प्रशान्त बागड
लंडनमध्ये विद्यार्थी म्हणून राहत असलेले तरुण महात्मा गांधी १८९० साली पॅरिस शहर बघायला जातात. तिथं आयफेल टॉवर पाहतात. पण तो त्यांना आवडत नाही. त्यात त्यांना सौंदर्य आढळत नाही. त्यात काही तरी खोट आहे असं त्यांना वाटतं. पायी चालून पॅरिस पाहणाऱ्या गांधींना तिथली जुनी चर्चेस मात्र आवडतात. चर्चमधली शांती, चर्चची भव्यता त्यांना भावते. ‘नोत्रदाम’मधलं चित्रकाम त्यांच्या नजरेत भरतं. त्यांच्या या प्रतिक्रियेचा काय अर्थ लावायचा?
महात्मा गांधींच्या आत्मकथेत ‘महाप्रदर्शन’ नावाचं एक लहानसं प्रकरण आहे. लंडनमध्ये विद्यार्थी म्हणून राहत असलेले तरुण गांधी १८९० साली पॅरिस शहर बघायला जातात, त्याची हकीगत त्यात आहे. त्या वर्षी पॅरिसमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या वस्तू आणि जुन्या कलाकृती यांचं मोठं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. आता जगप्रसिद्ध झालेला ‘आयफेल टॉवर’ या प्रदर्शनासाठी खास घडवण्यात आला होता. या प्रदर्शनाचं ते मुख्य आकर्षण होतं. लंडनच्या वृत्तपत्रांत त्याच्याविषयी बरंच काही छापून येई. विख्यात शहर आणि तिथला हा नवा टॉवर एकाच फेरीत बघून होईल म्हणून गांधी पॅरिसला जातात.
आयफेल टॉवर म्हणजे संपूर्ण लोखंडी बनावटीचा, सुमारे एक हजार फूट उंचीचा मनोरा. एवढी उंच रचना उभी राहू शकेल असं तोवर लोकांना वाटत नसे. गांधीही कुतूहल वाटून तो बघतात. ‘दोन-तीन वेळा’ वर जातात. ‘उंचावर भोजन केल्याचे लोकांना सांगता यावे’ म्हणून ‘साडेसात शिलिंग’ खर्चून टॉवरवरच्या उपाहारगृहात फराळ करतात. पण आयफेल टॉवर त्यांना आवडत नाही. त्यात त्यांना सौंदर्य आढळत नाही. एवढंच नाही तर तो त्यांना खटकतो. त्यात काही तरी खोट आहे असं त्यांना वाटतं. ती फक्त एक ‘नवी चीज’ आहे, ‘खेळणं’ आहे, असं त्यांना वाटतं. टॉलस्टॉय यांचा आयफेल टॉवरविषयीचा प्रतिकूल अभिप्राय गांधी उद्धृत करतात. टॉलस्टॉयच्या मते, अशा वस्तू म्हणजे व्यसनांनी ‘धुंदावलेल्या बुद्धी’ची निर्मिती असून ते माणसाच्या ‘मूर्खपणाचे चिन्ह’ आहे.
पायी चालून पॅरिस पाहणाऱ्या गांधींना तिथली जुनी चर्चेस मात्र आवडतात. चर्चमधली शांती, चर्चची भव्यता त्यांना भावते. ‘नोत्रदाम’मधलं चित्रकाम त्यांच्या नजरेत भरतं. भाविकांचा नम्र भक्तिभाव त्यांच्या मनावर छाप पाडून जातो. मूर्त प्रतिमेसमोर नत होणं म्हणजे विराट सृष्टीची व सृष्टी निर्मात्याची जाणीव राखणं असं त्यांना वाटतं. ही देवळं बांधायला लागणारा खर्च त्यांना सार्थकी लागल्यासारखा वाटतो.
गांधी बुचकळ्यात पाडतात. त्यांच्या या प्रतिक्रियेचा काय अर्थ लावायचा? त्यांच्याविरोधात किमान चार मुद्दे मांडता येतील. पहिला मुद्दा असा की, गांधी कदाचित पुराणमतवादी असावेत. माणूस नव्याचा स्वीकार चटकन करत नाही. गांधीही त्यास अपवाद नसावेत. ते जुन्या देवळांनाच चिकटून राहतात आणि नव्या आयफेल टॉवरकडे सनातनी कटाक्ष टाकतात. दुसरा मुद्दा असा की, गांधींना कदाचित कलावादी-सौंदर्यवादी भान नसावं. आयफेल टॉवर ही कलाकृती आहे, ती फक्त पाहण्यासाठी, पाहून आस्वाद घेण्यासाठी निर्मिली आहे, सौंदर्यानुभव देणं हेच तिच्या अस्तित्वाचं प्रयोजन आहे, ती उपयुक्त वस्तू नाही, हे त्यांच्या गावी नसावं. अरसिक असल्यामुळे आयफेल टॉवरचं सौंदर्य त्यांना जाणवलं नसावं. त्याच्याकडून ते बोधप्रद धडय़ाचीच अपेक्षा करत राहिले असावेत. तिसरा मुद्दा असा की, कदाचित गांधी तंत्रज्ञानाचे विरोधक असावेत. संपूर्ण लोखंडी बनावट, एवढी उंची, आधाराविना उभं राहणं हे आश्चर्यकारक पलू गांधी स्वत: नोंदवतात, पण त्यांना ते अजिबात महत्त्वाचे वाटत नाहीत. त्यांना तंत्रज्ञानातलं काही कळत नसावं. वैज्ञानिक प्रगतीबद्दल त्यांना आस्था नसावी. नंतर (१९०९ साली) लिहिलेल्या ‘हिंद स्वराज’मध्ये ते रेल्वेचा, वैद्यकशास्त्राचा धिक्कार करणारच आहेत. चौथा मुद्दा असा की, कदाचित गांधींची धार्मिक वृत्ती आड येत असावी. त्यांचा मूलत: देवाधर्माकडे ओढा होता. त्यामुळे त्यांना देवळं आवडणारच. ‘नोत्रदाम’ची कलाकुसर त्यांना आवडली ती त्यांच्या धार्मिक, आध्यात्मिक, पारलौकिक पूर्वकल्पनांमुळे; कलात्मक कारणासाठी नाही.
