पूजा सामंत – response.lokprabha@expressindia.com
अवघ्या वीस-बाविसाव्या वर्षी पहिला सिनेमा करणारी आलिया भट्ट. आज तिचं नाव मोजक्याच पण कसदार भूमिका करणाऱ्या दर्जेदार अभिनेत्रींच्या बरोबरीने घेतलं जातं. तिच्यासोबत दिलखुलास गप्पा-

वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी आलिया भट्ट बॉलीवूडची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री ठरली आहे. तिने केलेला प्रत्येक सिनेमा यशस्वी ठरला एवढंच नाही तर त्यातल्या तिच्या अभिनयाचं भरपूर कौतुक झालं. देशातील बहुतेक मोठे ब्रॅण्ड्स तिला आपल्या उत्पादनासाठी ब्रॅण्ड अम्बॅसॅडर म्हणून करारबद्ध करण्यासाठी एका पायावर ‘राजी’ आहेत. बॉलीवूडमध्ये कुणाही अभिनेत्रीला हेवा वाटावा अशी तिची वाटचाल सुरू आहे. तिचा प्रत्येक परफॉर्मन्स आजच्या तरुणाईला भावतोय. एका अर्थाने ती आजची, उद्याची नंबर वन अभिनेत्री आहे.

वांद्रय़ाच्या मेहबूब स्टुडिओमध्ये आलियाच्या भेटीची वेळ ठरली होती. आलिया माझ्या आधीच पोहोचली होती. काहीशा औपचारिकतेनंतर आमच्या मनमोकळ्या गप्पा रंगत गेल्या.

‘आलिया, सर्वप्रथम तुझ्या बालपणाविषयी सांग.. तुझ्याकडे भारतीय आणि ब्रिटिश पासपोर्ट आहे, तो कसा?’

आलिया म्हणाली, ‘माझी आई सोनी राजदान. तिचे वडील काश्मिरी तर आई जर्मन होती. आईकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याने माझाही तसा  पासपोर्ट आहे. अर्थात माझा जन्म मुंबईचा. माझी सख्खी बहीण शाहीन आणि सावत्र भावंडं म्हणजे पूजा भट्ट, राहुल भट्ट. माझ्या कुटुंबात मी शेंडेफळ असल्याने पपांचा (लेखक, निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट ) माझ्यावर विशेष जीव आहे.

आलिया अगदी सहज सांगते, ‘मी अभ्यासात यथातथाच होते. एका इयत्तेतून पुढील इयत्तेत गेले म्हणजे पुरेसा अभ्यास असं माझं लॉजिक होतं. जमनाबाई नरसी शाळेत असताना, अभ्यासात फारशी प्रगती नसली तरी मी माझ्या शिक्षकांची लाडकी होते. कारण मी लहानपणी एकदम अ‍ॅक्टिव्ह होते. स्नेहसंमेलनातून भाग घ्यायला मला आवडायचं.

माझी आई तिच्या किटी पार्टीजना मला घेऊन जायची. तासन्तास टीव्ही बघणं फार आवडायचं मला. बहुतेकदा मी बाहुल्यांशी खेळताना स्वत:शीच बोलत बसायचे. बाथरूममध्ये असतानाही माझी अखंड टकळी चालू असायची असं आई सांगते. टीव्हीवर गोिवदा-करिश्मा कपूर यांचे सिनेमे लागत तेव्हा त्यांचं नृत्य मला विलक्षण आवडायचं. मी सातवीत असताना वडिलांना म्हटलं होतं, ‘मला यापुढे अभ्यास करायचा नाहीये. मेरे लिये कोई फिल्म बना डालो.’

ते चमकले! ‘फिल्म में काम करोगी आलू? (आलियाचे घरगुती टोपण नाव) क्यों? अ‍ॅिक्टग अच्छी लगती है तुम्हे?’

