News Flash

मोदीराज्यात नवा भिडू

हार्दिक पटेल नेमका कोण आहे हा मुलगा? तो काय करतो, कुठे असतो?

जेमतेम एका आठवडय़ापूर्वी फारसा कुणालाही माहीत नसलेला हार्दिक पटेल एकदम सगळ्या चॅनलवर झळकायला लागला. देशभरात त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. नेमका कोण आहे हा मुलगा? तो काय करतो, कुठे असतो?

हार्दिक पटेलमधल्या नेतृत्वगुणांची चुणूक सर्वप्रथम गोवर्धन झडपीयांना दिसली. गोवर्धन झडपीया हे गुजरातमधले एकेकाळचे ताकदीचा नेते, माजी गृहराज्यमंत्री. त्यांनी हार्दिकच्या नेतृत्वगुणांना खतपाणी घातलं. आणि आता त्यांचं बोट सोडून अवघ्या २२-२३ वर्षांचा हार्दिक आरक्षणाचं राजकारण करायला लागला आहे.
चंदन नगर हे विरामगाव या शहरापासून १० किलोमीटर अंतरावरचं एक छोटंसं गाव. लोकसंख्या जेमतेम ७००. आज हे चंदननगर हार्दिकचं गाव म्हणूनच ओळखलं जायला लागलं आहे. हार्दिक पाचवीत असेपर्यंत इथे रहात होता. मग त्याचे आईवडील, भरत आणि उषा मुलांच्या शिक्षणासाठी विरामनगरला राहायला गेले.
भारत (४९) आणि उषा (४३) हे हार्दिकचे आईवडील विरामनगरमध्ये झालवाडी कडवा पाटीदार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. भारत पटेलांचा विहिरींना पंप पुरवण्याचा छोटासा व्यवसाय आहे. हार्दिकचा जन्म २० जुलै १९९३ चा. ते चंदनवाडीतून विरामगावला आल्यानंतर हार्दिकने तिथेच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अहमदाबादपासून ६० किलोमीटर लांब असलेल्या पांजरपोळ परिसरातल्या सहजानंद कॉलेजमधून त्याने त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये पोहोचेपर्यंत हार्दिकला राजकारणात रस निर्माण झाला होता. कॉलेजमध्ये तो जनरल सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवडूनही आला होता असं त्याची आई सांगते.
लहानपणापासून वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करता करता त्याने दुसरीकडे तो स्वत:चा एक लहानसा व्यवसायही सुरू केला होता. त्याने विरामगावच्या बसस्टॅण्डवर एक छोटासा पाण्याचा स्टॉलही सुरू केला होता. त्याला लहानपणापासूनच सार्वजनिक जीवनात आणि कामांमध्ये रस होता, असं त्याचे वडील सांगतात.
पण त्यापेक्षाही त्याच्या वडिलांना जास्त आठवतं ते त्याचं वाढत्या वयातलं क्रिकेटप्रेम. त्याला क्रिकेट खेळायला आवडायचंच आणि तो खेळत असताना कुणी तरी फोटो काढलेलंही फार आवडायचं. त्यानं त्याचे कोच देवूभाईंबरोबर क्रिकेट कोचिंग सुरू केलं तेव्हा त्याच्या स्वभावामुळे लहान मुलं त्याच्याकडे खेचली जायची. त्याने क्रिकेट कोचिंगमधून पॉकेटमनीही कमावला.
तिथून आजपर्यंतच्या प्रवासात हार्दिकचं प्रेरणास्थान आहेत ते सरदार वल्लभभाई पटेल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्याशिवाय कच्छमधले बजरंग दलाचे नेते, तसंच कडवा पाटीदार समाजाचे बाबू बजरंगी हेही त्याचे प्रेरणास्थान आहेत. हे बाबू बजरंगी नवचेतन ट्रस्ट चालवतात. हा ट्रस्ट मुस्लीम तसंच ख्रिष्टद्धr(२२४)चन धर्मीयांशी लग्न होणाऱ्या हिंदू मुलींची सुटका करण्याचं काम करत असल्याचा त्यांचा दावा आहे. या बजरंगींना २००२च्या गुजरात दंगलीत नरोदा पाटियामधल्या दंगलीतल्या सहभागाबद्दल शिक्षा झाली होती. पण त्याबद्दल हार्दिकला काहीच चुकीचं वाटत नाही. ‘समाजाच्या रक्षणासाठी अशाच चांगल्या माणसांची गरज आहे,’ असं तो सांगतो.
