पुण्यात बेकायदा बांधकामांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे कोणत्या ना कोणत्या रूपाने समर्थन आहेच आणि नव्याने उदयाला आलेली मनसेही त्यात मागे नाही. पर्वती पायथ्यापाशी मनसेचे विभागीय कार्यालय थेट पाटबंधारे विभागाच्या कालव्यावरील जागेतच उभे असून, या कार्यालयातूनच ‘नवनिर्माणा’चे कार्य सुरू असल्याचे पुणेकर रोज पाहत आहेत. मनसेचे पर्वती मतदारसंघाचे प्रमुख शिवाजी गदादे यांनी कालव्याच्या काठाजवळील जागेत त्यांचे कार्यालय उभे केले आहे. या कार्यालयाच्या पुढील संपूर्ण मोकळी जागा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येते. ही कालव्याच्या काठाची सर्व मोकळी जागा मनसेकडून कार्यालयासाठी वापरली जाते. गदादे यांची कन्या प्रिया गदादे येथील स्थानिक नगरसेविका आहेत.
* तळजाई पठार येथे बांधकाम सुरू असलेली एक इमारत सप्टेंबरमध्ये कोसळली आणि त्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. या बांधकामाची सखोल चौकशी झाल्यानंतर संबंधित काम माजी नगरसेवक संजय नांदे यांच्यामार्फत सुरू होते, ही बाब उजेडात आली. इमारत बेकायदा असल्यामुळे तिचे बांधकाम अतिशय वेगाने करण्यात येत होते आणि त्यातच ती कोसळली.
* राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांचे बाणेर रस्त्यावरील अत्याधुनिक संपर्क कार्यालय एका इमारतीच्या कडेला असलेल्या मोकळय़ा जागेत आहे. कायद्याच्या परिभाषेत ही जागा ‘साईड मार्जिन’मध्ये येते. तेथे बांधकाम करता येत नाही. त्या जागेत झालेले हे पक्के बांधकाम नागरिकांना खटकते, पण महापालिका अधिकाऱ्यांना मात्र ही गोष्ट अद्यापही दिसलेली नाही.
*  पुण्यात सर्वपक्षीय नगरसेवकांची संपर्क कार्यालये आहेत आणि त्यातील अनेक बेकायदाही आहेत. गेल्या महिन्यात कोथरूड भागातील अशी १२ कार्यालये पाडण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी ही कारवाई थांबलीसुद्धा.