डॉ. भालचंद्र मुणगेकर

‘लोकसत्ता’च्या १० ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध झालेले ‘खांडेकरांच्या ‘ययाति’बद्दल काही प्रश्न..’ या मथळ्याचे पत्र आणि त्यावर, नरहर कुरुंदकर यांच्या विवेचनाचा संदर्भ देणारी प्रतिक्रिया, यांतील मुद्दय़ांचा प्रतिवाद करणारे हे विश्लेषक टिपण..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

‘खांडेकरांच्या ‘ययाति’बद्दल काही प्रश्न..’ हे वाचकपत्र (‘लोकमानस’, १० ऑक्टोबर) वाचले. त्यानंतर १६ ऑक्टोबरच्या अंकात ‘‘ययाति’ ही वि. स. खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी..’ हे पत्रही वाचले. त्यातील मुद्दय़ांबाबत..

पहिल्या पत्रात मांडलेले मुद्दे असे : हस्तिनापूर गंगेपासून ११ कि.मी., तर यमुनेपासून १८० कि.मी. लांब असताना आणि त्यातही ‘त्या काळी’ मुळात हस्तिनापूर अस्तित्वात नसताना ती ययातिची राजधानी असल्याचे खांडेकरांनी का दाखवले? ययातिपासून देवयानीला दोन व शर्मिष्ठेला तीन मुलगे असताना कादंबरीत फक्त यदु आणि पुरुचाच उल्लेख का?

‘ययाति’च्या संदर्भात हे मुद्दे गैरलागू आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी की, हस्तिनापूर हे उत्तर प्रदेशमधील मीरतच्या ईशान्येकडे साधारण ३५ कि.मी. दूर गंगेच्या काठावर आहे. भरत राजाच्या पाचव्या पिढीतील ‘हस्ती’ या राजाने ते शहर वसवले, त्यावरून हस्तिनापूर हे नाव पडले. त्यामुळे तो खांडेकरांचा दोष मानला, तरी हस्तिनापूर नेमके कुठे आहे, हे सांगणे ‘ययाति’चा उद्देश नाही. दुसरे, देवयानीला ययातिपासून दोन मुलगे होते- यदु आणि तुर्वसु. खांडेकरांनी फक्त यदुचा उल्लेख केला. यदु हा ‘यादव’ ‘घराण्या’चा जनक मानला जातो. बरे, त्यावरून काय सिद्ध होते? पुरुच्या बाबतीत सांगायचे तर, त्याचा कादंबरीत नेमका काय ‘रोल’ आहे, हे खांडेकरांनी दाखवले आहे.

दुसऱ्या पत्रलेखकाने नरहर कुरुंदकरांचे ‘ययाति’चे विवेचन (‘भाष्य’ फार मोठा शब्द) दिले आहे. ते तर हास्यास्पद आहे. मराठी साहित्यात- आपण खांडेकर यांच्यावर टीका केली नाही तर आपली साहित्यसेवा अपुरी राहील, असे समजले गेल्यामुळे जितकी त्यांच्यावर, विशेषत: ‘ययाति’वर टीका झाली, तितकी अन्य कुणा साहित्यिकावर झाली नसावी. परंतु कुरुंदकरांचे विवेचन वाचून खांडेकरांचे ‘टीकाकार’ परवडले, पण कुरुंदकर यांच्यासारखे ‘समर्थक’ नको, असे खेदाने म्हणावे लागते. महाभारतातील एका पौराणिक उपकथेवर आधारित ‘ययाति’चा मुख्य आशय माणसाचा (येथे पुरुषाचा) अतृप्त भोगवाद कोणत्या थराला जाऊ शकतो, हे दाखवणे आहे. पुरेपूर लैंगिक उपभोग घेतल्यानंतरही उपभोगाची इच्छा अतृप्त राहिल्यामुळे ययाति स्वत:च्या मुलाचे- पुरुचे तारुण्य घेतो, हा ययातिच्या विकृतीचा कळस आहे. शेवटी उपरती होऊन म्हणा, उ:शापाच्या निमित्ताने तो पुरुला त्याचे तारुण्य परत करतो. याचे दुसरे टोक म्हणून सर्व विकारांवर विजय मिळवण्याच्या नादात ‘यति’ ‘विकृत’ होतो.

‘ययाति’ या कादंबरीचा आणि समाजवादाचा सुतराम संबंध नाही. माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण करणे, हे समाजवादाचे एक सर्वात प्रमुख उद्दिष्ट आहे. कार्ल मार्क्‍सच्या भौतिकवादाचा स्वीकार केल्याशिवाय समाजवादाचा विचार असंभव आहे. आता समाजवादही कोसळला आहे. ‘गांधीयन समाजवाद’ अशी कोणतीही वैचारिक व्यवस्था नाही. भारतातील समाजवाद्यांवर तथाकथित ‘गांधीयन समाजवादा’चा मोठा प्रभाव होता. त्याच अर्थाने खांडेकर ‘गांधीयन समाजवादी’ होते. एकदा ‘गांधीयन समाजवादा’चा स्वीकार केल्यानंतर खांडेकरांच्या जीवनाचे वेगळे तत्त्वज्ञान कोणते? त्यामुळे ‘‘ययाति’ ही खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी’ हे कुरुंदकरांचे विवेचन उथळ आहे.

आजचा माणूस अधिकाधिक उपभोगवादी होत चालला आहे. वाढता ‘चंगळवाद’ शोषण आणि त्यातही स्त्रियांचे लैंगिक शोषण हे त्याचे आजचे हिणकस व विकृत स्वरूप आहे. ययाति हा त्याचा प्रतिनिधी आहे. भारतात २०१९ मध्ये स्त्रियांवर चार लाख पाच हजार ८६१ अत्याचाराच्या घटना घडल्या आणि प्रत्येक दिवशी ८७ स्त्रियांवर बलात्कार झाले. हे बलात्कार करणारे सर्व ‘आजचे ययाति’ आहेत. शेवटी प्रश्न कचाचा. कच हा आजच्या मानवी जीवनात झपाटय़ाने हरवत चाललेल्या विवेकवादाचा प्रतिनिधी आहे. म्हणून माझ्या मते, कच हा ‘ययाति’ कादंबरीचा ‘प्रतिनायक’ आहे. केवळ ‘ययाति’च नव्हे, तर मानवतावाद आणि त्यात अनुस्यूत असलेला विवेकवाद ही खांडेकरांच्या साहित्यनिर्मितीची दोन प्रमुख वैशिष्टय़े आहेत.

(लेखक माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)