हार्दिक २०१२ मध्ये सरदार पटेल ग्रुपमध्ये (एसपीजी) सहभागी झाला. ‘प्रोटेक्टर ऑफ गर्ल्स’ (मुलींचा रक्षणकर्ता) या त्यानेच उभारलेल्या ब्रिगेडमुळे तो या ग्रुपमध्ये लोकप्रियही झाला. सरदार पटेल ग्रुप हा लेवा तसंच कडवा पटेलांनी काढलेली संस्था. २००१ मध्ये ती मुळात सुरू केली ती मेहसाणा इथल्या लालजी पटेल यांनी. स्री-भ्रूणहत्या रोखणं, रक्तदानाचे कार्यक्रम राबवणं अशा हेतूने ही संस्था सुरू झाली. लग्न जमवणारी वेबसाइट, लैंगिक शोषणाला विरोध करणं अशी कामंही या संस्थेमार्फत चालवली जात. हार्दिकची आणि आपली भेट कधी आणि कशी झाली तेही लालजी पटेलांना नीट आठवतं. ते सांगतात, आम्ही मेहसाणामध्ये सरदार पटेलांची जयंती साजरी करायचं ठरवलं होतं. तेव्हा हार्दिक मला येऊन भेटला आणि त्याने आमच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा मला सांगितली. आम्ही त्याला सहभागी करून घेतलं आणि आमच्या ग्रुपसाठी विरामगाव परिसरासाठी अध्यक्ष केलं. हार्दिकने २०१४ पर्यंत या परिसराचा अध्यक्ष म्हणून विरामगाव आणि मंडलमधून दोन वर्षांत लैंगिक शोषणाच्या सहा हजार केसेस आणून दिल्या.
सरदार पटेल ग्रुपमध्ये गेल्यावरच आपला मुलगा नीतीन पटेल (आरोग्यमंत्री), पुरुषोत्तम रुपाला (भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष), तेजश्रीबेन पटेल (काँग्रेसच्या स्थानिक आमदार) यांच्या संपर्कात आला आणि प्रकाशात आला असं भारत पटेल सांगतात. या नेत्यांच्या संपर्कात आल्यावर, त्यांच्याशी झालेल्या चर्चामधून त्याला पाटीदारांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजायला लागले, असं भारत पटेल सांगतात. त्यांच्या मते ‘आता कित्येक पाटीदार तरुण त्याच्याकडे येतात आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळत नसल्याचं सांगतात. तो त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही याला कारण एकच ते म्हणजे ओबीसी कोटा!’
हार्दिकची बहीण मोनिका ६४ टक्के मिळवून बीए झाली आहे. तिला ह्य़ूमन रिसोअर्स मॅनेजमेंट इन लेबर वेल्फेअर या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं होतं. पण ‘६४ टक्के मिळवूनही मला प्रवेश मिळू शकला नाही,’ ती सांगते. हे सगळं पाहत, समजून घेत हार्दिक घडत असतानाच झडपीया या भाजप नेत्याने हार्दिकचा इतर राज्यांमधल्या पटेलांशी संपर्क करून दिला. ‘गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अखिल भारतीय सरदार पटेल महासभेचा अध्यक्ष या नात्याने मी त्याला बाराबंकीत झालेल्या अखिल भारतीय कुर्मी महासभेला घेऊन गेलो,’ ते सांगतात.
या सभेत हार्दिकच्या लक्षात आलं की इतर राज्यांमधल्या पटेल समाजातल्य लोकांना आरक्षणाचा फायदा मिळतो आहे. तेव्हा त्याने त्यांना गुजरातमध्येही आरक्षण मिळवून द्यायचा, त्यासाठी काम करण्याचा निश्चय केला. बाराबंकीच्या त्या महासभेला आलेला कमलेश कटियार सांगतो, त्या सभेत हार्दिक काही मिनिटंच बोलला, पण तो जे काही बोलला ते इतकं प्रभावी होतं, की सगळ्यांनीच शांतपणे बसून ऐकून घेतलं. या महासभेला आलेले रामानुज पटेलही सांगतात की, हार्दिक पटेल एकदम हुशार असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्या सभेला आलेले पटेल समाजाचे लोक बघून हा समजा किती पसरला आहे हे समजल्यावर तो एकदम आश्चर्यचकित झाला होता.’
