या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले विचार.

‘विविधतेत एकता असणारी संस्कृती’ म्हणून भारतीय संस्कृतीचा गवगवा करणाऱ्या नतद्रष्ट वाचाळवीरांच्या संकुचित बुद्धिचातुर्याचे पितळ सध्या तरी उघडे पडले असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण इथल्या नागरिकांच्या मानसिकतेत रुजलेली विषमतेची विषवल्ली. नेहमी जातिभेदावरून अनेकांच्या कत्तलीपर्यंत पोहोचणारे प्रकरण आता वर्णभेदावरूनही कत्तलीपर्यंत पोहोचत आहे. हे स्व:संस्कृतीचा गर्व बाळगणाऱ्या आणि स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या भारतीयांना लाज वाटून घेण्यासारखे प्रकरण नक्कीच आहे. यापूर्वीही भारतात वर्णभेदाची प्रकरणे अनेकदा घडलेली आहेत. मासोंदा ओलिव्हिए हा काही पहिलाच या व्यवस्थेचा बळी नाही; पण प्रश्न हा पडतो की, केव्हापर्यंत कातडीच्या रंगावरून मासोंदासारख्या निरपराध व्यक्तींच्या कत्तली होत राहणार? केव्हापर्यंत ते या व्यवस्थेला बळी पडत राहणार? युरोपियन, अमेरिकन समाजात वर्णद्वेष असतानाच, भारतात मात्र जातिभेदाच्या जोडीला वर्णभेदाचे मूळही घट्ट रुजणे, माणसाला माणूस म्हणून जगू न देण्याचे लक्षण होय. हे खरे तर हिटलरशहाचेच वैशिष्टय़ म्हणावे लागेल, कारण स्वत:ला शुद्ध आर्य वंशाचा समजणाऱ्या अडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धात अनेक ज्यू नागरिकांना वांशिक भेदावरून हवाबंद खोलीत डांबून मारले.

तो भेद होता काळ्या-गोऱ्यांचाच, कित्येक कृष्णवर्णीयांचा गुलाम म्हणून व्यापार होत असताना, जेव्हा त्यांची प्रकृती खालावल्यास त्यांना निर्जन बेटावर वा मृत्यू झाल्यास समुद्रात सोडले जाई. तेव्हा कुठल्याही गोऱ्या व्यक्तीला त्यांची कीव येत नसे. एवढेच नव्हे, तर जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर या थोर शास्त्रज्ञालाही या वर्णद्वेषाला बळी पडावे लागले. हे झाले जगाबद्दल! भारताचा इतिहास उलगडता असे लक्षात येते की, या देशात वर्ण, जात, वर्ग इ. सर्व प्रकारचे द्वेष ठासून भरलेले आहेत, जे माणसामाणसांत विषमतेच्या िभती उभ्या करतात; पण केंद्रातील मंत्री व्ही. के. सिंह यांना या गोष्टींशी काहीही घेणेदेणे नसते. ते मासोंदासोबत घडलेल्या घटनेला किरकोळ घटना समजतात. भारताचा धार्मिक इतिहास बघितल्यास हे ज्ञात होते की, इथे वर्णद्वेषाची प्रकरणे प्राचीन काळापासून घडत आहेत. आर्य-अनार्य संघर्ष हे त्याचेच उदाहरण. तथाकथित आर्यानी अनार्यावर विजय मिळवून सत्ता प्रस्थापित केली आणि अनार्याना कनिष्ठ लेखले. धार्मिक ग्रंथात त्यांचा देव आणि दानव असा भेद दिसून येतो. हे अनार्य म्हणजेच दानव, राक्षस, असुर, की ज्यांचा वर्ण काळा वर्णिला गेला आहे. ते दुष्ट होते असेही त्यांचे वर्णन केले जाते. त्यामुळे धार्मिक ग्रंथात ही वर्णद्वेषाची मुळे रुजलेली आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अमेरिकन समाजात एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीवर अत्याचार झाल्यास त्याच्या न्यायासाठी गौरवर्णीय रस्त्यावर उतरतात; पण भारतात तशी स्थिती नाही. ‘अतिथी देवो भव’ची संस्कृती जोपासतो म्हणून सांगणाऱ्या भारतात जेव्हा एखादी जाहिरात बनविली जाते, तेव्हा त्या जाहिरातीतही अतिथी हे गौरवर्णीयच दाखविले जातात. त्यामुळे साहजिकच गोऱ्यांबद्दलचा मान आणि काळ्यांबद्दलचा द्वेष मनात रुजतो. कृष्णवर्णीय असणारा मासोंदा ओलिविए हा या देशात अतिथी असला तरीही त्याला वर्णद्वेषाला बळी पडावे लागते. खरे तर या सर्व घडामोडीसाठी जबाबदार ठरतो तो इथला सत्ताधारी वर्ग आणि संस्कृतीचा उदोउदो करणारे भाकड कथानक. डॉ. आंबेडकरांनी या देशात जातिनिर्मूलनाची चळवळ उभारली आणि कनिष्ठ गणल्या गेलेल्या जातींना कायदेशीर संरक्षण देऊन, भरघोस प्रयत्न केल्यानंतरही पूर्णपणे जातिनिर्मूलन होऊ शकले नाही, कारण इथल्या लोकांची प्रवृत्ती. तेच वर्णभेदासही लागू पडते. काळा म्हणजे कुरूप, नीच, दुष्ट, राक्षसी प्रवृत्तीचा अशी समजूत जनमानसात घट्ट रुजली आहे. त्यामुळेच ‘ब्लॅक इज ब्युटीफुल’सारख्या चळवळी या देशात चालवाव्या लागतात. कांचा ऐलय्यासारख्या विचारवंताला ‘बफेलो नॅशनॅलिझम’ या पुस्तकात म्हशीच्या सुंदरतेविषयी सांगावे लागते. माणसानेच माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेल्यामुळेच कृष्णवर्णीयांना, कनिष्ठ जातींतील लोकांना गुलामासारखी, जनावरासारखी वागणूक दिली गेली. तेव्हा भारतासारख्या देशात माणसाच्या प्रतिष्ठेवर संकट येत असेल, तर त्यात नवीन काही नाही; पण या वैचारिक मागासपणाच्या प्रवृत्तीला दूर सारण्यासाठी आणि मानवी प्रगतीचे अत्युच्च शिखर गाठण्यासाठी, माणसाने किमान माणसाशी तरी माणसाप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती स्वीकारणे अत्यंत निकडीचे आहे. नाही तर काळ्या कातडीचे हे वास्तव तग धरून राहील, यात तिळमात्र शंका नाही.

(जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personal opinion on loksatta agralekh
First published on: 16-06-2016 at 05:00 IST