सूक्ष्म जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील त्या नामवंत वैज्ञानिक. भारताला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठीची पहिली आधुनिक ‘कंप्रेस्ड बायोगॅस’फॅक्टरी त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. कृषी अवशेषांपासून ऊर्जानिर्मिती करून देशाला नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर बनवणाऱ्या आणि आपली उत्पादने निर्यात करून देशाच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करणाऱ्या डॉ. आरोही कुलकर्णी आहेत आजच्या दुर्गा.
वैज्ञानिक संशोधनाचा देशभरातील नागरिकांना त्यांचे रोजचे आयुष्य जगताना कसा उपयोग होतो, याविषयी माहिती देणारे आणि यासाठी कार्य करणाऱ्या संशोधकांचा परिचय करून देणारे एक लहानसे पुस्तक आरोही यांनी इयत्ता आठवीत असताना वाचले. या पुस्तकातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी वैज्ञानिक होण्याचा दृढ निश्चय केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. त्याचं मध्यमवर्गीय मराठी कुटुंब. घरी विज्ञानक्षेत्रात काम करणारं कुुणीही मार्गदर्शक नाही, तरीही त्यांनी ‘सूक्ष्म जैवतंत्रज्ञान’ हा विषय घेऊन पुण्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या ‘राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळे’त नोकरीसाठी रुजू झाल्या. तिथे त्यांना डॉ. अदिती पंत आणि डॉ. विद्या गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली एका प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याचकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी डॉ. माला राव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. साठी संशोधनाला सुरुवात केली. हे संशोधन करत असताना त्यांना उपयोजित संशोधनाची (Applied Research) गरज पुन्हा एकदा विशेषत्वाने जाणवली आणि आपली बुद्धिमत्ता समाजोपयोगी कामांसाठी वापरण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांना न्यू यॉर्क येथील ‘रेनस्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट’ येथे व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून जाण्याची संधी मिळाली. पण परदेशात जाण्याचा हा निर्णय सोपा नव्हता. कारण त्यांची मुलगी त्यावेळी अवघी अडीच वर्षांची होती. त्यांनी तिला घेऊन जाण्याची तयारी केली. यासाठी नवऱ्याचा पाठिंबा असला, तरी कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलून त्यांची मानसिकता तयार करणे, स्मार्टफोन नसण्याच्या त्या काळात ई-मेल्सवर तिकडचे प्राध्यापक, संस्था आणि इतरांशी संपर्क साधून सगळ्या प्रकारच्या व्यवस्था होतील हे बघणे…अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्याच, शिवाय त्यांनी तिथे राहून आई आणि वैज्ञानिक संशोधिकेची दुहेरी भूमिकाही यशस्वीपणे सांभाळली. भारताला औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी बनवणे हे ध्येय त्यांनी बाळगले होते. आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या भारतात परत आल्या.
भारतात परतल्यावर ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया फक्त प्रयोगशाळेत, असा समज असण्याचा तो काळ होता, पण प्रत्यक्ष कारखान्यात काम करायला स्त्रियाच नसल्यामुळे त्यांच्यासाठी कुठल्याच वेगळ्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे ‘सुरक्षारक्षकापासून सहकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ही बाई कसं काम करेल’, अशी शंका होती. अनेकांनी ती बोलूनही दाखवली. पण आरोही त्यांच्या मताशी अतिशय ठाम आणि नि:शंक असल्यामुळे त्यांनी इतरांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधली. त्यांच्या अडचणींचे आणि शंकांचे पूल पार करून त्या निश्चयाने कामाला लागल्या. त्यादरम्यान अमेरिकेतील ‘कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी’ येथे ‘नेहरू-फुलब्राईट फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली. या काळात लिग्नोसेल्युलोसिक इथेनॉल, ॲनिमल हेल्थकेअर प्रॉडक्ट्स, आणि कंप्रेस्ड बायोगॅस (सीबीजी)यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यापारीकरण यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
भारताला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी पहिली आधुनिक ‘सीबीजी’फॅक्टरी त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचबरोबर कृषी अवशेषांपासून ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आणण्यासाठी त्यांचे सूक्ष्म जैवतंत्रज्ञान लक्षणीय आहे. या प्रकल्पांमुळे आज देश नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतात आयात होणाऱ्या उत्पादनांचे पर्याय शेतकऱ्यांना ‘मेक इन इंडिया’अंतर्गत उपलब्ध करून देणे, हा डॉ. आरोही यांचा ध्यास आहे. आपली उत्पादने निर्यात करून देशाच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करणारी ही संशोधिका भारताची नाममुद्रा जागतिक नकाशावर ठळक करण्यासाठी अखंड प्रयत्नशील आहे.
डॉ. आरोही यांनी २० पेक्षा अधिक उत्पादने विकसित केली आहेत, ७ पेटंट्स मिळवले असून त्यांच्या नावावर १३ वैज्ञानिक प्रकाशने आहेत. त्यांच्या उपयोजित संशोधनामुळे प्रयोगशाळेतील संकल्पना प्रत्यक्ष उद्योगातील उत्पादने आणि तंत्रज्ञानात रूपांतरित झाल्या. प्रेसमडपासून कंप्रेस्ड बायोगॅस, कृषी अवशेषांचे मायक्रोबियल प्रिट्रीटमेंट तसेच एन्झाइमचे एप्लिकेशन, एन्झाइम व पेप्टाइड प्युरिफिकेशन, फार्मा इंटरमीडिएट्स, सेल्युलोज आणि झायलानेसेसचे औद्योगिक उपयोग यांचा समावेश आहे. त्यांचे कार्य शैक्षणिक, विज्ञान, समाज आणि उद्योगक्षेत्रांवर ठोस आणि दीर्घकालीन प्रभाव करणारे आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या संशोधनामुळे शाश्वत तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेला हातभार लागला आहे. विद्यार्थ्यांची सक्षम भावी पिढी तयार व्हावी यासाठी पुण्यातील ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ’, ‘सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’, ‘एमआयटी विद्यापीठ समूह’, ‘डी. वाय. पाटील विद्यापीठ’, ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालय’ या संस्थांशी त्या निगडित आहेत. लीडरशीप लेसन्स, व्हॅल्यूइंग व्हॅल्यूज, बिझनेस इम्प्रोव्हायझेशन यांसारख्या कार्यशाळांद्वारे अनेक संस्थांना त्या सातत्याने मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना सेंद्रिय तंत्रज्ञानातील प्रगती, तिचे लाभ आणि ‘बेटर इंडिया’ उपक्रम याविषयी माहिती देतात.
गेल्या वर्षभराहून अधिक काळ त्या ‘रेबीज’ जनजागृती सत्रे शाळा, कॉर्पोरेट्स व समुदायांत आयोजित करत असून, आजवर ३,००० हून अधिक व्यक्तींपर्यंत त्या या माध्यमातून पोहोचल्या आहेत. सध्या त्या ‘नवहिंद टेक्नॉलॉजीज एलएलपी’ आणि ‘आनंदिनी सोल्यूशन्स अँड एंटरप्रायझेस’ या संस्थांच्या संस्थापक भागीदार असून, प्रयोगशाळा, कारखाना उभारणी, नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प आणि उत्पादन विकास याबाबत मार्गदर्शन करतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर सूक्ष्म जैवतंत्रज्ञानावर आधारित नवनवे शोध लावून समाजोपयोगी कार्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. आरोही कुलकर्णी यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम.
varshapune19@gmail.com
संपर्क – ९५०३०५०२११
ई-मेल आयडी – aarohi_k@yahoo.com