अल् काइदा, मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट इ. संघटनेच्या नावात असणाऱ्या आता ५० हून जास्त संघटना कार्यरत असून तरुणांची माथी भडकावून हिंसक कारवाया घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पेशावरमधील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर अतिरेकी संघटनांचे कार्य व भारताला असलेला धोका याचा ऊहापोह करणारा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेशावरमध्ये शाळेत १३७ विद्यार्थ्यांची क्रूर कत्तल करण्यात आली. ही कृती अल् काइदाच्या निष्ठावान मारेक ऱ्यांनी केली. अल् काइदा आणि इतर अतिरेकी संघटना आतापर्यंत अनेक वेळा नि:शस्त्र नागरिकांचे हत्याकांड करीत आल्या आहेत. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला, मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांवरचा हल्ला इ.इ. पण पाकिस्तानातील या हल्ल्याने नवी नीच पातळी गाठली आहे. या नव्या नीचतेची लक्षणे अशी :
१) हा हल्ला स्वदेशात करण्यात आला. २) हल्ला आपल्याच धर्मातील लोकांवर करण्यात आला. ३) हल्ला पाकिस्तानी लष्करावर सूड उगवण्यासाठी झाला. ४) हल्ला शाळेतील कोवळ्या मुलांवर करण्यात आला.
आपल्या सर्वानाच प्रश्न पडतो तो हा की, माणसे एवढी क्रूर, एवढी पाषाणहृदयी, एवढी सैतानी कशी बनू शकतात? अमेरिकेत एखाद्याने शाळेत जाऊन गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत; पण ते एका, एकटय़ा माथेफिरूचे कृत्य असते. पेशावरचे क्रौर्य ही एका मोठय़ा संघटनेच्या बिनीच्या सैनिकांनी केलेली सामूहिक कृती आहे. अल् काइदाची आत्तापर्यंतची वर्तणूक, चालरीती लक्षात घेता ते या क्रूर कत्तलीची जबाबदारी घेतील, हल्लेखोरांचा ‘शहीद’ म्हणून गौरव करतील; इतकेच नव्हे तर माथेफिरू गोळीबार करीत असताना आर्त किंकाळणाऱ्या मुलांच्या चित्रफिती ते माहिती नभोमंडळावर प्रकाशीत करतील. हे सर्व काय आहे? ही हिंसक सांघिक मनोवृत्ती कशी निर्माण केली जाते? कशी पोसली जाते?

मुजाहिदचा मूळ अर्थ ‘धडपडणारा’, ‘संघर्ष करणारा’ असा आहे, पण आता मुसलमान मूलतत्त्ववाद्यांनी त्याचा अर्थ ‘पवित्र लढवय्या’ असा करून तो जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. सोव्हिएत रशियाच्या सैनिकांना अफगाणिस्तानमध्ये विरोध करण्यासाठी तयार झालेली ‘अल् काइदा’ ही संघटना आज निदान ६५ देशांत कार्यरत असल्याचा अंदाज आहे.

अल् काइदा, मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट इ. संघटनेच्या नावात असणाऱ्या आता ५० हून जास्त संघटना आहेत. सुरुवातीला, बिन लादेनने ‘क्रूसेडर (म्हणजे ख्रिस्ती आक्रमक) आणि ज्यू यांच्याविरुद्ध धर्मयुद्ध पुकारण्याचे आवाहन केले होते. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला हा या अमेरिकी क्रूसेडर आणि ज्यू विरोधी युद्धाचा भाग होता. पण अल् काइदा आणि मुजाहिदीन संघटनांनी आता आपला उद्देश आणि लक्ष्य बदलले आहे. मुसलमान बहुसंख्य असलेल्या देशातील राजवटी भ्रष्ट आहेत, अमेरिकाधार्जिण्या आहेत असे त्यांना वाटते. या राजवटी उलथून टाकणे आणि या प्रदेशात एकछत्री मूलतत्त्ववादी राजवट प्रस्थापित करणे हा आता त्यांचा प्रमुख उद्देश आहे. त्याच्या जोडीला, अशा राजवटींना साथ देणारे, पाश्चिमात्यांचे अनुकरण करणारे लोक धर्मद्रोही आहेत, त्यांना कठोर शासन करणे, सर्वसामान्य मुसलमानाला मूलतत्त्ववादी शुद्ध आचरण करण्यास भाग पाडणे असाही त्यांचा कार्यक्रम आहे. आधी घर सुधारू, ते शुद्ध करू, घरभेद्यांचा नायनाट करू, मग परत बाहेरच्या शत्रूंकडे अधिक ताकदीने वळू, असा हा डावपेच आहे. या डावपेचाचा भाग म्हणून इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अ‍ॅण्ड इराक (इसिस) या संघटनेने, त्यांनी व्याप्त केलेल्या प्रदेशात, खिलाफत म्हणजे ‘धर्मराज्य’ स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

