गैरप्रचाराचे अणू..

अणुभट्टय़ा स्वच्छ आणि सुरक्षित असतात. किरणोत्सार निसर्गातही असतोच, त्यामुळे अणुभट्टीलाच किरणोत्साराबद्दल दूषणे देण्यात अर्थ नाही, अणुऊर्जेचा पर्याय हा स्वच्छ-सुरक्षित असल्याने तो आपण स्वीकारला पाहिजे, असा प्रचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञही करीत असतात. हा प्रचार पूर्णत: योग्य असतो का आणि नसल्यास या गैरप्रचाराचे अणू कोणती हानी घडवतात, याची चर्चा करणारा पत्र-लेख..

अणुभट्टय़ा स्वच्छ आणि सुरक्षित असतात. किरणोत्सार निसर्गातही असतोच, त्यामुळे अणुभट्टीलाच किरणोत्साराबद्दल दूषणे देण्यात अर्थ नाही, अणुऊर्जेचा पर्याय हा स्वच्छ-सुरक्षित असल्याने तो आपण स्वीकारला पाहिजे, असा प्रचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञही करीत असतात. हा प्रचार पूर्णत: योग्य असतो का आणि नसल्यास या गैरप्रचाराचे अणू कोणती हानी घडवतात, याची चर्चा करणारा पत्र-लेख..
‘चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा’ हा राजीव साने यांच्या ‘गल्लत, गफलत, गहजब’ सदरातील लेख (१७ मे) आणि ‘लोकमानस’मधील पी. ए. पाटील यांचे ‘अणुवीज प्रकल्प हा अणुबॉम्ब नव्हे’ हे पत्र (१८ मे) यांना उत्तर देणे किंवा त्याचा प्रतिवाद करण्याचा बिलकूल उद्देश नाही; मात्र काही वैज्ञानिक अंधश्रद्धा वा गैरसमज निर्माण होण्याची भीती हीच या प्रस्तुत लेखाची प्रेरणा आहे. या दोन्ही मजकुरांतून असे ध्वनित होते की, अणुवीज हा अत्यंत स्वच्छ आणि स्वस्त विजेचा स्रोत असून तो इतर सर्व ऊर्जास्रोतांपेक्षा अतिशय सुरक्षित आहे, त्यामुळे भारतानेच नव्हे तर सगळ्या जगाने याचा अंगीकार करायला हवा. यातील ‘स्वच्छ’ आणि ‘सुरक्षित’ या दोन्ही मुद्दय़ांवर जे लिखाण झाले आहे ते दुर्दैवाने अत्यंत अवैज्ञानिक आहे.
‘निसर्गात किरणोत्सार असतोच, त्याचा मानवावर काही परिणाम होत नाही त्यामुळे अणुभट्टीतील किरणोत्साराचा परिणाम कसा होईल?’ असा दावा तर श्रेष्ठ अणुशास्त्रज्ञसुद्धा करीत असतात मग अन्य लेखकांनी केला तर त्यात नवल ते काय? पण या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘किरणोत्साराचे प्रमाण कोकणात ३०००, पुण्यात १२०० तर अणुकेंद्रात फक्त ५० असते’ (म्हणजे नेमके काय असते? या आकडय़ांचे एकक काय? असो.) – यातून त्यांचा सांगायचा मुद्दा इथे लक्षात येतो तो असा की, नसर्गिक किरणोत्सारापेक्षा अणुभट्टीतला किरणोत्सार कमी असतो. हाच एक मोठा गैरसमज सातत्याने समाजात पसरवला जात आहे. समजा, लेखक म्हणतात त्याप्रमाणे आज कोकणात नैसर्गिक किरणोत्सार (खरा शब्द आहे बॅकग्राऊंड रेडिएशन) जर ३००० एकक असेल आणि उद्या दुर्दैवाने तिथे अणुभट्टी बांधली गेली तर त्या ठिकाणी आज जो ३००० एकक किरणोत्सार आहे तो शून्यावर येणार आणि फक्त अणुभट्टीतलाच ५० एकक किरणोत्सार राहणार आहे का? अणुभट्टीत असे कोणते तंत्रज्ञान आहे, जे ‘बॅकग्राऊंड रेडिएशन’ शून्यावर आणते? म्हणजेच मूळच्या बॅकग्राऊंड रेडिएशनमध्ये अणुभट्टीतल्या किरणोत्साराची भरच पडणार आहे. हा साधा युक्तिवाद आहे.
