सुहास जोशी – @joshisuhas2 / response.lokprabha@expressindia.com
विशेष
अंथरायला आणि पांघरायला घोंगडीचा वापर एकेकाळी घरोघरी दिसून यायचा. पण बदलत्या काळात आता घोंगडीचा वापर कमी होऊ लागला आहे. गावोगावच्या जत्रेत घोंगडीची विक्रीही घटली आहे.

काठी न घोंगडं घेऊ द्या की रं,
मला बी जत्रंला येऊ द्या की रं…

Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Draw a beautiful rangoli of Gudhi
Video : पळी वापरून काढा गुढीची सुंदर रांगोळी, पाहताक्षणी लोक म्हणतील, “वाह! सुरेख”
How to make Spicy sandgi Mirchi
जेवताना तोंडी लावा झणझणीत सांडगी मिरची? एकदा खाऊन पाहाच, ही घ्या सोपी रेसिपी

अप्पा कांबळी यांचं हे लोकगीत महाराष्ट्रातील तमाम जत्रेकऱ्यांचं मूर्तिमंत चित्र उभं करतं. पहिल्याच ओळीतून घोंगडी आणि जत्रा या दोन गोष्टींचं अतूट नातं दिसून येतं, पण आज गावोगावच्या जत्रा पाहताना हे नातं अजूनदेखील तसंच आहे का असा एक अगदी सहज प्रश्न पडतो. नुकत्याच सुरू झालेल्या म्हसा (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथील सर्वात मोठय़ा जत्रेत या घोंगडय़ांची उपेक्षा ठसठशीतपणे दिसून येते.

सुमारे २०-१५ वर्षांपूर्वी कोणत्याही जत्रेत घोंगडय़ांची दुकानं एका बाजूला अगदी दिमाखात सजलेली असायची. सजावटीसाठी केवळ काळ्या रंगाच्याच अनेक शेड्स. ऐन जत्रेच्या दिवसात ही दुकानं तशी फारशी गजबजायची नाहीत. गर्दीचा पहिला बहर ओसरला की मग यांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागायची. तेव्हा अजून ब्लँकेट्स (यंत्रमागावरची घोंगडी, बरीचशी मऊ आणि सुबक. काही ठिकाणी मराठीत यालाच रग असे म्हणतात.) देखील मर्यादित होती. हातमागावर विणलेली घोंगडी घेऊन येणारे धनगर म्हणजे मस्त दिलदार माणसं. दिवाळी संपून एकदा का जत्रांचा मौसम सुरू झाला की यांचा घोंगडय़ांचा बाजार एकेक गावी फिरू लागायचा. आजदेखील ते असेच फिरतात. पण त्यांची संख्या अगदीच रोडावली आहे. म्हसाच्या यात्रेला नियमित येणारे अविनाश हरड सांगतात की, दोन हजार सालाच्या आसपास याच जत्रेत घोंगडी आळी असायची. घोगंडी विणणारे घाटावरचे लोक म्हसा जत्रेत हमखास दुकान मांडायचे. आज मात्र या जत्रेच्या सुरुवातीला भेट दिल्यावर दिसतात केवळ दोन-चार दुकानं. या घोंगडय़ांची जागा आत्ता मऊ मऊ अशा विविधरंगी ब्लँकेट्सनी घेतली आहे. ही ब्लँकेट्स लोकरीची नसतात. तरीदेखील गिऱ्हाईकांची रीघ त्यांच्या खरेदीसाठी लागते. ब्लँकेट्सच्या दुकानात घोंगडीचा गठ्ठा केविलवाणा वाटावा असा कुठेतरी ठेवलेला असतो.

अगदी आकडय़ातच मोजायचे तर किमान पन्नासएक तरी अशा ब्लँकेट्सची दुकानं येथे होती. तुलनेने घोंगडय़ांची दुकानं दोनच. या जत्रेत गेली २० वष्रे घोंगडीचा व्यवसाय करणारे चंद्रकांत सनगर सांगतात, ‘पूर्वी आम्ही जत्रेत सर्वात आधी पोहोचायचो. जत्रेच्या दिवसातच आमचा बहुतेक सारा माल संपून जायचा. पण गेल्या काही वर्षांपासून आम्हाला जत्रा संपल्यानंतरदेखील आठ-दहा दिवस थांबावं लागतं. तेव्हा कुठे बरा व्यापार होतो.’ चंद्रकांत सनगर हे मूळचे पेठ वडगावचे. सध्या     इचलकरंजी येथे त्यांचे घोंगडय़ांचे काम चालते. घोंगडी व्यवसायाचे काम बहुतांशपणे या सनगर मंडळींकडून केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यत घोंगडी उत्पादनाची चांगलीच परंपरा आहे. कर्नाटकातून लोकर विकत घ्यायची आणि हातमागावर विविध प्रकारच्या घोंगडय़ा तयार करायच्या हा या सनगर मंडळींचा व्यवसाय. पट्टणकोडोलीची जत्रा करून त्यांच्या फिरतीची सुरुवात होते. सगळंच काम कौशल्याचं आणि कष्टाचंदेखील. जेव्हा गावखेडय़ातून घोंगडीला गिऱ्हाईक होते, तेव्हा हा एक चांगल्या प्रकारे विकसित झालेला लघुउद्योग होता. एका हातमागावर वर्षांकाठी दोनअडीच हजार घोंगडय़ा विणल्या जायच्या. असे अनेक हातमाग होते. चंद्रकांत सनगर सांगतात की, आज पाचच टक्के माग शिल्लक आहेत.