यावर मी त्यांना म्हणाले, ‘अ‍ॅिक्टग का तो पता नहीं, लेकिन गोिवदा-करिश्मा जैसे डान्स करना है मुझे। कहीं भी! एअरपोर्टपर, गार्डन में, रोडपर! शाळेत फक्त वार्षिक स्नेहसंमेलनातून डान्स करायला मिळतो!’

मला सिनेमांचे आकर्षण होते. मला वाटायचं, कलाकारांना फक्त उत्तमोत्तम कपडे घालून ऊठसूट डान्स करायचा असतो.. माझ्यासाठी फिल्म्स म्हणजे फक्त डान्स होता!’

आलियाने शाळेत असतानाच बॉलीवूडमध्ये येण्याचा आपला मनसुबा चित्रपट निर्माते असलेल्या आपल्या वडिलांसमोर जाहीर केला होता. तिला खात्री होती, तिचे वडील तिलाही लाँच करतील. कारण बॉलीवूडमध्ये आजवर त्यांनी अनेकांना लाँच केलं होतं. पण तिचा भ्रमनिरास झाला. तिला विचारलं, ‘वडिलांनी तुला लाँच करावं असं तुला प्रकर्षांने वाटत होतं, हे खरंय ना?’

आलिया म्हणते, ‘येस! अगदी खरंय. माझ्या मोठय़ा बहिणीला पूजाला त्यांनी लाँच केलं. मी पपांच्या ‘संघर्ष’ सिनेमात प्रीती िझटाच्या लहानपणीची भूमिका केली होती. पपा मला लाँच करतील असं मला वाटत होतं, पण तशी काही हालचाल मला दिसेना. उलट आई आणि पपांनी एक प्रकारे माझं बौद्धिकच घेतलं. त्यांचं दोघांचंही मत होतं की माझ्यात अभिनयक्षमता असेल तर ती कोणत्याही चित्रपट निर्मात्याच्या सिनेमात दिसून येईल. उलट घराबाहेरच्या निर्मात्यांनी मला संधी दिली तर स्वत:ला जोखणं अधिक सोपं जाईल. थोडक्यात पपा मला लाँच करणार नव्हते. मी नाराज झाले खरी, पण माझ्यातील फिल्मी किडा पाहून करण जोहरने त्याच्या ‘स्टुडण्ट ऑफ द ईअर’मध्ये मला लाँच केलं. त्या वेळेस मी १७ वर्षांची होते. ‘स्टुडण्ट ऑफ द ईअर’ला घवघवीत यश मिळालं आणि मला माझा मेटाँर मिळाला. मी करणला  माझ्या लहानपणापासूनच ‘मेंटॉर’ मानत आलेय. करण आणि त्याच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चा ग्रुप, अयान मुखर्जी, शशांक खेतान हे सगळे माझे कुटुंबीयच आहेत. करणच्याच सांगण्यामुळे इम्तियाझ अलीने मला माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच ‘हायवे’सारखा अर्थपूर्ण चित्रपट दिला. करण म्हणतो, ‘हायवे’मधली व्यक्तिरेखा वीरा त्रिपाठी मी अक्षरश: जगलेय! वडील, आई, बहीण आणि पूर्ण भट्ट कुटुंबीय अभिनय आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये असल्याने अभिनय रक्तात आला असावा, पण करणने मला घडवलंय. हे श्रेय त्याचं आहे.’

अवघ्या पाच वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत आलियाने भल्याभल्यांना मागे टाकलंय. लहान वयात, कमी कालावधीत मिळालेलं यश पचवणं अवघड असतं, पण ते तिला जमलं आहे असं म्हणायला हरकत नाही. यावर आलिया सांगते,

‘याही बाबतीत माझ्यासमोर माझे वडील महेश भट्ट, करण जोहर यांचा आदर्श आहे. माझ्या वडिलांच्या आयुष्यात अनेकदा अपयश आणि यश हे सतत पाठशिवणीचा खेळ खेळत राहिलेत. मी लहानपणापासून या क्षेत्रातले खाच-खळगे, यश-अपयश पाहत आलेय. अभिनय करायचा हे डोक्यात फार पूर्वीपासून होतं. तसं ते घडत गेलं, माझे सिनेमे हिट होत गेले, हे ठरवून झालं नाही. माझी कुणाशी तुलना व्हावी इतकी मोठी मी झाले नाही. पण मला अहंकाराची बाधा झाली आहे, असं ज्या दिवशी पपांना किंवा करणला वाटेल, ते चक्क मला एक ठेवून देतील.’