सातत्याने सगळे अणुशास्त्रज्ञ अणुभट्टीतल्या किरणोत्साराची या नैसर्गिक किंवा बॅकग्राऊंड रेडिएशनशी तुलना करून अणुभट्टीतला किरणोत्सार कसा क्षुल्लक आहे हेच पटवायचा प्रयत्न करीत असतात, मात्र त्या वेळी ते आयोनायिझग आणि नॉन-आयोनायिझग किरणोत्साराबद्दल बोलत नाहीत. केवळ इतका ग्रे आणि इतका रॅम किरणोत्सार निसर्गात असतो आणि तितका ग्रे अणुभट्टीतून होतो, असे काहीबाही सांगून लोकांची दिशाभूल करीत असतात. परंतु अणुभट्टीतला किरणोत्सार हा आयोनायिझग स्वरूपाचा असतो. म्हणजे तो अणूमध्ये न्यूक्लियसच्या भोवती जे इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यातला एखादा इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षेतून बाहेर फेकू शकतो. एखादा इलेक्ट्रॉन हरवलेल्या अशा अणूचे मग आयनमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला आयोनायिझग म्हणतात. ही प्रक्रिया जर आपल्या शरीरातील एखाद्या सूक्ष्म पेशीतल्या अणूवर झाली तर असा आयोनाइज झालेला अणू ती पेशी बघडवून टाकतो. ही पेशी बिघडण्याची प्रक्रियाच पुढे कॅन्सरचे कारण ठरू शकते. ही प्रक्रिया जर आपल्या डीएनएभोवती असलेल्या द्रवातल्या अणूवर झाली तर डीएनए बिघडू शकतो. हा बिघाड पुढे अनेक आनुवांशिक बदल घडवतो. किरणोत्साराचे परिणाम पुढच्या पिढीत दिसतात असे म्हटले जाते, त्याचे कारण हेच आहे. असा हा आयोनायिझग किरणोत्सार फक्त अणुभट्टीत निर्माण होत असतो. नसर्गिक किरणोत्सारात ही क्षमता नसते. याचा अर्थ या जगात पहिली अणुभट्टी सुरू होण्यापूर्वी आयोनायिझग स्वरूपाचा किरणोत्सार नव्हता किंवा फारच क्षुल्लक होता. ‘फारच क्षुल्लक होता’ असे म्हणण्याचे कारण असे की, हा आयोनायिझग स्वरूपाचा नसर्गिक किरणोत्सार निर्माण करण्यात एका नसर्गिक अणुभट्टीचा हातभार होता. जशी राजापूरची गंगा हा एक निसर्गातील चमत्कार आहे तशीच आफ्रिकेतील ओक्लो येथील नसर्गिक अणुभट्टी हाही एक चमत्कार आहे. ही नसर्गिक अणुभट्टी हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात कार्यरत होती, जी असा आयोनायिझग स्वरूपाचा किरणोत्सार निर्माण करीत होती. मात्र एकंदर जगाचा आवाका पाहता हा किरणोत्सार क्षुल्लक होता, कारण या अणुभट्टीची क्षमता होती फक्त शंभर किलोवॅट.
किरणोत्साराच्या बाबतीत दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ावर अणुशास्त्रज्ञ लोकांची दिशाभूल करीत असतात, तो म्हणजे किरणोत्साराचा प्रकार. अणुभट्टीतला किरणोत्सार तीन प्रकारांत मोडतो, ज्यात दोन प्रकारचे कण असतात ज्याला अल्फा आणि बीटा म्हणतात आणि तिसरे गामा नावाचे किरण. अणुभट्टीत प्रत्यक्ष अणुभंजन होत असताना हे तीनही प्रकारचे किरणोत्सार निर्माण होत असतात. मात्र अल्फा आणि बीटा हे कण असल्याने ते विविध कारणांनी वातावरणात येतात आणि तिथून अन्न, पाणी या माध्यमातून ते प्राण्यांच्या, माणसांच्या शरीरात पोहोचतात. मात्र गामा हे किरण असल्याने त्यांचा एक स्रोत असतो आणि तो अणुभट्टीत स्थित असतो. तो बाहेर येण्याची शक्यता नसते. त्यामुळे अणुशास्त्रज्ञ याच किरणोत्साराबाबत बोलत असतात आणि अल्फा आणि बीटा कणाबाबत बोलणे टाळतात. अणुभट्टीतून उत्सर्जति होणारे हे कण हे ‘आण्विक प्रदूषण’ – न्यूक्लियर पोल्यूशन असते. मात्र असे काही होते हे आपल्याला सांगितलेच जात नाही, त्यामुळे ‘न्यूक्लियर पोल्यूशन’ हा शब्दच आपल्याला माहीत नाही. आपल्याला सतत असेच भासवले जाते की अणुऊर्जा स्वच्छ आहे.
