गणाधिपती गणराज ही सर्जनाची देवता. गणेशोत्सवात बाप्पाचे स्मरण-पूजन करून चराचरातील सकारात्मक ऊर्जेची अनुभूती भक्तांना येते. वर्षांनुवर्षांची ही प्रेरणादायी परंपरा सध्याच्या करोना काळातही अखंड सुरू आहे. अर्थात आरोग्य जपण्याचे भान राखत यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. करोनाच्या कठीण काळातून लवकरच बाहेर पडण्याची दुर्दम्य इच्छा बाळगून सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. युवा नेत्या अशी ओळख असलेल्या राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या घरात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा होत आहे, त्यांची गणरायाच्या चरणी काय प्रार्थना आहे, हे त्यांच्याच शब्दांत..

* कौटुंबिक एकता साधणारा उत्सव

दरवर्षी आमच्या पणजोबांनी बांधलेल्या गौळवाडी येथील घरात गणेशोत्सव साजरा केला जातो. अतिशय पारंपरिक पद्धतीने हा सण आम्ही सर्व जण साजरा करतो. चुलीवरचे जेवण आणि प्रसाद यांची चव निराळीच असते. गणपती बाप्पांपाठोपाठ गौराईंचेही आगमन घरी होत असते. सर्व कुटुंबीय यानिमित्ताने एकत्र येत असतात.

* यंदा कोकणातील वादळाचा परिणाम

३ जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सर्वाधिक रायगड जिल्ह्य़ाला बसला. यात २ लाख घरांचे आणि ११ हजार हेक्टर बागायतींचे मोठे नुकसान झाले. या वादळाचा तडाखा आमच्या या कौलारू वडिलोपार्जित घरालाही बसला. या वादळात घराची पडझड झाली. भिंती आणि कौलारू छप्पर नादुरुस्त झाले. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव तिथे साजरा करणं शक्य झालं नाही. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच आमच्या सुतारवाडी येथे गणेशोत्सव साजरा होत आहे.

* लवकरच विघ्न दूर होईल!

करोनाचे संकट आणि निसर्ग वादळाच्या पाश्र्वभूमीवर अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आमच्या जुन्या घरातील आठवणी आणि चुलीवरचे जेवण यंदा आम्ही मिस करणार आहोत. करोनाचे हे संकट लवकर दूर होवो, ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. लवकरच बाप्पा हे विघ्न दूर करेल. गणपती बाप्पा मोरया..