दयानंद लिपारे  

कोल्हापूर म्हटले की ऊस, भात, काजू, सोयाबीन, केळी, भाजीपाला ही पिके डोळय़ांसमोर येतात. कोल्हापूरच्या कृषी क्षेत्रात आता एक अनोखी भर पडत आहे, ती म्हणजे रबर शेती. कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आणण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉ. डी.  वाय. पाटील कृषी तंत्र विद्यापीठाने रबर लागवड सुरू केली आहे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
ग्रामविकासाची कहाणी
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

कोल्हापूर म्हटले की नजरेसमोर येतात गूळ, दागिने, चप्पल, मिसळ अशा काही वैशिष्टयपूर्ण वस्तू. कोल्हापुरी कृषी क्षेत्राची ओळख ही तर ऊस शेतीने ओळखली जाऊ लागली आहे. शेतीचे नानाविध प्रयोग या भूमीत झाले आहेत. ऊस, भात, काजू, सोयाबीन, केळी, भाजीपाला ही येथील पिके शेतकऱ्यांना आधार ठरली आहेत. कोल्हापूरच्या कृषी क्षेत्रात आता एक अनोखी भर पडत आहे, ती म्हणजे रबर शेती. कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आणण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉ. डी.  वाय. पाटील कृषी तंत्र विद्यापीठाने रबर लागवड सुरू केली आहे.  या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारा नवा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोल्हापूरमध्ये कृषी औद्योगिक क्रांती घडून आली आहे. द्रष्टे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरणाची बांधणी केली. कोल्हापूर सुजलाम सुफलाम होऊ लागले. उसाचे क्षेत्र बहरले. गुऱ्हाळघरांची मालिकाच आकाराला आली. त्यापासून उत्पादित कोल्हापूरचा गूळ देश-विदेशात प्रसिद्ध पावला. याच भूमीमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आधुनिक शेती अवजाराचे संग्रहालय सुरू केले. शाहूपुरी, जयसिंगपूर येथे बाजारपेठा सुरू केल्या. मुख्य म्हणजे कृषी उत्पादनाचे नवनवे प्रयोग केले.  त्यामध्ये सुगंधी तेल, औषधी तेल, मधुमक्षिका पालन, सुती कापड उद्योग हे काही उल्लेखनीय.  याच्या जोडीलाच त्यांनी चहा, कॉफी, रबर, वेलदोडे, कोको, ताग, अंबाडी, बटाटे, लाख ट्रॅफिकओका, कंबोडियन कापूस यासारखी या भागात कधीच न घेतलेली कृषी उत्पादने घेतली. हे सर्व कृषी विषयक उपक्रम म्हणजे शाहू महाराजांच्या प्रयोगशीलतेचे आणि प्रगतशीलतेचे द्योतक ठरले होते. चहाच्या मळय़ाचा प्रयोग तर अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला होता.

शाहूंच्या भूमीत त्यांचाच प्रयोग नव्याने

शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी केलेला एक प्रयोग आता त्यांच्याच भूमीत नव्याने अवतरत आहे. तो म्हणजे रबर शेतीचा. याकामी डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. रबर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया यांच्यासोबत यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आवारात आणि विद्यापीठाची मालकी असलेल्या डोंगर उताराच्या दोन गावांमध्ये रबर लागवड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाला सुरुवात केली आहे. याचे यश दाखवून अन्य शेतकऱ्यांनाही याकडे वळवण्याचा हेतू आहे. सह्याद्रीच्या पल्याड असलेल्या कोकणात रबर शेती तशी स्थिरावली आहे. त्याचे अनुकरण करण्याचा हा एक वैशिष्टय़पूर्ण प्रयत्न आहे.

सह्याद्रीच्या कुशीत रबर शेतीचा विस्तार

जागतिक उत्पादनापैकी ७० टक्के कच्च्या रबराचे उत्पादन मलेशिया आणि इंडोनेशिया होते. भारतात रबराची लागवड १८८० च्या सुमारास त्रवणकोर आणि मलबार भागात करण्यात आली. १९०२ मध्ये रबर मळय़ांची व्यापारी दृष्टय़ा लागवड झाली.  १९१० साली १२ हजार हेक्टर, स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी ६३ हजार हेक्टर तर १९७७-७८ साली  २ लाख ३३ हजार हेक्टर इतके क्षेत्र होते. त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली.  तमिळनाडू, कर्नाटक, अंदमान निकोबार, आसाम, मिझोराम येथे रबर लागवड वाढत आहे. गोवा राज्यामध्ये रबर लागवडीस सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीतही रबर शेती हळूहळू विस्तारत चालली आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही केरळ मधून आलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रबर लागवड ३०-३५ वर्षांपासून सुरू झाली आहे.

रबर लागवड तंत्र- मंत्र

रबर लागवडीला प्रोत्साहन देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. यासाठी केंद्राने रबर बोर्डाची स्थापना केरळमध्ये केली आहे. रबर शेतीसाठी अनुदान देण्यात येते. रबर लागवड होऊ लागल्याने दोडामार्ग येथे प्रादेशिक कार्यालय सुरू झाले आहे. या बोर्डामार्फत कलमांचा पुरवठा, तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. दापोली येथील कृषी महाविद्यालय रबर शेतीला प्रोत्साहन देण्यामध्ये पुढाकार घेत आहे. ही जमिनीची बाजू असल्याने आता कोल्हापूरसारख्या उसाच्या पट्टय़ातही रबर शेतीचा अंकुर फुलू लागला आहे. दक्षिण भारतात सह्याद्री पर्वताच्या उतारावरील समुद्रसपाटीपासून सुमारे ३०० मीटर उंची पर्यंतच्या प्रदेशात रबराचे मळे आहेत. जास्त उंचीवरील प्रदेशात झाडावर रोग पडतात. त्यामुळे उत्पादन घटते व चीक काढण्यासाठी केलेल्या शेतावरील सालीचे पुनरुज्जीवन होत नाही. ही बाब लक्षात घेता कोल्हापूरचे वातावरण रबर झाडांची लागवड करण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय नारळ, मिरी, टॅपिओका या पिकाबरोबर रबर झाडे मिश्र पीक म्हणूनही लावता येते. 

