दरवर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव आला आणि निर्विघ्नपणे पार पडला. भाविकांसाठी त्यांच्या भक्तीभावाचं प्रकटीकरण म्हणून गणेशोत्सव महत्त्वाचा असतो तसाच समाजातल्या जाणत्या, संवेदनशील व्यक्तीसाठी तो वेगळ्या कारणाने महत्त्वाचा असतो. ते कारण म्हणजे ‘लोकसत्ता’ पुरस्कृत ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम.

हा उपक्रम नेमका काय आहे, हे आता वाचकांना खरंतर नीट माहीत आहे. समाजात होत असलेल्या भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचारांमुळे एक प्रकारचे निराशेचे वातावरण तयार होत असते. लहरी मान्सूनवर सगळी अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या आपल्या देशात अपुरा किंवा अती पाऊस अनेक समस्या निर्माण करतो. याशिवाय दहशतवादाचे सावट सातत्याने आहेच. जातीधर्माच्या वादांमुळे समाजात कधी कधी काही प्रमाणात तेढ निर्माण होताना दिसते. एकीकडे स्त्रियांचं सक्षमीकरण होत असलं तरी दुसरीकडे स्त्रियांवरील अत्याचारांनी उग्र स्वरूप धारण केलेलं आहे. या देशात काहीच चांगलं घडू शकत नाही, असा विचार करत इतला बुद्धिमान तरुण मोठय़ा संख्येने देशाबाहेर जाताना दिसतो आहे. असं सगळं असलं, काहीसे निराशेचे सूर उमटत असले, तरी या वातावरणाला दिलाशाची किनारदेखील आहे. सगळंच संपलेलं आहे आणि आता काही घडूच शकत नाही, असं नाही. समाजात विधायक कार्याचा वसा घेऊन अनेक व्यक्ती-संस्था निरपेक्षपणे समाजमन घडविण्याच्या कार्यात गुंतल्या आहेत.  समाजाचा आधार बनण्यासाठी धडपडणाऱ्या या संस्थांना समाजाकडूनही आधाराची गरज आहे. आपण उठून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी काही करू शकत नसलो तरी ते करणाऱ्यांना हातभार लावायची, त्यांच्या पाठीशी जमेल तेवढी आर्थिक ताकद उभी करायची अनेकांची इच्छा असते. पण कुठेतरी जाऊन काहीतरी करणं त्यांना खरोखरच शक्य नसतं. त्यांची ही सत्कार्याची इच्छा आणि या संस्थांची गरज यांची सांगड घालण्यासाठी ‘लोकसत्ता’ हे व्यासपीठ आहे.

‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून या संस्थांची एक विधायक साखळी ‘लोकसत्ता’ने बांधली आहे. या वार्षिक दानयज्ञाची  आवृत्ती दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही सादर झाली.

वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक जाणिवेने काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख या उपक्रमातून लाखो वाचकांना झाली. या सत्कार्यात सहभागी होण्याची अनेकांची अतीव इच्छा असते. मात्र, व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा अन्य अनेक कारणांमुळे त्यामध्ये थेट सहभाग शक्य होत नाही. अशा वेळी, कुणी तरी आपल्या मनातल्याच कामात झोकून दिल्याची माहिती मिळते, आणि त्यामध्ये सहभागी होण्याच्या इच्छापूर्तीचा क्षण जवळ येतो. त्यासाठी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून यंदा गणेशोत्सवकाळात दहा संस्थांचा परिचय करून दिला गेला.

दरवर्षांप्रमाणे यंदाही या संस्थांना लोकसत्ता परिवार व हितचिंतकांकडून मोलाचा आर्थिक हातभार लागेल आणि हीच समाजातील दुख, विघ्ने दूर करणाऱ्या विनायकाची खरी आराधना ठरेल!

ग्रंथोत्तेजनाचा वसा!

चिन्मय पाटणकर

महाराष्ट्राला थोर सुधारक, लेखक, अभ्यासकांची मोठी परंपरा आहे. न्या. महादेव गोिवद रानडे हे त्यातलेच एक महत्त्वाचे नाव. आजची महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था रानडे यांच्याच आग्रहाने स्थापन झालेली संस्था. ती गेल्या १२४ वर्षांपासून कार्यरत आहे.

मराठी भाषेचा प्रचार करणे, इंग्रजी, संस्कृतादी भाषांमधील उपयुक्त पुस्तकांची भाषांतरे करणे आणि करून घेणे, महाराष्ट्रात विद्यावृद्धीसाठी सर्व प्रकारचे उत्तेजन देणे आणि नवीन उपयुक्त पुस्तकांसाठी यथाशक्ती मदत करणे या हेतूने न्या. महादेव गोिवद रानडे यांच्या पुढाकारातून डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना झाली.  १८९५ मध्ये सरकारच्या ‘दक्षिणा प्राइज कमिटी’चे काम संस्थेकडे आले. १९४८ मध्ये संस्थेचे इंग्रजी नाव बदलून महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असे मराठी नामकरण करावे, असा ठराव संस्थेने मंजूर केला. १८९६च्या सुमारास न्या. रानडे आणि न्या. तेलंग यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने पेशवे दप्तर अभ्यासकांसाठी खुले केले. डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटीच्या वतीने इतिहासकार द. ब. पारसनीस आणि रा. ब. वाड यांनी पेशवे दप्तरातील ५० हजार कागदपत्रे निवडून पेशवे रोजनिशीचे नऊ खंड प्रसिद्ध केले.

