News Flash

सुट्टी विशेषांक : लाकूडतोड्या आणि वनदेवता

रोज उठून बजबजपूरच्या जंगलात जाऊन लाकडं तोडायची, त्याची मोळी बांधायची आणि आटपाटनगरमध्ये आणून विकायची हा त्याचा पिढीजात व्यवसाय.

‘घाबरू नकोस शंकर, मी वनदेवता आहे,’ पांढऱ्याशुभ्र साडीतील त्या स्त्रीच्या बोलण्याने शंकर भानावर आला.

प्रशांत मोरे – response.lokprabha@expressindia.com
पहाटेचा कोंबडा आरवला आणि झटपट तयार होऊन शंकर घराबाहेर पडला. आटपाटनगरच्या एका टोकाला त्याचं घर होतं आणि बजबजपूरचं जंगल दुसऱ्या टोकाला. त्यामुळे जंगलात जायला त्याला बराच वेळ लागे. त्यात दिवस उन्हाळ्याचे होते. एकदा का सूर्य डोक्यावर येऊन उन्हाचा पारा वाढला की काही सुचत नसे. त्यात शंकरचं अंग मेहनतीचं काम. रोज उठून बजबजपूरच्या जंगलात जाऊन लाकडं तोडायची, त्याची मोळी बांधायची आणि आटपाटनगरमध्ये आणून विकायची हा त्याचा पिढीजात व्यवसाय. त्यामुळे ऊन वाढायच्या आत तो लाकडं तोडायचं काम उरकून घेई. त्या दिवशीही खांद्यावर कुऱ्हाड घेऊन तो बजबजपूरची वाट चालू लागला. गेली कित्येक वर्षे तो ही वाट तुडवीत होता. अगदी लहान असताना आजोबांचे बोट धरून तो पहिल्यांदा बजबजपूरमध्ये आला होता. त्यानंतर वडिलांनी त्याला झाडाच्या फांद्या कशा तोडायच्या, त्यांची मोळी कशी बांधायची हे शिकविले होते. काही दिवसांच्या सरावानंतर तो या कामात पारंगत झाला होता.

नेहमीप्रमाणे त्या दिवशीही तासाभरात तो बजबजपूरमध्ये पोहोचला. तेव्हा पूर्वेकडच्या आकाशात लाल, तांबूस रंग फेकून सूर्याने आपण लवकरच येत असल्याची वर्दी दिली होती. शंकरने एकदा त्या दिशेला पाहून नमस्कार केला आणि कामाला सुरुवात केली. जाडसर आणि एकसारख्या फांद्या असणारे एक झाड त्याने निवडले. कमीत कमी घावात फांदी झाडावेगळी करण्यात तो तरबेज होता. एका दमात डोक्यावरून वाहून नेता येतील, इतकी लाकडं तोडून तो विश्रांतीसाठी थांबला. ज्या झाडाच्या फांद्या त्याने तोडल्या होत्या, तिथून जवळच एक विहीर होती. त्यालगत एक मोठा डेरेदार वृक्ष होता. विहिरीतले पाणी आणि त्या झाडाच्या दाट सावलीमुळे तिथे चांगलाच गारवा होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत तो त्या सावलीत येऊन बसला. बाजूलाच असलेल्या एका काढणीने त्याने विहिरीतले पाणी काढले. ते पाणी कमालीचे थंड आणि चवीला गोड होते. घटाघटा पाणी पिऊन त्याने त्याची तहान भागवली. त्यानंतर आणखी पाणी काढून त्याने ते अंगावर ओतले. त्याचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. बायकोने दिलेला भाकरतुकडा चटणीबरोबर खाऊन तो तिथेच आडवा झाला. त्याचा चटकन डोळा लागला..

तितक्यात विहिरीत काही तरी धपकन् पडल्याचा आवाज झाला. त्यामुळे तेथील शांतता भंग पावली. झाडावर शांत बसलेल्या पाखरांनी एकच कलकलाट सुरू केला. शंकरही दचकून उठला. त्याने इकडे तिकडे पाहिले. मात्र त्याला काही दिसले नाही. मग आवाज कसला झाला? जागेवरून उठून त्याने विहिरीला एक प्रदक्षिणा घातली. तिथे कुणीही नव्हते. मग जेव्हा त्याने पुढे होऊन विहिरीत डोकावून पाहिले, तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. झाडाच्या खोबणीत ठेवलेली त्याची कुऱ्हाड विहिरीत पडली होती. विहिरीच्या तळाशी कुऱ्हाडीचं पातं चमकताना त्याने पाहिलं. विहीर अतिशय खोल होती. काय करावं? तो अस्वस्थ झाला. हातावर पोट असलेला तो गरीब माणूस. कुऱ्हाड हेच त्याचे उपजीविकेचं साधन होतं. मोळी विकून जे काही मोजके पैसे हाती येत, त्यात त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चाले. आता तातडीने नवीन कुऱ्हाड आणायची म्हणजे पैसे हवेत. ते कुठून आणायचे? शून्यात नजर लावून तो एकटक त्या विहिरीकडे बघत होता. हताश झाला होता. तितक्यात एक सुंदर स्त्री त्या झाडावरून तरंगत येऊन त्याच्यापुढे येऊन उभी राहिली. तिला पाहताच शंकरच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती असे दोन्ही भाव एकाच वेळी उमटले.

