हुमाच्या नवऱ्याचा हिलरींना फास
कोणत्याही निवडणुकांचं वातावरण हे युरोपातल्या हवामानासारखंच असतं, असं दिसतंय. आता ऊन आहे म्हणून बाहेर जायची तयारी करावी तर काळे ढग जमतात आणि चांगलाच पाऊस येतो. खरं तर हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवलेला असतो. पण तरी ते ऊन फसवतं.
हिलरी रोडहॅम क्लिंटन यांना असं या उन्हानं फसवलंय. आता त्यांचा विजय नक्की, प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चांगली त्यांनी १२ टक्क्यांची आघाडी घेतल्याची बातमी येऊन काही दिवस होतात न होताच तर डेमोकॅट्र्स पक्षाच्या डोक्यावर अचानक काळे ढग जमले आणि चांगलंच अंधारून आलंय.
अमेरिकेची बहुचर्चित अध्यक्षीय निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना वातावरणातला हा अचानक झालेला बदल केवळ हिलरी, अध्यक्ष बराक ओबामा यांच्याच नव्हे, तर सगळ्या जगाच्याच काळजाचा ठोका चुकवतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही राजकीय वातावरणातलं परिवर्तन झालंय त्याला खुद्द क्लिंटन जबाबदार आहेत, असं नाही. हे सगळं प्रकरण आहे हिलरी यांच्या अत्यंत जवळच्या साथीदार हुमा अबेदिन यांच्याशी संबंधित. भारतीय तीर्थरूप आणि पाकिस्तानी मातोश्री यांच्या संकरातून अमेरिकेतच जन्माला आलेल्या हुमा या हिलरी यांच्या प्रचारातल्या मुख्य सूत्रधार आहेत. त्यांचा आणि हिलरी यांचा संबंध केवळ या निवडणुकीपुरता नाही, तर याआधी हिलरीबाई गृहमंत्री असतानाही हुमा या त्यांच्या जवळच्या साथीदार होत्या. तेव्हापासूनचं जुनं हे प्रकरण आहे.
आणि तेसुद्धा फक्त हुमा यांच्याशीच संबंधित नाही. प्रकरण हा शब्द वापरायचा तो हुमा यांच्या पतीसंदर्भात. अँथनी वेनर हे त्याचं नाव. हा काँग्रेसमन. न्यूयॉर्क परिसरातनं डेमोकॅट्रिक पक्षाच्या तिकिटावर निवडून गेलेला. चांगला हुशार. तरतरीत. अगदी सिनेमातही काम केलेला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उगवत्या ताऱ्यांमधला एक. उत्तम सुरू होतं त्यांचं सगळं. तक्रार म्हणायची तर त्याच्याविरुद्ध एकच. ती म्हणजे कार्यालयातल्या सहकाऱ्यांशी उद्धट वागणं. त्यांना उशिरापर्यंत थांबवून ठेवणं वगैरे. हे एक वेळ ठीक. पण पुढे भलतंच घडलं.
त्यानं आपल्या ट्विटर खात्यातनं स्वत:चंच अर्धनग्न असं छायाचित्र एका महिलेला पाठवलं. ही महिला त्याची ट्विटरानुयायी होती. तिचा आणि याचा संबंध खरं तर फक्त ट्विटरमधनंच आलेला. तेव्हा त्या समाजमाध्यमाची मर्यादा यानं ओलांडण्याचं काहीही कारण नव्हतं. पण एवढं भान त्याला नव्हतं. मग झाला याचा बभ्रा. सुरुवातीला बराच काळ आपण असं काही केलेलंच नाही, असं तो सांगत राहिला. पण अमेरिकी माध्यमांनी ती महिला हुडकून काढली. तिची प्रतिक्रिया घेतली. तिनं यानं पाठवलेलं ते छायाचित्र दाखवलं. अखेर अँथनीला वार्ताहर परिषद घेऊन हे पाप कबूल करावं लागलं. त्या परिषदेत तो म्हणाला, की मी हे असं एकदाच केलेलं नाही. तर किमान सहा महिलांना आपण अशी छायाचित्रे पाठवलीयेत. माध्यमं त्याच्या मागे हात धुऊन लागली. त्यात लक्षात आलं एका १५ वर्षीय मुलीला त्यानं असंच काहीबाही अश्लील पाठवलंय. दुसऱ्या एका महिलेलाही तसाच संदेश. एकदा तर स्वत:च्या पोटच्या मुलाला झोपवताना त्या मुलाच्या अवस्थेतल्या स्वत:चं छायाचित्रही त्यानं पाठवल्याचं आढळून आलं. एव्हाना त्याचं लग्न हुमा यांच्याशी होऊन वर्ष झालं होतं. त्यांना मुलगा होता. आणि हे प्रकरण बाहेर आलं. माध्यमांनी या सगळ्या प्रकरणाला चतुर नाव दिलं. सेक्स्टिंग.