रबराच्या झाडापासून प्रारंभिक चीक काढावा लागतो.  तो खोडास चीर पाडून पन्हाळी सारख्या पत्राचा तुकडा वापरून काढण्याची पद्धत आहे. बिया लावून वाढवलेले झाड सात-आठ वर्षांत चीक काढण्याच्या स्थितीत येते. जमिनीपासून दीड मीटर उंचीपर्यंतच्या खोडाच्या सालीपासून चिक काढतात. चिक काढण्यासाठी चीर घेण्याच्या पूर्ण मळसूत्री, अर्धमळसूत्री, रोमन व्ही अक्षर अशा काही पद्धतीचा अवलंब केला जातो. लहान मळेवाले नारळाच्या करवंटीचा या कामासाठी वापर करतात. दिवसाच्या वाढत्या तापमानाबरोबर चिकाच्या थेंब थेंब गळणाऱ्या स्रावाचे  प्रमाण कमी होत जाऊन तीन तासानंतर स्त्राव बंद होतो. एक दिवसाआड  चीक काढला जातो. चिक काढते वेळी झाडाची साल थोडी कापली जाते. चिक काढण्यास सुरुवात केल्यानंतर दहा – पंधरा वर्षे चिकाचे उत्पन्न घेता येते.  झाडाची योग्य काळजी घेतल्यास ४०  ते ५०  वर्षांपर्यंत चीक काढता येतो. काही लहान रबर उत्पादक रोज चीक काढतात. तथापि यामुळे झाडाचे आरोग्य व आयुर्मान कमी होते. चिकापासून रबराच्या नानाविध वस्तू बनवल्या जातात.  सायकली पासून मोठय़ा जड वाहनांच्या टायरसाठी तसेच वेगवेगळय़ा उद्योगधंद्यांमध्ये कारखान्यांमध्ये रबराचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.

रबर शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती चांगली होते.  हे काम चिकाटीचे, कष्टाचे आहे. जितके परिश्रम घ्याल तितकी लक्ष्मी अधिक चालून येतेकोल्हापुरात उगवाईयामुळे कोल्हापूरसारख्या डोंगराळ भागात जिथे ऊस व अन्य पीक येत नाही अशा ठिकाणी रबर शेती केली जात आहे. कोकणात ज्याप्रमाणे आंबा पिकतो तितक्या प्रमाणात कोल्हापूरच्या मध्य, पश्चिमेकडील भागात आंबा उत्पादन येत नाही. अशा ठिकाणी पर्यायी चांगले पीक म्हणून रबर शेती उपयुक्त ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय राष्ट्रीय रबर बोर्डाच्या माध्यमातून डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने हा नवा प्रयोग सुरू केला आहे. त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून कोट्टायम येथील रबर रिसर्च इंस्टीटय़ूट ऑफ इंडियासोबत रबर लागवडीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. रबर बोर्डाचे कार्यकारी संचालक डॉ. के. एन. राघवन आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रबर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. एम.डी. जेसी व कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही संस्थांमधील हा करार पाच वर्षांसाठी असून परस्पर सहमतीने त्यात वाढ केली जाणार आहे. विद्यापीठ परिसरात लागवड केल्या जाणाऱ्या रबर रोपासाठीचे सर्व तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य ‘रबर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया करणार आहे.

कृषी क्षेत्राशी निगडित संशोधन व विविध प्रयोग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन यासाठी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ नेहमीच कार्यरत आहे. कोल्हापुरात रबर लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवा आर्थिक पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘रबर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने रबर लागवडीचा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल. रबर उद्योगातही कोल्हापूर जिल्ह्याचे नाव आघाडीवर राहावे असा आमचा प्रयत्न राहील. या भागात रबर लागवड यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना तर फायदा होईलच त्याचबरोबर अनेक प्रक्रिया उद्योगही उभे राहतील. – डॉ. संजय डी. पाटील, कुलपती, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ

डी. वाय. पाटील समूह कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला विद्यापीठाचा परिसर दूरदृष्टीची साक्ष देत आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी रबर लागवड हा याच प्रयत्नांचा पुढील भाग आहे. रबराच्या १० विविध जाती असून ४० हजाराहून अधिक उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूर येथील वातावरण रबर लागवडीसाठी पोषक आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येईल. – डॉ. राघवन, कार्यकारी संचालक, रबर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया

विद्यापीठाच्या आवारात बाराशे रबर रोपांची लागवड करण्यात आली आहे. विद्यापीठाची केकले व अन्य ठिकाणी पाच ते सात एकर डोंगराळ जमीन आहे. येथेही रबर लागवड हाती घेतली आहे. या माध्यमातून कोल्हापूरच्या भागात रबर शेतीचा नवा प्रयोग आकाराला येत आहे. – ए. बी. गाताडे, विद्यापीठाचे कृषी विभाग प्रमुख

dayanand.lipare@expressindia.com