चंद्रकांत सनगर यांचा हा पिढीजात व्यवसाय. ते सांगतात, ‘‘एक घोंगडी तयार करायला किमान अडीच ते तीन लोकर किलो लागते. एका मेंढरापासून साधारणपणे ४०० ग्रॅम लोकर मिळते. सध्या ही लोकर आम्हाला कर्नाटकातून उपलब्ध होते. तिकडे मेंढपाळ भरपूर आहेतच, पण त्याचबरोबर तेथील सरकारने या व्यवसायाला अनेक सोयीसुविधा दिल्या आहेत. त्यामुळे तेथून चांगली लोकर मिळते.’’ कर्नाटकातून आलेले सिद्धाप्पा पुजारी हे व्यापारीदेखील कर्नाटकातील या सुविधांचे कौतुक करतात. तेथेदेखील व्यवसाय कमीच आहे, पण तेथील सरकारने या व्यवसायाच्या वृद्धीसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. विक्रीवर ग्राहकांना विशेष सवलतदेखील दिली जाते असे ते सांगतात. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र सरकार काय करते हे विचारल्यावर येथील व्यापारी सांगतात की, आपल्या मंत्र्यांना घोंगडी म्हणजे काय हेच आधी समजावून द्यावे लागते अशी आज परिस्थिती आहे. आज या घोंगडीवर पाच टक्के जीएसटीदेखील बसवला आहे. त्यातच घोंगडी व्यावसायिकांच्या तीन संघटनादेखील आता नाहीशा झाल्याचे सनगर सांगतात. एक संघटना शिल्लक आहे, पण तीदेखील केवळ कागदावरच.

आपल्याकडील जत्रांमध्ये येणाऱ्या घोंगडय़ा या सर्वसाधारणपणे कोल्हापूर जिल्ह्य़ात तयार होतात. शेणगाव, मुरुगुड, मसुर माली, सेनापती, कापशी अशा ठिकाणी आज घोंगडय़ा विणल्या जातात. सांगली जिल्ह्य़ातील ढालगाव, बलेवाडी आणि म्हसवड अशा काही ठिकाणी घोंगडी तयार केली जाते. यापलीकडे हा व्यवसाय तसा वाढला नाही. मात्र या सर्व ठिकाणच्या घोंगडय़ांची मागणी मर्यादितच आहे. कोल्हापुरातील घोंगडीला कोकणातदेखील चांगलीच मागणी असते. चंद्रकांत सनगर सांगतात, ‘‘१५ वर्षांपूर्वी मे महिन्यात सावंतवाडीच्या जत्रेत आम्ही व्यापारी प्रत्येकी एकेक ट्रक भरून घोंगडी घेऊन जायचो. आज २० व्यावसायिक मिळून केवळ एक ट्रक भरून घोंगडी घेऊन जातो, इतकी मागणी कमी झाली आहे.’’

घोंगडी हा तसा ग्रामीण भागातील छोटय़ामोठय़ा घरांमध्ये अगदी सहज दिसणारा घटक. जमिनीवर अंथरूण म्हणून, कधी पांघरूण म्हणून, तर पावसाळ्यात शेतावर जाताना खोळ करून घोंगडी वापरली जायची. सनगर सांगतात की, घोंगडीवर बसून केलेल्या व्यवहाराच्या, सोयरीकीच्या बठकी मोडायच्या नाहीत असा एक अलिखित करार असतो. किंबहुना अशा बठकी मोडतदेखील नाहीत. तर बिरुबा, खंडोबा, बाळूमामा अशा देवांच्या ठिकाणी वाहण्यासाठी घोंगडीचा वापर होतो. तसेच जागरण, गोंधळ यातदेखील देव घोंगडीवरच मांडले जातात. सध्या घोंगडीचा संबंध केवळ या देवांपुरताच उरला असल्याचे सनगर यांना जाणवते.