हे सगळं घडलं पाच वर्षांपूर्वी. हुमाशी त्यांचा संसार सुरू होताच. पण हिलरी अध्यक्षीय निवडणुकांत उभं राहण्याचं ठरलं आणि तेव्हापासनं हुमा यांना हे सगळं हाताळणं अवघड जाऊ लागलं. संभाव्य अध्यक्षाच्या साथीदाराचा नवरा हा असा विकृत कसा, असे प्रश्न माध्यमं विचारायला लागली. हिलरीबाईंची अवस्था काय अवघड झाली असेल. नवऱ्याचा.. बिल यांचा हा असाच इतिहास. आणि उजव्या हाताच्या नवऱ्याचे हे असे डावे उद्योग. टीका फारच वाढत चालली. तेव्हा यंदाच्या ऑगस्ट महिन्यात हुमा यांनी आपल्या नवऱ्यापासनं काडीमोड घेतला आणि त्या पूर्णपणे हिलरी यांच्या निवडणुकीच्या कामाला लागल्या.
अमेरिकेत सत्तापदावर नसलात तर माध्यमं तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसत नाहीत. सत्तापदावरनं शहाणपणा सांगायचा आणि वर शेणही खात राहायचं हे दोन्ही होत असेल तर मात्र माध्यमं तुमचा पिच्छा सोडत नाहीत. तेव्हा हुमा यांनी अँथनी वेनर याला तलाक दिल्यानंतर खरं तर प्रश्न मिटला होता. सगळ्यांचं सगळं सुरळीत सुरू होतं.
तर तेवढय़ात हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे एफबीआय, प्रमुखाचं प्रकरण उपटलं. ही चौकशी यंत्रणा वेनर यांच्या खासगी मेल्सचा माग काढत होती. त्यानं काय काय आणखी उद्योग केलेत हा त्यामागचा उद्देश असणार. तर त्या तपासात या यंत्रणेला हिलरी क्लिंटन यांच्या खासगी मेल्सचा धागा सापडला. आधीच हिलरी यांनी पदावर असताना खासगी मेल खात्यातनं हजारो मेल्स पाठवल्याचं प्रकरण गाजत होतंच. त्यात आता हे. पदावर असताना ही अशी खासगी मेल खाती वापरायची नसतात, हा साधा नियम. तो हिलरी यांनी मोडला आणि लाखो मेल्स स्वत:च्या खासगी खात्यातनं त्या पाठवत राहिल्या. या अशा मेल्समधनं काही गोपनीय माहितीची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे. शिवाय गोल्डमन सॅक्स, युनायटेड बँक ऑफ स्वित्र्झलड, म्हणजे यूबीएस, आदी बँकांना त्यांच्याकडनं गेलेले मेल्सही याच खासगी खात्यातले होते. या बँकांनी लाखो डॉलर्सची बिदागी बिल आणि/किंवा हिलरी यांच्या व्याख्यानांसाठी दिल्याचं यातून निष्पन्न झालं. यातले हजारो मेल्स नष्ट करण्याचा प्रयत्न हिलरी यांनी केल्याचंही आढळलं. तेव्हा या सगळ्याची चौकशी सुरू होतीच. त्यात आता हे हुमाच्या नवऱ्याचं ईमेल प्रकरण एफबीआयला आढळलं. त्याचीही चौकशी सुरू होती.
