नागपूर: स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही प्राथमिक शिक्षणासाठी दुर्गम भागांतील आदिवासी पाड्यांवरील मुलेमुली नद्या-नाले ओलांडण्याचे दिव्य पार करत असताना या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एकलव्य इंडिया फाऊंडेशन’ सातत्याने काम करत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील ३० राज्यांतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘एकलव्य’ला या कार्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.
ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण आणि विदेशातील शिक्षणाची माहितीच नाही, अशा आदिवासी आणि पाड्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, समुपदेशन करून एकलव्य संस्था त्यांना देश आणि विदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी पाठवते. यासाठी आवश्यक शिष्यवृत्ती आणि फेलोशिपही मिळवून दिली जाते. २०१७ पासून ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन’ शैक्षणिक जागरूकता, संधी, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यावर काम करत आहे. या माध्यमातून आतापर्यंत ७०० हून अधिक कार्यशाळा घेतल्या गेल्या असून पहिल्या पिढीतील पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत संस्था पोहोचली आहे. एकलव्यच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमातूनही अनेकांनी मार्गदर्शन घेतले असून आघाडीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. एकलव्यमधून प्रशिक्षण घेऊन उच्चशिक्षण घेतलेले विद्यार्थी पुन्हा नवीन विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव सांगून मार्गदर्शन करतात. ज्या विद्यापीठांची, महाविद्यालयांची नावे लोकांना केवळ ऐकून माहीत होती, त्या ठिकाणी एकलव्यचे विद्यार्थी आज प्रत्यक्ष पोहोचले आहेत.
स्वतंत्र जागेची गरज
वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडी करून द्यायची असतील तर अधिकाधिक पायाभूत सुविधांची गरज आहे. एकलव्यमध्ये भारतभरातून ३० राज्यांतील विद्यार्थी वेगवेगळ्या निवासी प्रशिक्षणासाठी येतात. त्यामुळे आता स्वतंत्र व कायमस्वरूपी शैक्षणिक संकुलाची गरज आहे. ३०० विद्यार्थीक्षमता असलेले स्वतंत्र संकुल उभे करण्याचा एकलव्य संस्थेचा मानस आहे. त्यासाठी जमीन आणि इतर पायाभूत सुविधांची गरज आहे. दरवर्षी ५००हून अधिक विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येतात. मोठ्या शैक्षणिक संस्थांत किंवा परदेशांतील संस्थांत प्रवेश मिळवताना आर्थिक प्रश्न भेडसावतात. त्यामुळे स्वतंत्र शिष्यवृत्ती फंड किंवा कॉर्पस फंड उभा करण्याची गरज एकलव्यला भासत आहे.
Eklavya Grassroots And Education Development FoundationBank Name: Cosmos Bank
Account Number: ०३७१००१०७१०८
IFSC: सीओएसबी०००००३७
Branch: नागपूर शाखा
०७, मिडास हाइट्स, सेंट्रल बाजार रस्ता, सेंटर पॉइंट हॉटेलजवळ, रामदास पेठ, नागपूर, ४४००१०