संघटकांची संकुचित वृत्ती खेळाडूंसाठी मारक!

राज्याबाहेरील संघ बक्षीस पटकावतात म्हणून शिवशाही चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय करण्यात आली आहे. संघटकांचा हा संकुचित विचार खेळाडूंसाठी घातक आहे. ते आज हरतील, उद्या हरतील; पण त्यातूनही काही तरी शिकतील. हा विचार संघटक करत नाही. इतर राज्यांची वाटचाल यशाकडे का व कशी होत आहे, त्याचा विचार करून राज्यातील देशी खेळाडूंनी वाटचाल करायला हवी, तरच महाराष्ट्रात बदल घडेल.

महाराष्ट्रात क्रीडा संस्कृतीची मुळे आजही शाबूत आहेत, परंतु ती संस्कृती कशा पद्धतीने पुढील पिढीकडे पोहोचवतो, त्यावर त्याचा प्रसार अवलंबून असतो. क्रिकेटपाठोपाठ सर्वाधिक स्पर्धा कबड्डीच्या भरवल्या जातात. त्यामुळे देशी खेळांना व्यासपीठ नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. बँकांनी कबड्डीचे संघ केले, असे आपण म्हणतो. माझ्या मते त्याला खेळाडूच जबाबदार आहेत. बँकांच्या संघातून तुम्ही चांगली कामगिरी करत नसाल, तर त्यांच्याकडे पर्याय उरणार नाही. खेळाडूंनीही व्यावसायिक व्हायला हवे.

आमच्या काळात आम्ही एकजुटीने राहत होतो. त्यामुळे आम्ही अन्यायाविरुद्ध लढू शकत होतो किंवा आपली मते सहज पटवून देऊ शकत होतो, आता तसे होत नाही. संघटनेतील पदाधिकाऱ्यांना स्वत:चा अहंकार महत्त्वाचा वाटतो. मग त्यात खेळाडू व खेळाचा बळी गेला तरी त्यांना चालतो. अहंकार बाजूला ठेवल्यास, तो काही तरी नक्की जिंकू शकतो. मी खेळत असताना महाराष्ट्रात दर्जेदार अखिल भारतीय स्पर्धा होत होत्या, पण आता मुद्दा निघाला की बाहेरून संघ येतात आणि त्यामध्ये बक्षीस पटकावतात. मग त्यात चुकीचे काय आहे? या स्पर्धा राज्यस्तरीय करून आपण आपलीच स्पर्धा कमी का करतोय? असे करून आपण स्वत:ला कमी लेखतोय. आपल्याच घरात आपणच शहाणे होऊन बक्षीस रक्कम जिंकण्यात का अर्थ? संघटक आणि प्रशिक्षक तुमच्याच खेळाडूंना दुबळे करत आहात. तुम्हीच त्यांचे पंख कापता.
 – अनुराधा डोणगावकर, माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू

 

देशी खेळ म्हटल्यानंतर डोळ्यांसमोर मातीतील खेळ उभे राहतात. त्यामध्ये खो-खो, कबड्डी, मल्लखांब, आटय़ापाटय़ा, लंगडी असे विविध देशी खेळ आणि यांचे वैशिष्टय़ म्हणजे याला एकही रुपयाची गुंतवणूक लागत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे खेळ खेळले जातात. प्रशिक्षक नसतानाही केवळ बघून ती मुले हे खेळ खेळतात. कुस्ती कोल्हापूर आणि सांगलीपर्यंत मर्यादित राहिली. त्यांनी तो जिवंत ठेवलेला खेळ आहे. खेळाची जातकुळी बदलत चालली आहे.

अरुण देशमुख, क्रीडा संघटक व प्रशिक्षक

 

विविध खेळांच्या संघटनांनी एकत्र येऊन आपल्या अडचणी सोडवाव्यात. विचारमंथन करून त्यावर तोडगा काढावा, असे होत नाही. आमच्याच खेळाच्या संघटना चालवताना त्या खेळाकडे दुर्लक्ष होते, असा आमचा अनुभव आहे. देशी खेळ जेव्हा सुरू झाले, तेव्हा संघटनाही अस्तित्वात नव्हत्या. त्या वेळी आम्हाला छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार किंवा सुवर्णपदके अशी उद्दिष्टे होती का? कालचे खेळाडू म्हणून आज कार्यकर्ते म्हणून का उभे राहू शकत नाहीत.