पण हार्दिकच्याच जिल्ह्य़ात सरदार पटेलांच्या नावाने आठ शाळा चालवणारे शैलेंद्र पटेल सांगतात, हार्दिकला गुजरातमध्ये इतका पाठिंबा मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
गंमत म्हणजे एप्रिल १६ रोजी विरामगावमध्ये पाटीदाराचा मोठा मेळावा भरला होता. झडपीयाही त्याला उपस्थित होते पण तिथे पटेल, पाटीदार समाजाला आरक्षणात वाटा मिळवं यासाठी कोणतीही चर्चा झाली नाही. पण ती झाली जुलै ६ रोजी. मेहसाणात हार्दिकच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या रॅलीत.
त्याबद्दल झडपीया सांगतात, हार्दिक असा काही मुद्दा घेणार आहे याबद्दल मला काहीच सांगितलं गेलं नव्हतं की कल्पना दिली गेली नव्हती. दोन-तीन रॅलींनंतर मी त्याला सांगायचा प्रयत्न केला की हे बरोबर नाही. आणि आरक्षणाची मागणी करण्यासाठी ओबीसी आयोगाकडे जाणं योग्य ठरेल. पण त्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आपण जे काही करतो आहोत त्यात खरोखरच दम आहे, याविषयी हार्दिकलाही जुलै २४ पर्यंत म्हणजे वीसनगरमधल्या पाटीदार रॅलीमध्ये पहिल्यांदाच हिंसक संघर्ष झडेपर्यंत खात्री नव्हती. तिथे जवळपास दीडशे पाटीदारांवर कारवाई झाली. त्यानंतर बरोबर महिन्याने अहमदाबादमध्ये हार्दिकने काढलेल्या रॅलीला पाच लाख लोक उपस्थित होते. त्या रॅलीनंतर अहमदाबादेतच नव्ह तर राज्यभर हिंसक कारवाया झाल्या आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच गुजरातमधल्या लोकांना शांततेचं आवाहन करावं लागंल.
हार्दिक सांगतो वीसनगरच्या रॅलीमध्ये सरदार पटेल ग्रुप आणि पाटीदार अनामत आंदोलन समिती या गोघांमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं. लालजीभाईंचा एसपीजी ही संस्था गेली १४ वर्षे सुरू आहे पण पाटीदार अनामत आंदोलन समितीने जे साध्य केलं ते त्यांना एवढय़ा मोठय़ा काळात साध्य करता आलं नाही आणि त्यामुळेच एसपीजी आपल्या संस्थेपासून दूर गेली असं त्याचं म्हणणं आहे.
हार्दिकच्या समर्थकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर जवळजवळ ५१२ ग्रुप केले आहेत. वेबसाइट, फेसबुक, ट्विटर या माध्यमांमधूनही ते लोकांपर्यंत हा प्रश्न घेऊन पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला या सगळ्या साधनांचा सगळ्या पाटीदारांना एकत्र आणायला खूप उपयोग झाल्याचं हार्दिक कबूल करतो. गुजरातमध्ये पाटीदारांची संख्या दीड कोटी आहे. म्हणजेच पाटीदार एकूण गुजरातच्या लोकसंख्येच्या १४ टक्के आहेत. अहिर, मुस्लीम, अनुसूचित जाती-जमाती, ब्राह्मण आणि क्षत्रियांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचं तो सांगतो. आपल्या रॅलींना येणारे लोक केवळ माऊथ पब्लिसिटीने येतात असा त्यांचा दावा आहे. या लोकांपैकी पन्नास टक्के हे सोशल मीडियातून माहिती कळल्यामुळे येतात, असं सांगून हार्दिक म्हणतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सोशल मीडियाची ताकद काय असते ती दाखवून दिली. आता त्यांनाच वाटत असेल की, मी हे काय केलं.