हल्ली गावखेडय़ात पावसाळ्यात रंगीबेरंगी फ्लेक्स, प्लास्टिक यांच्यापासून खोळी केलेल्या सर्रास दिसून येतात. पावसात वापरायच्या खोळीची घोंगडी तयार करताना चिंचोक्यांची खळ करून त्याचा वापर केला जातो. अशा घोंगडय़ा बऱ्यापकी खरबरीत आणि कडक असतात. जत्रेत अगदीच दहा-पंधरा अशा घोंगडय़ा विकल्या जात असल्याचे येथील दुसरे व्यापारीदेखील सांगतात. घोंगडय़ांमध्ये काही प्रयोगदेखील होत आहेत. पांढऱ्या लोकरीची मऊसूत घोंगडीदेखील येथे पाहायला मिळते.

घोंगडी व्यवसायाबरोबरच अनेक पूरक उद्योगदेखील कमी झाले. जसे हातमाग कामगार कमी झाले तसेच घोंगडीला रेवडी भरणारेदेखील रोडावले. घोंगडीच्या दोन्ही टोकांना असणारे लोकरीचे सुट्टे धागे, दोऱ्यांच्या नक्षीने गुंफून हे धागे आणखीन सुट्टे न होण्याची काळजी घेतली जाते. यालाच रेवडी भरणे असे म्हणतात. लाल-गुलाबी-पिवळ्या अशा रंगांची ही पट्टी घोंगडीला खुलून दिसते. हे काम हातावरच केले जाते. अशी कामं करणारी माणसं जत्रेत घोंगडय़ांच्या दुकानाबाहेरच थांबलेली असतात. म्हसाच्या जत्रेत रघुनाथ सोनवणी हे असेच वृद्ध पण कसबी गृहस्थ भेटतात. हे शिक्रापूरचे. जत्रेबरोबर हेदेखील आपल्या पत्नीसह भटकत असतात. रेवडी भरण्यासाठी दोन माणसांची गरज असते. एक प्रत्यक्ष धागे गुंतवणारा आणि दुसरा धागे लांबवर धरून त्यांची अदलाबदल करणारा. या दोघांची ही सांगड जुळली की रेवडी खुलून येते. रघुनाथ सोनवणी यांची पिढी ही रेवडी भरणाऱ्यांची बहुतेक शेवटचीच पिढी असावी. ते सांगतात, ‘‘ घोंगडीचा धंदाच मंदावलेला असल्याने आमचं कामपण कमी झालं आहे. तरुण मुलं तर इकडे फिरकतच नाहीत. त्यापेक्षा नोकरी करणं त्यांना योग्य वाटतं.’’ रेवडी भरण्याचं काम तसंही फार पसे मिळवून देणारं नाही. एका घोंगडीमागे शे-दोनशे रुपयांचाच काय तो व्यवहार. पण तेदेखील आता दुरापास्त होऊ लागले आहेत.

एकूणच काय तर ऊब देणारी घोंगडी आता सर्वानाचा टोचू लागली आहे. सध्या सर्वाधिक मागणी असणारी आणि पांघरण्यासाठी वापरली जाणारी विविधरंगी, मऊसूत ब्लँकेट्स येतात ती परराज्यातून. लुधियाना, उत्तर प्रदेश येथून. यांचा सर्वात मोठ्ठा डेपो आहे जळगावात. ब्लँकेट्सनी भरलेली भली मोठी गाठोडी घेऊन ५०-१०० शंभर लोकांचा समूहच म्हसाच्या जत्रेत दिसून येतो. हे विक्री करणारे लोकदेखील बहुतांश परराज्यातलेच. तर खेडेगावातदेखील जमिनीवर बसण्यासाठी हल्ली घोंगडी वापरली जात नाही कारण प्लास्टिक खुच्र्या असतात. स्वस्त, टिकाऊ आणि शानदारपणा असं सारंच यात येतं. एकंदरीतच जीवनशैलीतल्या बदलाचा हा भाग म्हणावा लागेल.

‘काठी न घोंगडं..’ हे गाणं आजदेखील प्रसिद्ध असलं आणि शहरातील शाळांच्या वार्षकि विविध गुणदर्शन कार्यक्रमांत प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या साथीने हमखास वाजत असलं तरी या घोंगडीची कहाणी अस्वस्थ करणारी आहे. नवीन पर्याय आले की जुन्याची किंमत कमी होते हा उद्योगचक्राचा नियमच आहे. पण केवळ एक वस्तू इतपतच या घोंगडीची किंमत नाही. ग्रामीण संस्कृतीची पाळंमुळं या घोंगडीत दडलेली आहेत. त्यात केवळ उत्पादनच नाही तर कलेचीदेखील जोपासना आहे. ही संस्कृती आणि कलेसाठी तरी किमान ही घोंगडी जपायला हवी.