ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्मृतिशताब्दी वर्ष येत्या १९ तारखेपासून सुरू होत आहे. यानिमित्त महात्मा गांधी यांनी गोखल्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी, १९ फेब्रुवारी १९१६ रोजी पाठवलेल्या संदेशाचा संपादित अंश. बाजूचा लेख गोखले यांच्या पणतूचा..यत् करोषी यदश्नासि यत् जुहोषी ददासि यत्।
यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरूष्व मदर्पणम्? (भगवत गीता ९-२७)
जे जे काही करतोस, जे जे काही खातोस, जे काही त्याग अथवा बक्षीस म्हणून देतोस, जे काही दान करतोस, जे काही तप करतोस ते हे कौन्तेय, मला अर्पण कर.
कृष्णानं अर्जुनाला जे सांगितले, तेच जणू सर्वाची माता, भारतमाता हिने आपल्याला उद्देशून सांगितले आहे अशा थाटात महात्मा गोखले यांनी कार्य केलं. कारण त्यांनी जे जे काही केलं, जे जे काही उपभोगलं, ज्याचा त्याग केला, जे दान दिलं, जे तप केलं ते सारं या मातृभूमीसाठी.
गोखल्यांचं जीवन हे धर्मनिष्ठ माणसाचं जीवन होतं. त्यांनी जे केलं ते एका भक्ताच्या श्रद्धेनं केलं, ज्याचा मी साक्षीदार आहे. गोखले आधी अज्ञेयवादी होते. आपल्या अंगी रानडय़ांची धर्मश्रद्धा नाही, पण ती असती तर बरं झालं असतं, असं ते म्हणत. त्यांच्या कामामध्ये मला धार्मिकतेचा धागा दिसतो. त्यांचा ईश्वराविषयीच्या अस्तित्वाचा संशय हाच धार्मिकतेतून आला आहे, असं म्हणणं अयोग्य होणार नाही. जो माणूस समíपत जीवन जगतो, ज्याची राहणी साधी असते, जो सत्याचा मूर्तिमंत अवतार आहे. ज्याच्या ठायी मानवता ओतप्रोत भरलेली आहे, जो स्वत:चा म्हणून कशावरच हक्क सांगत नाही- असा माणूस धर्मनिष्ठच असतो, मग त्याला त्याची जाणीव असो वा नसो. गोखले व माझ्या वीस वर्षांच्या मत्रीमध्ये मला गोखले असे दिसले.
आमच्या १८९६ मधील भेटीनंतर गोखल्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे माझ्यासाठी आदर्शवत झाली. माझे राजकीय गुरू म्हणून मी त्यांना माझ्या हृदयात स्थान दिलं.  दक्षिण अफ्रिकेतल्या सत्याग्रहाची गोखल्यांवर एवढी छाप पडली की त्यांनी तिथे आपली तब्येत खालावलेली असतानादेखील यायचं ठरवलं. ते १९१२ मध्ये तिथे आले.  गोखले जिथे जिथे गेले तिथे यश त्यांना मिळत गेलं. अनेक जागी भारतीय आणि गोरे लोक एकत्र बसून गोखल्यांचा सन्मान करीत होते. जोहान्सबर्ग येथील मेजवानीला ४०० लोक होते, ज्यामध्ये १५० युरोपियन होते. गोखल्यांबरोबर हस्तांदोलन करण्यात त्यांच्यात चढाओढ लागली. गोखल्यांच्या भाषणात देशप्रेम ओतप्रोत भरलेलं होतं, शिवाय गोखल्यांच्या न्यायप्रियता आणि विरोधकाचा दृष्टिकोन समजून घेण्याच्या प्रवृत्तीनं ते भारावून गेले. गोखल्यांनी आपल्या भाषणात भारतीयांकरिता सन्मानीय वागणूक मागितली, पण म्हणून त्यांनी युरोपियनांचा अवमान केला नाही. गोखल्यांच्या मते, त्यांचे जोहान्सबर्गला झालेले भाषण उत्तम होते.
जनरल बोथा आणि जनरल स्मट्स यांच्याबरोबर प्रिटोरियामध्ये जी चर्चा झाली त्याच्यासाठी गोखल्यांनी केलेली तयारी थक्क करणारी आहे. आदल्या दिवशी त्यांनी माझ्याकडून आणि कॅलनबॅककडून माहिती घेतली. ते स्वत: पहाटे तीन वाजता उठले. आम्हालाही उठवलं. आम्ही आदल्या दिवशी दिलेली कागदपत्रं त्यांनी वाचली होती, शिवाय त्यावर आधारित त्यांनी आमची उलटतपासणी घेतली. मी त्यांना नम्रपणे, इतके कष्ट घेऊ नका असं सुचवलं. पण गोखल्यांनी एकदा झोकून द्यायचं ठरवलं म्हटल्यावर ते थांबणारे नव्हते. अशा अविश्रांत कामाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. दक्षिण अफ्रिकन मंत्रिमंडळानं सत्याग्रहींच्या मागण्या मान्य करणारं बिल पुढील अधिवेशनात मांडायचं मान्य केलं. शिवाय तीन पौंडाचा कर वेठबिगारांना रद्द करण्याचं आश्वासन दिलं.
