पश्चिम घाटातील कृष्णा खोरे हा तसा जल, जंगल आणि जमीन यांचा सुपीक भाग म्हणून ओळख असलेला भाग. कृष्णा बारमाही राखण्यात आणि कृष्णाकाठाला आर्थिक संपन्नता मिळवून देण्यात या नदीवरील कोयना धरण महत्त्वाचे आहे. या धरणामुळेच कृष्णाकाठ हा ऊसपट्टा समृद्ध झाला. उसाच्या शेतीवर जशी कारखानदारी फोफावली, तशी राजकीय समृद्धीही आली. गावपातळीवरच्या चावडीवर उस दराबरोबरच राजकारणाच्या गप्पांचा फड नित्यनियमाने रात्री जागवत असतो. याच आर्थिक संपन्नेतून गावपातळीवरचे पुढारी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देण्याबरोबरच सोनिया गांधी यांचे काय चुकले हे ठामपणाने सांगणारे पदोपदी भेटतात. यंदा मात्र, पावसाने डोळे वटारल्याने शिवारातील उसाला पाणी कसे पुरणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याच प्रश्नाच्या तव्यावर राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न निश्चितच विशेषत: खासदारकीची निवडणूक आल्यानंतर झाला नाही तर तो कृतघ्नपणा ठरला असता. यातूनच सांगलीचे खासदार भाजपचे असताना कृष्णा कोरडी पडण्यास शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना जबाबदार धरत प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. एकेकाळी राजीनामे खिशात ठेवून सत्ता भोगत असलेले शिवसेनेचे मंत्री आणि आता भाजपचे खासदार एकाच पंगतीला आहेत. खासदारांची राजीनाम्याची तयारी हा मतांच्या गणितात खुंटा हलवून घट्ट करण्याचा प्रयत्नच म्हणावा लागेल.
यशवंतरावांचा विसर
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाला सातारा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या सर्व विभागांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी राज्यभरातून अनेक राजकीय नेते आणि यशवंत प्रेमी येत असतात. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय सर्व विभागांना स्मृतिदिनाचा कार्यक्रम करण्याबाबत सूचना देते. मात्र साताऱ्यातील खंडाळा पंचायत समितीला शनिवारी शासकीय सुट्टी होती. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश असतानाही व सुट्टी दिवशी शिल्लक कामे उरकण्याच्या सूचना असतानाही आपल्याच इमारतीत यशवंतराव चव्हाण पुतळा अनेक वर्षांपूर्वी बसविण्यात आला आहे याचाच विसर पंचायत समितीच्या प्रशासनाला पडला. मग कोणाच्या तरी लक्षात आले आणि घाईगडबडीत साफसफाई करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तेव्हा लय भारी..
राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा (बिद्री ) शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगात आली आहे. पाहुणे – रावळे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असल्याने निवडणूक विशेष चर्चेत आहे. सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून टीकेच्या तोफा डागल्या जात आहेत. यात मेव्हण्या- पाहुण्यांची टीकाटिप्पणी लक्षवेधक बनली आहे. कारखान्याचे अध्यक्ष, राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांची साथ सोडून त्यांचे मेहुणे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए .वाय. पाटील यांनी विरोधकांना साथ दिली आहे. ते राधानगरीचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याबरोबर आहेत. त्यावरून के. पी. पाटील यांनी टीकेचे लक्ष्य करणे सोडले नाही. एका प्रचार सभेत के . पी. यांनी ए. वाय. यांचा तिरकस समाचार घेतला. ते म्हणाले, गद्दार म्हणून ज्यांचा उल्लेख पदोपदी झाला होता. गेले दशकभर बिद्री कारखान्याचा कारभार लय भारी असे राज्यभर स्तुती करीत होते ते कोणता चमत्कार घडला म्हणून रातोरात विरोधात बोलू लागले आहेत? हा प्रश्न दुसऱ्या मेहुण्यांना भंजाळून सोडत आहे.
(संकलन : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, विश्वास पवार)