ग्रंथपुरस्कारांबरोबरच ग्रंथनिर्मितीलाही प्रोत्साहन द्यावे, या विचारातून ग्रंथनिर्मितीसाठी ग्रंथकारांना पूर्णत: किंवा अंशत: निर्मितीखर्च देण्यास सुरुवात केली. मात्र, तो अनुभव प्रोत्साहक नव्हता. जमाखर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड झाल्याने संस्थेने तो प्रयोग बंद केला. काही वर्षांनी पुन्हा नूतन भारतवर्ष हे मासिक सुरू केले. मात्र, तो प्रयत्नही अल्पजीवीच ठरला. त्यानंतर संस्थेने पुन्हा प्रकाशनाचे प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल, संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या उषा रानडे लिखित एका शतकाची वाटचाल आणि श्री. ना. चाफेकर यांचे भाषापत्र हे तीन ग्रंथ प्रकाशित केले.

संस्थेकडे हजारो मौलिक  ग्रंथ आहेत. त्यात पेशव्यांची रोजनिशी आहेत. त्यात त्या वेळचा जमाखर्च आहे. ग्रंथपरीक्षांची परंपरा मराठीत सुरू झाल्याचा शोध संस्थेकडे असलेल्या ग्रंथपरीक्षणांतून घेता येऊ शकतो. न्या. रानडे यांचा पत्रव्यवहारही संस्थेने जतन केला आहे. विविध विषयांवरील ३० अभ्यासपूर्ण प्रबंधांची हस्तलिखिते, शंभर वर्षांपूर्वीचे हस्तलिखित ग्रंथ, जुन्या पोथ्याही आहेत. ज्ञानप्रसारासाठी ह. ना. आपटे आणि द. ब. पासरनीस यांनी १८९५ मध्ये सुरू केलेल्या भारतवर्ष या मासिकाचे अंकही संस्थेच्या संग्रही आहेत. संस्थेकडे पारितोषिकांसाठी आलेल्या पुस्तकांचा ठेवा आहे. जवळपास ३२ प्रकारचे कोश आहेत.

संस्थेकडे जवळपास ३० लाखांच्या ठेवी आहेत. मात्र, त्यातून वार्षिक ग्रंथ पुरस्कार आणि दैनंदिन कामकाजाचा खर्च जेमतेम भागतो. निधीची चणचण असल्याने वेगळे उपक्रम राबविण्यावर मर्यादा येतात. राज्य सरकारने संस्थेला १९७७ मध्ये पौड रस्त्यावरील वेदभवनजवळ दहा गुंठे जागा दिली. तिथे दक्षिणा भवन उभारण्याचा संकल्प आहे. या संस्थेला नव्या इमारतीची गरज आहे. सरकारकडून जागा मिळून दहा वष्रे उलटून गेली, तरी निधीचीअभावी इमारत बांधता आलेली नाही. अलीकडेच एका बांधकाम व्यावसायिकाच्या सहकार्याने इमारतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या ग्रंथसंपदेसाठी सध्याची जागा अपुरी आहे. दुर्मीळ पुस्तकांची जपणूक होण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन होणे अत्यावश्यक आहे. संस्थेतील ग्रंथांचे महत्त्व ओळखून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) एक हजार पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याच्या खर्चाची जबाबदारी एमकेसीएलनेच उचलली आहे. आतापर्यंत काही ग्रंथांच्या डिजिटायझेशनचे काम झाले आहे. तसेच बंगळुरुच्या सेंटर फॉर इंटरनेट अ‍ॅण्ड सोसायटी या संस्थेबरोबर करार झाला आहे. या कराराद्वारे संस्थेतील स्वामित्व हक्क मुक्त झालेली निवडक पुस्तके आणि ग्रंथ मराठी विकिपिडियावर उपलब्ध केली जाणार आहेत. अलीकडेच राज्य सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेकडून संस्थेला पाच लाखांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. मात्र संस्थेच्या कामाचा एकूण आवाका पाहता हा निधीही पुरेसा ठरणार नाही.

ऑक्टोबर २०१८ मध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने संस्थापक न्या. रानडे अध्यासन सुरू करून त्याद्वारे रानडे यांचे लेखन, त्यांच्यावरील लेखन यावर समीक्षात्मक बहुखंडी ग्रंथ प्रकल्पाची कल्पना आहे.

न्या. रानडे यांचे कार्य, व्यक्तित्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपट निर्माण करण्याचा संस्थेचा विचार आहे.

आदिवासी बोली आणि संस्कृतीच्या जतन, संवर्धनाचा प्रकल्पही करण्याची योजना आहे.

मराठीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध कोशांचा अभ्यास करून कोशांचा कोश तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

पुण्यातील मध्यवर्ती सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधर मंदिराकडून बाजीराव रस्त्याकडे जाताना डाव्या बाजूला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जवळच्या इमारतीत महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यालय आहे.

आश्वासक ‘सोबती’

प्रशांत मोरे

विशेष मुलांच्यां प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे कुणा एकटय़ा- दुकटय़ाचे काम नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, याची जाणीव झालेल्या विशेष मुलांच्या पालकांनी २००४ मध्ये ‘सोबती पालक संघटना’ स्थापन केली. आपल्या प्रश्नाला उत्तरही आपणच शोधले पाहिजे, म्हणून ‘सोबती’ परिवारातील पालकांनी वाडा तालुक्यात निवासी संकुल साकारले आहे.

‘सोबती’तील पालकांपुढे दुहेरी आव्हान आहे. या परिवारात दृष्टिहीन, स्वमग्नता, कर्णबधिरत्व, मतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात) आदी व्याधी असलेली मुले आहेत. नोकरी-व्यवसाय सांभाळून या विशेष मुलांचे उपचार, थेरेपी, प्रशिक्षण, त्यांच्यासाठी असलेल्या विशेष शाळांचा शोध यात पालकांची दमछाक होऊ  लागली. अंधांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय संघटनेने (नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड-नॅब) अशा पालकांना पहिल्यांदा मदतीचा हात दिला. ‘नॅब’चे प्रशिक्षित स्वयंसेवक अशा मुलांच्या घरी जातात आणि विशेष मुलगा अथवा मुलीला प्रशिक्षण देतात. या मुला-मुलींना किमान त्यांची कामे त्यांना करता यावीत, ती स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरते.

विशेष मुलांसाठीची शाळा किंवा प्रशिक्षण सत्रे ही वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंतच असतात. नंतर मुलाची काळजी त्या कुटुंबालाच घ्यावी लागते. अशी समस्या भेडसावणाऱ्या कुटुंबांनी एकत्र आले पाहिजे, या विचारातून ‘सोबती’चा जन्म झाला.

२००४ मध्ये ‘सोबती पेरेंट्स असोसिएशन’ची अधिकृत नोंदणी झाली. सध्या ‘सोबती’ संस्थेत मुंबई-ठाणे परिसरातील १२० पालक सभासद आहेत. २००७ मध्ये ठाण्यात एका विश्वस्त संस्थेच्या जागेत १०-१२ वर्षांवरील मुला-मुलींसाठी ‘सोबती’ने व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नेमले. त्यांच्याकडे मुले-मुली आपापल्या क्षमतेनुसार मणी ओवणे, कुटून मसाले बनविणे, वजन करणे, पॅकिंग करणे, घरघंटी चालविणे अशी कामे शिकली.

अल्पावधीतच ‘सोबती’च्या या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची कीर्ती पसरली. पार्किन्सन्स इंटरनॅशनल या अमेरिकेतील संस्थेने ‘सोबती’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ‘सोबती’ सदस्यांच्या सोयीसाठी अंधेरी इथे दुसरे केंद्र सुरू करण्यासाठी सक्रिय मदत केली. ठाणे आणि अंधेरी येथील दोन केंद्रे हा ‘सोबती’च्या प्रवासाचा एक टप्पा होता. त्यानंतर पालकांना पुढील आव्हानेही दिसू लागली होती. मुले मोठी होत होती. कायमस्वरूपी निवासी पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. माजी आमदार विवेक पंडित यांनी वाडा तालुक्यातील तिळसा येथील त्यांच्या मालकीची पाऊण एकर जमीन संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यानंतर वास्तू उभारण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी निधी संकलनाचे प्रयत्न सुरू केले. दोन-अडीच वर्षांच्या अथक परिश्रमातून १३ हजार ५०० चौरस फुटांची देखणी आणि सुसज्ज वास्तू सध्या तिळसा इथे उभी राहिली आहे. या केंद्रात ५० विशेष मुले-मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. गेल्या जून महिन्यापासून ‘सोबती’चे हे निवासी केंद्र सुरू झाले. केंद्रात मुले सोमवारी सकाळी येतात आणि शुक्रवारी दुपारी घरी परत जातात. मुले आणि प्रशिक्षकांच्या सोयीसाठी बस सुविधा आहे. ‘तिळसा’ केंद्र अतिशय अद्ययावत आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती, कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून इमारतीला पर्यावरणस्नेही दर्जा देण्यात आला आहे.

या निवासी केंद्रात सध्या १२ मुले वास्तव्यास असून सहा प्रशिक्षक कायमस्वरूपी त्यांच्यासोबत असतात. लवकरच निवासी केंद्रात मुलांची संख्या वाढणार असून त्यांच्यासाठी आणखी प्रशिक्षक नेमावे लागणार आहेत. या केंद्रात मुलांना तज्ज्ञ प्रशिक्षक विविध प्रकारची कौशल्ये शिकवितात. मोत्यांचे आणि मण्यांचे दागिने बनविणे, मोत्याची तोरणे, राख्या, दिवाळीतील शोभेचे दिवे, चहा मसाला, मुखवास, नैसर्गिक तेलापासून साबण बनविणे, मेणबत्त्या बनविणे, कागदी पिशव्या आदींचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. ‘सोबती’ परिवारातील पालक, हितचिंतक या वस्तूंची ठिकठिकाणी प्रदर्शने भरवून विक्री करतात.

विशेष मुलांची देखभाल आणि उपचारांचा ग्रामीण भागात अभाव आहे. त्यामुळे तिळसा केंद्रात वाडा तालुक्यातील विशेष मुलांसाठी प्रशिक्षण, उपचार केंद्र सुरू करण्याची ‘सोबती’ची योजना आहे.

‘सोबती’ला तज्ज्ञ प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी यांचे वेतन, दैनंदिन खर्च आणि देखभाल दुरुस्ती यासाठी दरमहा अडीच लाख रुपये खर्च येतो. काही पालक आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कमी वर्गणी घेतली जाते. त्यामुळे उर्वरित खर्च देणगीदारांच्या मदतीतूनच भागविला जातो. विशेष मुलांच्या पालकांनी अखंड परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर एक उत्तम पुनर्वसन केंद्र उभारले. मात्र, त्याच्या व्यवस्थापनासाठी दानशूरांकडून मदतीची गरज आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? सोबती पेरेंट्स असोसिएशन

पालघर जिल्ह्य़ातील वाडा या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ठाण्याहून दर अध्र्या तासाने एसटी बस सेवा उपलब्ध आहे. तिथून सात किलोमीटर अंतरावर तिळसा इथे ‘सोबती’ची निवासी वास्तू असून तिथे जाण्यासाठी सहा आसनी रिक्षांची सेवा उपलब्ध आहे.

स्वरसंचिताचे उपासक!

विद्याधर कुलकर्णी

सोलापूरमध्ये अभिजात संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमुळे युवा कलाकारांना शास्त्रीय संगीताविषयी गोडी वाटू लागली. ही बाब ध्यानात घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाने २००७ मध्ये संगीत संग्रहालय सुरू केले. त्यासाठी ज्येष्ठ संगीत अभ्यासक आणि मर्मज्ञ रसिक प्रा. श्रीराम पुजारी यांची प्रेरणा कारणीभूत ठरली. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’ असे या संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले.

स्वातंत्र्यपूर्व काळात १८५३ मध्ये श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाची स्थापना झाली. १६६ व्या वर्षांत पदार्पण केलेल्या वाचनालयाचा जुळे सोलापूर भागात विस्तारित कक्ष कार्यरत आहे. वाचनालयाच्या प्रा. श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयामध्ये शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, गज़्‍ाल, ठुमरी, भक्तिगीते, भावगीते, नाटय़संगीत असा विविध गानप्रकारांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला आहे. ग्रामोफोन रेकॉर्ड्स, ध्वनिफिती म्हणजेच कॅसेट्स, कॉम्पॅक्ट डिस्क (सीडी), व्हिडीओ कॉम्पॅक्ट डिस्क (व्हीसीडी) अशा विविध माध्यमांतून हा संग्रह उपलब्ध आहे. ज्येष्ठ गायक पं. प्रभुदेव सरदार यांच्या गायनाच्या ७५ कॅसेट्स असून ठुमरी आणि दादरा गायन प्रकाराच्या ८० रेकॉर्ड्स आणि तीनशे सीडी उपलब्ध आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये कंठसंगीत, वाद्यसंगीत मिळून ६५० रेकॉर्ड्स आहेत. गज़्‍ाल गायनाच्या ४० रेकॉर्ड्स, नाटय़संगीताच्या ५५ रेकॉर्ड्स आणि अभंगांच्या ४५ रेकॉर्ड्स आहेत. संग्रहालयाने संगणकावर १२०० जीबी संगीताचे जतन करून ठेवले आहे.

‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’ या जुन्या आणि दुर्मीळ संगीताचे जतन करणाऱ्या संस्थेची शाखा जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी यांनी सोलापूरमध्ये सुरू केली. या संस्थेमार्फत १९७२ पासून दोघेही आपल्या स्तरावर रेकॉर्ड्स संकलित करण्याचे काम करत होते. त्यांनी ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’ सोलापूर शाखेतर्फे १९९२ पासून नियमितपणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली.

हिराचंद नेमचंद वाचनालयाची नवी वास्तू १९९४ मध्ये साकारली गेली. त्या वेळी राळेरासकर आणि सोहनी यांनी आपल्या संग्रहातील रेकॉर्ड्स संस्थेला देत या वास्तूमध्ये संगीत संग्रहालय सुरू करण्याची संकल्पना मांडली. संस्थेच्या प्रमुखपदी असलेले डॉ. श्रीराम पुजारी यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि स्वतंत्र जागा निश्चित करून संगीत संग्रहालय सुरू करण्यात आले. पुजारी यांनी त्यांच्या संग्रहातील दिग्गज गायक कलाकारांच्या सुमारे तीनशे मैफलींच्या ध्वनिमुद्रणाचा संग्रह भेट स्वरूपात दिला. संग्रहालय सुरू झाल्याचे समजताच अनेक संगीतप्रेमी रसिकांनी आपल्या व्यक्तिगत संग्रहातील रेकॉर्ड्स संग्रहालयाला भेट दिल्या. या विषयातील डॉ. पुजारी यांचे योगदान ध्यानात घेऊन संगीत संग्रहालयाचे ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’ असे नामकरण करण्यात आले. एल. पी. (लाँग प्ले) रेकॉर्ड्स, ई. पी. (एक्स्टेंडेड प्ले) रेकॉर्ड्स, एकाच बाजूला ध्वनिमुद्रण असलेल्या वन सायडेड रेकॉर्ड्स, ध्वनिफिती म्हणजेच कॅसेट, सीडी आणि पेन ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या स्वरूपांतील संगीत संग्रह येथे पाहावयास मिळतो. वन सायडेड रेकॉर्ड स्वरूपात गौहरजान यांच्या आवाजातील पाच रेकॉर्ड्स आहेत.

संग्रहालयातील दुर्मीळ संगीत श्रोत्यांना ऐकविण्यासाठी दरमहा किमान एक कार्यक्रम आयोजित केला जातो. ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेल्या हिंदूी चित्रपटगीतांची चित्रफीत दाखविण्याबरोबरच साहिर लुधियानवी यांच्या गीतांवर आधारित दृक्-श्राव्य कार्यक्रम आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांवर आधारित कार्यक्रम असे कार्यक्रम संगीत संग्रहालयामध्ये सादर करण्यात आले. ध्वनिमुद्रित स्वरूपात असलेल्या संगीताच्या अमूल्य ठेव्याचे डिजिटायझेशन करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. ग्रामोफोन दुरुस्त करणारा एकमेव कारागीर सोलापूरमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामोफोन बिघडल्यानंतर त्यांना  बोलावले जाते. सीडी आणि व्हीसीडीच्या जमान्यात कॅसेट्स कालबाह्य़ झाल्या आहेत. त्यामुळे कॅसेटमधील बरेचसे ध्वनिमुद्रण सीडी माध्यमात नेऊन ठेवले आहे. त्याचप्रमाणे संस्थेने दीड हजार जीबी एवढय़ा क्षमतेचे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे. संगीताचे विद्यार्थी, अभ्यासक आणि रसिकांसाठी हा संग्रह खुला  आहे.

या संगीत संग्रहालयात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, गज़्‍ाल, ठुमरी, भक्तिगीते, भावगीते, नाटय़संगीत अशा गानप्रकारांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला आहे. रसिकांना दुर्मीळ संगीताचा श्रवणानंद देतानाच या संगीतठेव्याचे डिजिटायझेशन करण्याचा संकल्प आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय

सोलापूर एसटी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रिक्षाने अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर. सोलापूर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापासून रिक्षाने दहा मिनिटांच्या अंतरावर.

वन्यजीवांचे ‘माहेरघर’!

वसंत मुंडे

बीड जिल्ह्यच्या शिरुर तालुक्यातील तागडगावचा डोंगरपट्टा तसा दुष्काळी भाग. या माळरानावरचा सुमारे १५  एकर  परिसर आहे सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पाचा. गेली १५ वर्षे येथे राहणाऱ्या सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे या दोन वन्यजीवप्रेमींनी दहा हजारांहून अधिक पशू-पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत. ‘वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड सॅंक्च्युअरी असोसिएशन’ च्या माध्यमातून सुरू झालेल्या या कामाला आता गती मिळू लागली आहे. सोनवणे दाम्पत्य येथे जखमी, आजारी वन्यजीवांवर उपचार करते, त्यांना मायेचा आधार देते आणि बरे झाले की त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात म्हणजे जंगलात सोडून देतात.

सिद्धार्थ सोनवणे हा शिरुर तालुक्यातला तरुण. सृष्टी त्याची बालपणीची मत्रीण आणि आता पत्नी. दोघांनीही स्वत:ला वन्यजीवांच्या सेवेसाठी वाहून घेतले. औषध न पिणाऱ्या लेकराला कडेवर घेऊन जसे आंजारले-गोंजारले जाते, तसेच अनेक जखमी प्राण्यांना इथे प्रेम दिले जाते. एखादे आजारी लेकरू जपल्यासारखे सारे. कधी नागरिकांच्या मदतीने, कधी दोघेच हे काम करतात. सिद्धार्थ सोनवणेची तागडगावला १७ एकर जमीन आहे. त्यातील चार एकर जमीन ते कसतात. बाकी सगळी जमीन वन्यजीवांसाठी.

सर्पराज्ञी प्रकल्पाचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. या मार्गात अनेक अडचणी आल्या, आपण हे सारे का करतोय, असे वाटावे असे प्रसंगही घडले. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर परिसरातील बेकायदा शिकारीवर नियंत्रण आले, यामुळे काही हितसंबंधी लोक दुखावले गेले. या प्रकल्पाच्या पाणीपुरवठय़ाला अडचणी आल्या. पण तरीही माहेरात आल्यावर जसे आईला न बोलता लेकीच्या वेदना कळतात, अगदी तसेच वन्यजीवांच्या केवळ शरीराकडे पाहून या जीवाचे दुखणे काय हे सिद्धार्थ आणि सृष्टीला कळते आणि मग सुरू होतो उपचाराचा, थकलेल्या जीवांना नवे बळ देण्याचा प्रवास. जखम साफ करणे, औषध देणे, पशुवैद्यकीय तज्ज्ञाला भेटणे आणि असे बरेच काही. या सर्व प्रकारात धोके नसतात असे नाही, वन्यजीव काही एका क्षणात आपलेसे होत नसतात. त्यांच्या कलाने वागत त्यांना बरे करण्याचे काम सर्पराज्ञी प्रकल्पात होते. प्रत्येक वन्यजीवाच्या रचनेनुसार कुठे िपजरा, कुठे मोकळी जागा, कुठे झाडाच्या फांद्या वापरून केलेला झोका असे बरेच काही करावे लागते.

वन्यप्राण्याला खायला घालण्याची मेहनत वेगळीच. अजगराला दिवसाला किमान एक कोंबडी तरी लागते. त्यासाठी काही व्यक्तींकडे मदत मागितली जाते. आजारपणाच्या काळातला एखादा प्राणी दत्तक घ्या, अशी विनंती सिद्धार्थ करतो आणि मग एखाद्या प्राण्याचा खर्च भागतो. २०१२च्या दुष्काळात प्राण्यांना खायला काय द्यायचे, असा प्रश्न यायचा. मानवलोकच्या द्वारकादास लोहिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहा क्विंटल धान्य दिले होते.  गेल्या वर्षीही हा प्रश्न निर्माण आला होता. तेव्हा शिरुरच्या हमालांनी सांगितले, काळजी करू नका, आम्ही धान्य देऊ. २० क्विंटल धान्य हमालांनी एकत्रित केले आणि सिद्धार्थ आणि सृष्टीच्या या प्रकल्पाला दिले.

बाप्पा कानडे नावाच्या हमाली करणाऱ्या गृहस्थाने दाखवलेली भूतदया अद्भूत होती. या प्राण्यांना लागणाऱ्या औषधांसाठी स्वामी विवेकानंद शास्त्री हेदेखील मदत करतात. शिरुरच्या सिद्धेश्वर संस्थानाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सिद्धार्थ सांगतो. दरवर्षी मूठभर धान्य प्राण्यांसाठी व एक रुपया पाण्यासाठी असे ब्रीद ठरवून सिद्धार्थ अनेकांकडे मदत मागतो. ती काही वेळा दिली जाते, काही वेळा शेतीतून आलेल्या उत्पन्नाचा भागही खर्च होऊन जातो. आता वन्यजीवांचे अधिवास, प्रजननाचा कालावधी, वन्यप्राण्यांत दिसणारी आजाराची लक्षणे सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे यांना अनुभवाने माहीत झाली आहेत. पण प्रकल्पासाठी अजूनही अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. हा पट्टा दुष्काळी आहे आणि भोवताली पाणीच नसते. त्यामुळे एखादी विहीर करता आली तर बरे होईल, असा त्यांचा विचार आहे. शिवाय निसर्ग शिक्षण केंद्र उभारण्याचा विचार आहे.

सर्पराज्ञी प्रकल्पात रोज एक तरी जखमी किंवा आजारी वन्यप्राणी उपचारासाठी दाखल होतो. या वन्यजीवांवर योग्य उपचार करण्यासाठी, त्यांना ठेवण्यासाठी शेडची गरज आहे.

या प्रकल्पाला विहीर हवी आहे.

ल्ल सहा एकर मोकळ्या जागेत चारही बाजूंनी तारेचे कंपाउंड असण्याची गरज आहे. त्यामुळे जखमी, आजारी वन्यजीवांना तिथे हिंडता-फिरता येईल.

वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी व झाडांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २५ हजार लिटर क्षमता असलेली सिमेंट टाकी असणे गरजेचे आहे.

निसर्ग, वन्यजीवांविषयी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी व समाजात निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी निसर्ग शिक्षण केंद्र उभारण्याचा सोनवणे दाम्पत्याचा विचार आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प

बीड -खालापुरीमाग्रे शिरुरकडे जाताना पाडळीजवळून जाता येते. मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटरवर हा प्रकल्प आहे. अहमदनगर – पाथर्डी- शिरुर -पाडळी हादेखील पर्यायी मार्ग आहे.

विज्ञानसंस्काराची शाळा

सतीश कामत

शाळकरी मुलांवर आधुनिक विज्ञानाचे संस्कार घडविणाऱ्या वसुंधरा विज्ञान केंद्राचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी नाईक ऊर्फ ‘सीबी’ बाबा आमटेंनी १९८५ मध्ये केलेल्या ‘भारत जोडो’ अभियानामध्ये सहभागी होते. त्यात  देशाच्या सामाजिक-आर्थिक गुंतागुंतीचे विराट दर्शन सीबींना घडले. अज्ञान आणि अंधश्रद्धांच्या उच्चाटनाशिवाय आपल्या समाजाचा चिरस्थायी विकास अशक्य आहे, हे प्रकर्षांने जाणवले आणि इथेच कुठे तरी भविष्यातल्या कार्याचे बीज पेरले गेले. १९९५ मध्ये एक दिवस साधनाताई-बाबांचे पत्र आले. मग सीबींनी फार पुढचा-मागचा विचार न करता दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. दोन वर्षांनी पत्नीनेही शाळेतली शिक्षिकेची नोकरी सोडली आणि दोघांनीही कुडाळ तालुक्यातल्या नेरूरची वाट धरली.

मुंबईत असताना मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून राजीव वर्तक या समविचारी व्यक्तीशी सीबींचा परिचय झाला होता. त्यांच्याशी या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या ग्रामीण भागात विज्ञानप्रसाराचे काम करायचे ठरवले. त्यापूर्वी  खेडोपाडी पसरलेल्या अनेक शाळांना भेट देऊन तेथील शैक्षणिक परिस्थितीची पाहणी केली. बहुसंख्य शाळांमध्ये विज्ञानाचे मूलभूत धडे देण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा तर नव्हत्याच, पण त्यासाठी लागणारी उपकरणेही नव्हती. सीबींचा विचार आणखी पक्का झाला. ‘वसुंधरा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात घरातूनच वसुंधरा वैज्ञानिक केंद्राच्या कामाला प्रारंभ झाला. मग एका बँकेने फिरत्या प्रयोगशाळेसाठी गाडी दिली. त्या गाडीतून ‘सायन्स ऑन व्हील’ची कल्पना साकार करत सीबी आणि वर्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या दुर्गम भागात जाऊन तिथल्या शाळकरी मुलांना छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग दाखवू लागले.

गावातच सरकारी आरक्षण पडलेली साडेचार एकर जागा ग्रामपंचायतीकडून ९९ वर्षांच्या कराराने संस्थेला ही जागा देण्यात आली. या विस्तीर्ण जागेवर बहुपयोगी विज्ञान केंद्राची उभारणी करण्यासाठी कल्पकतेबरोबरच मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता होती. सीबींची कामावरची निष्ठा आणि बाबा आमटेंच्या सान्निध्यात असताना झालेला लोकसंग्रह इथे कामी आला. बघता बघता ३०-४० लाख रुपये गोळा झाले. मग ही रक्कम सव्वा कोटीपर्यंत गेली. सध्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पायाभरणी झाली आणि थोडय़ाच काळात वसुंधरा केंद्राची टुमदार वास्तू उभी राहिली. संस्थेच्या प्रयोगशाळेत विज्ञानाची मूलभूत तत्त्वं, शालेय विद्यार्थ्यांना सहज करता येतील अशा प्रयोगांमधून समजावून सांगितली जातात. या सभागृहाला ‘युरेका हॉल’ असे समर्पक नाव दिलेले आहे. दूरवरचे विद्यार्थी इथे येतात. याचबरोबर भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. इथल्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’बरोबरच थ्री डी ध्वनिचित्रफिती पाहण्यासाठी निर्माण केलेले मिनी थिएटर प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगे. शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग, शिबिरे, अवकाश दर्शन, शैक्षणिक खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञानाशी मैत्री असे विविध उपक्रम राबवले जातात. मोकळ्या जागेत उभारलेले डॉ. होमी भाभा सायन्स पार्क, फुलपाखरांचे उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, फिरत्या प्रयोगशाळेबरोबरच फिरते वाचनालय, हे आणखी काही वेगळे उपक्रम ‘वसुंधरा’तर्फे राबवले जातात.

मराठी विज्ञान परिषदेच्या ५२ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या यजमानपदाची जबाबदारी ‘वसुंधरा’ने गेल्या वर्षी स्वीकारली आणि यशस्वीही केली. त्या निमित्ताने इथे आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. पी. एस. देवधर इत्यादींनी ‘वसुंधरा’ंची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

केंद्राला आणखी एका फिरत्या प्रयोगशाळेची गरज आहे. ‘वसुंधरा’च्या आवारातही कायमस्वरूपी सुसज्ज प्रयोगशाळा उभी करायची आहे. शक्य झाले तर तारांगणाचेही भव्य स्वप्न साकारायचे आहे.  एकविसाव्या शतकाची दोन दशके संपत आली आहेत आणि प्रगत ज्ञान-विज्ञानाची कास धरणाऱ्याच समाजाची या पुढच्या काळात सरशी होणार आहे. अशा वेळी कोकणातल्या आडगावातून विज्ञानेश्वरीच्या या वारकऱ्यांनी सुरू केलेल्या दिंडीमध्ये सर्वानीच सहभागी व्हायला हवे.

‘वसुंधरा’मध्ये मार्गदर्शन घेतलेल्या ५४ मुलांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध किंवा तत्सम परीक्षेपर्यंत मजल मारली. तसेच होमी भाभा बालवैज्ञानिक स्पध्रेत आत्तापर्यंत तीन सुवर्ण आणि तब्बल १८ रौप्य पदके पटकावली आहेत. दोन विद्यार्थी ‘राष्ट्रीय बालवैज्ञानिक’ या किताबाचे मानकरी ठरले आहेत.  २०१५ मध्ये ‘वसुंधरा’ला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग, महिला व युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण वर्ग, आरोग्यविषयक सल्ला, देवराया आणि जैवविधतेचा अभ्यास इत्यादी उपक्रमही आहेत.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? वसुंधरा विज्ञान केंद्र

मुंबई-गोवा महामार्गावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यत कुडाळ येथे शहरात जाण्यासाठी वळल्यानंतर सुमारे ८ किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर ‘वसुंधरा’ची टुमदार इमारत आहे.

वंचितांचे ज्ञानमंदिर

एजाजहुसेन मुजावर

समाजात सर्वाधिक वंचित राहिलेल्या भटक्या जमातीच्या निराश्रित, अनाथ, वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विनया आणि महेश निंबाळकर हे दाम्पत्य सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे स्नेहग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून निवासी शाळा चालवत आहे. स्थलांतरित व शहरात  रस्त्यांवर भीक मागणारी शाळाबाह्य़ मुले, अनाथ, निराधार, वंचित व संघर्षग्रस्त मुले, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुले, दुर्लक्षित भटक्या जाती-जमातींची मुले अशांना निंबाळकर दाम्पत्याने एकाच छताखाली आणून औपचारिक शिक्षणासह कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे व्रत स्वीकारले आहे.

माढा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस जाता-येता महेश िनबाळकर यांना बार्शी परिसरात भटक्या जमातीच्या पालांवर राहणाऱ्या या वंचित, उपेक्षित कुटुंबांचे चित्र पाहून ते अस्वस्थ होत होते. निंबाळकर यांनी एके दिवशी पालांवर जाऊन डवरी गोसावी कुटुंबीयांची भेट घेतली. तेथील भटक्या मुलांना जवळच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविण्याची सूचना केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ही मुले जवळच्या शाळेत जाऊ लागली.

दुसरीकडे निंबाळकर यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी पालांवर जाऊन मुलांची शिकवणी घेण्यास सुरूवात केली. यात त्यांनी जवळच्या शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली. सुरुवातीला अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यानंतर शिकवण्याच्या पध्दतीत केलेल्या बदलानंतर मुलांमध्ये प्रगती दिसून आली. या वंचित मुलांची बार्शीतील भगवंत विद्यालयात शिक्षणाची सोय केली. अनौपचारिक शिक्षणानंतर अपौचारिक शिक्षणाचे पुढचे पाऊल आरंभले गेले. त्यासाठी पर्याय म्हणून निवासी शाळा सुरू करण्याबाबत महेश यांनी विचार सुरू केला. २०१४ मध्ये त्यांनी शासनाकडे निवासी शाळेचा प्रस्ताव सादर केला व जून २०१५ मध्ये खांडवी येथे पहिल्यांदा निवासी शाळा सुरू झाली. परंतु वर्षभरातच दुप्पट भाडेवाढीमुळे स्थलांतरित होण्याची वेळ आली. एव्हाना, घरच्यांचा विरोध झुगारून महेश निंबाळकरांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला. पत्नी विनया यांनाही जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षकपदाची नोकरी चालून आली होती. परंतु, मागचा-पुढचा विचार न करता तिने नोकरीकडे पाठ फिरवत पतीला साथ दिली.

