|| शफी पठाण

सा हित्य संमेलनाच्या मंचावर प्रत्यक्ष नयनतारा सहगल नव्हत्या, पण संमेलनाध्यक्षाच्या खुर्चीपासून रसिकांच्या शेवटच्या ओळीतील खुर्चीपर्यंत चौफेर सहगल यांचीच छाया जाणवत होती. साहित्य संमेलन म्हटलं की, संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचं सर्वानाच आकर्षण असतं. परंतु, हे संमेलन उपस्थित नसलेल्या उद्घाटकांच्या भाषणासाठी स्मरणात राहील.

सहगल यांना यवतमाळकरांनी पाहिलेलं नाही. परंतु त्यांच्या निमंत्रणवापसीवरून जो वाद निर्माण झाला, त्यावरून त्यांच्याविषयी एक वेगळीच सहानुभूती यवतमाळकरांच्या मनात निर्माण झाली. केवळ यवतमाळकरच नाही तर महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातून संमेलनासाठी आलेल्या सर्वच मराठी रसिकांना सहगल यांचे संमेलनाला न येणं सारखं खटकत होतं. त्याचं प्रतिबिंब संमेलनाच्या मंडपात चौफेर जाणवत होतं. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे या निमंत्रणवापसीवर काय भूमिका घेतात, यावरच अवघ्या यवतमाळात चर्चा रंगली होती. संमेलनाचे पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी बडोद्याच्या संमेलनात ‘राजा तू चुकत आहेस,’ असं विधान करून सत्ताधीशांना खडे बोल सुनावले होते. अध्यक्षपदाची सूत्रे अरुणाताईंकडे सोपविताना हा ‘देशमुखी बाणा’ पुन्हा जागृत होईल का, असाही विचार अनेकांच्या मनात चमकून गेला. या निमंत्रणवापसीचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी जोडला गेल्यानं संमेलनात आलेले सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे काय भाष्य करतील, याबाबतची उत्सुकताही स्पष्ट जाणवत होती. संमेलनाचा बिगूल वाजला, पाहुणे मंचावर आले आणि ही ‘सहगलछाया’ अधिकच गडद होत गेली. उद्घाटक म्हणून पहिल्यांदा माइकसमोर आलेल्या वैशाली येडे यांनी, ‘‘अडचणीच्या वेळी दिल्लीवाली नव्हे तर गल्लीवालीच बाई कामी येते,’’ असे विधान करून सहगलांच्या अनुपस्थितीला स्पर्श केला. या विधानाला टाळ्या मिळाल्या, पण सहगलांच्या अनुपस्थितीचे शल्यही त्या टाळ्यांच्या निनादात जाणवत राहिलं. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मात्र उगाच प्रतीकात्मक किंवा सूचक न बोलता सहगलांच्या निमंत्रणवापसीवरून आयोजक आणि महामंडळाला थेट सौजन्यानं झोडून काढलं. संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभरात काय केलं, याचा फार लेखाजोखा न मांडता देशमुखांनी सहगल यांच्या निमंत्रणवापसीलाच भाषणाचा मुख्य मुद्दा बनविला. टीकेची झोड सहन करणारे सरकारचे प्रतिनिधी विनोद तावडे यांनीही सहगलांचाच विषय पुन्हा चर्चेला घेतला. ‘‘आम्ही संमेलनाला अनुदान देतो, ते केवळ सरकारची भाषेबद्दलची बांधिलकी म्हणून. संमेलनाचे निमंत्रित ठरविण्याशी आमचा तिळमात्र संबंध नाही. तरीही काही मंडळी पूर्वग्रहातून सहगलांच्या निमंत्रणवापसीवरून सरकारला शिव्याशाप देत असतील, तर ते योग्य नाही,’’ असं त्यांचं म्हणणं होतं. संमेलनाच्या पूर्वार्धापासून मध्यंतरापर्यंत असा ‘सहगल राग’ निनादत असतानाच संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्या पहिल्याच मिनिटाला सहगलांबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील, असं वाटत असतानाच अरुणाताईंचं भाषण वाङ्मयीन पूर्वेतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत बरंच पुढं आल्यानंतरही सहगलांच्या विषयाला काही त्यांनी स्पर्श केला नाही. त्या काहीच कशा बोलत नाहीत, असा प्रश्न रसिकांच्या मनात घोळत असताना भाषणाच्या एका टप्प्यावर अखेर त्यांनी सहगलांच्या विषयाला हात घातला. ‘‘मराठीची उदारता जगानं पाहिली आहे. मराठीनं कायम इतर भाषांचा सन्मान केला आहे. मराठीला असा उज्ज्वल इतिहास लाभला असताना नयनतारा सहगल यांना केवळ इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून कुणी विरोध करीत असेल आणि त्या विरोधाला घाबरून आयोजक व महामंडळ त्यांचे निमंत्रण रद्द करीत असतील तर ही मराठीची मान शरमेनं खाली घालणारी बाब आहे,’’ अशा शब्दांत त्यांनी आयोजक आणि महामंडळ दोघांचाही समाचार घेतला. हा समाचार रसिकांना इतका आवडला, की जिथं जिथं सहगल यांचं नाव यायचं तिथंच टाळ्या वाजायच्या. या टाळ्यांचा आणि त्या वाजवणाऱ्या गर्दीचा नयनतारा सहगलांशी असा अदृश्य संबंध संमेलनाच्या मांडवात दृश्य स्वरूपात जाणवत होता.