गांधींच्या नापसंतीची अशी वासलात लावता येईल का? लावावी का? त्यांनी केलेली आयफेल टॉवर आणि चर्च यांची तुलना या चार निकषांच्या आधारे आपण खरंच मोडीत काढू शकू का? आयफेल टॉवर हा गांधींच्या दृष्टीनं केवळ आधुनिक, तंत्रज्ञानाधारित, सुखासक्त जीवनशैलीची नकोशी खूण आहे आणि चर्च पारंपरिक, धर्माधारित, पापभिरू अशा मावळत्या जीवनसरणीचं द्योतक आहे, असं साधं द्वंद्व मांडून भागेल? की या तुलनेत, या मूल्यमापनात आणखी काही दडलं आहे?
गांधींच्या विचारांवर ज्यांचा खोल प्रभाव पडला होता आणि आयफेल टॉवरसंबंधीचे ज्यांचे कडू उद्गार गांधी उद्धृत करतात, ते टॉलस्टॉय गांधींच्या या पॅरिसभेटीनंतर सात-आठ वर्षांनी (१८९७-९८) ‘कला म्हणजे काय?’ या आपल्या पुस्तकात पारंपरिक कलामीमांसेची मूलगामी चिकित्सा करतात. २० व्या शतकात पारंपरिक कलामीमांसेची, विशेषत: कांटप्रणीत कलामीमांसेची, अशी चिकित्सक तपासणी दोन चिंतकांनी केली आहे : टॉलस्टॉय आणि मार्टिन हायडेग्गर. हायडेग्गरच्या चिकित्सेची बरीच चर्चा होत आहे. परंतु ‘कला म्हणजे भावनांचा संसर्ग’, ‘कला म्हणजे भावनांचं संप्रेषण’ असा थातुरमातुर सारांश सांगून उडवून लावण्यापलीकडे टॉलस्टॉयच्या कलाविचाराची दखल घेतली जात नाही. टॉलस्टॉयच्या पुस्तकात प्रचलित कलेविषयीचं आणि कलाविचाराविषयीचं जे गहिरं असमाधान आहे, तेच गांधींच्या पॅरिस निरीक्षणात आहे. म्हणूनच ‘कला म्हणजे काय?’चं भाषांतर गुजरातीत आणि इतर भारतीय भाषांत व्हावं याकडे गांधींनी नंतर आवर्जून लक्ष दिलं असावं.
सौंदर्य, विशिष्ट प्रकारचा आनंददायक अनुभव, म्युझिअम, आर्ट गॅलरी, कलासक्त लोकांचं वर्तुळ किंवा क्लब, वर्तमानपत्रांत छापून येणारी परीक्षणं, चित्रांचे लिलाव- हे प्रचलित, आधुनिक, ‘एस्थेटिक’ कलेतले आणि कलाविचारातले कळीचे शब्द आहेत. या कल्पनेनुसार कला व्यावहारिक जीवनात, रोजच्या जीवनात घडत नाही; ती दूर कुठल्या तरी क्लबात, संग्रहालयात घडते. कलेचे चार भोक्ते चांगली कला कोणती, वाईट कला कोणती, हे ठरवतात, ठरवू शकतात. त्यांच्याकडे तसा अधिकार असतो. ते समीक्षक असतात, प्रकाशक असतात किंवा गॅलरीचे चालक-मालक असतात. इतरेजन अज्ञ किंवा अप्रगल्भ असतात. कलाकृती पाहून-ऐकून-वाचून येणारा सुखद अनुभव हा कलेचा गाभा. तो ज्याला येतो त्याला येतो. गूढतेचं वलय मिरवणाऱ्या अशा क्षणिक अनुभवात कलेचा संक्षेप करणं, ज्याच्या हाती सत्ता त्याला कलेविषयी सारं काही ठरवण्याचे सर्वाधिकार देऊन टाकणं, दैनंदिन व सर्वसाधारण जीवनाला कलाशून्य लेखणं या गोष्टी टॉलस्टॉय यांना मान्य नाहीत.