भास्कर सावंत,  मैदान बचाव समितीचे अध्यक्ष

************

व्यावसायिकतेची बदलती लीग

व्यावसायिकता असेल तर, नोकरीचा अट्टहास नको!

सुंदर अय्यर, टेनिस संघटक

असंख्य घरांमध्ये संध्याकाळी क्रीडावाहिन्या पाहिल्या जातात. विविध स्तरांतील हॉटेल्समध्ये टीव्हीवर क्रीडाविषयक कार्यक्रमच सुरू असतात. हा बदल लीगमुळे झाला आहे. महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातल्या व्यक्तींना खेळातल्या तांत्रिक गोष्टी समजू लागल्या आहेत. लीगमुळे खेळाडूंना शारीरिक तसेच मानसिक कणखर होण्यासाठी प्रशिक्षण मिळते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळते. मात्र लीग स्थानिक होण्याची आवश्यकता आहे. वैयक्तिक स्वरूपातले खेळ स्वार्थी असतात. लीगमुळे एकत्र येण्याची भावना वाढीस लागते. लीगना समाजाचे पाठबळ मिळाल्यास विकास होईल. १०, १३, १४ वर्षांखालील गटासाठी लीग सुरू झाल्यास लहान वयातच व्यावसायिकता अंगी बाणेल. आपल्या खेळाडूंचे ध्येय नोकरीच आहे का? हे समजून येत नाही. नोकरी मिळाली की खेळाडू खेळापासून दूर जातात. असे व्हायला नको. खेळात जर व्यावसायिकता असेल तर, नोकरीचा अट्टहास नको. नोकरी हा दुय्यम भागच असायला हवा. एक खेळ दुसऱ्या खेळाच्या वाढीसाठी नक्कीच साहाय्यभूत ठरू शकतो.

************

लीगच्या रूपाने खेळात होणारा बदल अपरिहार्य

राजू भावसार, माजी कबड्डीपटू

गेल्या पन्नास वर्षांत कबड्डी संयोजकांना जमले नाही ते केवळ दोनच वर्षांत प्रो-कबड्डी संयोजकांनी साध्य करून दाखवले आहे. लीगच्या रूपात खेळात होणारा बदल अपरिहार्य आहे. लीगच्या माध्यमातून खेळ आनुषंगिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. कामगारबहुल लालबाग-परळची कबड्डी सधन अशा पेडर रोडपर्यंत पोहोचली आहे. हे संक्रमण खेळाच्या भल्यासाठी आहे. दूरदर्शनने कबड्डीच्या प्रसारणाचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. स्टार स्पोर्ट्सने सखोल विचार करून बदल घडवले. खेळाडूंनी खेळ सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा खेळांसाठी काम करणे अपेक्षित आहे. यासाठी त्यांनी खेळांच्या संघटनांमधील प्रशासनात येणे आवश्यक आहे. ज्यांनी स्वतचे रक्त या खेळांसाठी सांडले अशांनी खेळांच्या व्यवस्थापनात यावे. त्यामुळे आपल्या संघटनेसाठी हे माजी खेळाडू आत्मीयतेने काम करतील. त्याने खेळांमध्ये होणारे राजकारण थांबेल व आपल्या विभागातील खेळाडूंना पुढे आणण्याचे प्रकारही थांबतील. पर्यायाने संघटना वादावादीऐवजी खेळांच्या भवितव्याकडे लक्ष देतील.

************

व्यावसायिकतेचे धडे बॉक्सिंगने गिरवावेत!