इथपर्यंत सगळं ठीक. पण या चौकशीची वाच्यता अध्यक्षीय निवडणुकीतल्या मतदानाला जेमतेम आठवडा असताना एफबीआयचे प्रमुख जेम्स कॉमे यांनी केली आणि एकच वादळ उठलं. ओबामा ते हिलरी अशा सगळ्यांनी कॉमे यांच्या उद्दिष्टांविषयी शंका व्यक्त केली. इथं एक लक्षात घ्यायला हवं, अमेरिकेत एफबीआयसारख्या यंत्रणा या स्वायत्त असतात. आपल्या सीबीआयसारखं तिथं नाही. त्यामुळे त्यांच्या प्रमुखांना अध्यक्षांकडनं आदेश घ्यावे लागत नाहीत. आपली सीबीआय म्हणजे सरकारच्या पिंजऱ्यातली पोपट असते. तसं तिकडे नाही. तेव्हा त्या अधिकाराचा वापर करून कॉमे यांनी या चौकशीची वाच्यता केली. माध्यमांनी लगेच एकच गदारोळ केला.
आणि बघता बघता जनमताचा हिलरी यांच्या बाजूने झुकणारा तराजू आधी सरळ झाला आणि नंतर अलगद डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनं झुकू लागला.
हे सगळं चारच दिवसांपूर्वी घडलं. त्यानंतर हिलरी यांनी प्रचारात अधिकच जोर लावलाय. पुन्हा जनमताचा कौल आपल्या बाजूनं यावा यासाठी त्या जंगजंग पछाडतायत. त्यांना त्यात किती यश येतंय ते आठ नोव्हेंबरला कळेलच. पण तूर्त तरी त्या दोन नवऱ्यांच्या नको त्या उद्योगात सापडल्यात एवढं नक्की. स्वत:च्या नवऱ्यानं केलेल्या उद्योगाच्या चर्चेतनं त्या जरा कुठे बाहेर येत होत्या, तर स्वत:च्या सहकाऱ्याच्या पतीनं त्यांना पुन्हा गोत्यात आणलंय. हुमाच्या नवऱ्याचा हा फास हिलरी किती सोडवू शकतात त्यावर त्यांचा व्हाइट हाऊसचा प्रवेश अवलंबून आहे.
म्हणजे ट्रम्प यांचे स्वत:चे हे असले उद्योग राहिले बाजूलाच, पण त्यांच्या प्रतिस्पध्र्याच्या सहकाऱ्याचे उद्योग उजेडात आल्यानं त्यांना दिलासा मिळलाय. त्यांना वाटतंय त्यामुळे जनता आपल्या मागे उभी राहील. खरंच होईल तसं?
निवडणूक प्रक्रिया
दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी अमेरिकी अध्यक्षपदासाठी मतदान होते. त्यानुसार अध्यक्षपदावर रिपब्लिकन पक्षाच्या वाह्य़ात, वादग्रस्त डोनाल्ड ट्रम्प यांना विराजमान करायचे की ई-मेल प्रकरणात अडकलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत अमेरिकी मतदारांना घ्यायचा आहे. ५० राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियातील मतदार मंगळवारी सकाळपासून मतदान केंद्रांपुढे रांगा लावतील. या ५० पकी कोणत्या राज्यातून कोणत्या पक्षास किती मते मिळतील याचे ठोकताळे तयार असतात. म्हणजे अमुक राज्य रिपब्लिकन समर्थक – म्हणून ते रेड स्टेट, तर तमुक एक राज्य डेमोक्रॅटांचे – म्हणजे ब्लू स्टेट. तशी काही कुंपणावरची, तळ्यात-मळ्यात असणारी राज्ये आणि मतदारही असतातच. ते नेमके कोणाला प्राधान्य देतात यावर अध्यक्षीय उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळेच निकालाची उत्सुकता टिकून असते. अध्यक्षीय निवडणुकीची ही पद्धत अतिशय पारदर्शी आहे आणि तेवढीच क्लिष्टही..
