सध्या लिलावातल्या २३.७० कोटी रुपयांच्या किमतीमुळे बातम्यांचा विषय झालेले चित्रकार गायतोंडे यांचं निधन २००१ साली झालं. त्याआधी पाच वर्षांपूर्वी, विकल झालेल्या गायतोंडे यांचं यथातथ्य चित्रण करणारा आणि त्यांच्या चित्रांवरच अधिक लक्ष केंद्रित करणारा एक लघुपट तयार झाला, तो त्यांच्यावरला एकमेव लघुपट आहे. चित्रकाराशी नातं जोडणाऱ्या त्या लघुपटाचे कर्ते सुनील काळदाते यांच्या या गुजगोष्टींमधून कदाचित, लिलावाच्या पलीकडले गायतोंडे समजतील..   
चित्रकार व्ही. एस. (वासुदेव) गायतोंडे यांच्या चित्रासाठी खूप कोटींची बोली लिलावात लावली गेल्याची बातमी परवा आली आहे. गायतोंडे आता आपल्यात नाहीत. पण ते असते आणि त्यांनी ही बातमी ऐकली असती तर?
तर, ते काहीच म्हणाले नसते.
त्यांच्या चेहऱ्यावरली रेषाही हलली नसती. जिवंतपणी त्यांना समजा कळलं असतं की त्यांचं चित्र इतकं महाग झालंय, तरी त्यांना काही वाटलं नसतं.
ते निर्विकार राहिले असते.
आम्ही गायतोंडे यांच्यावर बनवलेल्या फिल्ममध्ये दिसतात, तसेच बसून राहिले असते ते.. आणि आपण विचार करत राहिलो असतो की यांच्या मनात आत्ता काय चाललं असेल.
‘चित्र आणि चित्रकार यांच्यातला फरकच मिटून गेला आहे. गायतोंडे यांचं असणं हीच एक कलाकृती झाली आहे. हा कलावंत आणि ही त्याची कला असा भेद राहिलेलाच नाही,’ अशा अर्थाची वाक्यं १९९५च्या मे महिन्यात आम्ही बनवलेल्या त्या फिल्ममध्ये होती.
ती खरी आहेत. पण तेव्हा मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे गायतोंडे कधीच चित्राबद्दल बोलायचे नाहीत. याच्यापेक्षा हे चित्र इथं जास्त चांगलं दिसेल, एवढंसुद्धा नाही.
या त्यांच्या शांततेमुळे आणि अलिप्ततेमुळेच मला मोठा धक्का बसला होता, त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हाच. तो धक्का आपण फिल्ममध्ये जसाच्या तसा आणायला पाहिजे, असं मी ठरवलं.
मग फिल्मच बदलली.
या फिल्ममध्ये पहिल्यांदा एक निवेदन आहे. रमणमहर्षी यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव गायतोंडे यांच्यावर होता. त्या रमणमहर्षीनी सूक्ष्मदेह आणि मुक्तीचा मार्ग यांच्याबद्दल एकदा कॅनव्हास, रंग, चित्राची बाह्य़रेषा आणि पूर्ण चित्र, अशा उपमा वापरलेल्या आहेत. त्यांचं ते अवतरण या फिल्मच्या सुरुवातीलाच आहे. मग गायतोंडे यांच्याबद्दल, जन्म १९२४- नागपूर, वास्तव्य खोताची वाडी- मुंबई, शिक्षण- जेजे स्कूल ऑफ आर्ट, मग वॉर्डन रोडच्या भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूटमधला त्यांचा काळ, १९६४ साली रॉकफेलर फाउंडेशनच्या फेलोशिपवर अमेरिकेला आणि १९७१ साली पद्मश्री, त्याच वर्षीपासून दिल्लीत वास्तव्य हे तपशील निवेदनात सांगून होतात आणि पुढेच गायतोंडे यांनी चित्रं काढणं जवळपास थांबवलंच आहे, असाही उल्लेख येतो. त्यानंतर मात्र एखाद्या दृश्याचा अपवाद वगळता गायतोंडे, त्यांचा स्टुडिओ आणि त्यांची चित्रं एवढंच फिल्मभर दिसत राहतं. शब्द अजिबात नाहीत.
हा नि:शब्दपणा गायतोंडे यांच्याकडूनच आला.
फिल्म करतेवेळी, गायतोंडे यांच्या स्टुडिओत त्यांची भरपूर चित्रं होती. ती आम्ही बदलायचो. माझा त्यामागचा हेतू हा होता की काळ दिसावा, बदलत्या चित्रांमधून.