गोखल्यांना दिलेलं वचन अफ्रिकन सरकारनं पाळलं नाही. त्या वचनाचं पालन व्हावं म्हणून १९१३ साली त्यांनी जे परिश्रम घेतले, त्यामुळे त्यांचं आयुष्य दहा वर्षांनी तरी कमी झालं असं मला वाटतं.  भारतामध्ये दक्षिण अफ्रिकेच्या प्रश्नावर चळवळ उभारण्याकरिता आणि फंड जमवण्याकरिता त्यांनी घेतलेल्या अमाप कष्टाची कल्पना देणं अशक्य आहे. िहदू-मुस्लीम वादाबाबतदेखील गोखल्यांचा दृष्टिकोन धार्मिक होता. एकदा एक िहदू साधू गोखल्यांना भेटायला आला. त्याचं म्हणणं होतं की, गोखल्यांनी मुस्लीम धर्माला कनिष्ठ दर्जा देऊन िहदूंना फायदा करून द्यावा, पण गोखले त्याचे ऐकेनात. तो साधू म्हणाला की, देशाचा एवढा महान नेता स्वत:ला िहदू म्हणवून घेण्यास अभिमान बाळगत नाही.  त्यावर गोखले उत्तरले, ‘‘तुम्ही जे म्हणता ते करायचं हे जर िहदुत्व असेल, तर मी िहदू नाही. कृपा करून माझा नाद सोडा.’’ मग तो तथाकथित साधू खऱ्या संन्याशाला सोडून निघून गेला.
निर्भयपणा हा गोखल्यांच्या व्यक्तित्वाचा मोठा गुण होता. धर्मनिष्ठित माणसामध्ये हा गुण असावाच लागतो. रँड आणि आयर्स्ट यांच्या खुनानंतर पुण्यामध्ये दहशतीचं वातावरण होतं. गोखले त्या वेळी इंग्लंडला होते. तिथे काही सदस्यांसमोर जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांना कोणताही पुरावा देता आला नाही. गोखले जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी युरोपियन अधिकाऱ्याची माफी मागितली. त्या वेळी काही लोकांनी त्यांना भेकड म्हणून सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला. गोखल्यांनी हा सल्ला धुडकावताना हे उद्गार काढले: ‘‘सार्वजनिक कर्तव्ये ही कुणा एकाच्या हुकुमानं सुरू होत नाहीत की कुणाच्या इच्छेमुळे सोडून देता येत नाहीत. आपण वरच्या पातळीवरून काम करतो की खालच्या, याला महत्त्व नाही. लोकांनी केलेलं कौतुक आपल्याला नेहमीच आवडतं.. पण हेच आपल्या अस्तित्वाचं अंतिम उद्दिष्ट नाही, अथवा सर्वोच्चदेखील. ’’
या थोर देशभक्तापासून आपण काही शिकणार असू तर ते म्हणजे त्यांची निस्सीम भक्ती.
आपण प्रत्येक जण वरिष्ठ कायदे मंडळाचे सदस्य बनू शकत नाही. अशा कायदे मंडळातले सदस्य देशसेवक असतात असंही नाही. आपण प्रत्येक जण पब्लिक सíव्हस कमिशनमध्ये सामील होऊ शकत नाही. त्यात सामील असणारे देशासाठी काही करतील असेही नाही. आपण गोखल्यांसारखे बुद्धिमान होऊ शकत नाही. शिवाय त्यांच्यासारखे बुद्धिमान सारेच लोक सेवक होतील असेही नाही. पण गोखल्यांकडे असणारे धर्य, सत्यनिष्ठा, धीर, नम्रता, न्यायप्रियता, सरळपणा असे सारे गुण आपण आपल्या अंगी बाणवून ते देशाला अर्पण करू शकतो. भक्ताचा हाच बाणा हवा.  
अजून ते जिवंत आहेत..
काही  वर्षांपूर्वी पहिल्यांदा गोखले वाचायला घेतले. इतिहासाच्या पानातून डोकावणारे, विविध भाषणांतून दिसणारे, समकालीनांच्या नजरेतून चितारलेले गोखले वाचले. अनेकांना भेटलो. गोखल्यांच्या अफाट आणि अचाट अशा कर्तृत्वानं स्तिमित झालो. हे सगळं वाचल्यावर वाटलं की या देशानं गोखल्यांची सातत्यानं उपेक्षाच केलेली आहे. गोखले हे मोठं विद्यापीठ आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून शिकण्यासारखं, दुसऱ्यांना शिकवण्यासारखं भरपूर आहे.
