हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com
शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने दिवसागणिक वाढत आहेत. कोकणातील भात शेतीसमोरही अशीच मजुरांची कमतरता, उत्पन्नातील मर्यादा आणि वाढते औद्योगीकरणाची आव्हाने उभी ठाकली आहेत. या सर्वावर मात करण्यासाठी ‘एसआरटी’ अर्थात सगुणा भात लागवड तंत्र विकसित करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा हा एके काळी राज्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होता. आता मात्र ही ओळख पुसली जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढते औद्योगीकरण, मजुरांची कमतरता आणि शेती उत्पन्नातील मर्यादा यांसारख्या कारणामुळे जिल्ह्यातील शेती समोर नवी आव्हाने उभी राहिली आहे. जिल्ह्यातील भात लागवडीखालील क्षेत्र गेल्या काही वर्षांत जवळपास १८ हजार हेक्टरने घटले आहे. ही बाब लक्षात घेऊ न ‘एसआरटी’ अर्थात सगुणा भात लागवड तंत्र विकसित करण्यात आले आहे. ज्यामुळे भात लागवडीचा खर्च आणि श्रमाची मोठी बचत होण्यास मदत होत आहे.
रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख २४ हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जात असे. आता मात्र हे क्षेत्र घटून १ लाख ५ हजार हेक्टरवर आले आहे. म्हणजेच भात लागवडीखालील क्षेत्र १८ हजार हेक्टरने घटले आहे. पुढील काही वर्षांत यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४१ हजार २०० हेक्टर एवढे होते. यातही मोठी घट झाली आहे. ते आता १ लाख १४ हजार ४४३ हेक्टरवर आले आहे. म्हणजेच खरीप लागवडीखालील क्षेत्र २७ हजार हेक्टरने घटले आहे.
शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने दिवसागणिक वाढत आहेत. जिल्ह्यात औद्योगीकरणाच्या नावाखाली हजारो हेक्टर शेतजमिनी संपादित केल्या जात आहेत. महाकाय प्रकल्प या जमिनींवर उभ्या राहणार आहेत. दुसरीकडे याच औद्योगीकरणामुळे रोजगाराची नवी साधने उपलब्ध झाली आहेत. त्यातच मुंबई जवळ असल्याने तरुणाई रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतरित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशावेळी कष्टप्रद आणि कमी प्रतिष्ठेच्या शेती व्यवसायाकडे नवीन पिढी वळेनाशी झाली आहे. भातशेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. हवामानातील बदल अनियमित पर्जन्यमान यात भर घालतात. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम शेतीवर झाला आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी शेतीपासून दुरावत चालला आहे.
त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवणे, यांत्रिकीकरणाला चालना देणे, आधुनिक पीक लागवड पद्धतीचा अवलंब करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी दोघांचेही अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही बाब लक्षात घेऊ न नेरळ येथील कृषी अभ्यासक चंद्रशेखर भडसावळे यांनी ‘एसआरटी’ अर्थात सगुणा भात लागवड तंत्रज्ञान विकसित केले. भात लागवडीतील श्रम आणि खर्च कमी करणे हा यामागचा मूळ उद्देश होता. नेरळ येथील आपल्या जागेत निरनिराळे प्रयोग करून हे तंत्र विकसित केले.
एसआरटी लागवड तंत्र
कोकणातील पारंपरिक भात लागवड पद्धतील नांगरणी, चिखलणी, भाताच्या रोपांचे वाफे तयार करणे आणि नंतर मजुरांना घेऊ न लावणी करणे अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. यात श्रम, वेळ आणि पैसा खर्ची पडतो. तयार रोपांच्या लागवडीसाठी दहा ते बारा मजुरांची मदत घ्यावी लागते. या उलट ‘एसआरटी’ लागवड पद्धतीत नांगरणी, चिखलणी आणि लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतोच पण उत्पन्नही वाढण्यास मदत होते. ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीचा कर्ब वाढतो आणि उत्पादकताही वाढते. भात कापणीनंतर इतर पिकेही घेतली जाऊ शकतात. यामुळे शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नही वाढते.
