प्रामाणिकपणे आणि सचोटीने सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत, मात्र त्यांच्या कार्यातली मुख्य अडचण असते ती आर्थिक मदतीची. कारण अनेकदा त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. हेच लक्षात घेऊन गेली १५ वर्षे ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम राबविणाऱ्या आणि त्यातून १८० संस्थांना पाच कोटी रुपयांचे दान मिळवून देत त्या पुनरुज्जीवित करणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, वीणा गोखले.
रेश्मा भुजबळ reshmavt@gmail.com
दु:ख आणि समाधान या आयुष्यातल्या अपरिहार्य वाटा. आपला निर्धार पक्का असेल तर हे दोन्ही रस्ते जगण्याला अर्थ देतात, हे तंतोतंत लागू पडतंय ‘देणे समाजाचे’ देणाऱ्या वीणा गोखले यांना. आयुष्यातल्या दु:खाच्या प्रसंगांनी खचून न जाता त्यावर धीराने मात करत त्यांनी त्या दु:खालाच समाधानात बदलवलं. गेली १५ वर्षे त्यांच्या ‘देणे समाजाचे’ या उपक्रमातून पाच कोटी रुपयांचं दान अनेक विधायक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचून अनेक आयुष्यं सावरली तर गेलीच, शिवाय त्यांच्या सर्जनशील मनातून जन्मणारे संगीत, नृत्याने नटलेले पर्यटन ‘गिरीसागर टूर्स’च्या माध्यमातून अनेकांना आत्मिक आनंदही देत आहे.
मात्र हे घडण्यासाठी वेदनेचा प्रचंड मोठा सागर त्यांना ओलांडावा लागला; किंबहुना त्यामुळेच त्या आजच्या ‘वीणा गोखले’ बनू शकल्या. खरं तर त्यांचेही जीवन चारचौघींसारखेच सुरू होते. उत्तम शिक्षण (एमएस्सी न्यूट्रिशियन), संगीताची जाण-आवड, आवडीची नोकरी, साजेसा जोडीदार असे स्वप्निल आयुष्य. या आनंदात भर म्हणजे दोन जुळ्या मुलींचा जन्म. सगळं असं परिपूर्ण वाटत असतानाच त्यांच्या एका मुलीला मेनिंजायटिस असल्याचे सत्य त्यांना पचवावं लागलं. त्यातून सावरणं त्यांना खूपच कठीण गेलं. एका बाजूला मतिमंद, फिट्स येणारी पूरवी, तर दुसरीकडे अत्यंत हुशार सावनी. एक सामान्य तर दुसरी विशेष, या दोघींना सांभाळताना त्या पुरत्या गोंधळून जायच्या. अनेकदा निराशही व्हायच्या. विशेष मुलांना सांभाळणाऱ्या संस्थांमधून पूर्वीसारख्या मुलीला सांभाळण्यासाठी काही मार्गदर्शन मिळाले तर पाहावे म्हणून त्यांनी आणि त्यांचे पती दिलीप यांनी अनेक संस्थांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांना अनेक संस्थांची उत्तम कामगिरी समजली. मात्र प्रामुख्याने जाणवले ते हे की, ही कामगिरी समस्त समाजासमोर येतच नाही. त्यामुळे त्यांचे काम सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अशा संस्थांची कामं समाजासमोर यायली हवीत, असं वीणा आणि दिलीप गोखले यांना मनापासून वाटलं. दिलीप यांना या संस्थांचं प्रदर्शन भरवण्याची कल्पना सुचली. त्यानुसार समाजातील गरजवंत आणि दानशूर यांच्यासाठी सुरू झाला ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम. २००५ पासून त्यांनी या प्रदर्शनाला सुरुवात केली ती पितृपक्षात. यामागे व्यावहारिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन होता. पितृपक्षात दानाला महत्त्व असते तसेच या काळात कार्यालये किंवा प्रदर्शनासाठी हॉल घेणेही परवडू शकते या त्यामागचा दृष्टिकोन. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांकडून एकही पैसा घ्यायचा नाही आणि यात कोणतीही खरेदी-विक्री होणार नाही हे निश्चित केले गेले आणि त्यानुसार संस्थांचे काम डोळसपणे पाहून त्यांनी ‘आर्टिस्ट्री’ संस्था स्थापन करून प्रदर्शनाला प्रारंभ केला. याला त्यांच्या अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला. त्यानंतरची दोन वर्षेही उत्तम प्रतिसादाची होती. २००८ मध्ये प्रदर्शनाला अवघे १५ दिवस राहिले असताना दिलीप यांचे आकस्मिक निधन झाले आणि जरा कुठे स्थिरावतोय असे वाटत असतानाच नवे आव्हान सामोरे आले.
