शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून आधीच दूर असलेल्या मेळघाटातील आदिवासी मुलांचे आणि त्यातही अंध मुला-मुलींचे आयुष्य कसे असेल, याची सहज कल्पना करता येऊ शकते; पण २५ वर्षांपूर्वी प्रकाशाची वाट दाखवणारे बेट चिखलदरा येथे तयार झाले आणि अंधकारात चाचपडणाऱ्या या मुलांचे आयुष्यच बदलून गेले. अमरावतीच्या राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेच्या (नॉफ) चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयाने या भागातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना जगण्याची उमेद मिळवून दिली आहे.

राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था ही अपंगांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन या क्षेत्रात कार्य करणारी एक अग्रणी संस्था. १९८५ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे बहुतांश पदाधिकारी अंधच आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे आहेत. ही संस्था दृष्टिहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग अशा सर्व ‘दिव्यांगां’साठी समर्पित भावनेने कार्य करीत आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून संस्थेला अपंगांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा २०१३ या वर्षांचा ‘अपंग कल्याणार्थ राज्यस्तरीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Neha Hiremath and Accused Fayaz
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

या संस्थेच्या वतीने १९९१ मध्ये चिखलदरा येथे निवासी अंध विद्यालयाची स्थापना करण्यात आली. मेळघाट हा आदिवासीबहुल भाग. कोरकू आदिवासींचे हे ठिकाण. शिक्षणाविषयी कमालीची अनास्था. या आदिवासींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम आधी करावे लागले. या भागात अंध मुलांची संख्या जास्त असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांच्या शिक्षणाची कोणतीही सुविधा या भागात नव्हती. या अंध मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. सुरुवातीच्या काळात या अंध शाळेत मुले पाठवण्यासाठी पालक तयार होत नव्हते. अल्प विद्यार्थिसंख्येवर ही शाळा सुरू झाली. आज या अंध विद्यालयात ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात ३४ मुली आहेत. अनेक मुले या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडली. या निवासी अंध विद्यालयात आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. ती दहावीपर्यंत करावी, यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

क्रीडा क्षेत्रात चमक

समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून या शाळेची आणि ‘नॉफ’ची वाटचाल सुरू आहे. या शाळेने या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. आदिवासी मुलांना शिकवण्याच्या प्रक्रियेत येणारी मुख्य अडचण ही भाषेची आहे. या भागातील मुले एक तर त्यांची मातृभाषा कोरकू किंवा मोडकीतोडकी हिंदी यातून संवाद साधू शकतात. या मुलांना सर्व भाषांचे ज्ञान मिळावे, त्यांच्यातील कौशल्यगुणांना वाव मिळावा, सर्जनशीलता निर्माण व्हावी, याकडे संस्थेने विशेष लक्ष पुरवले आहे. क्रीडा क्षेत्रात या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. क्रिकेट किंवा कबड्डीच्या विविध स्पर्धामधून त्यांनी चमक दाखवली आहे. संगीतविषयक विविध कार्यक्रमांमधूनही मुला-मुलींनी आपला सहभाग नोंदवला आहे.

संस्थेने मिळालेल्या मदतीतून पाच वर्षांपूर्वी शाळेसाठी सुसज्ज इमारत उभी केली. या शाळेत शहरांमधील शाळांप्रमाणे सर्व आधुनिक प्रकारच्या सुविधा असाव्यात, अशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. निवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्थेतील ३४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सातत्यपूर्वक काम करीत आहेत, त्यामुळे सर्व मुलांकडे व्यक्तिगत लक्ष पुरवणे शक्य होत आहे. शालेय अभ्यासासोबतच खेळ, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ही मुले उत्साहाने सहभागी होतात. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ व शासनाचा समाजकल्याण विभाग यांच्या होणाऱ्या स्पर्धामध्ये या शाळेची मुले सतत चमकत आली आहेत. दृष्टिहीन व्यक्तींना संगीताचे विशेष भान आणि जाण असते, असे अनेकदा अनुभवायला येते. त्याची साक्ष विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांमधून पटते. चिखलदरा पर्यटन महोत्सवात या विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाची संधी मिळते. संपूर्ण शाळा संगणकीकृत करण्याचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मानस आहे.

स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्र

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सज्ज करण्याच्या हेतूने शाळेत स्वतंत्र अभ्यास केंद्र स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कलोती, कार्याध्यक्ष रामराव पोकळे, उपाध्यक्ष विजय नारायण श्रीवास्तव, सरचिटणीस दिलीप धोटे, सचिव सुधाकर पोकळे, प्राचार्य अनिल ढवळे यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. मेळघाटातील ३२ गावांमध्ये ‘क्राय’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आदिवासी कोरकू समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. अपंग युवक आणि युवतींच्या आंतरिक गुणवत्तेच्या विकासासाठी आणि प्रामुख्याने त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे, त्यांच्यात नेतृत्वक्षमता विकसित करण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारीत लुईस ब्रेल कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. ‘नॉफ’ या संस्थेच्या वतीने चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयाखेरीज अमरावतीत १८ वर्षांवरील अपंगांकरिता व्यावसायिक कर्मशाळा, दृष्टिबाधितांच्या शिक्षकांसाठी डी.एड. स्पेशल एज्युकेशन, दर्यापूर येथे निवासी अंध विद्यालय आणि नागपूर येथे कर्णबधिर विद्यालय इत्यादी प्रकल्प राबवले जातात.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

मोहन अटाळकर