दिल्लीवाला

सरंगी कथन

चांद्रयान-२ मोहीम अपयशी ठरली असली, तरी इस्रोतील शास्त्रज्ञांचे कौतुक झाले. या मोहिमेच्या आखणीत महिला शास्त्रज्ञांचा मोठा सहभाग असल्याने ही मोहीम अधिक कौतुकास्पद होती. चांद्रयानचा लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार म्हणून पंतप्रधानांनी इस्रोच्या मुख्यालयात रात्र जागून काढली. देशवासी विज्ञानाचे आणि वैज्ञानिकांच्या मेहनतीचे महत्त्व जाणतात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी सापडले तर मानवसृष्टी चंद्रावरही होऊ  शकते का, या आगामी विचाराला चालना देण्यासाठी ही मोहीम होती. अमेरिकेने मंगळयान सोडले त्यामागे हाच विचार होता. भारतही भविष्यात मंगळयान सोडू शकतो. पण मोदी सरकारच्या काही मंत्र्यांना त्यात फारसे स्वारस्य दिसत नाही. ज्यांचे कौतुक करण्यात मोदी-शहा आणि तमाम भाजप नेते थकत नाहीत त्याच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सरंगी यांना मंगळवारी हा फालतू आणि वेळ वाया घालणारा उपद्व्याप वाटतो. गेल्या आठवडय़ात सरंगी यांनी तसे जाहीर विधान केले. सरंगींच्या म्हणण्यानुसार, मंगळावर जाऊन जीवसृष्टी उभी करण्यापेक्षा पृथ्वीवरच मंगलदायी सृष्टी निर्माण करण्याला प्राधान्य द्यावे. सरंगींच्या दृष्टीने अशा मंगलमय सृष्टीत सद्भावना, शांती आणि प्रेम असेल.. पण याच कार्यक्रमात सरंगींनी सद्भावना गुंडाळून ठेवली. ते म्हणाले, वंदेमातरम् याचा अर्थ भारतामातेचा जयजयकार. ज्यांना जयजयकार करायचा नसेल त्यांनी वास्तव्यासाठी दुसरा देश शोधावा. काही बुद्धिजीवी अफजल गुरू आणि पाकिस्तानचा जयजयकार करतात. त्यांनी पाकिस्तानात गेले पाहिजे.. सरंगी यांच्याप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचे गांधी जयंतीच्या कार्यक्रमातील विधान उद्बोधक होते. ते म्हणाले, गांधीजींनी सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली..

संघाचा रोडमॅप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव सुनील आंबेकर यांनी २१ व्या शतकातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल कशी असेल, यावर पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचे प्रकाशन गेल्या आठवडय़ात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. आपल्या भाषणात भागवत म्हणाले की, ‘‘आंबेकरांनी पुस्तक लिहिण्यासाठी खूप मेहनत घेतली. आम्ही प्रकाशन करण्यासाठीही मेहनत घेतली!’’ झाले होते असे की, प्रकाशनासाठी पुस्तके वेष्टनात गुंडाळलेली होती. वेष्टनेच इतकी होती की, त्यात दडलेली पुस्तके बाहेर काढेपर्यंत भागवतांना खूप जोर लावावा लागला. त्याचा संदर्भ देत भागवतांनी गमतीने त्यांच्या मेहनतीचा उल्लेख केला.. अर्थात, भागवतांनी आंबेकरांचे भरपूर कौतुकही केले, ‘‘आंबेकर पुस्तक लिहितील असे वाटले नव्हते. त्यांची क्षमता नाही असे मुळीच नाही. ते संघाच्या कार्यात इतके मग्न आहेत, की त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी वेळ मिळाला कसा याचेच आश्चर्य वाटतेय.. आंबेकरांच्या पुस्तकाविषयी संघ कार्यकर्त्यांना समजले, तेव्हा काही जणांनी माझ्याकडे चौकशी केली. खरे तर तक्रारीचा सूर लावला होता..’’ हे सगळे भागवतांनी भाषणातच सांगितले. संघाचा रोडमॅप आता आंबेकर सांगणार का, अशी विचारणा अनेकांनी केली. त्यावर भागवतांचे म्हणणे होते की, ‘‘संघावर कोणीही पुस्तक लिहू शकतो. स्वत:चे विचार मांडायला लोक स्वतंत्र आहेत. अगदी संघाशी निगडित असलेल्यांनीही आपले विचार मांडायला हरकत नाही. संघात त्यांच्या विचारांवर चर्चाही होईल. पण एखाद्याने रोडमॅप दिला म्हणजे संघ त्यानुसार मार्गक्रमण करेल असे नाही. संघात विचारस्वातंत्र्याला वाव आहे. चर्चेनंतर सहमती बनेल आणि निर्णयावर अंमल होईल. मग एखाद्याने वेगळा रोडमॅप दाखवला तरी सहमतीचा निर्णय त्याला मान्य करावा लागेल..’’ थोडक्यात, भागवतांचे म्हणणे होते की, संघ आपल्याला कळला असा दावा कोणी करू नये. खुद्द गोळवलकर गुरुजी म्हणत असत की, ‘संघ आपल्याला कळला असे म्हणता येणार नाही.’ कित्येक वर्षे सरसंघचालक राहूनही गुरुजी- ‘संघ आत्ता कुठे समजायला लागलाय,’ असे सांगत. त्याची आठवण भागवतांनी करून दिली. संघाच्या दृष्टीने तीन आदर्श आहेत. हनुमान, शिवाजी महाराज आणि संस्थापक डॉ. हेडगेवार! भागवतांनी रोडमॅपचं कौतुक जरूर केले; पण संघाला रोडमॅप कोणी सांगण्याची गरज नाही, असेच अप्रत्यक्षपणे सूचित केले.