प्रायमरीज आणि कॉकसेस
आपल्याकडे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका होतात. त्यासाठी वर्षभर आधीच मोच्रेबांधणी सुरू होते. बिगूल, पडघम, नगारे, चौघडे वाजायला लागतात. अगदी तसेच नाही परंतु काटेकोर आखणीतून अमेरिकेत निवडणूक वर्षांच्या सुरुवातीपासूनच प्रचाराला सुरुवात होते. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांना आपापले अध्यक्षीय पदांचे उमेदवार निश्चित करावे लागतात. पक्षाच्या अध्यक्षांनी वा पक्षाच्या कार्यकारी समितीने अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा आणि त्याला मम म्हणत पक्षाने प्रचार सुरू करावा, असे अमेरिकेत बिलकूल नाही. निवडणूक वर्षांच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीपासूनच या दोन्ही पक्षांना प्रायमरीज किंवा कॉकसेसच्या माध्यमातून आपापले अध्यक्षीय निवडणुकीचे उमेदवार ठरवावे लागतात. ही प्रक्रिया जूनपर्यंत चालते. रिपब्लिकन अथवा डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमुक एका उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या निर्वाचकांना – इलेक्टर्सना मतदार मते देतात. याला प्रायमरीज असे म्हटले जाते. त्यातही दोन प्रकारे मतदान होते. म्हणजे एका प्रकारात मतदार येतात, मतपेटीत त्यांच्या पसंतीच्या अध्यक्षीय उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या इलेक्टरला मत टाकून जातात. मात्र, काही राज्यांत तसे नसते. तिथे फक्त पक्ष प्रतिनिधींनाच मतदान करता येते. याला बंद दरवाजाआडील मतदानपद्धती असे म्हटले जाते. खुल्या प्रायमरीजमध्ये तसे नसते. तेथे सामान्य मतदार कोणालाही मत देऊ शकतात. म्हणजे ते रिपब्लिकनांचे पाठीराखे असले तरी त्याच पक्षाच्या निर्वाचकाला मत टाकतील असे नाही. त्या त्या राज्याच्या लोकसंख्येवर संबंधित राज्याच्या निर्वाचकांची संख्या ठरलेली असते. म्हणजे मोठे राज्य असेल तर तेथील निर्वाचकांची संख्या जास्त आणि छोटय़ा राज्यासाठी कमी, असे. हे झाले प्रायमरीजचे.
कॉकसेसमध्ये पक्षनिष्ठांची मांदियाळी असते. अध्यक्षीय उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्याच्या बाजूने बोलून त्याला खुलेआमपणे पाठिंबा पक्षाच्या निष्ठावंतांकडून दिला जातो. प्रचाराचे मुद्दे काय आहेत, त्यात आणखी काय असायला हवे यावर येथे वैचारिक घुसळण होते.
प्रायमरीज आणि कॉकसेस सर्वच राज्यांत होतात असे नाही. राज्यपातळीवरील पक्ष याचा निर्णय घेत असतात. काही राज्यांत प्रायमरीज आणि कॉकसेस दोन्ही होतात. उदाहरणार्थ अलास्का आणि नेब्रास्का राज्यांत रिपब्लिकन पक्ष प्रायमरीज भरवतो तर डेमोक्रॅट्स कॉकसेस घेतात. तर केंटकी राज्यात डेमोक्रॅट्स प्रायमरीवर समाधान मानतात तर रिपब्लिकन्स कॉकसवर. या प्रक्रियेतून निवडल्या गेलेल्या निर्वाचकांनी अध्यक्षीय पदासाठी मतदान करायचे असते. मतसंघाच्या – इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून ही प्रक्रिया होते.
मतसंघ
अमेरिकी मतदार थेट मतदान करून अध्यक्ष निवडतात हा समज चुकीचा आहे. अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना नागरिकांकडे मतांचा जोगवा मागावा लागतोच, परंतु तेवढय़ावरच भागत नाही. मतसंघाची निम्मी मते मिळाली तरच व्हाइट हाऊसमध्ये जाण्याचा मार्ग निर्धोक होतो. मतदार मतदान करतात त्याला लोकप्रिय मते असे म्हटले जाते. लोकप्रिय मते जास्त आणि मतसंघाची मते कमी असे असेल तर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून संबंधित उमेदवार बाद होतो. मतसंघामध्ये ५३८ सदस्य असतात. त्यांपकी निम्मी मते अध्यक्षीय उमेदवाराला मिळवावी लागतात. प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येच्या अनुसार मते निश्चित केली आहेत. कॅलिफोíनया राज्याकडे सर्वाधिक म्हणजे ५५ मते आहेत तर टेक्सासकडे ३८. – प्रतिनिधी
विजयाची शक्यता..
