जंगलं वाचली तर पर्यावरण टिकेल हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट सत्य त्यांना निसर्गाच्या भटकंतीतून फार लवकर कळलं आणि तेच त्यांचं जीवितकार्य बनलं. सरकारी नोकरी सोडून त्यांनी समविचारी मित्रमैत्रिणींसह ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फॉउंडेशन’ची स्थापना केली. त्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच पुणे जिल्ह्यातील ११० गावांतल्या देवराया आणि ११५ गावांतील खासगी जंगले संरक्षित करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले आहेत यंदाच्या दुर्गा.

लहानपणापासून मोहात पाडणारा निसर्ग त्यांना कोकणातील देवराया आणि जंगल संरक्षणापर्यंत घेऊन गेला. अर्थात त्या दरम्यान होते ते गिर्यारोहण, जंगलांची यथेच्छ भटकंती आणि पीएच.डी.साठी केलेला त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास. साहजिकच आपला निसर्ग वाचवायला हवा, ही जाणीव आदीवृक्षासारखी मनात घट्ट मूळ धरू लागली. तोच ध्यास त्यांना घेऊन गेला ११० गावांतल्या देवराया आणि ११५ गावांतल्या हजारो एकर खासगी जंगलांच्या संरक्षणाकडे. त्या आहेत, जंगल वाचवण्यासाठी जमिनीवर उतरून काम करणाऱ्या ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या संस्थापक अर्चना गोडबोले.

महाविद्यालयीन शिक्षणात ‘मानव वनस्पती विज्ञान’ (Ethnobotany) आणि पुढे ‘आदिवासींचं जंगल आणि औषधीविषयक पारंपरिक ज्ञान’ यावर पीएच.डी करून त्यांनी झपाटल्यागत जंगल अंगात मुरवलं. दरम्यान, पश्चिम घाट बचाव मोहिमेतील सहभागामुळे पर्यावरण टिकण्यासाठी जंगलं टिकलीच पाहिजेत हा त्यांचा निर्धार पक्का झाला होता. त्यातून त्या पोहोचल्या आजिवलीच्या देवराईत. प्राचीन काळातल्या जंगलांचा आजही टिकून राहिलेला भाग म्हणजे देवराया. दुर्मीळ प्राणी, पक्षी आणि वनौषधीचा, वनौपजांचा प्रचंड साठा असलेल्या या देवराया.

या देवरायांना परंपरा आहे, संस्कृती आहे आणि गावकऱ्यांच्या श्रद्धा त्याभोवती जोडलेल्या असतात. मात्र या देवरायाही रस्ता बांधणी, चोरटी लाकूड विक्रीच्या शापात अडकल्या. आजिवलीची देवराईही तुटत चाललेली, पण स्थानिक आदिवासींनी माडासाठी ती जपलेली. त्यातून जे उत्पन्न मिळत होतं त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. त्या जीवनचक्रातून आजिवलीनं अर्चना यांच्या मनात जागवली लोक-जंगल-जैवविविधता सरंक्षणाची कल्पना. साहजिकच मग त्यांनी आपली वनस्पती सर्वेक्षण विभागातील नोकरी सोडून ‘ॲप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फॉउडेशन’(ए.इ.आर.एफ ) या संस्थेची स्थापना केली.

लोकांच्या सहभागातून पहिल्यांदा वाशी तर्फ संगमेश्वर गावातील तुटत चालेल्या २२ एकरवरील देवराई संरक्षणाचं काम सुरू झालं. आणि आतापर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्ग, रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील ११० गावातल्या देवराया संरक्षित करण्यात यश आल्याचे डॉ. अर्चना यांनी सांगितलं. ब्रिटनस्थित ‘व्हीटले फौउंडेशन’तर्फे २००७ मध्ये त्यांना देवराई संरक्षण कार्यक्रमासाठी मानाचा ‘व्हीटले असोसिएट पुरस्कार’ मिळाला. त्यानिमित्ताने देवरायांमधले महावृक्ष, त्यावरील जंगलांच्या पुनरुज्जीवनाचे काम करणाऱ्या धनेश पक्ष्याचं, त्यांच्या अस्तित्वाचं महत्त्व लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील ३४ हून अधिक देवरायांत धनेश पक्ष्यांना वाचवण्याचे काम सुरू केलं. देवरायाची निर्मिती, त्यामागची परंपरा, त्यांचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणारं ‘देवराई आख्यान’ हे त्यांचे पुस्तकही माहितीपूर्ण आहे.