शत्रूचा आणि घरभेद्यांचा नि:पात करताना क्रूर हिंसा केली पाहिजे, त्या हिंसेचे शहारे आणणारे प्रदर्शन केले पाहिजे, अशी या मुजाहिदीनना शिकवण दिली जाते. या क्रूरकर्मात ‘शिरच्छेद’ करणे ही जणू काही धार्मिक कृती असल्याचे सांगण्यात येत आहे. गळा कापण्याच्या, निरपराध नि:शस्त्रांचे हाल करून त्याला ठार मारण्याच्या या हिंसक क्रौर्याला, कुराणामध्ये समर्थन आहे, नव्हे ‘कुराणाचा तसा आदेशच आहे’ असा जहरी आणि खोटा प्रचार मुजाहिदीन- अल् काइदा- मूलतत्त्ववादी करीत असतात.

कुराणातील पुढील वचनांचा ते यासाठी सर्रास वापर करतात-
‘‘जेव्हा युद्धभूमीवर तुमची गाठ देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांशी पडेल तेव्हा जोपर्यंत त्यांचा पूर्ण बीमोड होत नाही तोपर्यंत त्यांची मुंडकी उडवा (‘मुंडकी उडवा’ ऐवजी ‘मानेवर वार करा’ असेही भाषांतर केले जाते)
देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांची मने मी भीतीने भरून टाकेन. त्यांच्या मानेवर वार करा, त्यांच्या साऱ्या बोटांवर वार करा’’ या वचनांचा आधार घेऊन मुसलमान युवकांना हिंसाचार करण्याचे आवाहन मुजाहिदीन आणि अल् काइदाचे नेते करतात. हा कुराणातील वचनांचा कमालीचा दुरुपयोग आहे हे मुसलमान जगतातील अनेक अभ्यासकांनी वारंवार दाखवून दिले आहे. कुराणातील वचने ही रानटी टोळ्यांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे यासाठी आहेत. पण स्वार्थी मूलतत्त्ववाद्यांना सत्याची चाड कधीच नसते. अल् काइदा- मुजाहिदीन यांनी क्रूर हिंसा हे विरोधकात दहशत निर्माण करण्याचे आणि अनुयायांना व्यसनी चटक लावण्याचे साधन बनवले आहे.
आपण भारतीयांना अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे भारतातून मुजाहिदीन आणि इसिस यांच्या आवाहनाला नगण्य तरुण बळी पडले आहेत. इंग्लंडसारख्या छोटय़ा देशांतून ४०० तरुण इसिसमध्ये सामील झाले, असे माहिती नभोमंडळावरील वृत्त आहे. भारतात इंग्लंडच्या तुलनेने शेकडोपट अधिक मुसलमान राहतात. इसिसचा एक प्रमुख प्रचारक मेहदी विश्वास भारतात, बंगलोरमध्ये कार्यरत होता. तरीही भारतातून इसिसमध्ये सामील झालेल्या युवकांची संख्या, तसा प्रयत्न करताना अटकाव केलेल्यांची संख्या २५ ते ३० इतकी कमी आहे. भारतातल्या मुसलमानांनी इसिस, अल् काइदा इ. अतिरेकी संघटनांना ठामपणे सार्वत्रिक नकार दिला आहे. यासंबंधी भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह, गौहत्तीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘‘अल् काइदा’ने ‘कायदा उल जिहाद’ अशी नवी शाखा उघडली आहे. या शाखेचा उद्देश बंगाल, आसाम, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि देशाच्या इतर काही भागांत त्यांची आतंकवादी पकड बसवणे असा आहे. आपला देश ते कदापि होऊ देणार नाही..

