स्वातंत्र्यानंतर तब्बल ७६ वर्षांनी एसटी महामंडळाची पहिली बस मारकनार गावात येणं, गावच्या लोकांना वीज, पाणी, पक्की घरकुले मिळणं, स्त्रियांसाठी बचत गट तयार करून त्यातून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं, अशा अनेक योजनांतून गावातल्या विकासकामांना गती देणाऱ्या, नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायतीतील गावांना विकासाच्या वाटेवर नेत परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या माडिया आदिवासी समाजातल्या भाग्यश्री लेखामी आहेत आजच्या दुर्गा.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वीज, रस्ते, पाणी, शिक्षण, बस यांसारख्या शहरवासीयांना सामान्य वाटणाऱ्या सोयीसुविधेसाठी आजही गडचिरोलीतील अनेक दुर्गम गावे प्रतीक्षेत आहेत. मात्र भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांचा चेहरामोहरा एका तरुणीने गेल्या पाच वर्षांत बदलून टाकला आहे, त्या आहेत भाग्यश्री मनोहर लेखामी. माडिया आदिवासी जमातीत जन्म घेतलेल्या भाग्यश्री यांना कोठी ग्रामपंचायतीच्या पहिल्या सरपंच होण्याचा मान मिळाला असून अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी येथील गावांचा केलेला विकास अनेकांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावरील भामरागड तालुका आजही नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील कोठी मध्ये १७ वर्षांनंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात मारकनार येथे राहणाऱ्या माडिया समाजातील मुलीला तिथल्या ग्रामस्थांनी सरपंच म्हणून निवडून दिले, भाग्यश्रींनी मिळवलेला विजय हा फक्त निवडणुकीचा निकाल नव्हता, तर तो एका परंपरेविरुद्धचा आवाज होता.
अर्थात सरपंच झाल्यामुळे लगेच गावचे प्रश्न सुटणार नव्हते त्यासाठी सुधारणेची कळकळ आणि प्रत्यक्ष अहोरात्र काम करणं गरजेचं होतं. कोठी गावात वीज नव्हती, पावसाळय़ात रस्ते चिखलात गडप होत, आरोग्य केंद्रात डॉक्टर नव्हते, शाळा भग्नावस्थेत होत्या. जन्म-मृत्यू नोंदी ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. शिवाय बालविवाह आणि ‘कुर्माघर’(मासिक पाळीत स्त्रियांनी गावाबाहेरील झोपडीत राहायला जाणे) सारख्या प्रथा समाजात खोलवर रुजलेल्या होत्या.
अशा वातावरणात शारीरिक शिक्षणातील पदवी मिळवणाऱ्या, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर पडलेल्या भाग्यश्री यांना आजूबाजूच्या प्रदेशाचा झालेला विकास खुणावत होता. त्यांनी लोकांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली. तीच त्यांची ताकद ठरली. कारण प्रशासन आणि ग्रामस्थांमध्येही कामांच्या बाबतीत संवादाची मोठी दरी होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेत, अनेक शासकीय योजना समजून घेऊन त्यांनी विकासकामांना गती देण्याचे काम केले.
शासकीय योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आज कोठी ग्रामपंचायत तालुक्यात सर्वात पुढे आहे. सरकारच्या घरकुल योजनेबाबतीत सर्वात जास्त मंजूर आणि बांधकाम झालेली १७५ पेक्षा जास्त घरकुले कोठी ग्रामपंचायतीमध्ये आहेत. भाग्यश्रींनी केलेलं पहिलं मोठं काम म्हणजे गावात वीज आणणं. २०२१ मध्ये तीन गावांमध्ये वीज आल्यावर लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास बसला. या यशानंतर त्यांनी एकामागून एक कामे हाती घेतली.
आधारकार्ड, रेशनकार्डसारखी कागदपत्रे मिळवून देणं, ग्रामपंचायतीत तरुणांना रोजगार देणं. पण खऱ्या अर्थाने ऐतिहासिक काम म्हणजे गावात बससेवा सुरू होणं. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७६ वर्षांनी महामंडळाची पहिली बस मारकनार गावात दाखल झाली. त्या वेळी अनेकांच्या डोळय़ांत आनंदाश्रू उभे राहिले. कारण ती बस म्हणजे फक्त प्रवासाची सोय नव्हती, तर ते होतं प्रगतीच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल.
भाग्यश्रींनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं. ‘कुर्माघर’ सारख्या प्रथेतून स्त्रियांना बाहेर काढलं. तसेच ‘सोनाली महिला बचत गट’ स्थापन क़ेला. तेंदू, बांबू, महुआसारख्या वनौपजांवर आधारित छोटे उद्योग तेथील स्त्रियांनी सुरू केल्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. याशिवाय ‘वनहक्क जनजागृती’मोहिमेमुळे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या हक्काची शेतीची जमीन मिळाली. कोठीमध्ये आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळा आधीपासून आहे, परंतु लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती नव्हती. पक्के रस्ते नव्हते त्यामुळे नदी-नाले पार करून मुलं येऊ शकत नव्हती. मात्र शिक्षणाचं महत्त्व पालकांना पटवून देऊन, पक्क्या रस्त्यांची उभारणी केल्याने विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत दाखल करता आलं.
भाग्यश्रींची दृष्टी केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी माडिया संस्कृती जपत आधुनिक शिक्षणालाही चालना दिली. ‘उलगुलान फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी मुलांसाठी माडिया भाषेसोबत इंग्रजी व डिजिटल शिक्षणाची केंद्रे सुरू केली. ‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशन’सोबत माडिया समाजाच्या परंपरा, गोटुल व्यवस्था, खानपान याचे दस्तऐवजीकरण केले. हे कार्य म्हणजे पुढील पिढय़ांसाठी संस्कृतीचा वारसा जपण्याचं महत्त्वाचं पाऊल ठरलं.
भाग्यश्रींच्या कामाची दखल केवळ स्थानिकच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. निती आयोगाच्या ‘आकांक्षी ब्लॉक’ उपक्रमात त्यांनी गडचिरोलीचं प्रतिनिधित्व केलं. ‘टाटा स्टील फाउंडेशन’ने त्यांना ‘ट्रायबल लीडर फेलोशिप’ दिली तर ‘भारतीय छात्र संसदे’ने त्यांना ‘उच्चशिक्षित युवा सरपंच’ पुरस्कारानं गौरवलं. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती होय.
गडचिरोलीसारख्या मागासलेल्या भागात भाग्यश्री लेखामी यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग हा फक्त एका गावापुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण समाजासाठी आशेचा किरण आहे. आदिवासी संस्कृती जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या कोठी ग्रामपंचायतच्या युवा सरपंच भाग्यश्री लेखामी यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम.
sspakalwar@gmail.com
संपर्क
bhagyashrilekhami@gmail.com