सरकारी आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात कोणतंही सरकारी संरक्षण नसलेली सहा लाख एकरहून अधिक जमीन आहे. त्यातील बहुतांशी खासगी जंगले आहेत. त्यांची देखभाल करणारं कुणी नाही. देवरायांमुळे नैसर्गिक जीवनचक्राची कल्पना असल्याने संस्थेतर्फे ही खासगी जंगले संरक्षित करण्याचा विचार सुरू झाला. अर्थात हे काम सोपं नव्हतं. कारण खासगी जमिनींचेही मालक होते.

अनेकांमध्ये कौटुंबिक वाद होते, काही जंगलांचे मालक अन्य राज्यात स्थायिक झाले होते. त्यांना शोधून काढणं, त्यांना ही संकल्पना पटवून देणं गरजेचं होतं. ही सगळी जंगलं पडून होती त्यातून फार उत्पन्न मिळत नसे. त्यामुळे येईल त्या किमतीला लाकूडतोड्याला दिली जात. ‘ए.ई.आर.एफ.’च्या कार्यक्रमातून या जंगल मालकांना ते न तोडण्यासाठी मोबदला दिला जातो व त्यातून पुढे ते जंगले कसे टिकेल यावर काम केलं जातं. जंगलातील बेहडा उत्पादनातून स्थानिक लोकांना काही काळा करता नियमित रोजगार मिळणं सुरू केल्याने लोकसहभागातून जंगल वाचवणं शक्य झालं आहे.

आपले जंगल आपल्याला खूप काही देऊ शकते याची कल्पना आल्यामुळे कोकणातील जंगल मालकांनीही जंगल संरक्षणाला मान्यता दिल्याने ११५ हून अधिक गावांमध्ये १४,००० एकर जमिनीवरील जंगल २०३२ पर्यंत सुरक्षित झाले असून ६००० पेक्षा अधिक जंगलमालक या संस्थेशी जोडले गेल्याचं डॉ. अर्चना यांनी सांगितलं.

डॉ.अर्चना यांनी १९९५ ते २००० दरम्यान नागालँड व अरुणाचल प्रदेशात आदिवासींच्या निसर्गविषयक ज्ञानाचा अभ्यास केला. त्यावर आधारित ‘नागालँडच्या अंतरंगात’या पुस्तकाला पाच पुरस्कार मिळाले आहेत. त्या ‘लीडरशीप फ़ॉर एन्व्हायर्न्मेंट अँड डेव्हलपमेंट’या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या २००० पासून ‘फेलो’ असून पर्यावरण व जंगल संरक्षण करणाऱ्या ‘International union for Conservation of Nature’ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर काम करीत आहेत. मंगोलिया, इंडोनेशिया या देशांमध्येही काम केले आहे.

२०१२ ते २०१९ या काळात त्यांनी ‘ग्लोबल वॉर्मिंग व वातावरण बदल यासाठी काम करणाऱ्या जागतिक बँकेच्या ‘Climate Investment Fund’कार्यक्रमात आशिया व पॅसिफिक देशातील स्वयंसेवी संस्थांचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या सह्याद्रीतील जंगल संरक्षणाच्या कामाची दखल घेऊन ‘क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह’नंही घेतली.

देवराया आणि खासगी जंगले संरक्षित करत आपली नैसर्गिक संसाधनं जपून पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम.