सफरचंद बागेचा बागलाणमध्ये प्रयोग!

देवळा, बागलाण परिसरात यापूर्वी काही शेतकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयत्न केला आहे

अनिकेत साठे aniket.sathe@expressindia.com

नाशिक जिल्ह्यातील बागलाण हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात पिकणारी द्राक्षे जगभर जातात. याच बागलाणमध्ये आता सफरचंद बागेचा प्रयोग फळे धरू लागला आहे. याच प्रयोगाविषयी..

नाशिक जिल्ह्यातील बागलाण हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसर. वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हंगामपूर्व द्राक्ष पीक काढण्यात या भागाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाताळात जगभरात द्राक्ष पुरविणारा हा एकमेव परिसर. जगात कुणाची द्राक्षे नसतात तेव्हा बागलाणची द्राक्ष जगात भाव खातात. लागवडीचे अचूक नियोजन अन् जोखीम पत्करण्याची तयारी या मूळ स्वभावातून नानाविध प्रयोग स्थानिक  पातळीवर अव्याहतपणे सुरू असतात. त्या अंतर्गत थंड प्रदेशात फुलणारी सफरचंद बाग बागलाणच्या काहीशा उष्ण वातावरणात फुलविण्याची किमया युवा शेतकरी चंद्रकांत ह्यळीज यांनी साधली आहे. यापूर्वी बागलाणसह देवळ्यात काही शेतकऱ्यांनी सफरचंद बाग फुलविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, आजवर फळाला सरासरी दीडशे ते दोनशे ग्रॅमचे वजन मिळाले नव्हते. ह्यळीज यांनी हिमाचल प्रदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, लागवड, फवारणीचे तंत्र आत्मसात करीत तो टप्पा गाठला आहे.

हंगामपूर्व द्राक्ष व डाळिंबाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यात शेतकऱ्याने सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आखतवाडे येथे ह्य़ाळीज कु टुंबाची वडिलोपार्जित शेती आहे. युवा शेतकरी चंद्रकांत हे वडील पांडुरंग ह्यळीज यांच्यासह काही क्षेत्रावर द्राक्ष, काही क्षेत्रावर डाळिंब तर उर्वरित क्षेत्रावर कांदा पीक घेतात. तीन वर्षांपूर्वी त्यांनी १० गुंठे जागेवर सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. सफरचंदच्या ‘हर्मन ९९’ वाणाला पसंती देऊन त्यांनी हिमाचलमधून १२० प्रती रोप प्रमाणे १५० रोपे मागविली. १० गुंठे क्षेत्रावर १३ बाय १४ या अंतरावर त्यांची लागवड करण्यात आली. प्रारंभी त्यांनी आंतरपीक घेतले. त्यासाठी छोटय़ा टॅक्टरने नांगरणी केली. सफरचंदाचे मुळे जमिनीलगत वा काहीशी वर येतात. नांगरणीत काही झाडांची मुळे तुटली. त्यात ती झाडे गेली. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर आंतरपीक घेणे बंद करण्यात आले. तेव्हापासून ट्रॅक्टरने नांगरणी केली जात नाही.

