करोना संसर्गाची लाट आली तेव्हा संपूर्ण मानवजातीवर महामारीचे संकट ओढवले होते. कोविड १९ ची लाट ओसरत आली आणि याचवेळी ‘लम्पी’ चर्मरोगाने डोके काढले. उत्तर भारतातील गायपट्ट्यातून आलेली ही लाट पुढे देशभर पसरत केली. महाराष्ट्रातही यामुळे पशुपालकांमध्ये हाहाकार उडाला होता. अनेक गोवंश या आजाराला बळी पडले. त्यावर लस काढण्यात महाराष्ट्राचा पुढाकार होता. आता पुन्हा एकदा ‘लम्पी’ चर्मरोगाची दुसरी लाट राज्यात सुरू झाली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. तथापि महाराष्ट्र गोवंशावर लसीकरण झाले असल्याने ही लाट पूर्वी इतकी तीव्र राहणार नाही. किंबहुना त्यावर उपचार करणे शक्य असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात आहे.

सन २०२२ सालचा उत्तरार्ध देशातील पशूंवर संकट आणणारा होता. त्याला कारण ठरले लॅम्पी चर्मरोगाची लागण. कोविड १९ संसर्ग, मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या समस्यांना तोंड देत असताना ‘लम्पी’ त्वचारोग हा चिंतेचा विषय बनला होता. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी स्किन आजरा’मुळे आतापर्यंत ७,३०० हून अधिक पशूंचा मृत्यू यामुळे झाला होता.

‘लम्पी’ त्वचारोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्राण्यांना याचा सर्वाधिक धोका असतो. लम्पी त्वचारोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्राव, जास्त लाळ, पशूंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये गुरांना खाण्यास त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले.

गोवंश जनावरांमधील लम्पी त्वचारोगामुळे राज्यात दहशतीचे वातावरण तयार होऊ लागले. त्यावर गायीचे दूध प्यावे की नाही, अशीही भीती काहींच्या मनात आहे. या रोगाबाबत विविध माहिती सध्या समाज माध्यमावर प्रसारित होत आहे. ‘दूध प्यायल्याने या आजाराची लागण मानवालाही होऊ शकते,’ अशा आशयाच्या या पोस्ट आहेत. मात्र, नागरिकांनी या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य ‘लम्पी’ चर्मरोग टास्क फोर्स, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालकांनी केले आहे. ‘लम्पी’ हा त्वचारोग केवळ गोवंशातील विषाणूजन्य रोग आहे. तो म्हशींमध्येसुद्धा क्वचितच आढळून येतो. ‘लम्पी’चे विषाणू हे ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर निष्प्रभ होतात. त्यामुळे उकळलेल्या व पाकिटातील पाश्चराइज्ड दुधात जंतू जिवंत राहत नाहीत. त्यामुळे दूध बिनधास्त प्यावे. मात्र, शास्त्रीयदृष्ट्या ते उकळूनच प्यावे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

या आजारामुळे महाराष्ट्रात पशुधन बाधित होण्याचा सिलसिला कायम आहे. आजारासंदर्भात एक दिलासादायक बातमी म्हणजे महाराष्ट्र हे या रोगावर लस तयार करणारे पहिले राज्य बनले आहे.

‘लम्पी’ चर्मरोग प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवता येणे सोपे झाले असून भविष्यात ‘लम्पी’ सदृश एखादा आजार उद्भवल्यास त्यावरदेखील नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. पशुवैद्यकीय जैव पदार्थनिर्मिती संस्था, औंध, पुणे यांच्याकडे निर्माण केलेल्या विषाणू प्रयोगशाळेमध्ये आदर्श उत्पादन पद्धतीचा अवलंब करून लम्पी चर्मरोगावरील लसीचे उत्पादन करण्यात आले. त्यामुळे राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. निश्चितच या आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत ही एक दिलासादायक बाब त्यांच्यासाठी ठरली आहे.

देशभरात ‘लम्पी’ने थैमान घातले आहे. लम्पीचा महाराष्ट्रातदेखील मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवला. लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले. एकीकडे जनावरे आजारी पडून दगावत असताना आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरे दगावल्याने आर्थिक संकट निर्माण झाले होते. तेव्हा राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘लम्पी’ आजाराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. ‘लम्पी’ आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपयांचे तर वासराचा मृत्यू झाल्या १६ हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मदत केली जाणार असताना त्यासाठी अल्प किंवा अत्यल्प भूधारक असण्याची अट होती. ती रद्द करण्यात आल्याने पशुपालकांना आणखी एक दिलासा मिळाला.

‘लम्पी’ या आजारामुळे देशातील शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च आला आहे. ‘लम्पी’ आजारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक जनावरं दगावली आहेत. जवळपास तीस लाख जनावरांना लागण झाली. या आजारामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचार व्हायला हवेत, अशी मागणी संसदेत करण्यात आली होती.

राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये तीन लाख ५४ हजार पशूंना संसर्ग झाला होता. त्यापैकी दोन लाख ७१ हजार पशू उपचाराने बरे झाले . मात्र २५ हजार ६७६ पशूंचा मृत्यू झाला आहे. नुकसान भरपाईपोटी जनावरांच्या मालकांना ३० कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. एक कोटी ४० लाख पशूंचे मोफत लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली.

आता पुन्हा एकदा लम्पी चर्मरोगाने डोके वर काढले आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. पशुपालकांना जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. ‘लम्पी’ त्वचारोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येऊ नये. याप्रकारे जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात ‘लम्पी’ चर्मरोग झालेल्या जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण झालेल्या जनावरांना पुन्हा या चर्मरोगाची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. नव्याने ज्या केसेस समोर येत आहेत अशी जनावरांत या चर्मरोगाची लागण प्रथमच झालेली दिसून येते. त्यांच्यावर लसीकरण केल्याने चांगला फरक पडत चालला आहे. लसीकरण केल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती वाढते. या चर्मरोगाची लागण होत असल्याचे प्रकार होत असले तरी यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. योग्य प्रकारे लसीकरण, उपचार केले तर निश्चितपणे फरक दिसून येईल, असे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी सांगितले.