आणखी एक गैरसमज या लेखांमधून पसरण्याचा धोका आहे. लेखक म्हणतात- ‘ही जी किरणोत्सारी मूलद्रव्ये असतात त्यात सातत्याने भंजन होत असते आणि किरणोत्साराने त्याचे वस्तुमान सतत कमी कमी होत जाते, त्यामुळे ही मूलद्रव्ये आपण नाही वापरली तर ती संपून जाणार आहेत.’ ..केवळ हे लेखकच नाही तर काही अणुशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखकही अशी अवैज्ञानिक विधाने बेधडकपणे करतात. मुळात किरणोत्सारी मूलद्रव्यात भंजन होत नाही तर भंजनातून किरणोत्सारी मूलद्रव्ये तयार होत असतात. आज निसर्गात केवळ एकच मूलद्रव्य असे सापडते की, ज्याचे भंजन होऊ शकते. ते म्हणजे युरेनिअमचे एक समस्थानक ‘युरेनिअम-२३५’. याचे अर्धायुष्य असते ७०४ दशलक्ष वर्षे, म्हणजे आज पृथ्वीवर जितके ‘युरेनिअम-२३५’ असेल ते ७०४ दशलक्ष वर्षांनंतर निम्मे होणार आहे. त्यामुळे आपण ते वापरले नाही तर ते वाया जाईल, ही भीती हे शास्त्रज्ञ किती बेमालूमपणे सामान्यांच्या गळी उतरवत आहेत, पाहा! ‘एनपीसीआयएल’ने तयार केलेल्या पुस्तिका अशाच बेजबाबदार अवैज्ञानिक विधानांनी भरलेल्या आहेत. त्यांचा प्रतिवाद अनेक ठिकाणी केलेला आहे, तरीही पुन्हा पुन्हा त्याच थिअरीज का मांडल्या जात आहेत कळत नाही.    
आता पाहू या अणू अपघात. दोन्ही लेखकांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की, अणू अपघात अशी काही गोष्टच नसते, कारण अणुभट्टी ही अपघात‘प्रूफ’ असते. ‘मी जरी स्फोट करायचा असे ठरवले, तरी स्फोट घडवू शकणार नाही, असे खुद्द अनिल काकोडकरांनी सांगितले.’ हे जर खरे असेल तर मग धन्यच आहे. अणुभट्टीत स्फोट घडवायचा असेल तर जगातल्या कोणत्याही चालू स्थितीतील अणुभट्टीत थंडाव्यासाठी खेळवले जाणारे पाणी फक्त दोन मिनिटे बंद करावे आणि मग अणुभट्टी राहते की उडते ते पाहावे. आजपर्यंत जगात जे तीन महा अणू अपघात झाले त्यांचे कारण येनकेनप्रकारेण थंडाव्याचे पाणी बंद होणे हेच होते. ज्या फुकुशिमातल्या अणू अपघाताचा दाखला सातत्याने दिला जातो तो अपघात ‘बंद अणुभट्टीत झालेला अपघात’ होता हे इथे ध्यानात घ्यायला हवे. ज्या क्षणी भूकंप झाला त्याच क्षणी अणुभट्टी बंद झाली होती, कारण तशी व्यवस्था प्रत्येकच अणुभट्टीत केलेली असते. मात्र अणुभट्टी बंद होते म्हणजे वीजनिर्मिती बंद होते, मात्र भट्टीत अणुभंजनाची साखळी प्रक्रिया सुरूच असते आणि ती नियंत्रित करण्यासाठी बंद अणुभट्टीतसुद्धा पाणी खेळवणे गरजेचे असते. फुकुशिमात जेव्हा त्सुनामी आली आणि वीजपुरवठा बंद झाला तेव्हा पर्यायी वीजव्यवस्थेवर पाणी खेळवत ठेवले गेले मात्र त्याच वेळी ही पर्यायी व्यवस्था फार काळ टिकू शकत नसल्याचे लक्षात आले होते त्यामुळे पुढच्या दोन-तीन दिवसांत आसपासच्या लोकांना तिथून हलवण्यात आले. त्सुनामीनंतर सुमारे दोन-तीन दिवसांनी फुकुशिमातल्या अणुभट्टय़ांचा गाभा वितळण्यास सुरुवात झाली. तोवर आसपासच्या सर्व लोकांना तिथून हलवण्यात आल्याने त्या वेळी मरायला तिथे कुणी शिल्लकच नव्हते. यातून काय अर्थ काढायचा? की अणू अपघातात कुणी मरतच नाही? म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर भरदिवसा एखाद्या भरलेल्या थिएटरमध्ये जर आग लागली तर एका वेळी हजार लोक मरू शकतात. मात्र तीच आग जर रात्री दोन वाजता रिकाम्या थिएटरला लागली तर एकही माणूस मरणार नाही. यातून आगीत कुणीच मरत नाही, असा अर्थ काढायचा का? आपले तथाकथित अणुशास्त्रज्ञ अणुऊर्जेचे समर्थन करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात त्याचे फुकुशिमा हे उत्तम उदाहरण आहे. मुळात अणू अपघाताची तीव्रता ही किती माणसे मेली यावरून ठरतच नसते. अणुभट्टीचा गाभा वितळणे ही अणू अपघाताची सर्वात वरची पातळी आहे. थ्री माइल आयलंड, चेर्नोबिल आणि फुकुशिमात ती पातळी गाठली गेली आणि दुसरीकडे भारतीय अणुशास्त्रज्ञांनी आणि विज्ञानलेखकांनी अणू अपघाताबाबतच्या थापेबाजीची सर्वात वरची पातळी गाठली, हे भारतीय विज्ञान क्षेत्राचे दुर्दैव आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: False propaganda of nuclear