कला हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. मध्यंतरी झालेल्या कलचाचणीत अनेक विद्यार्थ्यांचा कल कलेकडेच असल्याचं दिसलं. असं काय आहे या कला क्षेत्रात? त्याकडे वळताना कोणत्या गोष्टींचा विचार व्हायला हवा? आदी मुद्दय़ांच्या अनुषंगानं कला क्षेत्रातल्या करिअर संधीवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.

कलेतल्या संधींबाबत या लेखात आपण समजून घेणार आहोत. एका प्राचीन चिनी म्हणीनुसार माणसाकडं जर दोन रुपये असतील, तर त्यात त्यानं एकाची भाकरी आणि एकाचं फूल घ्यावं. कारण त्याला भाकरी जगवेल आणि फूल त्याला का जगायचं ते सांगेल. भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानात ‘कला मोक्ष:’ असं म्हटलं गेलंय. म्हणजे कला ही मोक्षप्राप्तीसाठी असते. म्हणजेच कला ही आपल्या अभिव्यक्तीचं एक साधन आहे. लोकांची मानसिक गरज कलेच्या अभिव्यक्तीतून पूर्ण होत असते. केवळ रोटी-कपडा-मकान या आवश्यक गरजांखेरीजही जीवन आहे. कलात्मकतेसाठी आणि मूल्यात्मकतेसाठीही आपण जगायला हवं. एकुणात कलेचा प्रवास प्रबोधनपासून ते रसास्वादापर्यंत असा फार व्यापक आहे. आपल्याकडं तशा पद्धतीनं विचार केला गेल्यानं त्याचं प्रतििबब आपल्या अभिजात कलांमधून दिसतं. कलेचा जन्म मुळी जीवनाचं कारण शोधण्यासाठी, अज्ञात गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी झालेला आहे.

मुळात आपल्याला कलेबद्दल कुतूहल वाटायला हवं. त्यासाठी पूर्वग्रहदूषित दृष्टी बाजूला सारून कलेविषयी जाणून घ्यायची सवय लावायला हवी. म्हणजे कलादृष्टी विकसित व्हायला मदत होईल. त्यातून खूप काही शिकायला मिळेल. मुलांच्या भविष्याची दिशा पालकांनी ठरवायची नाही, हे लक्षात घ्यावं. मुलाचा कल कोणत्या कलेकडं आहे, त्याला काय करायचंय, याचं तटस्थपणे निरीक्षण करावं. मुलांचं मन आणि कलेचा स्थायीभाव या गोष्टी बऱ्याचशा सामायीक आहेत. मुलांच्या कुतूहलातून त्याची उत्सुकता वाढते आणि त्यातून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. शोधक वृत्ती जागी होते. त्यातून पुढं विचारांना चालना मिळते. मुलांना विविध माध्यमांतून व्यक्त व्हायचं असतं, मात्र काही वेळा नकळत पालकांचा त्यात व्यत्यय येतो. खरं म्हणजे मुलांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. पण आजच्या अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या अफाट वेगाचं आणि बदलत्या जीवनशैलीचं वादळ मुलांभोवती सतत घोंगावत असतं. या काळ-काम-वेगाच्या गणितात आपल्या पाल्यानं त्या वेगाशी सम साधत योग्य किनारा गाठायला हवा, अशी पालकांची अपेक्षा असते. या संवेदनशील टप्प्यावर मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. मुलामध्ये कलागुण दिसले तर त्या कलागुणांना वाढायला वाव देणं गरजेचं असतं. हे कलागुण झटपट वाढावेत, अशी अनेकदा पालकांची अपेक्षा असते.  कोणतीही कला सराव आणि चिंतनाशिवाय परिपक्व  होत नाही.

कला, तंत्रज्ञान आणि विज्ञानाची सांगड साधून नवनिर्माण होऊ शकतं. फक्त त्यासाठी आपल्या विचारांचा मागोवा घ्यायची पॅशन आपल्यात हवी. दृश्यकलेचे उपयोजित आणि मूलभूत कला असे दोन प्रकार आहेत. उपयोजित कला क्षेत्रात अनेक चांगल्या संधी आहेत. मूलभूत कला प्रकारांत रंगरेखा (ड्रॉइंग पेंटिंग), शिल्पकला, मातीकाम, धातूकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकला इत्यादी विभाग आहेत. उपयोजित कला प्रकारांत छायाचित्रण, मुद्राक्षरण (टायपोग्राफी), प्रदर्शन अभिकल्प (एक्झिबिशन डिझाइन), उपयोजित रेखाटनं (इलस्ट्रेशन), कॉप्युटर ग्राफिक्स इत्यादी विभाग आहेत. त्याखेरीज कलाशिक्षण प्रशिक्षण आदी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहेत. हे सारे अभ्यासक्रम प्रॅक्टिकल आहेत. या कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या कोणत्याही अभ्यासक्रमांतील विद्यार्थी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. या अभ्यासक्रमांना प्रवेशपरीक्षा असते, तर पदविकेसाठी विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन फाऊंडेशन कोर्सनंतर पदवी अभ्यासक्रम करता येतो.