दिलीप यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वीणाताईंवर आली, त्यात पूरवीचे आजारपणही होतेच. त्यातच मुख्य जबाबदारी होती ती ‘देणे समाजाचे’ची. वीणा यांनी स्वत:ला सावरले आणि प्रदर्शनाची तयारी सुरू करून ते यशस्वीपणे पारही पाडले. त्या सांगतात की, त्या वर्षी जर माघार घेतली असती तर हा उपक्रम कदाचित कायमसाठीच बंद पडला असता आणि त्याही दु:खातून बाहेर पडू शकल्या नसत्या. अर्थात दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांना त्यांचा व्यवसाय ‘गिरीसागर टूर्स’चीही मदत झाली. या टूर्सतर्फे ‘स्वरांबरोबर विहार’ ही अनोखी पर्यटन संकल्पना राबवण्यात येते. तसेच परदेशी सहलीही आयोजित केल्या जातात.
दिलीप यांनी सुरू करून दिलेले ‘देणे समाजाचे’ हे व्रत त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. दर वर्षी प्रामाणिकपणे आणि सचोटीने सामाजिक कार्य करणाऱ्या १५ संस्थांना आपली माहिती देणारा स्टॉल इथे विनामूल्य लावायला दिला जातो. दानशूर मंडळी प्रत्यक्ष तिथे येतात. या संस्थांची माहिती घेतात आणि आर्थिक मदत करतात. प्रत्येक संस्थेला दोनदाच या प्रदर्शनात सहभागी होता येत असल्याने नवीन संस्थांनी पाहणी करून त्यांचे कार्य तपासणे, खात्री करून घेणे ही कामे गेली १५ वर्षे वीणाताई स्वत: करतात. ही तपासणी वर्षभर सुरू असते. त्यानंतरच संस्थांना सहभागी करून घेतले जाते. तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला येणारा लाखो रुपयांचा खर्च केवळ दानशूर व्यक्तीच्या मदतीतून भागवला जातो.
आज ‘समाजाचे देणे’ हा एक ब्रँड झाला आहे. इथे येणाऱ्या संस्थांना लोकही विश्वासाने सढळ हाताने मदत करत असतात. म्हणूनच गेली १५ वर्षे १८० संस्थांना पाच कोटी रुपयांच्या देणग्या मिळवून देण्यात वीणा गोखले यशस्वी ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त अनेक संस्था पुनरुज्जीवित झाल्या, संस्थांचे प्रकल्प मार्गी लागले, विविध संस्थांना अनेक कार्यकर्ते मिळाले, वेगवेगळी कौशल्ये असणाऱ्या व्यक्ती संस्थांशी जोडल्या गेल्या. अंध, अपंग मुलांना सांभाळणाऱ्या संस्थांपासून ते प्रदूषण, पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे हा उपक्रम २०१९ पासून मुंबई येथेही सुरू झाला आहे. मुंबईत हा उपक्रम फेब्रुवारी-मार्च महिन्यात केला जातो.
‘देणे समाजाचे’ या उपक्रमाला केवळ ज्येष्ठ आणि सधन लोक भेट देतात असेही नाही, तर विद्यार्थी, तरुण सगळ्याच आर्थिक स्तरांतील लोक मदत करतात. लोकांना या उपक्रमातून देण्याचीच नव्हे तर असे कार्य समजून घेण्याची सवय लागते आहे आणि हेच या उपक्रमाचे मोठे यश आहे असे वीणा गोखलेंना वाटते.
‘देणे समाजाचे’ हा उपक्रम त्यांना सकारात्मक ऊर्जा देतो. म्हणूनच पती आणि नंतर पूरवीच्या निधनाच्या दु:खातून त्या सावरू शकल्या. येणारी डोंगराएवढी संकटे, अडचणी त्यांना लहान वाटायला लागली. परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीतही स्वत:ला कायम उभारी देत समाजाचे देणे देणाऱ्या या दुर्गेला आमचे अभिवादन!
संपर्क
वीणा गोखले
भ्रमणध्वनी – ९८२२०६४१२९
ई-मेल : gokhaleveena@yahoo.co.in
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा