यंदाही राज्याच्या बहुतांश भागांत पाण्याची तीव्र टंचाई  असून हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरूच आहे.  पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडेही नाही. या पाश्र्वभूमीवर राज्यातील पाण्याचे चित्रमय, भेदक वास्तव ..

टंचाईच्या तीव्रतेची संवेदनाही हरवली!
मराठवाडा
प्रतिनिधी, औरंगाबाद<br />मराठवाडय़ासाठी पाणीटंचाई निर्माण झाली नाही तर आश्चर्य वाटावे, असे वातावरण गेली अनेक वष्रे आहे. त्यामुळे एक हजार टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसा दर उन्हाळ्यातील नित्याची बाब झाली आहे. टंचाईच्या तीव्रतेची संवेदनाच हरवून बसावी, असे सध्याचे वातावरण आहे.
टँकर सुरू आहेत, मागणी होईल तेथे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या नेहमीप्रमाणे ९७१ गावे आणि ३३९ वाडय़ांना टँकरची फेरी होते. गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने ही संख्या काहीशी कमी झाली आहे. मात्र, या वर्षी अजून तरी कोठे चारा छावणी उघडण्याची वेळ आली नाही.  या वर्षांत टंचाईवर ६१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता टंचाई उपाययोजना असा शब्द उच्चारला, तरी जलयुक्त शिवार असे एकच एक जालीम उत्तर प्रत्येकाला सांगितले जाते. या कार्यक्रमातून पाणलोटाची कामे कधी होणार, कधी त्या बंधाऱ्यात पाणी अडणार, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे नित्याची पाणीटंचाई व नव्या योजना असे दरवर्षीचे वातावरण या वर्षीही आहे. किती कोरडय़ा तलावांतून गाळ काढला, अशी नव्या आकडेवारीची त्यात भर आहे. दुसरीकडे गावोगावी बाईच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आहे. टँकरचे पाणी विहिरीत वा आडात टाकले जात असल्याने आड, पोहरे, रहाट हे शब्द अजूनही परवलीचे आहेत. टँकरचा विळखा एवढा मजबूत कसा? कारण उसाच्या पिकात दडले आहे. ज्या जिल्हय़ात अधिक साखर कारखाने, त्या जिल्हय़ात अधिक टँकर अशी अवस्था आहे. परंतु टंचाईचे मूळ दुखणे कोणाला दूर करायचे नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडेही नाही. जुनाच कारभार दरवर्षीप्रमाणे सुरू आहे.

आकडेवारीत टंचाई
*टँकरची संख्या १ हजार २५६
*अधिग्रहण केलेल्या विहिरी ३ हजार १४४
vv03-पाण्यासाठी वणवण ही केवळ माणसाच्याच नशिबात नसून जनावरांनादेखील या ‘पाणीटंचाई’ला सामोरे जावे लागते. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील  हे दृश्य
vv05-टँकर आल्यानंतर पाण्याची भांडी घेऊन धावाधाव करण्यापेक्षा आपापली भांडी रांगेत लावून ठेवली म्हणजे बरेचसे काम सोपे होते. पण ही भांडी चोरीला गेली तर? हा प्रश्नदेखील तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे लातूरमध्ये भांडी ओळखण्यासाठी, तसेच ती चोरीला जाऊ नयेत यासाठी अशी झाकून ठेवावी लागतात.
vv06-टंचाईच्या काळात रस्त्यावरून वाहून जाणाऱ्या पाण्याचे मोलदेखील महत्त्वाचे असते, याची जाण या चिमुरडय़ालादेखील आहे. वसमत तालुक्यातील ही परिस्थिती वेगळा विचार करायला भाग पाडते.
vv11-‘पाणी म्हणजे जीवन’ असे म्हटले जात असले तरी या पाण्यासाठीच बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यात जीवनच पटावर लावावे लागत आहे.
धरणे असूनही टंचाईचे चटके
नाशिक
प्रतिनिधी, नाशिक
उन्हाचा तडाखा जसजसा वाढू लागला, तसतसे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट बिकट स्वरूप धारण करत आहे. नाशिकमध्ये सद्य:स्थितीत जवळपास ३० गावे आणि १००हून अधिक वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ात टँकर सुरू नसले तरी ग्रामीण भागांत पाण्यासाठी महिला-मुलांना पायपीट करावी लागत आहे.
कायमस्वरूपी उपाय केले जात नसल्याने शेकडो गावांना टँकरने पाणी पुरविणे हा एककलमी कार्यक्रम असतो. यंदाचा उन्हाळ्याचा हंगामही त्यास अपवाद ठरला नाही. नाशिक हा खरे तर मुबलक धरणे असणारा जिल्हा. लहान-मोठी जवळपास २० धरणे या जिल्ह्य़ात आहेत.  याच भागात टंचाईचे तीव्र चटके बसत आहेत. डोंगर-दऱ्यांमध्ये वास्तव्यास असलेल्यांची स्थिती अधिकच बिकट आहे. फेब्रुवारी महिन्यात पाणी आणताना हृदयविकाराच्या धक्क्याने सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अनेक गावांत महिला व मुलांची सकाळपासून पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू होते. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ांत अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आलेला नाही.  . धुळे व जळगाव शहराला सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.
vv04-त्र्यंबक-घोटी रस्त्यावरील पेगलवाडी गावातील महिलांना डोंगर-दऱ्यांमधून पाणी आणावे लागते.
पारंपरिक स्रोत आटू लागले
नगर
विशेष प्रतिनिधी, नगर
उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच नगर जिल्हा पाण्यासाठी तहानला आहे. आता दिवसागणिक ही व्याकूळता वाढते आहे. सध्या जिल्हय़ात १७८ गावे व तब्बल ७०० वाडय़ावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, त्यासाठी जिल्हाभर २४२ टँकर सुरू आहेत. येत्या काही दिवसांत ही संख्या लक्षणीय वाढेल अशीच चिन्हे आहेत. पाण्याचे पारंपरिक स्रोतच आटू लागल्याने पाण्यासाठी दररोज दूरवर भटकंती सुरू आहे.