या लागवड पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या गादीवाफ्यांमुळे भातरोपांच्या मुळाशी प्राणवायूचे प्रमाण योग्य राहाते. मुळाशी पुरेसा ओलावा टिकून राहतो. साच्यामुळे दोन रोपांमधील अंतर समप्रमाणात राखले जाते. त्यामुळे एका एकरातील रोपांची संख्या नियंत्रिक करता येते. या लागवड पद्धतीत अगोदरच्या पिकांची मुळे जमिनीतच कुजू दिली जातात. त्यामुळे जमिनीचा कर्ब वाढतो. रोग आणि किड प्रादुर्भाव कमी होण्यासही मदत मिळते. कमी पाऊ स अथवा जास्त पावसाचा भात पिकावर विपरीत परिणाम होत नाही.
लागवडीचे फायदे
‘एसआरटी’ लागवड पद्धतीमुळे भात लागवडीचा खर्च पन्नास ते साठ टक्कय़ाने कमी होऊ शकतो. लावणी करावी लागत नसल्याने ५० टक्के श्रम कमी होता. जमिनीची धूप २० टक्कय़ांपर्यंत थांबविता येते. रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर येऊ शकतो. भात आठ ते दहा दिवस आधी तयार होतो. समान अंतरावर रोप लागवड केली असल्याने पिकांना सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो. त्यामुळे पिकांची वाढ जोमात होते. लावणी करताना रोपांना होणारी इजाही कमी होते.
तंत्रज्ञानाची जन्मकथा..
अमेरिकेतून परतल्यावर शेती करण्याचा निर्णय चंद्रशेखर भडसावळे यांनी घेतला. पण शेतीसाठी मजुरांची जुळवाजुळव करणे खूप अडचणीचे ठरत होते. चिखलणी जमिनीची धूप होत होती. त्यामुळे १९९८ पासून भडसावळे यांनी भात लागवडीच्या संशोधनाला सुरवात केली. प्रयोग केल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही याची खात्री त्यांना होती. लावणी करणे किचकट काम आहे. त्यातून बाहेर पडायचे होते. त्याचा मागोवा घेत असताना एसआरटी तंत्र गवसले. उन्हाळ्यात दुबार भात पिकाची लागवड केली जाते. मी भाताऐवजी भुईमूग लागवड केली. त्यासाठी तयार केलेले गादी वाफे शिल्लक राहिले, त्यामुळे या वाफ्यात हायब्रीड भाताची लागवड केली. ठिबक सिंचनाच्या मदतीने हे पीक घेतले. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. यातूनच एसआरटी भात लागवड तंत्रज्ञान विकसित झाले. १४ वर्षांच्या प्रयोगांनंतर २०११ साली हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाले.
जगापुढे आज ‘ग्लोबल वॉर्मिग’ आणि अन्नधान्य तुटवडा दोन मोठय़ा समस्या आहेत. पारंपरिक भात लागवड पद्धतीने मिथेन उत्सर्जन होते. या तंत्रज्ञानात मिथेन उत्सर्जन होत नाही. उलट हवेतील कार्बन डायक्साइड शोषला जातो. दरवर्षी या प्रकारच्या एका एकर शेतीद्वारे ९ टन कार्बन डायॉक्साइड शोषला जाऊ शकतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला फायदा होऊ शकतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा, शासनाने त्यासाठी प्रयत्न करावेत.
– चंद्रशेखर भडसावळे, एसआरटी तंत्रज्ञानाचे जनक
रायगड जिल्ह्यात भात शेतीसाठी मजूर मिळणे कठीण होत चालले आहे. वाढत्या मजुरीमुळे शेती न लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. अशा वेळी एसआरटी तंत्र शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकते. यामुळे शेतीचा खर्च आणि श्रम बचत होण्यास मदत मिळते. या तंत्राचा वापर करून कापणीनंतर जोड पिकेही घेता येऊ शकतात. शेतकऱ्यांना एसआरटी लागवड तंत्र वापण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
– रवींद्र मर्दाने, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र
कोकणात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. कारण यांत्रिकीकरण करणे परवडत नाही. बैलजोडी बाळगण्याची गरज नाही. फावल्या वेळेत कमी श्रमात हे तंत्रज्ञान वापरून शेती करता येऊ शकते. इंधनाची यामुळे बचत होते. उत्पादन आणि उत्पादकता वाढू शकते.
– नवीनचंद्र बोऱ्हाडे, कृषी पर्यवेक्षक