अहमदाबादमधल्या सभेत त्याने गुजरातीत नाही तर हिंदीत भाषण केलं. कारण त्याचं असं म्हणणं आहे की, आरक्षणाचा हा मुद्दा कोणत्याही राज्यापुरता नाही तर तो सगळ्या देशाचा प्रश्न आहे. त्यामुळे देशातल्या सगळ्या लोकांपर्यंत तो पोहोचेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिल्लीचा रस्ता धरताना मोदींनीही जाणीवपूर्वक हिंदी भाषेचा वापर केला होता, हा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. नुकत्याच प्रकाशित झालेल्या हार्दिकसंबंधातल्या एका व्हिडीओमध्ये फक्त सरदार पटेलच नव्हते तर शिवाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोसही होते. डरकाळी फोडणारा सिंह आणि नंतर हातात गन घेतलेला हार्दिक अशीच त्या व्हिडीओची सुरुवात होती. हार्दिकची अशी सगळी वातावरणनिर्मिती चालली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी तू ओबीसी आयोगाकडे का जात नाहीस या प्रश्नावर हार्दिक सांगतो, माझा त्या पॅनेलवर विश्वासच नाही. १९९१ मध्ये काही पाटीदार नेत्यांनी ओबीसी दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते, पण त्यांचा अर्ज फेटाळला गेला. तर २००१ मध्ये कच्छिया पटेल (भाजीविक्रेता समाज) समाजाने ओबीसी दर्जा मिळावा यासाठी अर्ज केला आणि त्यांना ओएनजीसीसारख्या सार्वजनिक आस्थापनांमध्ये आरक्षण मिळालं. त्यांचा साठ वर्षांचा इतिहास खणून काढायाला त्यांना चार र्वष लागली आणि आयोगाला पटवून द्यायला नऊ र्वष. हार्दिक सांगतो, आम्ही जर आमचा इतिहास धुंडाळायचा ठरवला तर आम्हाला रामायणापर्यंत मागे जावं लागेल. हिंदू धर्माशी इतका पुरातन संबंध आणखी कुणाचा आहे का?’
हार्दिकला मिळणारा प्रतिसाद बघून आता हा पुढच्या काळात काय काय करणार असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
तो काँग्रेस आमदार तेजश्रीबेन पटेल यांच्या जवळचा आहे, असे निनावी संदेश सोशल मीडियातून फिरायला लागले आहेत. भाजपचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला आणि गृराज्यमंत्री रजनीकांत पटेल यांच्याबरोबरचे फोटो प्रसिद्ध करून हार्दिकने या संदेशांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे.
आरक्षणासंदर्भातल्या हार्दिकच्या वक्तव्यांना जिथून प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली, ते कानपूरचे कमलेश आणि इतर लोक मात्र हार्दिकच्या अलीकडच्या भाषणांमधल्या नकळत येणाऱ्या आरक्षणविरोधी सुराबद्दल नाराज आहेत. तो एक तर सगळ्यांनाच आरक्षण द्या असं म्हणतो किंवा आरक्षण पूर्ण संपवा असं म्हणतो हे पूर्ण चुकीचं आहे कमलेश सांगतात.
तरीही या मुद्दय़ाची चर्चा तरी सुरू झाली म्हणून ते खूश आहेत.
एंडला हे हार्दिकच्या विरामगाव, मंडल या परिसरातलंच गाव. अल्पेश ठाकूर हा त्या गावातला ओबीसींचा नेता. त्याने नुकतंच पाटीदारांच्या आंदोलनाविरोधात ओबीसींची एक सभा आयोजित केली होती. ‘हार्दिक विक्षिप्त आहे,’ तो सांगतो, ‘त्याला जिकडे महत्त्व मिळेल तिकडे त्या ग्रुपमध्ये तो जातो. मग ते भाजपवाले असोत, काँग्रेस असो वा आम आदमी पार्टी. दोन महिन्यांपूर्वी मी विरामगावात ठाकूर समाजाची रॅली आयोजित केली होती. त्या रॅलीचं स्वागत करणारा फलकही हार्दिकने लावला होता.’ ठाकुरांच्या मते, पाटीदारांचं आंदोलन हे आरक्षणविरोधी आंदोलन आहे, सगळंच आरक्षण काढून टाकावं हा त्यांचा छुपा अजेंडा आहे.
त्या सगळ्याबद्दल हार्दिकला विचारलं तर तो गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, अल्पेश असं म्हणाला? असू दे, माझा मित्रच आहे तो!
गुजरातच्या राजकारणात नवे भिडू कसे उभे राहत आहेत याचंच चित्र आहे हे सगळं!
(‘द संडे एक्स्प्रेस’मधून)
(अनुवाद : वैशाली चिटणीस)
परमिल दाभी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:32 am

Web Title: hardik patel
टॅग : Hardik Patel
Next Stories
1 चित्रकुंभ : माहोल कुंभमेळ्याचा…
2 चिंबधारा : पाऊसवेळा.. जीवनाचे संगीत
3 चिंबधारा : पाऊस उच्चभ्रूंचा आणि पाऊस गरिबांचा
Just Now!
X