‘यशामुळे तुझं वागणं-बोलणं एवढंच नाही तर अगदी तुझं चालणंही बदललं आहे.’ यावर आलिया म्हणाली, ‘आता मी २५ वर्षांची आहे. कुठल्याही क्षेत्रात गेले असते तरी त्या नोकरी किंवा व्यवसायामुळे माझ्यात आत्मविश्वास आलाच असता की. शिवाय कलावंतांचे आयुष्य नेहमीच जगाच्या, मीडियाच्या स्कॅनरखाली असतं. खरं म्हणजे कॅमेरे आपल्यावर रोखले गेले आहेत या भावनेतूनही चाल बदलते, डौल येतो. आपल्या बॉलीवूडमध्ये काही स्टार्स त्यांच्या खास स्टायलिश वॉकमुळे प्रसिद्ध आहेत, तर काही होते. विनोद खन्ना यांचं चालणं खूप खास होतं. अमिताभ बच्चन, संजय दत्त यांची चालदेखील कॉपी करणं मुश्कील आहे. मला म्हणायचं आहे की आत्मविश्वासामुळे चालीत फरक पडतो. स्टारी वॉक हे मीडिया अटेन्शन असतं हेदेखील एक सबळ कारण आहे.’ आलियाला तिच्यात घडणारे हे बदल स्टारी अ‍ॅटीटय़ुडचा भाग वाटतात.

मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राजी’ या सिनेमाला व्यावसायिक यश मिळालं. त्यातल्या आलियाच्या अभिनयाची तारीफही झाली. तिच्या होमवर्कची देखील चर्चा झाली. तिने ‘राजी’मध्ये चोंगा हे वाहन चालवलं होतं, ते चालवणं खरं तर अवघड होतं तिच्यासाठी. आलिया १८व्या वर्षी ड्रायिव्हग शिकली असली तरी तिला फारसा सराव नाही. त्यात चोंगा हे वाहन ट्रकपेक्षा थोडं लहान पण जड असतं. १९७०च्या दशकात त्याचा वापर व्हायचा. चित्रपटात एका महत्त्वपूर्ण दृश्यासाठी तिला चोंगा चालवायचं होतं. आलियाने महिनाभर ‘धर्मा’ प्रॉडक्शनच्या बेसमेंटमध्ये प्रॅक्टिस केली. तेंव्हा कुठे तो सीन तिने परफेक्ट केला.

आलियाला सहज विचारलं, ‘तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता?’

आलियाचे डोळे बोलक्या बाहुलीसारखे चमकले. ती सांगते, ‘मी आधी सांगितलं होतं तसं मला लाँच केलं नाही म्हणून मी पपांवर रागावले होते. पण माझ्या यशाचा चढता आलेख ही माझ्या पपांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. ‘हायवे’ सिनेमासाठी मला अनेक पारितोषिके मिळाल्यानंतर त्यांनी प्रेमाने, अभिमानाने माझा ऑटोग्राफ घेतला आणि त्याचं लॅमिनेशन करून त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलंय.  मी खूप थकले असले की माझे पाय चेपायलादेखील पपा कमी करत नाहीत.’

