२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याही वर्षी असे  कार्यक्रम होत आहेत. या घटनेला ९० वर्षे होत आल्याने आता अशा नकारात्मक कार्यक्रमांची आवश्यकता का उरलेली नाही, याची चिकित्सा करणारा लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याही वर्षी असे असंख्य कार्यक्रम होत आहेत. खरोखरच काय साधतो आपण हे सारे करून? गेल्या वर्षी याच दिवशी मुंबईत पुरोगामी-डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी एक मोठा मोर्चा काढला होता. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यातल्या बऱ्याच जणींनी तिथे भाषणे केली. काहींनी परिवर्तनाची जोशपूर्ण गाणी म्हटली, तर काहींनी पथनाटय़े सादर केली. स्त्रियांवर शेकडो वर्षांपासून अन्याय-अत्याचार होत आलेत, ते थांबले पाहिजेत. महिलांशी सन्मानाचा, समतेचा, न्यायाचा व्यवहार झाला पाहिजे, असा या भाषणांचा आशय होता. या सर्व भाषणांमध्ये स्त्रियांना गुलाम करणाऱ्या मनुस्मृती या धर्मग्रंथाचा विषय निघणे साहजिकच होते. अर्थातच शेवटी, मनुस्मृतीचे प्रतीक तयार करण्यात आले आणि त्याचे संतापदग्ध अभिनयासह दहन करण्यात आले.

विद्रोही, क्रांतिकारी वगरे लोकांच्या संमेलनांमध्येही हटकून मनुस्मृती दहनाचा समावेश असतो. बऱ्याचदा हा ‘धगधगता’ प्रसंग साजरा करूनच कार्यक्रम सुरू केला जातो. मंचावर चातुर्वण्र्य व्यवस्थेचे प्रतीक म्हणून एकावर एक चार मडकी ठेवून ती उतरंड दातओठ खात रागारागाने लाकडाच्या दांडक्याने फोडणे, हा पुरोगामी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा आणखी एक ‘अभिनव’ प्रकार अलीकडे रूढ होऊ पाहतो आहे. कितीही प्रयत्न केले तरी समाजात परिवर्तनच होत नाही, अशी तक्रार पुरोगामी-परिवर्तनवादी करत असतात. सगळ्याच गोष्टी इतक्या उथळ पातळीवर चालल्या असतील तर कसे होईल परिवर्तन?

विषमता, शोषण यांसारख्या समाजविघातक तत्त्वांचा अर्क असणारा मनुस्मृती हा धर्मग्रंथ बाबासाहेबांनी एकदाच जाळला आणि नवा विचार करायला सुरुवात केली. त्यांनी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ ही केशवसुतांची तुतारी फुंकली आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही. सावध होऊन पुढच्या हाका ते ऐकू लागले. मनुस्मृती जाळणारे लोक मात्र दरवर्षी आठवणीने २५ डिसेंबरची वाट पाहतात आणि त्या दिवशी साग्रसंगीत, वाजतगाजत, त्वेषपूर्ण आविर्भावात मनुस्मृती जाळतात!

डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्याला पुढच्या वर्षी ९० वष्रे पूर्ण होतील. त्यानंतरची आज तिसरी किंवा चौथी पिढी हयात आहे आणि तिचाही मनुस्मृती जाळण्यावर भर आहे! अशा किती पिढय़ा आपण मनुस्मृती जाळणार आहोत? जे जाळून टाकायच्या लायकीचे आहे ते दरवर्षी आठवणीने जाळत बसण्यात काय अर्थ आहे? मनुस्मृतीबद्दलचे हे छुपे आकर्षण तर नाही ना? डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अजूनही मनुस्मृतीच का आठवते? ती एकदा जाळून टाकलीय ना? बाबासाहेबांनी मनुस्मृती जरूर जाळली, पण तो त्यांच्या चळवळीचा प्रारंभिबदू होता, दरवर्षी करायचा उत्सव नव्हे आणि अंतिम टप्पा तर नव्हेच नव्हे! मनुस्मृती नष्ट केल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि नव्या पिढीच्या हातात समर्थ पर्याय दिला. एखादी गोष्ट मुळापासून संपुष्टात आणायची असेल, कायमची विस्मरणात टाकायची असेल तर तिच्या जागेवर नवे बॅनर, नवी तत्त्वमूल्ये, नव्या निष्ठा आणि धारणा निर्माण कराव्या लागतात, हा ‘पोकळी-पर्याय’ सिद्धान्त आहे. डावी मंडळी असा पर्याय कधी देणार आहेत? का आणखी पाच-पंचवीस वर्षांनीही त्यांचा कार्यक्रम मनुस्मृती जाळण्याचाच असणार? चांगले पीक घ्यायचे असेल तर प्रथम त्या शेतातील तण काढावे लागते. उत्तम पीक घेण्याचा हा पहिला भाग असतो. त्या शेतात उत्कृष्ट प्रतीचे बीजारोपण करून त्याची मशागत करणे हा दुसरा भाग असतो. मनुस्मृती जाळणे हा बाबासाहेबांच्या क्रांतीचा नकारात्मक पूर्वार्ध होता. त्या क्रांतीचा सकारात्मक उत्तरार्ध १९५६ साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर अवतरला. पुरोगामी लोक मात्र केवळ पूर्वार्धावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत! उत्तरार्धाचे काय? तण काढल्यानंतर ती शेतजमीन (नवे बीज न पेरता) तशीच मोकळी ठेवली तर तीत पुन्हा तणच उगवून येते. वारंवार मनुस्मृती जाळणे म्हणजे वारंवार तण उपटून काढणे!