भौगोलिकदृष्टय़ा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आणि पर्जन्यछायेखालचा प्रदेश यामुळे दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असला तरी मागच्या तीन-चार वर्षांत पाण्याची स्थिती अधिकच खालावली आहे. 
vv07मराठवाडय़ातील जायकवाडी धरण भरण्याच्या अट्टहासामुळे सिंचनाच्या क्षेत्रातही शेतीचे पाणी दूर राहिले, पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. गेली वर्षांनुवर्षे बागाईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातही आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागतात. जिल्हय़ातील पारनेर, पाथर्डी, शेवगाव, नगर, जामखेड, श्रीगोंदे, कर्जत, राहाता, नेवासे आणि संगमनेर या दहा तालुक्यांमध्ये पाण्याची स्थिती विदारक आहे.
वणवण आणि उधळणही
विदर्भ
प्रतिनिधी, नागपूर  
एकीकडे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या महिला आणि दुसरीकडे वाहनांवर नळ सोडणारे नागरिक, हे विरोधाभासी चित्र आता उन्हाची चाहूल लागताच आणखी ठळक होऊ लागले आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण, तर शहरी भागात पाण्याची उधळण, ही अवस्था विदर्भात सर्वदूर आहे. पूर्वच्या तुलनेत पश्चिम विदर्भ नेहमीच तहानलेला असतो.
उंचीवर असलेला बुलढाणा जिल्हा, वाशीम व अकोला शहरांत कायम पाणीटंचाई असते. यंदाही त्याची तीव्रता कायम आहे. त्या तुलनेत अमरावती शहरात टंचाई नाही, पण उधळण मात्र जोरात सुरू दिसते. मागास, अशी ओळख असलेल्या मेळघाटात फिरले की, डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करणाऱ्या महिलांची रांग प्रत्येक गावात दिसते. संपूर्ण विभागात दोनशे गावे अशी आहेत जेथे नळयोजना आहेत, पण पाण्याचाच पत्ता नाही.
योजना तयार केली, पण पाणी स्रोताकडे लक्ष दिले नाही. परिणामी, ही गावे तहानलेली आहेत. यंदा सतत अवकाळी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी थोडी बरी आहे. म्हणून तर टँकरची संख्या फक्त ३८ आहे. तरीही गावातले स्रोत आटल्याने दूरवरून पाणी आणण्याचे प्रमाण ग्रामीण भागात यंदा वाढले आहे.
पूर्व विदर्भात तुलनेने टंचाई नाही. अद्याप एकाही गावात टँकर लागलेला नाही. मात्र, ग्रामीण भागात दुरून पाणी आणावे लागत असल्याचे दृश्य कायम आहे. टँकरमुक्तीच्या यादीतून ही गावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत.
vv08– नागपूर  परिसरात अनेक ठिकाणी दररोज असे पाणी वाया जाताना दिसून येते.
पाण्यासाठी भटकंती सुरू
द. महाराष्ट्र
प्रतिनिधी, सोलापूर
राज्याच्या भौगोलिक नकाशात १३ दुष्काळी तालुक्यांचा भाग प्रामुख्याने माणदेशात गणला जातो. या माणदेशासह दक्षिण महाराष्ट्रात गतवर्षी अवकाळी पाऊस पडून पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती. परंतु त्याच अवकाळी पावसाने या भागातील पाणीटंचाई थोडीशी लांबविली. मात्र आता मे महिन्याच्या आगमनाबरोबर या भागातही यंदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदा या दुष्काळी पट्टय़ाबरोबरच सोलापूर आणि सातारा शहरालाही काही प्रमाणात पाणीटंचाई भेडसावू लागली आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हय़ातील मोठा भाग पारंपरिक अर्थानेच दुष्काळी आहे. पण सिंचनाच्या योजना आणि यंदाच्या अवकाळी पावसाने यावर थोडीफार मात केली आहे. पण तरीही सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला, मंगळवेढा तालुके तसेच सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ, खानापूर तालुक्यात आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. परंतु यंदा प्रशासनाने टँकरऐवजी खासगी विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यावर भर दिला आहे. पण अनेक भागांत अशा पाणी असलेल्या विहिरीदेखील नाहीत मग अशा वेळी जिथे पाण्याचा स्रोत आहे, अशा ठिकाणाहून हे पाणी वाहून आणावे लागत आहे. अनेक भागांत या पाण्यासाठी महिलांना १ ते २ किलोमीटरचीही पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडे घेऊन नाहीतर सायकलला कॅन बांधून हे असे पाणी भरण्यात ग्रामीण भागातील अनेकांचा दिवस सरतो. यंदा ग्रामीण भागाबरोबरच या सोलापूर, सातारा आणि इचलकरंजी या शहरांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. सोलापूर शहराजवळ मुळेगाव, दोड्डी आदी भागांत तर पाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. सोलापूर शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सातारा शहरातही अनेक भागात सध्या पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांना मिळेल तिथून पाणी गोळा करावे लागत आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले व शिरोळसारख्या भागांत पाणीप्रश्न सतावत आहे. पंचगंगा नदीतील प्रदूषणाचा फटका तीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहराला बसला आहे. यामुळे शेजारी पाणी असूनही ते प्रदूषित झाल्याने त्यांना वेगळ्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
vv09-सातारा शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाई जाणवू लागल्याने पाण्यासाठी अशी चक्क हातगाडी जोडून त्याची वाहतूक महिलांना करावी लागत आहे.