चित्रकला हा पाया असणाऱ्या उपयोजित दृश्यकलेत (Applied Arts) करिअर संधी उपलब्ध आहेत. उपयोजित दृश्यकलेत अनेक विभाग आहेत, उदाहरणार्थ दृश्यविचार प्रसारण कला (Visual Communication Design), मुद्राक्षरण कला (Typography), प्रकाश चित्रण कला (Photography), संवादी रेखाटणे (Illustration), प्रदर्शन रचना व मांडणी (Exhibition Display Designing), संगणकासाठीची दृश्य रचना (Computer Graphics), मृद्रा अभिकल्प (Graphic Designing) इत्यादी विषय उपयोजित कलेत शिकविले जातात. त्यातील कोणत्याही एका प्रकारात आपण कौशल्य प्राप्त करू शकतो आणि इतर विभागांचीसुद्धा आपली जुजबी ओळख होते.

उपयोजित दृश्यकलेत बीएफए डिग्री केल्यानंतर जाहिरात क्षेत्रातील विविध टप्प्यांपकी उदाहरणार्थ-कॉपी रायटिंग, इलेस्ट्रेशन असं आपल्या कलागुणांना वाव देणारं क्षेत्र निवडता येतं. अलीकडेच आलेल्या ‘जंगल बुक’नं अनेकांना भुरळ घातली होती. मनात आणलंत तर तुम्हीही तस्संच अ‍ॅनिमेशन शिकू शकता. फोर-डी, थ्री-डी अ‍ॅनिमेटेड चित्रपटांपासून ते कार्टून्सपर्यंत आणि जाहिरातींपासून ते व्हिडीओजपर्यंत या क्षेत्रात खूप पर्याय उपलब्ध आहेत. या सगळ्या विषयांत आधुनिक तांत्रिक गोष्टींची (सॉफ्टवेअर) जोड देण्याची सोय आहेच, तरीही केवळ सॉफ्ट्वेअर्सवर हुकमत असून भागणार नाहीये. कारण ते केवळ पूरक तांत्रिक साधन आहे. त्यामुळं इथं पणाला लागेल ती तुमची संवेदनशीलता. त्याखेरीज कल्पकता, आकलनशक्ती तुमचा यूएसपी ठरेल. सध्याचा समाजमाध्यमांचा वाढता वापर आणि त्याकडचा कल बघता त्या अनुषंगानं काही नवीन संधी निर्माण होत आहेत. युट्यूबवरील व्हिडीओज, व्ल्हॉिगगपासून ते वेबपेजेस, ब्लॉग्ज आणि फोटोंपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आपल्या कलागुणांना वाव मिळू शकतो. सेल्फीच्या वेडाचा अपवाद वगळता छायाचित्रण या क्षेत्रात कलादृष्टीला चिक्कार वाव आहे. त्यामुळं ही कला शिकून सततच्या सरावामुळे आणि सुरुवातीला मिळू शकणाऱ्या कामामुळे नेमका क्षण कॅमेऱ्यात योग्य तऱ्हेने बंदिस्त करायला शिकता येतं. विविध इव्हेंटस् कव्हर करणं, फॅशन, इंडस्ट्रिअल, फूड, नेचर, टेबलटॉप, हवाई अशा अनेक प्रकारांची छायाचित्रं काढता येतात. त्याचप्रमाणे त्यांचं व्हिडीओ शूटिंगही करता येतं.

ग्राफिक डिझायिनगमध्ये अनेक उपयुक्त आयकॉन्स (चिन्हे) तयार करण्यास शिकविली जातात.

