ज्येष्ठ विचारवंत असगर अली इंजिनियर  यांचे नुकतेच निधन झाले. एका बाजूला दाऊदी बोहरा समाजातील दडपशाहीविरोधात लढत असताना एकूण मुस्लीम जगात होणाऱ्या अन्यायाकडेही त्यांचे बारीक लक्ष होते. इस्लाम धर्माने स्त्रियांना दिलेले अधिकार मुस्लिमांकडून वेळोवेळी नाकारले जातात. याविरोधात इंजिनियर यांनी प्रदीर्घ वैचारिक लढा दिला आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला वेध..

असगर अली इंजिनियर हे आपल्या परिवर्तन चळवळीचे एक अग्रणी नेते. त्यांचे वडील धार्मिक विधी करणारे आमील होते. ज्ञानी होते. धर्माचा त्यांचा अभ्यास हा सखोल होता. असगर अलींनी तो वारसा जपला; धर्माचा सखोल अभ्यास केला. अरबी व फारसी भाषा शिकल्यामुळे इस्लाम धर्माचे बारकावे समजणे शक्य झाले. गुजराती ही तर त्यांची मातृभाषाच होती व इंग्रजी ही शिक्षणाची भाषा. त्यांनी त्यांचा अभ्यास केवळ धर्माच्या अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता व्यापक राजकारण व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. मार्क्सवादाचा अभ्यास व त्याचा प्रभाव हा त्यांच्यावर कायमच होता. इस्लामच्या बरोबरच इतर धर्माचाही त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हे एका पंथात सामावण्यासारखे नव्हते. राजकीय जाण असल्यामुळे समाजात विविध पातळींवर होणाऱ्या अन्यायाच्या कारणात ते खोलात जाऊन तपास करायचे. त्याविरोधात उभे राहणे हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग बनला.
दाऊदी बोहरा समाजात धर्मगुरू सय्यदना यांचा एकछत्री अंमल चालतो. ते, त्यांचे कुटुंबीय व त्यांनी नेमलेले त्यांचे प्रतिनिधी हे समाजात समांतर सत्ता चालवतात. मुलं जन्माला आल्याबरोबर विविध प्रकारचे कर त्यांच्यावर लागू करण्यात येतात. थोडे वय झाल्यावर सर्वानी ममिसाकफ म्हणजे आपण सय्यदना यांचे गुलाम असल्याची शपथ घ्यावी लागते आणि सय्यदनांचे आदेश पाळण्याची लहानपणापासून सवय लावली जाते. इतर जातीच्या रचनेप्रमाणे याही पंथात लग्न आणि मृत्युसमयी कुटुंबीयांची अडवणूक करून कराची थकबाकी वसूल करणे या गोष्टी केल्या जातात.  आणि म्हणून सय्यदना यांच्याविरोधात गेली अनेक वर्षे आंदोलन सुरू आहे. असगर अली इंजिनियर या आंदोलनामध्ये १९७२ पासून सहभागी झाले. त्यांनी नोमानभाई कॉन्ट्रॅक्टरच्या बरोबरीने काम केले व नोमानभाईंच्या निधनानंतर या सुधारणावादी बोहरा चळवळीचे नेतृत्व असगर अली इंजिनियरकडे आले. त्यांनी या चळवळीला एक व्यापक वैचारिक अधिष्ठान दिले, आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थ संघटन निर्माण केले व बोहरा पंथातील अन्यायाच्या विरोधात जगभर आवाज उठवला. या मोहिमेदरम्यानही जागोजागी सय्यदना यांच्या हस्तकांनी अडथळे आणायचे प्रयत्न केले. आता सय्यदना यांची दडपशाही थोडीशी हलकी झाली आहे व संघर्षांची तीव्रतापण थोडी कमी झाली आहे. पण अधिकाराचा प्रश्न अनुत्तरित आहे. जातीबाहेर टाकण्याचा अधिकार जातपंचायतीला असल्याचा निकाल मुंबई हायकोर्टाने दिला आहे. शासन याविषयी काही कायदे करील अशी अपेक्षा फलित होईल, असे वाटत नाही.
एका बाजूला दाऊदी बोहरा समाजातील दडपशाहीविरोधात लढत असताना एकूण मुस्लीम जगात होणाऱ्या अन्यायाकडेही असगर अली इंजिनियरांचे बारीक लक्ष होते. इस्लाम धर्माने स्त्रियांना दिलेले अधिकार मुस्लिमांकडून वेळोवेळी नाकारले जातात. याविरोधात असगर अली इंजिनियर यांनी प्रदीर्घ वैचारिक लढा दिला आहे. कुराण हा मुसलमानांचा सर्वात पवित्र ग्रंथ. यामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. संपत्तीचा अधिकार- वडिलांच्या व नवऱ्याच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क आहे. स्त्रीच्या संपत्तीशिवाय तिचा विवाह होऊ शकत नाही. तलाकचा अधिकार आहे. हे सर्व अधिकार सरंजामी वृत्तीचे मुस्लीम मुल्ला-मौलवी, मुस्लीम देशांतील राज्यकत्रे नाकारत असतात, हे असगर अलींचे महत्त्वाचे प्रतिपादन आहे. पगंबरांच्या काळात स्त्रिया मशिदीमध्ये जाऊन नमाजपण पडत असत. मग आता स्त्रियांना मशिदीत का येऊ देत नाही, हा सवाल त्यांनी अनेक वेळा विचारलेला आहे. कुराणामध्ये वांशिक समतेचा आग्रह आहे. वंशश्रेष्ठतेचा उच्चार करणाऱ्या अरबवृत्तीयांच्या विरोधात ते उभे राहिले आहेत. तबलिग व जमाते इस्लामच्या कट्टरतावादाच्या विरोधात त्यांनी वैचारिक मांडणी केली आहे. मुस्लीम जगतात सूफी संतांनी केलेल्या योगदानाचा गौरव त्यांनी वेळोवेळी केला आहे. भारतात प्रचलित असलेल्या मुस्लीम पर्सनल लॉमधल्या अनेक त्रुटी या इस्लामविरोधी असल्याचे त्यांनी आग्रहाने मांडले आहे. बहुपत्नीत्वाची (चापर्यंतच) परवानगी युद्धात हुतात्मा झालेल्या सनिकांच्या विधवा झालेल्या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी दिली आहे, याची ते आठवण करून देतात. जन्मत:च मुलीला मारून टाकण्याच्या प्रथेवर बंदी आणण्याची पगंबरांची कृती ही क्रांतिकारक होती, हे ते आग्रहाने सांगतात. आणि ऊठसूट महिलांच्या अधिकारांचे संकोच करणारे फतवे काढणाऱ्यांविरोधात असगर अली नेहमीच उभे राहिले आहेत. मागच्या वर्षी दिल्ली येथे मुस्लीम व्यक्तिगत कायद्याविषयी झालेल्या बठकीत मुस्लीम व्यक्तिगत कायद्याचे संहितीकरण करण्याचे ठरवण्यात आले होते, ज्यातून मुस्लीम महिलांचे वैवाहिक अधिकार सुरक्षित होतील. या बठकीत असगर अली इंजिनियर यांचा सिंहाचा वाटा होता. इस्लाम धर्म हा िहसेला उत्तेजन देणारा धर्म नाही, हा सहिष्णू धर्म आहे हे ते आग्रहाने व पुराव्यासह सांगत असत. जिहादच्या नावाखाली निरपराध लोकांना मारण्याची आतंकवादी प्रवृत्ती ही इस्लामविरोधी असल्याचे त्यांचे मत त्यांनी जाहीरपणे अनेकदा मांडले आहे. लिखाणातही त्यांनी याबद्दल लिहिले आहे.
भारतात होणाऱ्या दंगली हा त्यांच्या चिंतेचा विषय होता. अनेक दंगलींच्या ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास करणे, त्याचा अहवाल तयार करणे हे काम त्यांनी केले. १९८०-८१ दरम्यान अहमदाबाद, गोध्रा, पुणे-मुंबई येथे झालेल्या दंगलींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. दंगलीच्या मागे धार्मिक नव्हे, तर आíथक व व्यावसायिक हितसंबंध व कारणं असतात हे ते नेहमीच सांगत. अलीगडच्या दंगलीवर लिहिलेल्या लेखात त्यांनी कुल्लपच्या व्यवसायात नव्याने शिरलेल्या काही लोकांना मुस्लिमांच्या हातात असलेला व्यवसाय हिसकावून घ्यायचा होता म्हणून त्यांनी दंगल घडवली, असे लिहिले होते. त्यांच्या या मांडणीमध्ये मार्क्सवादी विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत असे. १९९२-९३ साली मुंबई येथे बाबरी मशीद पडल्यानंतर झालेल्या िहसाचार व बाँबस्फोटामुळे ते खूप अस्वस्थ झाले होते. त्या अशांततेच्या काळातही त्यांनी शांततेसाठीची मिरवणूक रस्त्यावर येऊन काढली होती. दंगल होऊ नये यासाठी कडक कायदा व्हावा हा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या व त्यांच्यासारख्या इतरांच्या आग्रहावरून तयार झालेले विधेयक संसदेमध्ये मांडण्यासाठी तयार आहे. संसदेसमोर हे मांडले जाईल की नाही हे मात्र अनिश्चित आहे.
गेली काही वर्षे असगर अलींनी हे सांप्रदायिक सद्भावनेचे विचार तरुण आणि विद्यार्थिजगतात पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम काढली होती. ठिकठिकाणी ते विद्यार्थ्यांची शिबिरे घेत असत. तीन-चार वर्षांपूर्वी पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये घेतलेल्या शिबिरात पूर्ण दिवस त्यांनी तरुणांशी संवाद साधला. यात त्यांनीच मध्ययुगीन इतिहास, स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्योतर काळातील भारतातील धर्मवादी राजकारण या विषयांवर प्रामुख्याने मांडणी केली होती. सांप्रदायिक सलोखा निर्माण व्हावा, दंगली होऊ नयेत, विसंवादाची सोडवणूक व्हावी यासाठी त्यांनी अनेक चर्चासत्रे, प्रशिक्षण, शिबिरे आयोजित केली. त्यातील पुणे येथे दोन प्रशिक्षणे आयोजित करण्याची मला संधी मिळाली. त्यांचा अभ्यास, त्यांची तळमळ, त्यांची निष्ठा ही सर्व उपस्थितांना प्रभावित करणारी होती. या सर्व कामासाठी त्यांनी संस्था स्थापन केल्या. प्रशिक्षण साहित्य निर्माण केले. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली; प्रकाशित केली. इस्लामवरच्या त्यांच्या अभ्यासाला व त्यांच्या मांडणीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली होती. अनेक मुस्लीम देशांत त्यांनी सरकारी पातळीवर व इतर संस्थांमध्ये आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. संवाद व चर्चा करायला ते कोठेही जायला तयार असत. समताधिष्ठित उदारमतवादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेली इस्लाम धर्माची मांडणी ही िहदुत्ववादाच्या प्रभावाखाली असणाऱ्या तरुणांना त्या प्रभावातून मुक्त करण्यास मदत करणारी होती, तो हेतूही होता. त्याचप्रमाणे ती मांडणी कट्टर इस्लामच्या प्रभावाखाली असणाऱ्या मुस्लीम तरुणांनाही कट्टरतेपासून दूर नेण्यासाठी मदत करणारी होती व तोही हेतू होता. त्यांचे हे प्रयत्न प्रामाणिक होते, सशक्त होते. ते किती यशस्वी झाले हे तर काळच ठरवेल. त्यांना नम्र श्रद्धांजली.