आपल्या वडिलांबद्दल असणारी माया तिच्या बोलण्यातून जशी ओसंडते तसं वडिलांच्याबाबतीत आपलं एकदा चुकलं, ही भावनादेखील तिला व्यथित करते. त्या चुकीबद्दल आलिया सांगते,

‘दोन वर्षांपूर्वी मी घराजवळच स्वकमाईतून एक फ्लॅट बुक केला. त्याच्या फर्निचर- इंटिरियरचं काम सुरू झालं. अर्थात घरी सगळ्यांना त्याविषयी माहीत होतंच. मम्मी-पपांना माझं घर कधी एकदा दाखवेन असं मला झालं होतं. फ्लॅटचं काम संपत आलं, तेव्हा मी खूप एक्साईट झाले होते. आम्ही तिघं नव्या फ्लॅटमध्ये आलो. मी मोठय़ा उत्साहात त्यांना दाखवत सुटले, ‘हे बघा, हे किचन, ही ड्रॉइंग रुम, ही माझी बेडरुम, ही गेस्ट रुम..’ माझा अखंड उत्साह, माझं घर हे सगळं बघताना पपांच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दलचा अभिमान ओसंडून वाहात होता. आईने मला आनंदाने मिठी मारली. हो, वयाच्या तेविसाव्या वर्षी तिच्या लेकीचा फ्लॅट झाला होता. पपा म्हणाले, आर्थिकदृष्टय़ा स्थैर्य येण्यासाठी त्यांच्या आयुष्याची ५० वष्रे खर्च झाली होती. पण वयाची विशी गाठेपर्यंत मी आर्थिक सुबत्ता मिळवली आणि तेही सकस भूमिका करत, याचा त्यांना खूप अभिमान वाटत होता. आई-वडिलांनी मोठय़ा उत्साहाने माझा फ्लॅट पाहिला. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणवले होते. ‘आलू बेटा, व्हेअर इज माय रूम?’ पपांनी हा प्रश्न विचारताच मी खाड्कन भानावर आले.

खरंच की, मी कुठेही त्यांच्या रूमची तजवीजच केली नव्हती. मी माझ्यातच गुंतून पडले होते! माझ्या लहानपणी आपली स्टडी रिकामी करून ती जागा त्यांनी मला सहजच बहाल केली होती ते मला आठवलं. अर्थात, कुठल्याही पित्याला त्याच्या ममतेची पितृसुलभ-प्रेमाची परतफेड नकोच असते. पण लेकीच्या नव्या घरात आई-वडिलांसाठी एक कॉर्नर असू नये? इतकी स्वार्थी होते मी?

मी त्या क्षणी गप्प बसले, कारण स्पष्टीकरण देण्यासाठी शब्द नव्हते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, या भावनेने मी त्या वेळी व्यथित झाले होते!’ या चुकीचं परिमार्जन कसं करायचं हा प्रश्न आलियाला सतत सतावत असतो.

‘अभिनेत्री असल्याचं कधी दडपण जाणवलं का? मनासारखं वागता येत नाही, सतत ग्लॅमरस दिसावं ही या व्यवसायाची अलिखित मागणी असते, तिचं दडपण येत नाही का?’

या मुद्दय़ावर आलिया विचारात पडल्यासारखी वाटली. म्हणाली, ‘अभिनयक्षेत्रात यायचं हा माझाच तर अट्टहास होता. त्यामुळे या क्षेत्रातल्या ग्लॅमरस लुकसाठी माझी मानसिक तयारी होतीच. पण खूप मेकअप करणं मला आवडत नाही. ऑन स्क्रीन मेकअप ही त्या व्यक्तिरेखेची गरज असते. ‘हायवे’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी दिग्दर्शक इम्तियाझ अली यांनी साधं सनस्क्रीन लोशनदेखील लावू नकोस असं मला बजावलं होतं. माझी त्वचा रापलेली दिसणं ही त्या भूमिकेची गरज होती. ‘डीअर जिंदगी’मध्येही मेकअप नव्हताच. अलीकडच्या काळातील या चित्रपटांमध्ये, त्यांच्या मेकिंगमध्ये जमीन-अस्मानाचा बदल झाला आहे. सध्या नैसर्गिक दिसण्याचा ट्रेण्ड आहे. एकेकाळी बहुतेक नायिकांना त्यांच्या डोक्यावर मोठाले विग्ज घालून वावरावं लागे. आता तो काळ गेला. त्यामुळे एकूण तसा ग्लॅमरस लुकचा ताण कमी झालाय. पण हल्ली एअरपोर्ट लुकची काळजी घेण्याचा ट्रेण्ड आहे. मध्यरात्री किंवा भल्या पहाटे लॅण्ड होणाऱ्या फ्लाइटस आणि एअरपोर्टबाहेर पापाराझीझचा खडा पहारा.. त्यांनी सेलेब्रिटीजचे काढलेले फोटो कुठल्या वेबसाइट्सवर, कुठल्या देशात, कुठे वापरले जातील याचा पत्ता नसतो! त्यामुळे आता एअरपोर्ट लुकचा ताण असतो. मी खूपदा मिनिमल लुकमध्ये असते. घरात जम्प सूट, ट्रॅक सूट, सलसर पायजमा, टीशर्ट वापरणं मला आवडतं. एरवी काहीही मेकअप नसतो. माझ्यावर ग्लॅमरस दिसण्याचं प्रेशर अजिबात नाही.’ आलिया सहजच सांगते.

‘यश आणि अपयशाकडे तू कशी पाहतेस?’

आलिया सांगते, ‘अगदी नॉर्मलपणे! आजवर अनेकदा महेश भट्ट संपले असं इंडस्ट्रीत ऐकू आलं आणि तितक्यांदा ही बाऊन्स्ड बॅक फ्रॉम स्क्रॅच! यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये हा मंत्र मी त्यांच्याकडून शिकले. अपयश म्हणजे माझी फिल्म फ्लॉप झाल्यास पुढील सिनेमाचं मानधन थोडं कमी होईल इतकंच. पण यशाचा आलेख वाढता राहिल्यास माझी जबाबदारी मोठी आहे.’

ऑफ स्क्रीन आलिया खूप मूडी आहे. शेंडेफळ असल्याने घरात लाडोबा आहे. ती सांगते, कधी कधी माझे मूड्स स्विंग होत असतात.. कधी मी खूप बोलत असते. कधी गप्प असते.  वेळ मिळाला की झोपायला आवडतं मला. माझ्यासाठी माझं कुटुंब, करण, काही जवळचे मित्र सर्वस्व आहेत. पण हेही तितकंच खरं की माझा मूड ऑफ आहे म्हणून मी कुठल्याही निर्मात्याला आजवर कसलाही त्रास दिला नाही. कधी माझ्यामुळे शूटिंग कॅन्सल झालं नाही. कारण माझे वडील, काका सगळेच निर्माते आहेत. त्यांच्या व्यथा मी जन्मापासून जाणून आहे.

‘तू घरच्यांसाठी वेळ कसा काढतेस’ यावर आलिया म्हणाली, ‘वेळ कुठे मिळतो? पपांची आणि ममाचीही फारशी भेट होत नाही. ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग आटोपून मी नुकतीच बल्गेरियाहून मुंबईत आले. ‘डीअर जिंदगी’साठी दोन महिने गोव्यात होते. ‘हायवे’च्या शूटींगसाठी देशभरात ठिकठिकाणी आम्ही फिरत होतो. ‘टू स्टेट्स’साठी दीड महिने दक्षिणेत होते. ‘राजी’चं शूटिंग काश्मीर, पटियाला, लुधियाना इथे पार पडलं. त्यामुळे हल्ली असं होतं की मी मुंबईत असेन तर सेटवर कधी कधी ममा आणि पपाच मला भेटायला येतात.’