जय कवळी, बॉक्सिंग संघटक

व्यावसायिकतेचे वळण खेळाच्या सुदृढ बांधणीसाठी आवश्यक आहे. बॉक्सिंग हा खेळ आम्ही व्यावसायिकदृष्टय़ा चालवत नाही. याबाबतीत आम्हाला क्रिकेटकडून धडे घेण्याची गरज आहे. क्रिकेटमध्ये लवचिकता आली. त्यामुळे प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा क्रिकेटला लाभत गेला. असेच बदल कबड्डीतही झाले. मातीतली कबड्डी ही मॅटवर आली. त्यामुळे आजच्या प्रो-कबड्डीचे स्वरूप प्रेक्षकांपुढे आले. हे बदल कालानुरूप झाले. मात्र आजच्या बॉक्सिंगमध्ये असे बदल झालेच नाहीत. कारण बॉक्सिंगमध्ये व्यवसायिकतेचा अभाव आहे. त्यामुळे आता बॉक्सिंगमध्ये तांत्रिकदृष्टय़ा बदल करावे लागणार आहेत. आपल्या वैभवाचे सादरीकरण करण्याची कला आपल्याला जमलीच पाहिजे. व्यवसायिक लीग सुरू होण्यामागे भांडवलशाहीचा हात मोठा असला तरी, भांडवलशाहीचे दुर्गुणही या क्षेत्रात येत आहेत. क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे प्रकार झाल्यावर अन्य खेळांच्या माध्यमातून हे प्रकार थांबवण्यासाठी आचारसंहिता निर्माण करण्यात आली.

************

महिलांना दुजाभाव

महिला खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवावे

प्रा. नीता ताटके, मल्लखांबपटू, प्रशिक्षक

क्रीडा क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे सर्व सत्ता त्यांच्या हातात एकवटलेली असते. त्यामुळे महिला खेळाडूंना नेहमीच पुरुष खेळाडूंच्या म्हणण्यानुसार वागावे लागते. अनेकदा महिलांचा चुकीच्या कामासाठी वापर केला जातो. यातून महिलांचे मानसिक खच्चीकरण होत असून महिलांना केंद्रस्थानी ठेवून खेळाची आखणी करण्याची गरज आहे. आपल्याकडे खेळाचा विकास करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञानही पुरुषांच्या खेळाच्या पद्धतीनुसार ठरवण्यात आले आहे. स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक क्षमतेत फरक असल्याने त्यांची खेळाची पद्धतीही वेगळी आहे, मात्र हे लक्षात घेऊन त्यानुसार खेळांची मैदाने आणि तांत्रिक बाबींमध्ये महिलांच्या गरजा विचारात घेतलेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात तर महिला आणि पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनामध्येही तफावत होती. या समानतेसाठी महिलांनी अनेक वर्षे झगडा केला. त्यातूनच कालांतराने अनेक खेळांमध्ये महिला खेळाडूंनाही समान वेतन सुरू झाले आहे.

पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या क्रीडाक्षेत्रात अधिकार मिळवण्यासाठी प्रत्येक पातळीवर महिलांना लढा द्यावा लागला आहे. दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ९९७ पुरुषांसोबत २२ महिला होत्या, मात्र आता ही परिस्थिती बदलली असून येत्या ऑलिम्पिकमध्ये ४० टक्क्यांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. हा सहभाग अधिक वाढावा, यासाठी महिलांच्या बाजूने नियम होण्याची गरज आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या गरजा वेगळ्या असल्याने संघटनांनी त्यांना त्या पद्धतीच्या सोयीसुविधा देणे आवश्यक आहे. तालुका ते राष्ट्रीय पातळीपर्यंत होणाऱ्या स्पर्धामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून तर ग्रामीण भागातूनही महिला सहभागी होत असतात. मात्र तेथे खेळत असताना त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होणेही गरजेचे आहे. तसे झाले तर क्रीडा क्षेत्रात महिलांचे संघटन वाढेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल. महिलांच्या मागे त्यांचे कु टुंबाने कणखरपणे उभे राहायला हवे.

************

समाज प्रगल्भ नाही!