१. वॉशिंग्टन
- मतसंघ मते : १२
- हिलरी : ९७.०
- ट्रम्प : ३.०
२. ओरेगॉन
- मतसंघ मते : ७
- हिलरी : ९०.८
- ट्रम्प : ९.२
३. कॉलिफोर्निया
- मतसंघ मते : ५५
- हिलरी : ९९.९
- ट्रम्प : ०.१
४. इडाहो
- मतसंघ मते : ४
- हिलरी : ०.५
- ट्रम्प : ९९.५
५. नेवाडा
- मतसंघ मते : ६
- हिलरी : ५०.१
- ट्रम्प : ४९.९
६. उताह
- मतसंघ मते : ६
- हिलरी : ३.१
- ट्रम्प : ८४.४
७. अॅरिझोना
- मतसंघ मते : ११
- हिलरी : २५.९
- ट्रम्प : ७४.१
८. मोन्टाना
- मतसंघ मते : ३
- हिलरी : ३.७
- ट्रम्प : ९६०३
९. योमिंग
- मतसंघ मते : ३
- हिलरी : ०.८
- ट्रम्प : ९९.२
१०. कोलोराडो
- मतसंघ मते : ९
- हिलरी : ७३.०
- ट्रम्प : २७.०
११. न्यू मेक्सिको
- मतसंघ मते : ५
- हिलरी : ८०.९
- ट्रम्प : १८.६
१२. टेक्सास
- मतसंघ मते : ३८
- हिलरी : ४.२
- ट्रम्प : ९५.८
१३. ओक्लाहोमा
- मतसंघ मते : ७
- हिलरी : ०.१
- ट्रम्प : ९९.९
१४. कन्सास
- मतसंघ मते : ६
- हिलरी : २.३
- ट्रम्प : ९७.७
१५. नेब्रास्का स्टेटवाईड
- मतसंघ मते : २ (नेब्रास्कातील तीन काँग्रेशनल जिल्ह्य़ांतील विजयी उमेदवारास एकेक मतसंघ मत दिले जाते.)
- हिलरी : १.६
- ट्रम्प : ९८.४
१६. साऊथ डाकोटा
- मतसंघ मते : ३
- हिलरी : ५.०
- ट्रम्प : ९५.०
१७. नॉर्थ डाकोटा
- मतसंघ मते : ३
- हिलरी : २.३
- ट्रम्प : ९७.७
१८. मिनेसोटा
- मतसंघ मते : १०
- हिलरी : ८१.६
- ट्रम्प : १८.४
१९. आयोवा
- मतसंघ मते : ६
- हिलरी : २८.८
- ट्रम्प : ७१.२
२०. मिसौरी
- मतसंघ मते : १०
- हिलरी : २.८
- ट्रम्प : ९७.२
२१. अर्कान्सास
- मतसंघ मते : ६
- हिलरी : ०.५
- ट्रम्प : ९९.५
२२. लुझियाना
- मतसंघ मते : ८
- हिलरी : ०.५
- ट्रम्प : ९९.५
२३. मिसिसिपी
- मतसंघ मते : ६
- हिलरी : १.६
- ट्रम्प : ९८.४
२४. टेनेसी
- मतसंघ मते : ११
- हिलरी : १.८
- ट्रम्प : ९८.२
२५. इलिनॉय
- मतसंघ मते : २०
- हिलरी : ९७.८
- ट्रम्प : २.२
२६. विस्कॉन्सिन
- मतसंघ मते : १०
- हिलरी : ७८.२
- ट्रम्प : २१.८
२७. मिशिगन
- मतसंघ मते : १६
- हिलरी : ७६.१
- ट्रम्प : २३.९
२८. इंडियाना
- मतसंघ मते : ११
- हिलरी : २.५
- ट्रम्प : ९७.५
२९. केंटकी
- मतसंघ मते : ८
- हिलरी : ०.३
- ट्रम्प : ९९.७
३०. अलाबामा
- मतसंघ मते : ९
- हिलरी : ०.२
- ट्रम्प : ९९.८
३१. फ्लोरिडा
- मतसंघ मते : २९
- हिलरी : ४८.०
- ट्रम्प : ५२.०
३२. जॉर्जिया
- मतसंघ मते : १६
- हिलरी : १६.०
- ट्रम्प : ८४.०
३३. साऊथ कॅरोलिना
- मतसंघ मते : ९
- हिलरी : ९.७
- ट्रम्प : ९०.३
३४. नॉर्थ कॅरोलिना
- मतसंघ मते : १५
- हिलरी : ४८.०
- ट्रम्प : ५२.०
३५. व्हर्जिनिया
- मतसंघ मते : १३
- हिलरी : ८१.१
- ट्रम्प : १८.९
३६. वेस्ट व्हर्जिनिया
- मतसंघ मते : ५
- हिलरी : ०२
- ट्रम्प : ९९.८
३७. ओहायो
- मतसंघ मते : १८
- हिलरी : ३१.०
- ट्रम्प : ६९.०
३८. पेन्सिल्व्हेनिया
- मतसंघ मते : २०
- हिलरी : ७४.५
- ट्रम्प : २५.५
३९. न्यू यॉर्क
- मतसंघ मते : २९
- हिलरी : ९९.७
- ट्रम्प : ०.३
४०. व्हर्माँट
- मतसंघ मते : ३
- हिलरी : ९७.७
- ट्रम्प : २.३
४१. न्यू हॅम्पशायर
- मतसंघ मते : ४
- हिलरी : ६१.२
- ट्रम्प : ३८.७
४२. मेन स्टेटवाईड
- मतसंघ मते : २ (मेनमधील दोन काँग्रेशनल जिल्ह्य़ांतील विजेत्याला प्रत्येकी एक मतसंघ मत बहाल केले जाते.)
- हिलरी : ७७.६
- ट्रम्प : २२.४
४३. मॅसच्युसेट्स
- मतसंघ मते : ११
- हिलरी : ९९.८
- ट्रम्प : ०.२
४४. कनेक्टिकट
- मतसंघ मते : ७
- हिलरी : ९४.६
- ट्रम्प : ५.४
४५. न्यू जर्सी
- मतसंघ मते : १४
- हिलरी : ९६.६
- ट्रम्प : ३.४
४६. मेरिलँड
- मतसंघ मते : १०
- हिलरी : ९९.९
- ट्रम्प : ०.१
४७. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया
- मतसंघ मते : ३
- हिलरी : ९९.९
- ट्रम्प : ०.१
४८. डेलावेर
- मतसंघ मते : ३
- हिलरी : ८९.८
- ट्रम्प : १०.२
४९. ऱ्होड आयलंड
- मतसंघ मते : ४
- हिलरी : ९०.५
- ट्रम्प : ९.५
५०. अलास्का
- मतसंघ मते : ३
- हिलरी : २४.२
- ट्रम्प : ७५.७
५१. हवाई
- मतसंघ मते : ४
- हिलरी : ९८.७
- ट्रम्प : १.३
शक्याशक्यतेचा खेळ
- ’ एकाही उमेदवाराला मतसंघातील अपेक्षित २७० मते मिळणार नाहीत : १.१%
- ’ मतसंघात समसमान मते : ०.७%
- ’ फेरमतमोजणी : ८.६%
- ’ हिलरींना लोकप्रिय बहुमत : ७५.९%
- ’ ट्रम्प यांना लोकप्रिय बहुमत : २४.१%
- ’ हिलरी यांना लोकप्रिय बहुमत परंतु मतसंघात पराजय : ११.९%
- ’ ट्रम्प यांना लोकप्रिय बहुमत परंतु मतसंघात पराजय : ०.६%
- ’ हिलरी यांचा एकतर्फी विजय : ५.१%
- ’ ट्रम्प यांचा एकतर्फी विजय : ०.४%
एकूण मतदारांमधील प्रमाण
- श्वेतवर्णीय – १५,६०,८४,०००
- कृष्णवर्णीय – २,७४,०२,०००
- हिस्पॅनिक – २,७३,०२,०००
- आशियाई – ९२,८६,०००
अमेरिका मतदारसंख्या
- अमेरिकेतील २०१६ च्या निवडणुकीपूर्वीचे एकूण पात्र मतदार २२ कोटी, ५७ लाख, ७८ हजार (२२,५७,७८,०००)
मतसंघ मते
- हिलरी : २९०.५%
- ट्रम्प : २४६.७%
- इव्हान मॅकम्युलिन : ०.७%
- गॅरी जॉन्सन : ०.१%
लोकप्रिय मते
- हिलरी : ४८.४%
- ट्रम्प : ४५.५%
- गॅरी जॉन्सन : ४.५%
- अन्य : १.६%
गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com