता संपवता फडणवीस म्हणाले की, मोदींबरोबर सर्वाधिक काम केलेले, त्यांच्या बरोबर राजकीय प्रवास केलेले आणि मोदींविषयी सर्वाधिक माहिती असलेले शहांशिवाय दुसरे कोण असेल? मोदींच्या शासनकाळाच्या अनुभवाविषयी शहांकडून ऐकून घेतलं पाहिजे! मग, शहांनी भाषणाला सुरुवात केली. पहिलंच वाक्य ते म्हणाले, ‘‘नाही… फडणवीस बोलताहेत ते खरं नाही. मी मोदींना जवळून ओळखतो हा तुमचा गैरसमज आहे!’’… मग, सेकंदभर थांबून शहा म्हणाले की, ‘‘मोदींना खरोखर कोण जवळून ओळखत असेल तर ती देशातील त्यांच्यावर प्रेम करणारी जनता…’’ शहांनी मोदींचं असं कौतुक केल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला नसेल तरच नवल!

… यांचा घसा बसला!

मोदींच्या शासनकाळाच्या चिकित्सा चर्चासत्राची सांगता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली, तेही शहांसारखे बराच वेळ बोलत होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केली, जेमतेम दहा मिनिटं झाली असतील, राजनाथ यांचा घसा खवखवायला लागला. त्यांना बोलताना त्रास व्हायला लागला होता. ते म्हणाले, ‘‘माझा घसा खराब झालाय. खरंतर माझा गळा कधीच खराब होत नाही. पहिल्यांदाच असं झालंय. मलाही कळत नाही असं का झालं?’’… राजनाथ नेहमी शांत, धीरगंभीरपणे बोलत असतात. त्यामुळं सभागृहातील तमाम मोदीभक्तांना नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेना. हलकं हास्य मात्र कुठून कुठून उमटलं. भाषणाला चाळीस-पंचेचाळीस मिनिटं झाली असतील, राजनाथ यांनी अचानक व्यासपीठावरल्या व्यक्तींकडं पाहिलं आणि म्हणाले, किती वेळ मी बोलायचं आहे? मला सांगितलं गेलं होतं की, तुम्हाला ४० मिनिटं बोलावं लागेल म्हणून विचारतो कारण ४० मिनिटं झालीत आणि तसंही जेवणाची वेळ झालीय, भूक लागली की (श्रोत्यांच्या) डोक्यात काही शिरत नाही…  मग भाषण कसं चांगलं होणार?… राजनाथ यांच्या या वाक्यांवर व्यासपीठावरून कोणीच काही बोलेना मग, राजनाथ म्हणाले, जेवणाची वेळ टळून गेली की भूक कमी होते, मी आणखी थोडा वेळ बोलतो… असं म्हणत राजनाथ आणखी पाऊण तास बोलले. मोदी पंतप्रधान कसे झाले, हे राजनाथ सांगत होते… २०१३-१४ मध्ये मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. देशाला नव्या नेत्याची गरज होती, पक्षात मोदींवर सहमती झाली, त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचं ठरलं. मीच तशी घोषणा केली. त्या काळात मोदींविषयी मला फारशी माहिती नव्हती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मला कल्पना नव्हती. आता मात्र मोदींविषयी मला खूप माहिती झाली आहे!… मग, पुढं राजनाथ हे मोदींच्या निर्णयक्षमतेवर, प्रामाणिकपणावर, त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीवर बोलले. राजनाथ यांचं सगळं भाषण म्हटलं तर अतिगंभीर, त्यांच्या स्वभावाला साजेसं होतं पण, म्हटलं तर ‘जोर का झटका धीरे से लगे’ या वळणानंही जाणारं होतं. ते कोणाला कसं भावलं ते कळायला मार्ग नव्हता.