भारतात मुसलमान मोठय़ा संख्येने आहेत. मात्र देशाची अखंडता आणि सुरक्षितता यासाठी लढण्याची तयारी मुसलमान तरुणांनी नेहमीच दाखवली आहे. म्हणूनच अतिरेकी गटांचे मुसलमान तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. राजनाथ सिंह म्हणतात ते पूर्णत: खरेच आहे. पण त्याचमुळे भारतातील मुसलमान, म्हणजे भारतीय नागरिकांचा एक फार मोठा गट, आता दुहेरी संकटात आहे. यातील पहिला धोका म्हणजे मुजाहिदीन, अल् काइदा, इसिस यांना मुसलमान धर्मीयांकडून नकार घेण्याची सवय नाही. असा नकार त्यांना सहन होत नाही. त्यामुळे भारतातील तरुण मुसलमानांना वेडे बनवण्याचे प्रयत्न ते अधिक जोराने रेटतील.

मुजाहिदीन, अल् काइदापासूनचा दुसरा धोका गंभीर आहे. भारतातले मुसलमान आपल्याला वश होत नाही हे लक्षात आले, की या संघटना त्यांना ‘धर्मद्रोही’ ठरवतील. अशा धर्मद्रोहय़ांना क्रूर हिंसक शासन करणे हे ते आपले पवित्र कर्तव्य समजतात. त्यामुळे अल् काइदा, मुजाहिदीन यांचे नजीकचे हिंसाचाराचे लक्ष्य भारतातील शांतताप्रिय मुसलमान असणार आहेत. ती त्यांची रणनीती आहे. काश्मीरमध्ये बहुसंख्य जनता मुसलमान आहे. तेथे कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी ते मुजाहिदीनधार्जिणे, अल् काइदाधार्जिणे असणार नाही हे नक्की. असे सरकार हे मुजाहिदीनच्या दृष्टीने ‘काफिरांना’ सामील असणारे सरकार असेल. अशा सरकारांचा पाडाव करून तेथे ‘खिलाफत’ स्थापन करणे हा त्यांचा नजीकचा डावपेच आहे. त्यामुळे काश्मीरमधील सरकार आणि हे सरकार निवडून देणारा सामान्य मुसलमान हा या जहरी अतिरेक्यांसाठी प्रमुख शत्रू आहे. त्यांना ‘पवित्र’ शासन करणे, त्यांच्यावर क्रूर हिंसाचारी हल्ले करणे हा मुजाहिदीन, अल् काइदा यांचा नजीकचा कार्यक्रम राहणार आहे.

अत्याचारी अतिरेक्यांपासून भारतीयांचे, भारतातल्या मुसलमानांचे, संरक्षण करणे ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. हिंसेपासून संरक्षणासाठी, हिंसेने उत्तर देणे हे काम सैन्य आणि पोलिसांचे आहे. आपण नागरिकांनी जर हिंसेची भाषा केली (कृती तर लांबच राहू द्या) तर समाजात हिंसेची मानसिकता वाढेल. तीच नेमकी गोष्ट मुजाहिदीन आणि अल् काइदा यांच्या फायद्याची आहे. ‘डोळ्याला डोळा यातून सर्व जग आंधळे होईल,’ असे गांधीजी म्हणाले होते. मुजाहिदीन आणि अल् काइदा यांना कमजोर करायचे असेल, त्यांना भारतात पाय रोवू द्यायचा नसेल तर त्यांच्याशी हिमतीने आणि यशस्वीरीत्या गेली अनेक वर्षे सामना करणाऱ्या भारतातील मुसलमानांना एकटे पडू देता कामा नये. सर्व भारतीयांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ‘हम तुम्हारे साथ हैं, हम सब एक हैं’ हा विश्वास त्यांना देण्याची गरज आहे.

*लेखक  पुणे येथील ‘इण्डियन इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रीसर्च’ (इंडसर्च) येथे मानद प्राध्यापक आहेत.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modus operandi of al qaeda brutality
First published on: 01-01-2015 at 12:16 IST