– अॅड. सीमंतिनी नूलकर
साताऱ्यापासून अवघे १६ ते १७ किलोमीटर असलेले लिंबगाव तिथल्या बारा मोटेच्या विहिरीमुळे सर्वत्र प्रसिद्ध. परंतु कृष्णाकाठच्या या लिंबची ओळख त्याहीपेक्षा प्राचीन ताम्रपाषाण, नवाश्म, मध्याश्मयुग, माळवा संस्कृती, सातवाहन अशी आहे. या प्राचीन कालखंडाचे साक्षीदार म्हणून या गावाची नव्याने ओळख तयार होत आहे. मुघल, मराठेशाही, ब्रिटीश अशा ऐतिहासिक राजवटीही या गावाने अनुभवल्या आहेत.
लिंबगावाची वेस एकेकाळी नागेवाडीपर्यंत होती. या परिसरात शाकंभरी देवीचे मंदिर आहे, शिळावर्तुळ आहे. ऐन नदीपात्रातल्या बेटावर कोटेश्वर मंदिर आहे. जुनी भित्तीचित्रं असलेली मंदिरं आहेत. सुबक देखणे घाट आहेत. जुने वाडे आहेत. मध्ययुगीन वास्तू आहेत, सतीशिळा-वीरगळ आहेत आणि ‘पुरातत्व पर्यटना’साठी सर्वात महत्त्वाचे असलेले ‘पांढरी’ चे टेकाड देखील आहे.
अनेक गावात ‘पांढर’ किंवा पांढरीचे टेकाड असते. जिथे वहितीला योग्य अशी जमीन – किर्दसार आहे, जिथे सधन शेतकरी, शेतीकामाचे मजूर आहेत ती वस्ती म्हणजे गाव समजले जाते. अशा गावाचे सहसा दोन भाग पडतात. एक वस्तीचा भाग – गावठाण म्हणजे पांढरी. तर दुसरा शेतीचा म्हणजे काळी.
लिंबगावात जुन्या काळची पांढरी आहे. साधारण तीन ते चार एकर परिसरात पसरलेले हे टेकाड आहे. इथे केलेल्या पुरातत्वीय उत्खननात ताम्रपाषाण, नवाश्म, मध्याश्मयुग, माळवा संस्कृती, सातवाहन कालखंडातल्या एकावर एक वसत गेलेल्या वस्त्यांचे थर आढळले. या उत्खननात दगडी हत्यारं, प्राण्यांची हाडं, वेगवेगळ्या प्रकारची काळी – लाल खापरं, काचमणी, शंखबांगडीचे तुकडे, नाणी मिळाली आहेत.
या गावातील उत्खननात सातवाहनकालीन कुंभ, सिरीसातकर्णीचे नाणे मिळाले. प्राचीन काळातील धान्याचे अवशेष सापडले आहेत. या एवढ्या पुरातत्वीय सांस्कृतिक संपदेतून लिंबची प्राचीन समृद्धी तर समजतेच जोडीने प्राचीन व्यापारी मार्गावरील त्याचे अस्तित्व स्पष्ट होते. कृष्णेची सुपीक गाळाची जमीन, मुबलक पाणी आणि एखाद्या प्राचीन व्यापारी मार्गाचे सान्निध्य याने या गावाला श्रीमंत केले असावे.
अनुकूल पर्यावरणामुळे मध्याश्मकालाचा काही भाग माणसासाठी सुखकाळ बनला होता. माणसाचे भटके जीवन संपून शेतीचा शोध लागला. वस्ती-निवारा, अन्न साठवणूक करणे, त्यासाठीची भांडी तयार करण्याची गरज निर्माण झाली. हाच माणूस म्हणजे महाराष्ट्राचा ‘आद्या शेतकरी’. सुखसमृद्धीचा काही काळ गेल्यानंतर, सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी पर्यावरण, हवामानातले बदल यामुळे पाऊसमान कमी झाले. प्रतिकूल पर्यावरणामुळे, आद्या शेतकरी देशोधडीला लागला. तिथपासून मानवाच्या उत्क्रांतीचे अनेक टप्पे, पांढरीच्या टेकडांच्या उत्खननांत दिसतात. महादेव डोंगररांगांच्या कुशीत वसलेले लिंबगाव असे युगायुगांचे साक्षी आहे.
पर्यटन या युगाचा, परवलीचा शब्द आहे. ‘पुरातत्व पर्यटन’ हाही यातीलच एक प्रकार. प्राचीन कालापासून माणसाचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि हवामानामुळे झालेली स्थित्यंतरे, स्थलांतरे, विकासाचे टप्पे समजून घेण्याच्या दृष्टीने; पुरातन वारशाची जपणूक करण्यासाठी, सजगता निर्माण होण्यासाठी, पुरातत्व स्थळाजवळच्या स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनेही हे ‘पुरातत्व पर्यटन’ अर्थपूर्ण काम करते.
हे पर्यटन गतकाळाची कवाडे उघडून, आपल्याच प्राचीन आयुष्याशी, पूर्वजांशी संवाद करते. यामध्ये अदृश्य-अतूट बंध, दृढ करणारा रोमांचकारी अनुभव असतो. हा असा ‘पुरातत्व पर्यटना’चा अनुभव घ्यायचा असेल तर लिंबची पांढर वाट पहातेय !
ssnoolkar@gmail.com