ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक निधन हा महाराष्ट्राला आणि विशेषत: भाजपला मोठा धक्का आहे. लोकसभेत घवघवीत यश संपादन केल्यावर महाराष्ट्राची विधानसभा काबीज करण्याचे मनसुबे रचत असताना आणि राजकीय व्यूहरचना करीत असताना मुंडे यांना काळाने हिरावून नेले. ‘मुंडेंविना युती’ निवडणुकीला कशी सामोरी जाणार, युतीचे जागावाटप , भाजपचे राज्यातील नेतृत्व व निवडणुकीची धुरा कोण सांभाळणार आणि सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद कोणाकडे, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांत होणाऱ्या स्थित्यंतराचा हा आढावा
मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीची वाटचाल कठीण व वळणावळणाची आहे. कोणत्या वळणावर कोणाची साथ राहील व कोणाची सुटेल, कोणाकडे नेतृत्व व सूत्रे राहतील आणि कोणाला दूर केले जाईल, याची छातीठोकपणे खात्री कोणत्याही नेत्याला देता येणार नाही.
नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी हाक दिली आणि देशभरात झंझावात निर्माण केला. दिल्लीतील सत्तापरिवर्तनात महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण योगदान दिल्यावर आता राज्यातही सत्तापरिवर्तन करण्याचे वेध भाजपला लागले आहेत. गेली १५ वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरून हटवून महाराष्ट्रात पुन्हा भगवा झंझावात उभा करण्यासाठी मुंडे यांनी कंबर कसली होती. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर ते उत्साहाने कामाला लागले होते. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी १ जून रोजी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी त्यांनी राज्यातील सर्व भाजप नेत्यांची तब्बल साडेतीन तास बैठक घेऊन मतदारसंघनिहाय आढावाही घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणायचे आहे, याच्या चर्चा झाल्या. पण हे साकारण्याआधीच मुंडे यांच्यासारखे महाराष्ट्राची खडान्खडा माहिती असलेले आणि या मातीशी ज्यांची नाळ जोडली गेली आहे, असे खंबीर नेतृत्व काळाने हिरावून घेतले.
लोकसभेसाठी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेने भरभरून मते दिली. पण त्या जोरावर विधानसभा काबीज करता येईल, हा भ्रम आहे. भाजपला वातावरण अनुकूल असले तरी मुंडे यांच्या गैरहजेरीत अधिक कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. या परिस्थितीत प्रचाराची धुरा भाजप कोणाकडे सोपवेल, हा महत्त्वाचा प्रश्न असून त्यावर दोन आठवडय़ांत केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रदेश भाजपची सर्व धुरा आहे. पण प्रदेश नेत्यांमध्ये नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून कोणतेही मतभेद होऊ नयेत आणि राज्यातील ज्येष्ठ नेते या नात्याने मुंडे यांच्यानंतर आता महाराष्ट्रातील निवडणुकीवर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच लक्ष राहणार आहे. उत्तर प्रदेशात करिश्मा घडवून आणणारे मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांच्याकडे राज्याच्या निवडणूक नीतीची आखणी सोपविण्यात येईल, तर निवडणुकीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी केंद्रात मंत्रिपदी असलेल्या नितीन गडकरी यांच्यावर सोपविली जाईल. येत्या दहा-बारा दिवसांत यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून होईल.