काँग्रेसची यात्रा

महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त काँग्रेस शक्तिप्रदर्शन करेल असे वाटले होते. पण पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आक्रमक भाषणापलीकडे काँग्रेसच्या जयंती कार्यक्रमांमध्ये फारशी ताकद नव्हती. भाजपच्या मुख्यालयाच्या जवळ दीनदयाळ मार्गावर दिल्ली काँग्रेसचेही कार्यालय आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये याच भागात काँग्रेसचे मुख्यालयही हलवले जाणार आहे. नजीकच्या भविष्यात भाजप आणि काँग्रेसची मुख्यालये हाकेच्या अंतरावर असतील. दिल्ली काँग्रेसच्या कार्यालयापासून राजघाटापर्यंत सद्भावना यात्रा काढलेली होती. या यात्रेत राहुल गांधी सहभागी होणार नव्हते. पण त्यांनी मन बदलले. मग काँग्रेसने कार्यकर्त्यांना संदेश दिला. राहुल गांधींमुळे यात्रेत कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. या सगळ्यांनी चार किमीचे अंतर पायी कापले. राहुल गांधी वध्र्यात सेवाग्रामला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. लखनऊमध्ये प्रियंका गांधी-वढेरा यांनी मूकमोर्चा काढला होता; पण प्रभारी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर या मोर्चाकडे फिरकलेच नाहीत. ते भाजपच्या रस्त्यावर असल्याचे सांगितले जात होते. राज बब्बर अजून काँग्रेसमध्ये असले, तरी ते सक्रिय नाहीत. भाजपच्या काही नेत्यांनी चरखा चालवून पाहिला. सद्भावना यात्रेत काँग्रेसच्या नेत्यांनीही चरखा चालवून बघितला. काँग्रेसच्या यात्रेत आत्मा नसल्याने सगळाच कार्यक्रम प्रतिमात्मक झाला होता. आता काँग्रेसने आर्थिक प्रश्नांवर जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सलग आठ आठ तास भाजपच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा करून महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी नक्की केली होती. परदेशात गेलेल्या मोदींची सगळे वाट पाहत होते. अखेर गेल्या रविवारी संध्याकाळी मोदी भाजप मुख्यालयात आले. पहिली बैठक हरयाणाच्या नेत्यांबरोबर झाली. हरयाणाच्या जागा फक्त ९० आहेत; पण तरीही मोदींनी त्यासाठी चार तास दिले. महाराष्ट्रात २८८ जागा. त्यात शिवसेनेशी युती होणार की नाही, हेही निश्चित नव्हते. त्यामुळे उमेदवार निश्चितीला मध्यरात्र उलटणार असे वाटत होते. पण पुढच्या दीड तासांमध्ये मोदी बैठक पूर्ण करून निघूनही गेले. आता मुख्यमंत्री फडणवीस यांची सगळे वाट पाहत होते. तासभर कोणीच खाली आले नाही. मग कानावर आले की, मोदींबरोबरची बैठक संपली असली तरी शहांशी चर्चा सुरू आहे. तेवढय़ात राज्यातील एक मंत्री भाजप मुख्यालयात दिसले. ते बैठकीला नव्हतेच. ते नेमके का आले होते, हे कळले नाही. त्यांचे केंद्रीय मंत्र्यांकडे काम होते. हे केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या उमेदवार निश्चितीच्या बैठकीत असल्याने त्यांनी राज्यातील मंत्र्यांना भाजप मुख्यालयावर बोलावलेले होते. केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांमध्ये काय बोलणे झाले, हेही कळायला मार्ग नाही. पण राज्यातील या मंत्र्याला अखेपर्यंत तिकीट मिळाले नाही. त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती.

निवृत्तिवेतन गरजूंसाठी..

माजी केंद्रीय अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांची पत्नी संगीता यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलेय. दिवंगत खासदाराची पत्नी या नात्याने त्यांना मिळणारे निवृत्तिवेतन राज्यसभेच्या गरजू कर्मचाऱ्यांना दिले जावे, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. ‘अरुण जेटलींना वकिलीच्या व्यवसायात व राजकीय क्षेत्रातही मोठे यश मिळाले. समाजाने भरभरून दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला, गरजूंना मदत केली. त्यामुळे त्यांच्या पश्चात पत्नीला मिळणारे निवृत्तिवेतनही गरजूंच्या मदतीसाठी दिले पाहिजे,’ असे पत्र संगीता जेटली यांनी पंतप्रधान मोदी यांनादेखील पाठवले आहे.