‘घाबरू नकोस शंकर, मी वनदेवता आहे,’ पांढऱ्याशुभ्र साडीतील त्या स्त्रीच्या बोलण्याने शंकर भानावर आला.

‘वनदेवता!’ शंकर आश्चर्यचकित झाला.

‘म्हणजे आजोबांनी सांगितलेली गोष्ट खरी होती तर..! ’ तो मनाशीच पुटपुटला.

‘हो शंकर. तुला तुझ्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे,’ स्मितहास्य करीत वनदेवता म्हणाली.

‘मी मनातल्या मनात बोललो, ते हिला कसं कळलं?’ शंकरला प्रश्न पडला.

‘कारण मी वनदेवता आहे. मी तुझ्या मनातलं सर्व काही वाचू शकते, पाहू शकते,’ वनदेवतेने थेट शंकरच्या मनाशी संवाद सुरू केला.

आता शंकर थोडा सावरला. त्याची भीड चेपली. वनदेवतेला नमस्कार करून तो म्हणाला, ‘हे माते माझ्यावर कृपा कर. आजोबांप्रमाणे मलाही सोन्या-चांदीचा मोह नाही. विहिरीत माझी लोखंडाची कुऱ्हाड पडली आहे. ती तेवढी काढून दे.’

वनदेवता म्हणाली, ‘शंकर मी तुझ्या आजोबांची परीक्षा घेतली होती. त्यांचीही अशीच विहिरीत कुऱ्हाड पडली होती. तेव्हा मी त्यांना आधी सोन्याची तसेच चांदीची कुऱ्हाड काढून दिली. मात्र त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून फक्त लोखंडाचीच कुऱ्हाड आपली असल्याचे सांगितले.’

‘हो, देवी. आजोबांनी मला ही गोष्ट सांगितली होती. मलाही दुसरे, तिसरे काही नको. फक्त माझी कुऱ्हाड हवी,’ त्याने थेट मुद्दय़ालाच हात घातला.

‘तुझ्या आजोबांना मी विहिरीतली कुऱ्हाड काढून दिली होती, पण आता मी ती चूक करणार नाही. मी कुऱ्हाड काढणार नाही,’ वनदेवतेने सांगितले.

‘का? माझे काही चुकले का?’ शंकरने विचारले.

‘चूक तर नक्कीच झाली, पण तुझी एकटय़ाची नाही. आपले सगळ्यांचेच चुकले. कुऱ्हाडीने झाडे तोडून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला,’ वनदेवता म्हणाली.

‘हो, पण लाकडं तोडली नाहीत, तर माझे कसे होईल? माझे घर कसे चालेल?’ शंकरला काळजी वाटू लागली.

वनदेवता म्हणाली, ‘शंकर तुम्ही पिढीजात लाकूडतोडे. आजोबा-पणजोबांपासून तुम्ही झाडे तोडून मोळ्या विकत आहात. तरीही जेमतेम पोट भरण्याव्यतिरिक्त तुमच्या पदरात फारसे काही पडले नाही. आता माझे ऐक. जे होतं ते चांगल्यासाठीच. कुऱ्हाड विहिरीत पडली ते एका अर्थाचे चांगलंच झालं. आता काही तोडू नकोस. त्याऐवजी जोडायला शिक. झाडे तोडून फारसे काही मिळत नाही, हे तर तुला माहिती आहेच. आता झाडांची राखण करून काय मिळते ते पाहा. जंगलात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी राहतात. त्या सर्वाचे भरणपोषण जंगलात होते. त्यापैकी कुणीही झाडे तोडत नाहीत. मग माणसेच का जंगले तोडतात? ठरावीक काळानंतर फांद्या सुकून आपोआप गळतात. त्या लाकडांवर मानवाच्या गरजा भागू शकतात. मात्र हव्यास कधीच पूर्ण होत नाही. या जंगलात अनेक उपयुक्त फळे, फुले आहेत. औषधी वनस्पती आहेत. त्या ओळखायला शिक. जंगलातले हे सोने गोळा कर. मोळीपेक्षा या साऱ्याचे मूल्य निश्चितच अधिक आहे.’

वन देवतेच्या बोलण्याने शंकरचे डोळे उघडले. त्याने कुऱ्हाडीचा नाद सोडला. वनदेवतेच्या सल्ल्यानुसार त्याने जंगलातील खरे सोने गोळा करायला सुरुवात केली. वडिलोपार्जित वहिवाटीच्या जागेतील जंगलपट्टा तो राखू लागला. त्यातून त्याला पहिल्यापेक्षा किती तरी अधिक उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे त्याच्या हाती चार पैसे अधिक खुळखुळू लागले. तोडण्यापेक्षा, जोडण्यात अधिक हित आहे, हे त्याला स्वानुभवाने पटले. वनदेवतेने त्याच्या आजोबांना सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडी दिल्या होत्या. मात्र त्यापेक्षा अधिक मौल्यवान भेट वनदेवतेने त्याला दिली होती. योग्य सल्ला देऊन त्याला सन्मार्गावर आणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:04 am

Web Title: logger and forest goddess
Next Stories
1 सुट्टी विशेषांक : कोण मी होणार..?
2 सुट्टी विशेषांक : करा जादू
3 तरल सुरांचा तारा
Just Now!
X