काळ कितीही बदलला, तरी गायतोंडे बदलणार नाहीत, हे माहीत होतं. फिल्ममध्येही ते येतं. त्यांचं ते स्वत:त असणं मला टिपायचं होतं, तेही अशा पद्धतीने की, समोर कॅमेरा आहे याची जाणीव गायतोंडे यांना अजिबात होऊ नये.
म्हणून आम्ही काय केलं, कॅमेरा पहिले दोन-तीन दिवस नुसताच ठेवून दिला त्यांच्यासमोर. ऑन केलाच नाही. नंतर ऑन होता तेव्हाही मी कुठे तरी लांबच उभा राहायचो.
प्रेक्षकांनाही असंच वाटलं पाहिजे की, आपण गायतोंडे यांना सहज समोरनं पाहतोय. त्यासाठी मी अजिबात झूम, पॅन वगैरे तंत्रं गायतोंडे समोर असताना वापरली नाहीत.
तंत्रं वापरली, पण ती चित्रांवर.
फिल्म व्हिडीओ प्रकारची होती. पण कॅमेरा हवा तसा होता. पंडोल आर्ट गॅलरी आणि गायतोंडे ज्यांच्यावर विश्वास ठेवत ते गॅलरीचालक दादिबा पंडोल यांच्यामुळे फिल्मसाठी बरंच आर्थिक सहकार्य झालं होतं, त्यात हा एक भाडय़ानं आणलेला कॅमेरा.
या कॅमेऱ्यातून त्यांच्या चित्रांचे ‘एक्स्ट्रीम क्लोजअप’ घेण्यासाठी पॅरिसहूनच मी एक खास माउंट बनवून घेतला होता. व्हिडीओ कॅमेऱ्याला हा माउंट लावला की, त्याच्या वर त्या वेळच्या एसएलआर स्थिरचित्रण कॅमेऱ्याची झूम/मॅक्रो लेन्स मला वापरता यायची. भिंग घेऊन चित्र पाहताना जसं वाटेल तसा परिणाम मिळाला.
या फिल्ममध्ये समुद्राचं दृश्य वारंवार येतं. समुद्रासारखी शांतता गायतोंडे यांच्या चित्रांमध्ये आहे. मूळचे गोवा-कोकण इथले गायतोंडे. त्यांचं मूळ घर तिथे होतं. या फिल्ममध्ये समुद्रकिनारी एक लहानगा मुलगा धावतोय असा शॉट आहे. त्यातला समुद्र, वाळू यांचे रंग गायतोंडे यांच्या चित्रात ज्या ऑकर, ग्रीन शेड्स असतात तसाच हवा म्हणून समुद्रकाठी थांबलो होतो. त्यातून समुद्र आणि गायतोंडे यांचं काय नातं असेल हे मनात झिरपत होतं. अखेर सगळय़ा मानवी निर्मितीची पाळंमुळं निसर्गात असतात.
ही माझी साडेसतरा वर्षांपूर्वीची मतं, फिल्ममध्ये आली आहेत. गायतोंडे आहेत तसेच दाखवायचेत, ते असे आहेत हे बघितलं तर जो धक्का बसेल तो बसूदेत लोकांना, हे मत मला महागात पडणार की काय असं वाटू लागलं होतं.
फिल्मचा भारतातला पहिला खेळ १९९७ मध्ये मुंबईत (एनसीपीएच्या एका सभागृहात) झाला तेव्हा एक चित्रकार धावतच आले आणि म्हणाले : गायतोंडे ग्रेट होते. तू तुझ्या या लघुपटात त्यांची पार वाटच लावून टाकलीस.
या अशाच प्रतिक्रिया. ‘आमच्या गायतोंडेंना या अशा अवस्थेत कशाला दाखवलंत तुम्ही’ वगैरे.. मी डिप्रेस झालो. गरिबांचं घरसुद्धा हिंदी सिनेमात छानच असतं. पण इथं गायतोंडे यांच्यासारख्या प्रज्ञावंत चित्रकाराच्या स्टुडिओत खूप धूळ, खूप पसारा, अस्ताव्यस्त पडलेले जुने ब्रश, रंग.. गायतोंडे यांनी बरेच दिवस, बरेच महिने पेंटिंग केलं नसल्याच्या सर्व खुणा. कोळिष्टकसुद्धा. मी ‘आहेत तसे’ गायतोंडे दाखवले. त्यात यशस्वीच झालो एक प्रकारे. पण लोकांना छानछानच हवं होतं.
कवी आदिल जस्सावाला, अमूर्त चित्रकार मेल्ही गोभाई यांनी धीर दिला. त्यांना फिल्म आवडली. ही फिल्म लोकांना कळायला वेळ लागेल म्हणाले.