पथदर्शक नावं, दुकानं किंवा मॉलमधील पाटय़ा/चिन्हं, वस्तूंची शीर्षकं (Logo, Symbols, Sign ages) बनविण्याचं मार्केट सध्या तेजीत आहे. टायपोग्राफी हा आजवर तसा दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. अक्षरांची विशिष्ट पद्धतीची मांडणी विविध माध्यमांचा वापर करून केली जाते. सुबक आणि वाचनीय अक्षरांचा तोल साधणारी अक्षरं यंत्राच्या साहाय्यानं तयार केली जातात. सुलेखनात अक्षराकाराच्या प्रमाणांचा पाया आणि अक्षरांच्या वळणांचा घाट शिकवला जातो. त्यात विविध प्रयोग केले जातात. टाइप डिझायिनगमध्ये कला आणि तंत्रज्ञानाचा संगम पाहायला मिळतो. उपयोजित कला शिक्षणात इलस्ट्रेशन डिझायिनग, स्टेज क्राफ्ट, सेट डिझायिनग, इव्हेंट डिझायिनग, चित्रपट डिझायिनग आदी प्रकार शिकता येतात. तसंच इलस्ट्रेशनमध्ये अर्कचित्रं, व्यंगचित्रं आदींचा समावेश होतो. डिझाइन या शाखेतही दृश्यकलेला वाव आहे. विविध प्रॉड्क्टची उपयुक्तता आणि त्यातल्या दृश्यसौंदर्याची जाणीव, हे गुण त्यासाठी उपयुक्त ठरतील. कलाशिक्षक प्रशिक्षणाच्यादेखील पदविका मिळविण्याची सोय उपलब्ध आहे.त्याखेरीज कलाशिक्षक म्हणूनही नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.

तुम्ही कोणतीही कला निवडलीत आणि तिचं आविष्करण केलंत तर आनंदच मिळेल. मुलभूत दृश्य कलेकडं कल असणारा कलाकार हा स्वानंदासाठी कलेचा आविष्कार करतो. मूलभूत दृश्य कला क्षेत्रात स्पर्धा नसावी. कला ही एक प्रत्यक्षात अनुभवण्याची, करून बघण्याची गोष्ट आहे. मग तिचं उपयोजन होतं. त्यामुळं एखाद्या कलाकाराच्या यशाला कोणत्याही चौकटीच्या मोजमापात बसवता येत नाही. कलेवर नितांत प्रेम असेल, तर त्यासाठी अपरिहार्य ठरणारा खडतर प्रवास करायला हवा. अडचणी आल्याच तर त्यातून मार्ग काढून संस्कृतीचं जतन करत, कलासाधना करायला हवी.

शब्दांकन : राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com

 

आवश्यक गुण –

कुतूहल, जिज्ञासा, कौशल्य, अभिव्यक्ती, सातत्यपूर्ण सराव, पॅशन.

 

संस्थांची नावं :

BFA अप्लाइड आर्ट, फाइन आर्ट्स पदवी देणाऱ्या

राज्य शासनाच्या संस्था –

’      सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई.

’      सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई.

’      गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट, औरंगाबाद.

’      गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट, नागपूर.

BFA अप्लाइड आर्ट, पदवी देणाऱ्या खाजगी संस्था –

’      रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, मुंबई.

’      बांदेकर कॉलेज ऑफ आर्ट, सावंतवाडी.

’      विवा कॉलेज ऑफ आर्ट, विरार.

’      भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्ट, पुणे.

’      डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, पुणे.

अप्लाइड आर्ट, पदविका देणाऱ्या खाजगी संस्था –

’      सोफिया पॉलिटेक्निक, मुंबई (विद्याíथनींसाठी राखीव)

’      रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स, वांद्रे.

पदविकेचं प्रथम वर्ष पायाभूत अभ्यासक्रम

(Foundation Course), तसेच कला शिक्षक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शासनमान्य संस्था –

’      मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई कला महाविद्यालय,

चर्नी रोड.

’      ठाणे स्कूल ऑफ आर्ट, ठाणे.

’      एसएनडीटी कॉलेज, चर्चगेट.

BDes, MDes डिझाइन पदवी आणि पद्व्योत्तर शिक्षण देणाऱ्या केंद्र शासनाच्या संस्था –

’      इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर, आय आय टी, पवई मुंबई,

’      तसेच आयआयटी- गुवाहाटी, आयआयटी- कानपूर, आयआयटी- हैद्राबाद.

’      नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ डिझाइन (NID) अहमदाबाद, बंगलोर.

BDes डिझाइन पदवी देणाऱ्या खाजगी संस्था –

’      एमआयटी डिपार्टमेंट ऑफ डिझाइन, पुणे.

’      सिंबायसिस इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, पुणे.

’      सृष्टी इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, बंगलोर.

कला शिक्षणातील अभ्यासक्रमांसाठी काही उपयुक्त संकेतस्थळं –

  • http://doa.org.in/DOA/courses
    http://archive.mu.ac.in/courses/ Fine%20Art.pdf
    http://www.sirjjschoolofart.in/
    http://www.idc.iitb.ac.in/
    http://srishti.ac.in/
    http://www.sndt.ac.in/courses/ admissions/list-of-programmes.htm

प्रा. संतोष क्षीरसागर – response.lokprabha@expressindia.com