आलिया कुणाकडेच स्पर्धक म्हणून बघत नाही. ती सांगते, गेली तीन-चार वष्रे माझ्या वेगवेगळ्या सिनेमांचं शूटिंग सातत्याने सुरू आहे. मला माझ्यासाठीच वेळ मिळत नाही, तर इतर कुणाचं काय चाललंय हे कुठे बघत बसू? पण तुझ्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं तर दीपिका पदुकोण मला सीनियर आहे, पण समकालीन म्हणून मी फार तर तिचा विचार करेन. बाकी माझी बॉलीवूडमध्ये कुणाशी तशी फारशी मत्री नाही. या क्षेत्रात मत्री फक्त त्या त्या सिनेमाच्या शूटिंगपुरतीच असते. त्यात कुणाचा दोष नसतो कारण प्रत्येक जण प्रचंड बिझी आहे. व्हॉटसअ‍ॅपमुळे सगळे जण एकमेकांच्या संपर्कात असतात. ‘डीअर जिंदगी’च्या काळात मी शाहरुख, गौरी िशदे यांच्याबरोबर काम करत होते, त्यामुळे त्यांच्या संपर्कात होते. शूटिंग संपलं, सगळे दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी झाले.

पण काही कलाकार मला मनापासून आवडतात. कतरिना बेस्ट डान्सरच नाही तर ऑलराऊंडर आहे. सोनम कपूर फॅशनिस्ता म्हणून मला आवडतेच, पण तिचा सडेतोडपणाही मला भावतो. करिना कपूर उत्तम अभिनेत्री आहे. दीपिकाची कारकीर्द अभिमान वाटावी अशीच आहे. अनुष्काने अभिनेत्री आणि निर्माती म्हणूनही स्वत:चा छान जम बसवलाय. शाहरुख उत्तम अभिनेता, आदर्श सहकलाकार, युनिटमधल्या महिला कलाकारांचा आदर करणारा, बडबडा, इंटलेक्चुअल आहे. पण यातल्या कुणाचंही अनुकरण करणं मला शक्य नाही. आलिया भट्ट कायम आलियाच राहील. आय विल बी आल्वेज मी! मी प्रभावित होते, म्हणजे त्यांच्यातील गुणांची मी तारीफ करते इतकंच. मी त्यांच्यासारखी झाले तर खरी आलिया भट्ट हरवून जाईल.’

‘आलिया, तुझ्या नावावर खूप विनोद आहेत. तू कशी पाहतेस त्यांच्याकडे? ’

आलियाला नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न. त्यामुळे तिचं उत्तरही तयार असतं. ‘मी डफ्फर आहे हे चित्र का निर्माण झालं हे सगळ्यांना ठाऊक आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात रॅपिड फायर या सेगमेंटमध्ये त्याने विचारलेल्या काही प्रश्नांना मी दिलेली उत्तरं हास्यास्पद होती असं करणनेच मला सांगितलं. रजनीकांत जोक्सनंतर माझेच जोक्स व्हायरल झालेत. मला आधी खूप वाईट वाटलं. मी करणला म्हटलं, तूच जवाबदार आहेस माझ्या डफ्फर या प्रतिमेसाठी! त्याने मला सल्ला दिला, काळजी करू नकोस आलिया! तुझ्या अभिनयाने तू सगळ्यांना तुझ्यावरचे विनोद विसरायला लावशील याची मला खात्री आहे. आणि तसंच झालं. आता मीच हसते माझ्या व्हायरल जोक्सवर. शिवाय काळ हे सगळ्याचं उत्तर आहे हे खरंच आहे.’

सध्या अवघ्या बॉलीवूडला ‘मी टू’ प्रकरणाने हादरवून सोडलं आहे. त्याबद्दल आलियाला काय वाटतं? आलिया सांगते, स्त्री शोषण अनादी अनंत काळापासून चालत आलंय. पण प्रत्येक गोष्टीची वेळ येतेच. माझ्या मागे ‘भट्ट’ या आडनावाचं कवचकुंडल आहे. त्यामुळे मला कधी अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं नाही. पण ज्यांना जावं लागलं, त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटतं. एवढे दिवस बोलू न शकलेल्या या स्त्रिया आता या शोषणाबद्दल जाहीरपणे बोलायला लागल्या आहेत. त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं. आता यापुढच्या काळात तरी असं शोषण करणारे दहा वेळा विचार करतील अशी आशा आहे.

