|| दयानंद लिपारे

कोवळय़ा वयात आलेल्या अपंगत्वावर मात करून नसीमा हुरजूक यांनी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेद्वारे हजारो अपंगांना स्वत:च्या पायावर उभे केले. अपंगांना शिक्षण, रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनाचे कार्य ही संस्था करते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही संस्था अपंगांचा आधारवड आहे.

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?

अपंगत्वापाठोपाठ मानसिक दुबळेपणाची मालिकाही सुरू होते. त्यातून मुक्त होऊन अपंगांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आहे तो कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेने! या संस्थेने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील हजारो अपंगांच्या जीवनात प्रकाशवाटा तयार केल्या आहेत. स्वत:च्या अपंगत्वावर मात करून हजारो अपंगांना उभारी देण्यासाठी पुढाकार घेतला तो नसीमा हुरजूक यांनी. या संस्थेत त्यांना ‘दीदी’ नावाने ओळखले जाते.

शाळेत असताना नसीमाने एका नृत्यस्पर्धेत भाग घेतला होता. अचानक मंचाची फळी तुटल्याने त्या कोसळल्या आणि त्यांच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले. कालपर्यंत नाचणारी, बागडणारी मुलगी चाकाच्या खुर्चीवर कायमची जखडली गेली. सर्वोत्तम नृत्यांगना होण्याच्या तिच्या स्वप्नाला तडा गेला. पण नाउमेद न होता नसीमाने त्यावर मात केली आणि तिने अंगीकारलेल्या कार्यातून शेकडो अपंगांच्या मनात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवली गेली.

दीदींना आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली ती बाबुकाका ऊर्फ एस. एन. दिवाण यांनी. त्यांनी दीदींना धर्यशील बनवले. त्यामुळे अपंगत्व ही आपली मर्यादा नाही, असे त्यांनी स्वत:ला बजावले आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नोकरी पत्करली. येथूनच त्यांनी अपंगांना विविध स्वरूपात मदत करण्यास सुरुवात केली. अपंगांच्या राष्ट्रीय स्पर्धेत टेबल टेनिस, भालाफेक, गोळाफेक, व्हीलचेअर रेस अशा खेळात त्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत वैयक्तिक अजिंक्यपद मिळवल्याने त्या इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत सहभागी होऊ शकल्या.

गेली पाच दशके नसीमा दीदींनी हजारो अपंगांना शिक्षण, प्रशिक्षण, व्यवसाय यामध्ये मार्गदर्शन केले. त्यातून त्यांच्यात आत्मसन्मान आणि आत्मभान जागवले गेले आणि ते स्वबळावर उभे राहू लागले. एकदा स्वप्न पाहिले, की मग ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी असते. आता वयाच्या ६८ व्या वर्षी शारीरिक व्याधीग्रस्त असतानाही अपंगांच्या कल्याणासाठी त्यांची धडपड अखंड सुरूच असते.

अपंग अपत्याची जबाबदारी टाळण्याच्या अमानुष घटना पाहून दीदी अस्वस्थ व्हायच्या. आणि मग त्यातून अपंगांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय ‘हेल्पर्स’ने घेतला. अपंगांची जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांच्या जीवनशैलीला अनुसरून वसतिगृह उभारले पाहिजे, असे संस्थेने ठरवले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून दोन एकर जागा मिळवली. शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या उचगाव गावातील जागेत संस्थेचे पहिले रोपटे लावले गेले ते ‘घरौंदा’ वसतिगृहाच्या नावाने. पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना येथे प्रवेश दिला जातो. अपंगांच्या सर्वागीण पुनर्वसनाचे कार्य केले जाते. या वसतिगृहाने आजवर पाच हजारांहून अधिक मुलांना आधार दिला आहे. प्रवेशितांची शारीरिक तपासणी करून कृत्रिम साधने पुरवली जातात. गरजेप्रमाणे शस्त्रक्रिया केल्या जातात. संस्थेने २,३३३ अपंगांना ५५ लाख ८९ हजार रुपयांची कृत्रिम साधने, उपकरणे दिली आहेत, तर केंद्र सरकारच्या अनुदानातून १३५ लाभार्थ्यांना २ लाख ६० हजारांची उपकरणे दिली आहेत.

यानंतर नसीमा दीदींनी संस्थेची स्वतंत्र शाळा हे नवे आव्हान स्वीकारले. उपोषणाचा मार्ग अवलंबिला, तेव्हा कुठे वसतिगृहाला लागूनच आणखी दोन एकर जागा मिळाली. याच जागेत आता उभे राहिले आहे, बालवाडी ते दहावीपर्यंतचे अपंग आणि सदृढ यांना एकत्रित शिक्षण देणारे- समर्थ विद्यामंदिर!

