शर्मिष्ठा भोसले sharmishtha.bhosale@expressindia.com

लहानपणापासूनच अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या लोकांमध्ये आयुष्य गेल्याने त्याविरोधात संघर्ष करायचा हे ठरूनच गेलं होतं. त्यासाठी कायद्याचं शिक्षणही उपयोगी पडलं. शिक्षण आणि धाडस यांच्या जोरावर अ‍ॅड. रंजना यांनी समाजातल्या अनेक कुप्रथांविरुद्ध संघर्ष केला. ७६ बाबा-बुवांची भोंदूगिरी उघडकीस आणली, १८१ बालविवाह रोखले, इतकंच नाही तर अनेक जातपंचायतीचं महत्त्व संपवलं.  बुवा-बाबांच्या भोंदूगिरीला उघडं पाडत सामान्यांचे डोळे उघडणं हे एकाच वेळी धाडसी आणि अतिशय धोकादायक काम करणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, अ‍ॅड. रंजना गवांदे

अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या कित्येकांचे प्रबोधन करत त्यांना नवे आयुष्य देणाऱ्या अ‍ॅडव्होकेट रंजना गवांदे १९८६ पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अमानवी प्रथा जपणाऱ्या जातपंचायती, बुवाबाजी, बालविवाह, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार अशा अनिष्टतेविरुद्ध त्यांचा यशस्वी लढा अव्याहत सुरू आहे.

रंजना यांना सामाजिक जाणिवेचे धडे अगदी नकळत्या वयातच मिळाले. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्य़ात सुरगाणा तालुक्यातल्या कुकुडणे गावचा. हा सगळा आदिवासी भाग. एकही डॉक्टर नाही. लोक अनारोग्यासह अंधश्रद्धांमध्ये खितपत पडले होते. दहा किलोमीटरच्या परिसरात फक्त एक परिचारिका असायची. तिच्यासाठीही कुठलंच वाहन नव्हतं. जंगलातून वाट शोधत आदिवासींवर उपचार करत ही परिचारिका फिरायची तेव्हा लहानगी रंजना तिच्यासोबत जायची. प्रचंड हलाखीतील लोकांना जगताना बघायची. या वातावरणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.

रंजना महाविद्यालयात गेल्या तेव्हा कळवण, देवळा, सटाणा या भागांतला दारूचा उग्र झालेला प्रश्न त्यांनी जवळून पाहिला. व्यसनाधीन पुरुष आणि त्यापायी कुटुंबांची झालेली वाताहत बघून त्यांनी व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. नंतर नाशिकला वकिली अभ्यासक्रमातलं शिक्षण घेत ‘एलएलबी’ची पदवी मिळवली. सामाजिक वास्तवाकडे पाहण्याची संवेदनशील नजर घेऊन १९८६ मध्ये वकिली व्यवसाय सुरू केला. यादरम्यान पीडित स्त्रियांचीही प्रकरणे त्यांच्याकडे येऊ लागली. त्यांची यशस्वी सोडवणूक करतानाच त्या अनेकविध सामाजिक चळवळींशी स्वत:ला जोडून घेत राहिल्या. तशातच एकदा त्यांना ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चं वार्तापत्र बघायला मिळालं. त्या करत असलेले आणि समितीचे काम यात समान धागा दिसल्याने त्या ‘अंनिस’च्या कामाकडे ओढल्या गेल्या. सुरुवातीला ‘अंनिस’च्या शाखा आणि मग जिल्हा पातळीवर त्या कार्यरत राहिल्या. गेली चार वर्ष ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या ‘बुवाबाजी संघर्ष विभागा’च्या राज्य सचिवपदाची जबाबदारी पेलणाऱ्या रंजना यांनी आजवर ७६ बाबाबुवांची भोंदूगिरी उघडकीस आणली आहे. त्यांनी सहकाऱ्यांसह केलेल्या संयमी प्रयत्नांतून अतिशय सनातनी आणि अपरिवर्तनीय मानल्या गेलेल्या अनेक जातपंचायतींचे विसर्जन झाले आहे.