सुमा शिरूर, नेमबाजपटू

आपला समाज पारंपरिक विचारसरणींनी बांधला गेला असल्याने क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांना आपली पारंपरिक कर्तव्ये पार पाडूनच बाहेर पाऊल ठेवावे लागते. घरातील कामे सोडून त्यांचे खेळासाठी बाहेर राहणे सहसा मान्य केले जात नाही. स्पर्धाच्या निमित्ताने अनेक दिवस महिला खेळाडूंना घराबाहेर राहावे लागते. आपली आई, पत्नी घराबाहेर असणे कोणालाही आवडत नाही. मात्र अशा वेळी महिलांनी कुटुंबाच्या काळजीने ध्येयांपासून डगमगून न जाता, त्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. कालांतराने आपल्याला यश मिळाल्यानंतर साहजिकच कुटुंबीयांचा पािठबा मिळतो, ते आपला आदरही करतात. माझ्या कुटुंबीयांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले आहे. पण त्यांचे प्रोत्साहन ही नंतरची गोष्ट आहे. सर्वात आधी आपल्याला हे सगळे सहन करून आपले ध्येय गाठायचे आहे की नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट असले पाहिजेत. मी स्वत:च जर माझ्या ध्येयांविषयी किंवा माझ्या खेळातील करिअरविषयी साशंक असेन तर मी खेळात पुढे जाण्याऐवजी कुटुंब आणि समाजाच्या विरोधाची कारणे पुढे करत राहीन. पण जर मला माझ्या खेळाची, ध्येयाची निश्चित जाण असेल तर विरोधाला बळी न पडता माझ्या ध्येयासाठी झगडत राहीन. कारकीर्दीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमल बजावणीसाठी मी समर्थ होते. महिला खेळाडू गरोदर असेल तर तिचा खेळ संपलाच अशीच सगळ्यांची धारणा होते. त्यामुळे मी गरोदरपणात सातव्या महिन्यापर्यंत खेळत होते. मी असोसिएशनसकट कोणालाही कल्पना दिली नाही. त्या वेळी संघ माझ्या पाठीशी उभा राहिला.

************

महिला खेळाडूंकडे गांभीर्याने पाहिले जात नाही

डायना एडल्जी,माजी क्रिकेटपटू

महिला खेळाडूंना गुणवत्ता असतानाही सरकारी नोकरीत घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते. महिला अधिकारी पदावर येतील आणि त्यांच्या हुकूमानुसार वागावे लागेल, या भीतीने पुरुषमंडळी महिला खेळाडूंची बढती रोखून ठेवतात. मात्र नोकरीची पर्वा न करता महिला नियमाने प्रामाणिकपणे आपला खेळ खेळत आहेत.

‘क्रिके ट हा महिलांचा खेळ नाही, तुम्ही स्वयंपाकघर सांभाळा,’ हा सल्ला क्रिकेटमध्ये आदर्श मानल्या गेलेल्या संदीप पाटील आणि दिलीप वेंगसरकरसारख्या महान खेळाडूंकडून एके काळी मिळाला होता. १९७७ मध्ये भारतीय महिला क्रिकेट कसोटी जिंकल्यावर पारितोषिक देण्यासाठी संदीप पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्वासमक्ष माफी मागितल्याशिवाय पुरस्कार घेणार नाही, असे आम्ही सांगितले. अखेर त्यांनी जाहीरपणे महिला क्रिकेट संघाची माफी मागितली. क्रिकेटमध्ये महिला चांगली कामगिरी करीत असल्या तरी सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. आयसीसीची विश्वचषक स्पर्धा जिंकल्याशिवाय बीसीसीआयच्या दृष्टीने भारतीय महिला क्रिकेट संघाला महत्त्व मिळणार नाही.

तुम्ही तुमच्या हक्कांसाठी झगडल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. आजही ‘बीसीसीआय’कडून महिला क्रिकेट संघाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. असे असले तरी महिला क्रिकेट शिबिरे आणि सामने आयोजित करून आम्ही महिला क्रिकेट वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.