डॉ. बाबा आढाव
समाज परिवर्तनामध्ये सामान्य कष्टकरी, शोषित आणि वंचितांना सामावून घेत समाजवादी चळवळीचा पाया व्यापक करण्यामध्ये जॉर्ज फर्नाडिस याचे योगदान अतुलनीय असेच आहे. केवळ कामगारच नाही तर अन्य घटकांच्या चळवळी, त्यांचे प्रश्न याची त्याला उत्तम जाण होती. अशा चळवळींच्या पाठीशी तो आपली ताकद उभी करायचा. आमच्या ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीला त्याचा सक्रिय पाठिंबा होता. नगर जिल्हय़ात जोगतिणी प्रथेला विरोध करीत त्यांच्या पुनर्वसनासाठी मी काम करत होतो. त्या वेळी एक छोटीशी चिठ्ठी मला त्याने पाठवली होती. ‘ऑल स्ट्रेंथ ऑन युवर शोल्डर.’ एवढा एका ओळीचाच मजकूर होता, पण त्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला बळ मिळाले.
संघटना बांधणीचे म्हणून जॉर्ज याचे एक वेगळे तंत्र असायचे. ते कदाचित कोणाला मान्य होईल किंवा मान्य होणारही नाही. पण, संघटनेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता असावी ही त्याची त्यामागची भूमिका होती. संघटनेमध्ये अध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार या महत्त्वाच्या पदांवर त्याला आपली माणसं हवी असायची. शरद राव आणि माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांचे बंधू बाळ दंडवते हे चळवळीतील आणि मधू लिमये हे वैचारिकदृष्टय़ा जॉर्ज याचे जवळचे मित्र होते. कामगाराची दुखरी नस त्याला नेमकेपणाने ठाऊक असायची. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याची धडपड आणि तळमळ वाखाणण्याजोगी होती.
केवळ समाजकारणात राहून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी राजकारणात गेलं पाहिजे ही जॉर्जची धारणा होती आणि ते त्याने साध्य करून दाखवले. त्या काळी काँग्रेसचे प्रस्थ असलेल्या स. का. पाटील यांच्याविरुद्ध त्याने निवडणूक लढवली. पाटील यांच्या प्रचारामध्ये ‘पीपीपी’ असे फलक लागलेले असायचे. त्याचा प्रतिवाद करताना अफाट कल्पनाशक्ती असलेल्या जॉर्ज आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ‘पीपीपी’ म्हणजे ‘पाटील पडलाच पाहिजे’ असे फलक लावले होते. त्याचा मतदारांवर योग्य तो परिणाम झाला आणि स. का. पाटील यांचा पराभव करून जॉर्ज विजयी झाला. अशी त्याची झेप जबरदस्त होती. संपसम्राट हीच जॉर्जची ख्याती होती. त्या काळी मुंबईला गिरगावात त्याने बॉम्बे लेबर युनियनसाठी कार्यालय घेतले होते. बडोद्यातील ‘डायनामाईट’ प्रकरणापासून ते ‘डायलॉग’ असा त्याचा धडाका होता. या झंझावाताची आजारपणामुळे अशी दुर्दैवी अखेर झाली याचे मित्र म्हणून वाईट वाटते.
४२ वर्षांनी आरोपातून मुक्तता
जॉर्ज फर्नाडिसने १९७५ मध्ये रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला होता. त्याला पाठिंबा म्हणून मी, बा. न. राजहंस आणि शांताराम दिवेकर अशा काही जणांनी डेक्कन क्वीन अडवली होती. त्याबद्दल आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. संप पुकारणारा जॉर्ज बाजूला राहिला आणि पुढे राजकारणात जाऊन मंत्री झाला. आमच्या मागे तारखांना न्यायालयात हजर राहण्याचे काम आले. या खटल्यातील साक्षीदार आणि बरेचसे आरोपी काळाच्या पडद्याआड गेले. तब्बल ४२ वर्षांनी म्हणजे दोन वर्षांपूर्वी मी आणि शांताराम दिवेकर यांची या आरोपातून मुक्तता करण्यात आली.