‘तू अलीकडेच ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण केलं. रणबीर तुझा सहकलाकार होता या सिनेमासाठी. शूटिंगनंतरही तुमची मत्री बहरत गेली आहे अशी चर्चा आहे. पुढे काय?’

आलिया सांगते, ‘रणबीरला ‘संजू’ सिनेमाच्या दरम्यान माझ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्याने तेव्हा सांगितलं, आमच्यात मत्रीला नुकतीच सुरुवात झालीय. सध्या तरी ही मत्री कुठला टप्पा गाठेल हे सांगता येणार नाही. माझं पण तेच सांगणं आहे, प्लीज वेट अ‍ॅण्ड वॉच. माझ्या आईवडिलांची इच्छा आहे की सध्या मी माझं काम एन्जॉय करावं. बघू या, आत्ता तरी व्यक्तिगत आयुष्यात सांगावं असं फार काही नाही. नुकतीच मी न्यूयॉर्कला जाऊन चिंटू अंकल (ऋषी कपूर)ना भेटून आले. एवढंच..’

हा रणबीर-आलियाच्या नात्याच्या भविष्याबाबतचा सूचक इशाराही असू शकतो!

लेक बापावर रागावते तेव्हा…

एकदा खूप वाईट मूडमध्ये आलियाने तिच्या पपांना फोन लावला. तातडीने भेटायचं आहे, असं त्यांना सांगितलं. ते म्हणाले, ‘शाम को घर पर मिलेंगे ना आलू.’ पण तिला त्या क्षणीच त्यांना भेटायचं होतं. मग त्यांनी तिला त्यांच्या ‘विशेष फिल्म्स’च्या ऑफिसमध्ये यायला सांगितलं. तिला वाटलं, ते तिला ताबडतोब त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतील, मग ती रडून रडून त्यांना तिच्या मूड ऑफचा किस्सा सांगेल. ते तिची समजूत घालत समोरच्या व्यक्तीची चूक कशी आहे आणि आलिया कशी निरपराध आहे असं म्हणतील. त्यामुळे तिचं दु:ख  हलकं होणार होतं. तिला मोकळं मोकळं वाटणार होतं.. पण झालं उलटंच !

आलिया सांगते, मी गेले तेव्हा पपा, मुकेश अंकल, विक्रम भट्ट, इम्रान हाश्मी, पूजा असे सगळेच कुठल्याशा फिल्मबद्दल चर्चा करत होते. मी पपांना दुसऱ्या केबिनमध्ये जाऊन बोलू या असं सुचवलं. पण ते मला म्हणाले, इथेच ये आमच्या सगळ्यांच्या समोर आणि बोल.  मी कशामुळे रागावले हे त्यांना तिथे सगळ्यांसमोर त्यांना सांगणे मला अप्रशस्त वाटलं, पण त्यांनी मला त्या सगळ्यांसमोरच मन मोकळं करायला सांगितलं. खूप रागावले मी. त्यांना सांगितलं, तुम्ही एकटेच माझ्याशी बोलणार नसाल तर अ‍ॅम गोइंग बॅक राइट अवे! पण त्यांनी प्रेमाने मला सांगितलं, मी तिथेच, त्या सगळ्यांसमोर स्वत:ला एक्स्प्रेस करावं!

मी सांगायला सुरुवात केली आणि माझे डोळे पाण्याने भरले. अवघ्या काही सेकंदांत माझा संकोच-भीड चेपली आणि मी व्यक्त झाले. बाकीचं कुणी काहीच बोललं नाही, पण पपांनी मला नंतर समजावून सांगितलं. मला अभिनयाच्या क्षेत्रात यायचं होतं. तेव्हा १०० लोकांसमोर मला स्वत:ला एक्स्प्रेस करावं लागलं तरी मला कुणी बघतंय या भावनेने माझं अवसान गळता कामा नये. त्यासाठी त्यांनी ती ट्रायल माझ्यावर घेतली होती. त्यांच्या दृष्टीने ते कदाचित बरोबर असेलही, पण मला मात्र आजही वाटतं की पपांचं ते वागणं कठोरपणाचं होतं.