त्याआधी, १९९५ मध्ये फिल्मचं प्रायोजकत्व पत्करणारे दादिबा पंडोल यांनाही ती फिल्म आवडली होती की नाही, कोण जाणे. ते तेव्हा काहीच बोलले नव्हते. मी संकलित कॉपी त्यांच्याकडे दिली तेव्हा म्हणाले होते : ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना ही फिल्म दाखवू या. नाडकर्णी म्हणाले होते, चांगली आहे. पण पंडोल काहीच बोलले नाहीत. तेव्हाही, नंतरही.
त्या मधल्या दोन वर्षांत, ती फिल्म युरोपात मात्र तीन ठिकाणी गेली.
झालं असं की, मी १९९५ मध्येच व्हिडीओ कॅसेट (त्याच फिल्मची रफ कॉपी) घेऊन पॅरिसला परतलो. ही कॅसेट मी मित्राला दिली आणि ती त्यानं पॅरिसमधल्या ‘आर्ट फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये एंट्री म्हणून दिली. ती तिथे निवडली गेली.. ८०० हून जास्त फिल्म त्यांच्याकडे आल्या होत्या, त्यातून अधिकृत निवड फक्त ३८ फिल्म्सची झाली. मग ती व्हेनिसच्या अशाच प्रकारच्या महोत्सवात आणि थेसालोनिकी (ग्रीस) इथल्या अखिल युरोपीय कला-चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आली. हे सारे महोत्सव झाले, तोवर १९९६ साल उजाडलं होतं. तिकडे लोकांची दाद मिळालीच (मी फक्त पॅरिसला हजर होतो), पण ही फिल्म लोकांपर्यंत जातेय याचंच बरं वाटायचं मला.
पुन्हा १७ र्वष ती फिल्म कुठेच दिसली नाही.
गेल्या दोन महिन्यांत मी ती १७ वर्षांपूर्वीची फिल्म पुन्हा तशीच उभी करण्याचा प्रयत्न केला. ९९ टक्के यश मिळालं. पण ती आणखीही चांगली होईल. फेरसंकलनात तिच्या सीन्सचा कालावधी कमी-जास्त झालाय. ही जी नव्यानं उभारलेली फिल्म आहे तिचे खेळ नुकतेच ठाण्यात झाले. आणखीही कदाचित होतील. एवढय़ा वर्षांनी खेळ झाला तेव्हा ठाण्यातले कलाविद्यार्थी खूप मोठय़ा संख्येनं होते. वयस्क चित्रकार होते ते मला मागच्या आठवडय़ात म्हणाले की, तुमच्यामुळे आम्हाला काही क्षण गायतोंडे पाहता आले. ही प्रतिक्रिया आधी मिळाली नव्हती.
मला फिल्म संपल्यावर त्या विद्यार्थ्यांसमोर जाऊन विचारावंसं वाटत होतं, ‘तुम्हाला कोण महत्त्वाचं वाटतं? गायतोंडे की हुसेन?’
मी काही तसं विचारलं नाही. काही गोष्टी आपसूक आपापल्या कळलेल्या बऱ्या असतात.
तर परवाच्या लिलावातली मोठी किंमत ऐकून गायतोंडे असेच बसून राहिले असते निर्विकार, हे मला आपसूक कसं काय कळलं?
मी जानेवारी १९९५ ते मे १९९५ एवढय़ाच कालावधीत गायतोंडे यांना भेटलोय, पण खूप वेळा. एकदा असाच त्यांच्याकडे असताना पिशवी पडलेली होती, प्लास्टिकची. आत काही तरी, कागदात गुंडाळलेलं, चॉकलेटांसारखं लागलं हाताला. आत काय? पैसे. नोटा. गड्डीच्या गड्डी. मी त्यांना सॉरी म्हणताना बोललो, मला वाटलं चॉकलेट असेल..  त्यावर ते म्हणाले होते : तुला ते चॉकलेट वाटत असेल तर ते चॉकलेटच!
गायतोंेडे यांच्यासाठी मात्र, पैसे हा बाकीच्या पसाऱ्यातलाच एक भाग होता.
विख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या याच अमूर्त चित्राने लिलावात २३.७० कोटी रुपयांची बोली मिळवत भारतीय चित्रांसाठीचा नवा जागतिक विक्रम  प्रस्थापित केला. यापूर्वीच्या जागतिक लिलावात गायतोंडे यांच्या चित्रांनीच प्रस्थापित केलेले सर्वाधिक बोलीचे दोन्ही विक्रमही त्यांच्याच चित्राने मोडीत काढले.