डिसेंबर २०२० च्या अखेरीस या झाडांची छाटणी करून बहर घेण्यात आला. फुलोऱ्यानंतर सहा महिन्यांत झाडाला फळ येतात. सध्या प्रत्येक झाडाला १५० ते २०० ग्रॅम वजनाची शंभर ते सव्वाशे फळे आहेत. फळांची संख्या बऱ्यांपैकी असून त्यांची गोडी बाजारात मिळणाऱ्या अन्य सफरचंदांप्रमाणेच आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातून येणारे सफरचंद आणि स्थानिक पातळीवर उत्पादित झालेले सफरचंद यांच्या चवीत कोणताही फरक नाही. उलट ही अधिक अवीट असल्याचे चव चाखणारे ग्राहक सांगतात. त्यामुळे ज्या ग्राहकांनी बागेत येऊन सफरचंद खरेदी केली ते आजही मागणी करतात. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे ह्यळीज यांनी आता एक एकर क्षेत्रात सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवळा, बागलाण परिसरात यापूर्वी काही शेतकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयत्न केला आहे. काश्मीर-हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचे साधारणत २०० ते २५० ग्रॅम वजन असते. स्थानिक शेतकऱ्यांच्या लागवडीत सफरचंदाचे वजन ७० ते ८० ग्रॅमच्या आसपास राहिले. फळाला चांगला आकार, वजन येत नसल्याने शेतकरी विचारात पडले होते. त्यांना ह्यळीज यांच्या बागेने उत्तर दिले. सफरचंद हे अतिशय नाजूक फळ आहे. फुलोऱ्यावेळी औषधांच्या जादा फवारणीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे समीकरण चुकले. फळे कडक झाली. आवश्यक तो आकार प्राप्त झाला नाही, असे निदर्शनास आले. संबंधितांना नियोजनात आवश्यक ते बदल करण्यास सुचविण्यात आले. असा प्रयोग करणारे पंढरपूर, नंदुरबार, मालेगाव, लोणी येथील शेतकऱ्यांनी ह्यळीज यांच्या सफरचंद बागेत भेट दिली आहे. फळाचा आकार बघून त्यांना सुखद धक्का बसला. कारण राज्यातील कोणत्याही बागेत त्यांना अशा आकाराचे फळ दृष्टिपथास पडले नाही. आता वेगवेगळ्या भागातील हे शेतकरी ह्यळीज यांच्या मार्गदर्शनानुसार सफरचंद लागवड करीत आहेत.

एक एकर सफरचंद लागवडीतून तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असा ह्यळीज यांचा अंदाज आहे. एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. डिसेंबरमध्ये छाटणी केली की जानेवारीत फुले येतात. जून, जुलैच्या सुमारास परिपक्व फळ तयार होते. शेतीच्या आवडीतून केलेले वेगवेगळे प्रयोग सफरचंदाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आले आहे. तीन वर्षांपूर्वी सफरचंदाची शेती करण्याचा विचार डोक्यात आला. उष्ण हवामानात सफरचंदाची रोपे तग धरणार का, याबाबत साशंकता होती. मात्र, रोपे केवळ जगलीच नाही तर, फळे देखील लागली. यावरून हंगामपूर्व द्राक्ष पाठोपाठ बागलाणमध्ये सफरचंदाची शेती होऊ  शकते, यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे चंद्रकांत ह्यळीज यांनी म्हटले आहे.

जमीन आणि हवामान

या फळाला लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त ठरते. सफरचंदाची लागवड करण्यासाठी तापमान सरासरी २१ ते २४ अंश असणे गरजेचे आहे. हे तापमान वर्षांतून किमान २०० तास झाडाला मिळायला हवे. पण आपल्याकडे राज्यात असे तापमान थंडीतच दोनशे पेक्षाही जास्त तास मिळते. त्यामुळे तापमानाचा प्रश्न निकाली निघाला आहे, असे लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या पिकाला चांगली फुले आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे १००  ते सव्वाशे सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे. ते पर्जन्यमान राज्यात उपलब्ध आहे.

खत व्यवस्थापन

एक एकर जमिनीत ४५० ते ५०० झाडांची संख्या असते. लागवड करताना रासायनिक खतांबरोबर या झाडाला प्रती वर्षी १० किलो शेणखत द्यावे लागते. रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणावर अवलंबून असते. तरीही साधारण ३५० ग्रॅम नत्र, १७५ ग्रॅम स्फुरद आणि ३५० ग्रॅम पालाश पूर्ण वाढलेल्या झाडाला दिले जाते. उन्हाळ्यामध्ये झाडाला सात ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याची गरज भासते. फळधारणा झाली की साधारणपणे आठवडय़ाने झाडाला पाणी दिले जाते. वेगवेगळ्या हंगामानुसार या फळावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या पिकावर कोलार रॉट, अ‍ॅपल स्कॅब यासारखे रोग पडतात. यावर मॅनको झेब, कार्बेन्डाझिम तसेच इतर बुरशीनाशकांची फवारणी योग्य पद्धतीने घेऊ न रोग नियंत्रण करता येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Successful experiment of apple cultivation in baglan taluka zws

ताज्या बातम्या