बऱ्याच जणांनी सल्ला दिला- आता गोखले कुणाला माहीत असणार? आजच्या वातावरणात गोखल्यांना काय मान मिळणार? पण जसजशा भेटीगाठी वाढायला लागल्या तसा याच्या उलट अनुभव यायला लागला. गोपाळ कृष्ण गोखले कोण, असं कुणालाही सांगण्याची वेळ आली नाही. किंबहुना अनेक वेळा मलाच लोक गोखल्यांची स्तुती ऐकवायला लागायचे. जणू ते गोखल्यांना भेटले होते, अशा थाटात. गोखले अजूनही लोकांच्या मनात आहेत याची प्रचीती आली. आम्ही गेली १०० वष्रे गोखल्यांचं नाव ‘गाजवायचा’ कोणताही प्रयत्न न करतादेखील लोकांच्या मनात ते आदराचं स्थान पटकावून होते.
एक गृहस्थ भेटले आणि मला म्हणाले, गोखल्यांचे पुतळ्यामधले किंवा फोटोमधले डोळे पाहिले तरी मला त्याची जरब वाटते. मी काही विपरीत करत असेन तर ते डोळे मला अडवतात. माझ्या अंगावर काटा आला. असं खरंच होऊ शकतं? कुणी दुसऱ्यांनी सांगितलं असतं तर मी हे उडवून लावलं असतं. एकाने आपल्या मुलाचं नाव गोखल्यांमुळे गोपाळकृष्ण ठेवलं होतं. गोखले किती खोलवर टिकून आहेत याचा प्रत्यय आला.  महाराष्ट्रात गोखल्यांच्या नावे असणाऱ्या साधारण संस्था माहीत होत्या. पण गोखल्यांच्या नावे कोलकात्यामध्ये मुलींची शाळा असेल असं मला वाटलं नाही. शिवाय ही शाळा सत्यजीत रे यांच्या आई सरला रे यांनी चालू केली असं वाचल्यावर तर मी थक्क झालो. बंगळुरूला गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अफेअर्स आहे म्हणून त्यांचा माग काढला. चेन्नईला गोखले हॉल आहे, जो अ‍ॅनी बेझंट यांनी बांधला होता. त्याची माहिती काढली. आयआयटी खरगपूरच्या एका हॉलला गोखल्यांचं नाव आहे. कुणाला हे सुचलं असावं आणि केव्हा ?आत्ता तरी माहीत नाही. यावर कडी केली ती म्हणजे- मॉरिशसला गोखले हॉल आहे असं ऐकल्यावर. म्हणजे गोखले भारताबाहेरदेखील पोहोचले होते!
या सगळ्यावर शिरपेच चढवला तो म्हणजे गोखल्यांचं पहिलं चरित्र १९१६ साली आसामी भाषेमध्ये लिहिलं आहे हे कळल्यावर. या चरित्राचं शीर्षक आहे- महात्मा गोखले- जे गांधीजी यांनी गोखल्यांना संबोधलं आहे. गोखले आणि आसामचा काय संबंध? शोधला पाहिजे, म्हणून तिथे जाण्याचा मानस आहे. नेपाळमधून आमंत्रण आहे. गोखले नेपाळलाही गेले होते की काय?  
गोखल्यांचे दुसरे शिष्य मोहम्मद अली जिना. मला वाटलं पाकिस्तान होऊन ६५हून अधिक वष्रे लोटली. ते विसरले असतील. पण जिनांच्या अधिकृत पाकिस्तानी वेबसाइटवर गोखल्यांचा उल्लेख आहे. इतकंच नव्हे, तर जिनांवर पाकिस्तान टेलिव्हिजनने बनवलेल्या सीरियलमध्येदेखील गोखले म्हणून एक पात्र आहे. पाकिस्तानात जाऊन शोध घ्यायला हवा.
जिथे गेलो तिथे गोखले या नावाने दरवाजे उघडले, माणसं जोडली गेली. गोखले हा चमत्कारच होता, नव्हे आहे. ते अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या कामाने, त्यांच्या विचारांनी. ते विस्मरणात गेले आहेत हा भ्रम आहे. ही स्मृतिशताब्दी म्हणजे त्यांचा असं जिवंत असण्याचा उत्सव आहे. गोखल्यांशी संबंधित माणसं, संस्था असे धागे जरी जोडायचे ठरवले तरी हे वर्ष अपुरं पडणार आहे.