टॉलस्टॉयच्या मते कला ही केवळ करमणूक नाही, केवळ फुरसत बहारदार करणारी बाब नाही; तर कला ही मानवी जीवन अस्तित्वात आणणारी, जीवनाची मानवी मिती शक्य करणारी मूलभूत गोष्ट आहे. भाषा वापरून आपण विचार वाटून घेतो. कलेमुळे आपल्याला भावना वाटून घेता येतात. भावना वाटून घेणं म्हणजे भावनेचा उच्चार करणं, भावनेला शब्द देणं, भावना समजून घेणं, भावनेत सहभागी होणं. भावनेची अभिव्यक्ती लोकांना एकत्र आणते, बांधते. कला म्हणजे असा पायाभूत संवाद. अशा संवादात सहभागी होण्याच्या कलात्मक क्षमतेत मनुष्याचं मनुष्यत्व असतं. कला ही कोणत्याही अमूर्त, तात्त्विक कल्पनेचा आविष्कार नसते. कला ही माणसाच्या अतिरिक्त ऊर्जेचा व्यय होण्यासाठी शोधून काढलेली युक्ती नसते. कला ही सुखदायी वस्तूंची निर्मिती नसते. मानवी जीवन अस्तित्वात येण्यासाठीची ती पूर्वअट असते.
कलेचं एखादं वेगळं क्षेत्र नसतं, सवतासुभा नसतो. ती सर्वत्र असते. अंगाईगीतं, विनोद, नकला, घराची सजावट, कपडे, भांडीकुंडी, आरत्या, उखाणे अशा सगळ्या वस्तूंमध्ये, रचनांमध्ये, सवयींमध्ये आढळणारी कलात्मकता कलेचा मूलाधार असते.
दैनंदिन जीवनातून उगवणारी व नेहमीच्या भावभावना व्यक्त करणारी कला महत्ता कशी प्राप्त करते? टॉलस्टॉय ‘धार्मिक आकलन’ ही संकल्पना वापरतात. धार्मिक आकलन म्हणजे चांगलं-वाईट, कल्याणकारक-हानीकारक याविषयीचे विचार; माणसाने कसं जगावं याचा शोध घेताना सापडलेली तत्त्वं; समाजाची धारणा कशी करावी याचं मंथन. हे आकलन अर्थात काळाच्या ओघात बदलत असतं. काळाच्या एका टप्प्यावर अनेक परस्परविरोधी आकलनंही मांडली जाऊ शकतात. कला हे बदल व ही भिन्नता टिपते. अस्सल कलेला, श्रेष्ठ कलेला रस असतो ते हे आकलन मांडण्यात, ते पारखण्यात, ते धसाला लावण्यात. टॉलस्टॉय अशा आकलनाला नुसतं जीवनविषयक वा समाजविषयक आकलन (किंवा तत्त्वज्ञान) न म्हणता ‘धार्मिक’ आकलन का म्हणतात? इथं मेख आहे. इथं गांधींना भावणारं सूत्र आहे. टॉलस्टॉयच्या मते, असं र्सवकष आकलन घडवण्याचा; सृष्टी, समाज, मानव यांचे संबंध तपासण्याचा; मानवाला आदर्श पुरवण्याचा कसून प्रयत्न धर्म करत आला आहे. त्यांच्या डोळ्यांपुढे अर्थात ख्रिस्ती धर्म आहे. म्हणून ते अशा चिंतन-मंथनाला व श्रेष्ठ कलेच्या मुख्य आस्थाविषयाला ‘धार्मिक आकलन’ म्हणतात.
गांधींना पसंत पडलेली चर्चेस या धार्मिक आकलन विचारार्थ सादर करणाऱ्या कलाकृती आहेत, असं म्हणता येईल. गांधी प्रतिमा-साक्षर आहेत. ते चर्चची वास्तू, तिथली चित्रं, मूर्ती ‘वाचून’ भाव ताडतात. वेगाने बदलणाऱ्या, आधुनिकतेला आपला थाटमाट मांडू देणाऱ्या जगात चर्च हे त्यांना समानशील स्थान वाटतं. चर्च म्हणजे चर्च मानतं त्या सर्व समजुती नव्हेत. चर्च म्हणजे जिथं धार्मिक आकलन पणाला लागू शकतं, गवसू शकतं असं क्षेत्र. आयफेल टॉवर निव्वळ चमत्कृती आहे. उंच काही तरी उभारण्याचा चंग आहे. एकदा कुतूहल म्हणून बघितल्यावर निरस होणारं खेळणं आहे. पण त्या खेळण्याची सावली पॅरिस शहराचा, लोकजीवनाचा, ‘नोत्रदाम’चा, लहानमोठय़ा चर्चेसचा ग्रास घेऊ शकते.
आत्मकथेतला ‘महाप्रदर्शन’ हा छोटेखानी अध्याय आणि त्यातलं गांधींचं खोल असमाधान हे कलेविषयीच्या टॉलस्टॉयवादी कल्पनेचं सूचन करतं.
(लेखक भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), कानपूर येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत.)
prashantbagad@gmail.com