बुवाबाबा आणि स्त्री शोषण हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. बुवाबाबांच्या भोंदूगिरीला उघडं पाडत सामान्यांचे डोळे उघडणं हे एकाच वेळी धाडसी आणि अतिशय धोकादायक काम आहे. सहकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी आजवर सर्वधर्मीय बाबांचं पितळ उघडं पाडलं आहे. प्रातिनिधिक उदाहरण सांगायचं, तर शिर्डीला रमेश डांगे नावाचा एक बाबा होता. तो स्त्रियांचं शोषण करायचा. ‘माझ्यात साईबाबांचा अंश आहे,’ असं म्हणत लोकांना मारायचा. एकदा एकानं आपल्या बायकोला या महाराजाकडं नेलं होतं. त्यानं त्या बाईच्या अंगातलं भूत उतरवायचं म्हणून तिला प्रचंड मारलं. ती बाई अ‍ॅड. रंजना यांच्याकडे आली तेव्हा अक्षरश: काळीनिळी पडली होती. मात्र या बाबाची भोंदूगिरी उघडकीस आणताना दीडेक हजार लोकांचा जमाव अ‍ॅड. रंजना यांच्यावर चालून आला होता. प्रसंगावधान राखत त्यांनी वेळ निभावून नेली आणि त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. भोंदू बाबा-बुवांना समाजातून उखडून टाकतानाच बळी ठरलेल्या स्त्रियांचे संवाद, व्याख्यानं, गाणी, पथनाटय़ या माध्यमांतून प्रबोधन सुरू असते. समाजाला अंधश्रद्धापासून दूर नेत, विविध घटकांचं शोषण थांबवणं, विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करणं असे हेतू ठेवून अ‍ॅड. रंजना काम करत आहेत.

जातपंचायत आणि त्यांच्या कुप्रथा याविरुद्ध मोर्चा उघडण्यातही रंजना यांनी पुढाकार घेतला. २०१३ या वर्षी नाशिकच्या प्रमिला कुंभारे या तरुणीच्या प्रकरणापासून रंजना यांनी हे काम सुरू केलं. प्रमिलाने आंतरजातीय विवाह केला होता. ती नऊ महिन्यांची गर्भवती असताना वडिलांनी तिची तिच्या वाढदिवशीच हत्या केली. पुढे जातपंचायतीच्या दबावातून तिच्या वडिलांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं. भटक्या जोशी समाजातील ही मुलगी होती. तोवर जातपंचायत आणि त्याअनुषंगाने होत असलेल्या क्रूर प्रकारांची चर्चाच झाली नव्हती. या प्रकरणानंतर ‘अंनिस’ने ८ ऑगस्ट २०१३ला नाशिकमध्ये ‘जातपंचायत मूठमाती परिषद’ घेतली. त्यानंतर लागोपाठ अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली. भटक्या जोशी समाजाने २०१६ ला नगर जिल्ह्य़ातील मढी येथे मोठय़ा मेळाव्यात जातपंचायत बरखास्त केली. त्या कार्यक्रमात रंजना यांचा सत्कारही केला गेला, हे विशेष! मुलीला क्रूर कौमार्य चाचणी करायला भाग पाडणाऱ्या कंजारभाट जातपंचायतीची, वैदू समाजाबाबतची प्रकरणेही रंजना यांनी सक्षमपणे हाताळली. पुढे जातपंचायतींना आळा घालण्यासाठी ‘अंनिस’च्या पाठपुराव्याने राज्य शासनाने २०१६ ला ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ केला. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अ‍ॅड. रंजना आणि त्यांचे सहकारी पोलिसांना नि:शुल्क प्रशिक्षण देतात. नगर जिल्ह्य़ात आजवर त्यांनी सहा कार्यशाळा घेतल्यात. सोबतच भटक्या-विमुक्तांच्या समाजात होणाऱ्या बालविवाहांना रोखण्यासाठीही रंजना कार्यरत आहेत. महिला बालकल्याण विभागाच्या सोबतीने रंजना यांनी नगर जिल्ह्य़ात ग्रामसेवक, सरपंच, आशा सेविका यांच्या बारा कार्यशाळा घेतल्या. सोबतच त्यांनी भटक्या समाजातील १५३ आणि अन्य समाजातील २८ असे एकूण १८१ बालविवाह रोखलेत. अमानुष देवदासी प्रथेविरुद्ध उभ्या राहत एक वर्षांच्या कोवळ्या मुलीचा खंडोबाशी लागणारा विवाह थांबवण्याचं श्रेयही त्यांचंच. नगर जिल्ह्य़ातील तब्बल ८०० ग्रामपंचायतींना दारूबंदी ठराव करून ते शासनाला सोपवण्यासाठी रंजना यांनी प्रेरित केलं. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक छळासंबंधाने त्यांच्याकडे राज्यभरातून वेळोवेळी सहा तक्रारी आल्या. त्यातही लक्ष घालत त्यांनी राज्य शासनासोबत पत्रव्यवहार केला.

समाजातल्या कुप्रथांवर विवेकी प्रहार करत दुर्बल-वंचितांना अभय मिळवून देणाऱ्या या आधुनिक दुग्रेला आमचा सलाम.

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

पॉवर्ड बाय– व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक,

इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

ranjanagawande123@gmail.com