‘घरौंदा’मध्ये अपंगांना स्वबळावर उभे करणारे वेगवेगळे प्रकल्प आहेत. त्याची जबाबदारी विभागून दिली आहे. प्रत्येक जण आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडतो. एकमेकांच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही, तरीही साऱ्या कामात साऱ्यांचाच सूर जुळला आहे. ‘हॅण्डिहेल्प वेल्फेअर फाऊंडेशन’ हे त्यातील एक! या माध्यमातून अपंग विद्यार्थ्यांना कपडे शिवण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण, तर ‘हॅण्डिहेल्प वेल्फेअर फाऊंडेशन’द्वारा अपंग व्यक्तींना लागणारी सर्व कृत्रिम साधने बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अपंगांना परवडेल अशा दरात कृत्रिम साधने पुरवली जातात. सरकारी सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना कृत्रिम साधने याच संस्थेकडून घ्यावीत असे महाराष्ट्र शासनाने अध्यादेशात म्हटले आहे. येथे सात अपंग व एक सुदृढ सेवारत आहेत. त्यांचे विभागप्रमुख अविनाश कुलकर्णी. छायाचित्रण कलेचा छंद जोपासताना त्यांना अपंगत्व आले आहे. आजही ते हा छंद जोपासतात. त्यावर आधारित त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

सन २००० साली सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात माणगावकर कुटुंबीयांनी बक्षीसपत्राने संस्थेला साडेबारा एकर जमीन दिली. पायवाट नसलेल्या जंगलात ‘हेल्पर्स’च्या अपंग पथकाने जमीन साफ करण्यापासून काम सुरू केले. येथे काजू बी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. आठ-दहा अपंगांना सोबत घेऊन सुरुवात केलेल्या प्रकल्पात आज दीडशे लोकांना रोजगार मिळाला आहे. ७५ टक्के अपंग व त्यात ६० टक्के महिला आहेत. ११ टन काजू बियांवर पहिल्या वर्षी प्रक्रिया केली. या वर्षी ४०० टन काजू प्रक्रिया केली गेली. आता हा प्रकल्प ६०० टन काजू प्रक्रिया करणारा आणि २०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा असा विस्तारायचा आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या निधी संकलनाचे काम सुरू असून दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

आता परिपूर्ण ‘स्वप्ननगरी’ उभारण्याचे  ‘हेल्पर्स’चे स्वप्न आहे. त्यात अपंगांसाठी रोजगार, स्वमालकीचे घरकुल उभारले जाणार असून आता ते बऱ्याच अंशी प्रत्यक्षात उतरले आहे.

या स्वप्ननगरीत सिमेंट ब्लॉक बनवणे, शेती व दूध प्रकल्प सुरू केला आहे. अपंगांनाही त्यांच्या परीने वैवाहिक जीवन जगायचे असते ही गरज ओळखून ‘हेल्पर्स’ने अपंग-सदृढ असे अनेक विवाह करून दिले असून या सर्वाना अव्यंग अपत्ये झाली आहेत. पाच अपंगांनी स्वत:च्या घरकुलासाठी २-३ गुंठे जागा खरेदी केली आहे. या उपक्रमात आणखीही अपंग सहभागी होतील. ते स्वत:चे घर स्वत: बांधून घेतील. त्यांचे जीवन आणि भवितव्याची सुरक्षा संस्थेमुळे मिळाली आहे. मात्र, या प्रवासात अपंगांना समाजातील दानशूरांची साथ हवी आहे. अपंग असूनही स्वत:च्या पायावर उभे राहणाऱ्यांना ‘हेल्पर्स’ने मदतीचा हात दिलाच आहे. ‘हेल्पर्स’ला आपल्या कार्याचा विस्तार करायचा आहे. अनेक गरजू अपंगांच्या पुनर्वसनाबरोबरच कोकणातील काजू बी प्रकल्प विस्ताराचे आव्हान संस्थेपुढे आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’

कोल्हापूर-हुपरी मार्गाने सरळ गडमुडिशगी कमानीपर्यंत जावे. कमानीतून आत प्रवेश केल्यावर पहिल्या डाव्या वळणाने सरळ येताच आपण संस्थेच्या समर्थ विद्यामंदिर या शाळेत पोहोचतो. घरौंदा अपंगार्थ वसतिगृह व प्रशिक्षण केंद्र शाळेलगतच आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून हे अंतर सात किलोमीटर आहे.

धनादेश –‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर’ (Helpers of the Handicapped, Kolhapur) या नावाने काढावा. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.