मुंडे यांनी महायुतीची मोट बांधली. शिवसेना, रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी व विनायक मेटे यांच्यामध्ये विधानसभेसाठी जागावाटप करणे हे सोपे काम नाही. लोकसभेच्या आखणीत मुंडे यांनाही ते आव्हानच ठरले होते. आता ते आणखी अवघड होणार आहे. विधानसभेसाठी शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा हे सूत्रही आता लोकसभेत घवघवीत यश मिळालेल्या भाजपला मान्य नसून किमान १५० जागा हव्या आहेत. मोदी यांनी नुकतीच राष्ट्रीय सरचिटणिसांची बैठक घेतली. महाराष्ट्रासह ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तेथे भाजपचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे भाजपला पसंत पडेल ते जागावाटपाचे सूत्र शिवसेनेने मान्य केले, तरच युती टिकेल, अन्यथा शतप्रतिशत भाजपचा विचार केला जाण्याचीही शक्यता आहे. युतीतील जागावाटपच कठीण असताना अन्य छोटय़ा पक्षांना जागा सोडणे त्यांना कठीण आहे. त्यामुळे महायुतीतील काही पक्षांना सोडचिठ्ठी मिळणे अटळ आहे. पण या लहान पक्षांची विधानसभेच्या अनेक मतदारसंघांत विशिष्ट मते आहेत. भाजपचा सर्वसमावेशक चेहरा टिकविण्यासाठी या पक्षांची आवश्यकता असून शिवसेनेशी जागावाटप फिसकटले, तर अन्य पक्षांची सोबत भाजपला टिकविता येईल. अमित शहा यांना निवडणूक जबाबदारीसाठी राज्यात पाठविले गेले, तर भाजपला अधिकाधिक जागा कशा मिळतील, याचीच व्यूहरचना होणार असून शिवसेनेच्या भूमिकेवर बरीच राजकीय गणिते अवलंबून असतील. भाजपकडून युती टिकविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पण शिवसेनेची भूमिका आडमुठी राहिल्यास वेगळा विचार भाजपला करावा लागेल. तेव्हा मनसेसारख्या अन्य पक्षांचा विचारही भाजपकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडकरी महाराष्ट्रात सक्रिय झाल्यास शिवसेनेशी त्यांचा समन्वय कठीणच आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक अधिक आहे. त्यामुळे महायुती टिकणार का, भाजपसोबत कोणते पक्ष राहतील, हे सर्व जागावाटपाच्या गणितावर अवलंबून राहील.
नितीन गडकरी यांना राष्ट्रीय राजकारणातच रस असून महाराष्ट्रात सत्ता आल्यास केंद्रीय मंत्रिपद सोडून ते मुख्यमंत्री म्हणून येणार नाहीत, असे काही नेत्यांना वाटते. पण त्या वेळची राजकीय परिस्थिती आणि केंद्रीय नेतृत्व व विशेषत: मोदींच्या इच्छेवर ते अवलंबून असणार आहे. निवडणुकीनंतर गडकरी महाराष्ट्रात परतणार नसतील तर देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यापैकी एकाची महाराष्ट्रातील नेतृत्व म्हणून निवड होण्याची चिन्हे आहेत. विधानसभेची निवडणूक मोदींच्या नावानेच लढून राज्यातील नेतृत्वाचा किंवा मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजप निवडणुकीनंतरच घेईल, अशी शक्यता अधिक आहे. मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीची वाटचाल कठीण व वळणावळणाची आहे. कोणत्या वळणावर कोणाची साथ राहील व कोणाची सुटेल, कोणाकडे नेतृत्व व सूत्रे राहतील आणि कोणाला दूर केले जाईल, याची छातीठोकपणे खात्री कोणत्याही नेत्याला देता येणार नाही. आगामी विधानसभा काबीज करण्याची ‘ही वाट वळणाची’. भाजपसाठी तशी खडतरच राहील, अशी चिन्हे आहेत.
मुंडेंची जागा कोण लढविणार?
मुंडे यांच्या बीड मतदारसंघातून पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांना भाजपकडून उमेदवारी निश्चितपणे दिली जाईल. आपण महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊन मुलगी पंकजा मुंडे-पालवे यांना लोकसभेत पाठविण्याची मुंडे यांची इच्छा होती. त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून पंकजा यांच्याकडेच पाहिले जाते.
पंकजा लोकसभेत गेल्यास त्या मराठवाडय़ातील नेत्या म्हणून राष्ट्रीय पातळीवर जातील. मात्र विधानसभेसाठी अन्य भाजप नेत्याला उमेदवारी मिळेल. मुंडे यांनी ओबीसी व तळागाळातील समाजाचे नेतृत्वही केले.
मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे लोकसभेत गेल्या आणि पंकजा यांनी विधानसभेतच राहून या समूहाचे नेतृत्व केले, तर त्या राज्यात नेत्या म्हणून उदयास येतील आणि सत्ता आल्यास मंत्रीही होतील. मुंडे यांच्यावर प्रेम करणारा व त्यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग असून पंकजा यांचे नेतृत्व त्यांना मान्य होईल. या साऱ्या बाबींवर महिनाभरानंतरच निर्णय होणे अपेक्षित आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2014 रोजी प्रकाशित
ही वाट वळणाची..
मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीची वाटचाल कठीण व वळणावळणाची आहे. कोणत्या वळणावर कोणाची साथ राहील व कोणाची सुटेल, कोणाकडे नेतृत्व व सूत्रे राहतील आणि कोणाला दूर केले जाईल...
First published on: 08-06-2014 at 12:50 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti after gopinath mundes death