येत्या दोन महिन्यांत राजकारण ढवळून निघेल. लोकसभेच्या निवडणुकांचे सावट राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवरच नव्हे, तर कार्यालयांवरही दिसू लागेल. राजकीय पक्षांची कार्यालये हा राजकारणाचा अस्सल खलबतखाना.. इथे राजकारण शिजते, रुजते आणि पाझरते.. या कार्यालयाच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि भिंतीला राजकारणाचा स्पर्श झाल्याने इथल्या वातावरणाला वेगळेपणाचा वास असतो. बैठका, चिंतन, मनन, मंथन, सारं काही इथे होतं आणि इथूनच बाहेर पडतं.. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. साहजिकच, अनेक राजकीय पक्षांची केंद्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक कार्यालये इथे एकवटली आहेत. निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना या कार्यालयांना येऊ घातलेल्या नव्या लकाकीचा हा त्रयस्थ मागोवा.. दर रविवारी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चर्चगेटला उतरून ‘सब वे’तून बाहेर पडून त्याच फुटपाथने सरळ चालू लागलं, की पाच-सात मिनिटांत ‘वसंतराव भागवत चौक’ लागतो. वसंतराव भागवत म्हणजे, महाराष्ट्रात ज्यांनी भाजप रुजविला ते, पक्षाचे ज्येष्ठ नेते. या चौकात भाजपचं प्रदेश कार्यालय आहे. ‘योगक्षेम’ इमारतीकडे पाठ करून उभे राहिले, की समोर भारतीय जनता पक्षाच्या या कार्यालयाची चकचकीत इमारत नजरेस पडते.
जुन्या इमारतीत, सभागृहात व्यासपीठाच्या मागे एक मोठा फलक असायचा.. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती’असा ‘निर्धार’ त्यावर झळकत असायचा. नूतनीकरणानंतर तो फलक आता नाही. कार्यालयात प्रवेश करताच, दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे भव्य तैलचित्र नजरेस पडते. महाजन असताना, ‘भाजप म्हणजे महाजन’ असंच मानलं जायचं..  आता नव्या कार्यालयाला ‘कॉर्पोरेट लूक’ आलाय.. दुधी काचांच्या भिंतींनी बंद केलेल्या चकाचक केबिन्समधून पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि राष्ट्रीय नेते पक्षाचा कारभार चालवितात. महत्त्वाच्या साऱ्या बैठकाही इथेच होतात आणि महायुतीमधील भाजपच्या धोरणांची आखणीही इथेच जन्म घेते..
प्रमोद महाजन यांनी पूर्वी पक्षाच्या कार्यालयाचं पहिलं नूतनीकरण केलं, तेव्हा एक दालन खास आपल्या पसंतीनुसार बनवून घेतलं होतं, असं सांगतात. त्यांच्या पश्चात, गोपीनाथ मुंडे यांचं दालन म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना मुंबईत आले, म्हणजे याच खास दालनात कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक म्हणजे मैफलीचाच माहोल असायचा.
आता कार्यालयाचं रूपच पालटल्याने, ते दालन नाही. नव्या कार्यालयात भरपूर, वातानुकूलित दालनं आहेत. प्रत्येक दालनातच नेत्यांच्या आणि त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असतात. चहा, नाश्त्याच्या प्लेट घेऊन वेगवेगळ्या दालनांमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची लगबग सतत सुरूच असते. राज्यातील नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या बैठका असतात, तेव्हा तर जेवणाच्या पंगतीही बसतात. इतर दिवशीदेखील, अभ्यागतांची ऊठबस करताना, दोनतीनशे कप चहा सहज संपून जातो.. चहावरून राजकारणात उमटलेल्या वादळानंतर तर, अलीकडे भाजपच्या या कार्यालयात सर्वत्र चहाचे भरलेले आणि रिते झालेले कप आढळतात..गोपीनाथ मुंडे दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर काही काळ हे कार्यालय काहीसं एकटंएकटं झालं. सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांचा राबता काहीसा रोडावला. मुंडे यांनी संसदीय राजकारण करावे, तर गडकरींनी संघटनात्मक राजकारण करावे असे वाटप झाल्याची चर्चा सुरू झाल्यापासून मुंडे यांचं इथे येणंही कमी झालं.. गडकरी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पुन्हा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले आणि इथली गजबजही पुन्हा सुरू झाली. कार्यालयाबाहेरच्या गाडय़ांच्या गराडय़ातील त्यांची गाडी दिसली, की मुंडे आत आहेत, हे ओळखून कार्यकर्ते, नेते गर्दी करू लागले.
निवडणुकांची चाहूल लागण्याआधीपासूनच भाजपच्या प्रदेश कार्यालयावर मोदींच्या करिश्म्याची लकाकी चढू लागली आहे. राज्यातून कार्यकर्त्यांच्या, इच्छुकांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. कुणी इच्छुक एखाद्या दिवशी कार्यालयात प्रत्येक नेत्याच्या केबिनमध्ये येरझारा घालताना दिसतो. कधी इच्छुकांचा जवळचा सहकारी दिवसभर थांबून अंदाज घेण्याचा प्रयत्न करून गावाला परततो.. लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची यादी प्रदेशातून जारी होणार नाही, हे माहीत असतानाही कानोसा घेण्याचे आपापले प्रयत्न करणारे अनेक जण कार्यालयाच्या आसपासही दिसतात. विधानसभेच्या निवडणुकांची तर हवादेखील दूर आहे, पण ‘नमो’ अशा अक्षरांचे स्टिकर असलेल्या गाडय़ांची गर्दी आता सुरू झालीच आहे. नरेंद्र मोदींना न्यायालयाचा दिलासा मिळाला, मोदींची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवड झाली, ..निमित्त कोणतेही असो, कार्यालयाबाहेरच्या रस्त्यांवर फटाक्याच्या आतषबाजीला उधाण येते आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या गर्दीलाही, निवडणुकांच्या रंगतदार राजकारणाची चाहूल लागते..
नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या या कार्यालयात डोकावण्याची संधी मिळावी, यासाठी येताजाता अनेक जण उगीचच घुटमळतानाही दिसतात. सहज आत जाऊन फेरफटका मारून बाहेर आल्यावर उजळणारे त्रयस्थांचे, अगदी सामान्य मतदारांचे चेहरेही इथे दिसतात.
कार्यालयाच्या प्रशस्त अशा प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच, आतील भारदस्त राजकारणाची चाहूल लागते. प्रत्येक बंद दालनात राजकारणाचा मागोवा घेण्याचे काम सुरू असते. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक बैठकीत या गप्पांमधून मिळालेल्या माहितीचा मसाला उपयोगी पडतो..
भाजप हा संघ परिवाराचा घटक. पक्षाचे अनेक नेते संघाच्या मुशीतूनच पक्षाच्या राजकारणात दाखल झालेले.. संघाच्या कट्टर कार्यकर्त्यांच्या घरी, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि माधव सदाशिव गोळवलकर- म्हणजे गुरुजी, यांची छायाचित्रे असतातच.. पक्षाच्या कार्यालयात एखाद्या दालनात कुणाच्या तरी टेबलावर आणि सभा दालनाच्या मागच्या भिंतीवर त्यांच्या प्रतिमा दिसतात. पक्षाचं परिवाराशी असलेलं नातं स्पष्ट असावं यासाठी जाणीवपूर्वकच या प्रतिमा सभागृहात लावल्या आहेत, असं कुणी तरी पदाधिकारी ठामपणे सांगून टाकतो..
कार्यालयातील उजवीकडचं दालन म्हणजे, पक्षाचा प्रसिद्धीप्रकोष्ट. इथे पत्रकारांचा, टीव्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा राबता सुरू असतो. पक्षातील घडामोडींच्या, अन्य पक्षांतील आतल्या बातम्यांचा हमखास पुरवठा या ठिकाणाहूनच होतो, असं पत्रकार खात्रीपूर्वक मानतात.. केशव- म्हणजे केशव उपाध्ये आणि माधव- म्हणजे माधव भांडारी हे दोघे प्रवक्ते या दालनातच भेटतात.. गप्पांचा फड रंगलेला असतो. राजकीय किस्से, घडामोडी, बातम्या, माहितीची देवाणघेवाण सुरू असते..
भाजपच्या नव्या कार्यालयात पक्षाचे नेते, पदाधिकारी आहेतच, पण वीस-पंचवीस कर्मचारीदेखील आहेत. काही कर्मचारी तर, आपण पगारी कर्मचारी आहोत हे विसरूनच गेले आहेत. तेही कार्यकर्ते असल्याच्या भावनेनंच इथे वावरताना दिसतात..
पक्षाच्या कार्यालयातील टेलिफोन ऑपरेटर हा मुंबईतील अनेक पत्रकारांची ‘हेल्पलाइन’च आहे. कधी कुणाशीही, अगदी भाजपबाहेरील नेत्यांशी संपर्क साधावयाचा असेल, तरी त्याच्या दूरध्वनी क्रमांकासाठी इथे बिनदिक्कत चौकशी करावी. टेलिफोन नंबर मिळणारच, या खात्रीला फारसा कधी धक्का लागतच नाही..
संपर्क यंत्रणेची सारी अद्ययावत साधने असलेल्या या कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर मोबाइलची रेंज मात्र केबिनबाहेरच रेंगाळू लागली आणि अनेक नेते संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचा अनुभव कार्यकर्त्यांना येऊ लागला. बूस्टर लावून मोबाइलच्या सिग्नलची क्षमता वाढविण्याचे प्रयोग सुरू झाले, पण केबिनमधील नेत्याशी मोबाइल संपर्काचे अडथळे अजून संपलेले नाहीत, असा कार्यकर्त्यांचा तक्रारीचा सूर अधूनमधून कानावर पडतो..
देशात नरेंद्र मोदींची लाट असल्याचे आणि भाजप आघाडी सत्तेवर येणार असल्याचे वेगवेगळे सर्वेक्षण अहवाल बाहेर पडू लागल्यानंतर भाजपचे हे प्रदेश कार्यालय जणू मोदीस्पर्शाने भारून गेले आहे. नरेंद्र मोदींची छायाचित्रे, फलक, पोस्टर्स, बॅनर्सची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.
बाहेरच्या भिंतीजवळ, उंच बांबूंमध्ये पक्षाचे भलेमोठे झेंडे उभे आहेत.
निवडणुकीचा माहोल सुरू झाला, की फडकण्यासाठी जणू ते उतावीळ आहेत, असे उगीचच वाटू लागते..
     
पक्षायन भा.ज. प.
देशात नरेंद्र मोदींची लाट असल्याचे आणि भाजप आघाडी सत्तेवर येणार असल्याचे वेगवेगळे सर्वेक्षण अहवाल बाहेर पडू लागल्यानंतर भाजपचे हे प्रदेश कार्यालय जणू मोदीस्पर्शाने भारून गेले आहे. नरेंद्र मोदींची छायाचित्रे, फलक, पोस्टर्स, बॅनर्सची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namo india bjp mumbai head office
First published on: 09-02-2014 at 02:36 IST