या संदर्भातला आंबेडकरांचा मार्ग हा गोळीबंद पॅकेजसारखा आहे. त्याचा फक्त पहिला अर्धा भागच अनुसरला तर ‘काय नको आहे’ एवढेच समजेल. ‘काय हवे आहे’ हे समजावून घ्यायचे असेल तर दुसरा अर्धा भाग लक्षात घेणे आणि तो निष्ठेने आणि डोळसपणे अनुसरणे आवश्यक ठरते. लोकरहाटी केवळ नकारावर चालत नाही, स्वीकारावर चालते. स्वीकाराचा अपरिहार्य टप्पा म्हणून प्रारंभी काही नकार द्यावे लागतात. मनुस्मृतीला नकार हा त्यातला एक भाग आहे.

इथे एक मूलगामी प्रश्न उपस्थित करावासा वाटतो तो म्हणजे, मुसलमान किंवा ख्रिश्चन लोक मनुस्मृती जाळतात का? (वरकरणी हा प्रश्न भलताच बालिश वाटेल, पण तो तसा मुळीच नाही.) या प्रश्नाचे उत्तर सोपे असले तरी तेच फार महत्त्वाचे आहे. मुसलमान हे मुसलमान आहेत किंवा ख्रिश्चन हे ख्रिश्चन आहेत म्हणून ते मनुस्मृती हा काय प्रकार आहे आणि त्यात काय लिहिलेय, याचा विचार करत नाहीत! त्यामुळे ते मनुस्मृती जाळण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते िहदू नसतात, त्यामुळे त्यांनी िहदूंच्या धर्मग्रंथांबद्दल काही भूमिका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनुस्मृतीबद्दल कसलीच भावना त्यांच्या मनात नसते. तिच्याशी संबंधच नसतो! मनुस्मृती हा विषयच त्यांच्या निष्ठेच्या कक्षेबाहेरचा असतो. नेमके हेच मर्म लक्षात घेऊन पुरोगामी मंडळींनी जाळण्याच्या पातळीवर नव्हे, तर निष्ठेच्या पातळीवर मनुस्मृतीशी असलेला संबंध संपुष्टात आणला पाहिजे. तसे केले की मग मनुस्मृतीची आठवण होण्याचे काहीच कारण असणार नाही आणि ऊठसूट तिचे दहन करून तिला अकारण प्रसिद्धी देण्याची आवश्यकता उरणार नाही.

मनुस्मृतीला संविधान हा संपूर्ण-समग्र पर्याय नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. मनुस्मृती ही एकाच वेळी व्यक्तिजीवन आणि समाजजीवन नियंत्रित करत होती. त्यातल्या समाजजीवनाच्या भागापुरता संविधान हा पर्याय आहे. व्यक्तिजीवनाच्या भागाला पर्याय काय? संविधान व्यवस्थित अंगीकारले की झाले, असा विचार अनेक जण करतात. मात्र हा विचार अपूर्ण आहे. संविधानापलीकडेही माणूस आणि माणसाचे विश्व असते. त्याला धार्मिक-सांस्कृतिक-कौटुंबिक-खासगी विश्व म्हणतात. या विश्वातील मनुस्मृतीच्या प्रतिगामी उच्छादाला पर्याय काय? बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान दिले आणि त्यानंतर सात वर्षांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दिला. संविधानाद्वारे त्यांनी उत्तम सार्वजनिक जीवनाची वाटचालसंहिता दिली. धम्माद्वारे उत्तम व्यक्तिगत जीवनाची मूल्यसरणी दिली. व्यक्तीला, समाजाला, देशाला फक्त संविधान पुरेसे आहे, असे त्यांनी मानले नाही. त्यापलीकडेही माणसाला धर्माची, संस्कृतीची गरज आहे हे त्यांनी जाणले आणि त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी सर्वोत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्याची खबरदारी घेतली. मनुस्मृतिदहन केल्यानंतरची ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी डावे-पुरोगामी पार पाडणार आहेत काय? मनुस्मृती जाळल्यानंतर त्याऐवजी काय स्वीकारायचे आणि जीवननिष्ठा कशाशी जोडून घ्यायची हे ठरविणार आहेत काय? जोपर्यंत ही गोष्ट ते ठरविणार नाहीत तोपर्यंत त्यांना मनुस्मृतीच जाळणे भाग आहे आणि मनुस्मृतिदहन ही आता कसलीही रिस्क नसलेली सोपी गोष्ट होऊन बसली आहे. आम्ही अजूनही पुरोगामी आहोत, हे दाखविण्यापुरताच आता तिचा उपयोग उरला आहे. मनुस्मृतिदहन करून आपण भारतीय संस्कृतीमधली सर्वात वाईट गोष्ट निदर्शनास आणतो आणि तसे करण्याची आवश्यकताही काही प्रमाणात आहे; परंतु त्यापेक्षा जास्त आवश्यकता आपल्या संस्कृतीमधला सर्वात उज्ज्वल ठेवा अधोरेखित करण्याची आहे आणि हे मात्र आपण कटाक्षाने टाळतो. हा संस्कृतीशी केलेला अप्रामाणिकपणा आणि पक्षपातीपणा नव्हे काय? आज नागपुरात मनुस्मृतिदहनाऐवजी संस्कृतीमधले सर्वात सुंदर संचित आपल्या मुठीत सामावून घ्यायला असंख्य ओबीसी बांधव निघालेत, ही खरी प्रामाणिक भूमिका आणि विधायक कृती म्हटली पाहिजे.

sandvishwa24214@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr babasaheb ambedkar manusmriti dahan
First published on: 25-12-2016 at 03:15 IST