विनया हिने महेश यांना अंगावरचे सोन्याचे दागिने काढून दिले. त्यातूनच कोरफळे येथे माळरानावरील तीन एकर जमीन खरेदी केली आणि निवासी शाळेसाठी स्नेहग्राम प्रकल्पाला सुरुवात झाली.  २५ मे २०१७ रोजी अजित फाउंडेशनच्या माध्यमातून स्वयंअर्थसाहाय्यित शाळा म्हणून स्नेहग्राम विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘आनंदवन’चे विश्वस्त तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे व आनंदवन समाजभान अभियानाचे प्रमुख कौस्तुभ आमटे यांच्याकडून शाळेसाठी पाच टीनशेड, अ‍ॅम्ब्युलन्स, भांडी, एक महिन्याचा किराणा माल,  जनरेटर, गणवेश व चादरी अशी भरघोस मदत मिळाली. याशिवाय कीर्ती ओसवाल (पुणे), आयएएस अधिकारी रमेश घोलप आदींच्या विशेष सहकार्याने ‘स्नेहग्राम’ साकारले गेले आहे.

सध्या स्नेहग्राम विद्यालयात वेगवेगळी कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेली ४० मुले-मुली निवासी शालेय शिक्षण घेत आहेत. यात ५ ते १२ वयोगटातील २५ मुले व १५ मुली आहेत. शासनाच्या मदतीविना इथे समाजव्यवस्था व शासनव्यवस्थेपासून वंचित व उपेक्षित असलेल्या भटक्या मुला-मुलींना मोफत निवासी शिक्षण देताना समाजातील दानशूर मंडळींकडून मिळणारे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘स्नेहग्राम’च्या परिसरात जंगली व फळांची सातशे वृक्षांची लागवड झाली असून या वृक्षांची देखभाल मुलेच करतात. ‘स्नेहग्राम’चा दरमहा खर्च सुमारे एक लाखाचा आहे. हा खर्च १२५ देणगीदारांच्या माध्यमातून भागविला जातो. निधी मिळाला तर विविध उपक्रम राबविण्याचा स्नेहग्रामचा विचार आहे.

केवळ औपचारिक शिक्षणावर भर न देता कौशल्याधिष्ठित शिक्षण व व्यावहारिक जीवनानुभवही मुलांना दिले जातात. स्नेहग्राम विद्यालयात सध्या ४० वंचित मुले आहेत. भविष्यात ५०० वंचित मुलांना निवासी शाळेच्या माध्यमातून समूह शिक्षणासह सांभाळण्याचा स्नेहग्रामचा संकल्प आहे. शाळेची स्वतंत्र इमारत व वसतिगृहाची स्वतंत्र व्यवस्था उभी करायची आहे. इतर आवश्यक पायाभूत सुविधा द्यायच्या आहेत. त्यासाठी समाजातील दानशूर मंडळींची साथ हवी आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? स्नेहग्राम प्रकल्प

सोलापूर-बार्शी रस्त्यावर सोलापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर वैरागच्या पुढे पानगावलगत कोरफळे हे गाव आहे. बार्शी येथून हे गाव १५ किलोमीटर अंतरावर आहे. पानगावात प्रवेश केल्यानंतर पुढे चार किलोमीटर अंतरावर कोरफळे गावच्या हद्दीत स्नेहग्राम प्रकल्प आहे.

दुष्टचक्र भेदण्यासाठी…

मोहन अटाळकर

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शेकडो कुटुंबांना दिलासा देण्याचे विदर्भातील यवतमाळ येथील दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने हाती घेतलेले काम आता  शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मूळ शोधून उपाय करण्यापर्यंत पोहोचले आहे.

दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले.  गरजू चारशेच्या वर कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले. अशा कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले. या कुटुंबाांना वेगवेगळे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेकडून मदत व प्रोत्साहन दिले जाते. कुटुंब आधार योजनेच्या माध्यमातून संस्थेने शेळीपालन, किराणा दुकान, शिवणकाम, शेवई व्यवसाय, भाजीपाला दुकान, चप्पल दुकान, चहा दुकान इत्यादी व्यवसाय सुरू करून दिले. विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्यांची आवड आणि कौशल्य विचारात घेऊनच व्यवसायांची निवड करण्यात आली. ही कुटुंबे आता स्वावलंबी झाली असून सन्मानाने जगत आहेत. संस्थेचे कार्यकत्रे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात व त्यांना भावनिक व मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. संस्थेने पालकत्व स्वीकारलेल्या एका तालुक्यातील अशा सर्व कुटुंबांची एक बैठक आयोजित केली जाते. त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जातात. त्यानुसार संस्था आपला कार्यक्रम निश्चित करते. दरवर्षी संस्थेच्या भाऊबीज कार्यक्रमातून महिलांना गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. हा शेतकरी कुटुंबांसोबत संवादाचा सुरुवातीचा दुवा ठरत असतो.  शेतीला पूरक ठरणाऱ्या अनेक दुर्लक्षित बाबी संस्थेच्या संशोधकांनी हेरल्या. शेततळी, लघु बंधारे बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम संस्थेने केले. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याचे काम संस्था करीत आहे. शेतीसाठी आवश्यक बियाण्यांचा पुरवठा संस्थेकडून केला जातो. शेतीतील लागवडीचा खर्च कमी करण्यासाठीदेखील संस्थेतर्फे विविध प्रयोग केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातच उपलब्ध असलेल्या संसाधनांपासून औषधी, खते तयार करण्यापासून ते पिकांच्या संगोपनापर्यंत सर्व प्रकारची शास्त्रीय माहिती संस्थेमार्फत पुरवली जाते. संशोधनात्मक आणि संघटनात्मक पातळीवर संस्थेने विकसित केलेली व्यवस्था ही या क्षेत्रात कार्य करण्यासाठी पथदर्शकच ठरली आहे. सोप्या शेती पद्धती विकसित करण्याचे किंबहुना अनेक परंपरागत पद्धतींना पुनरुज्जीवित करण्याचे काम संशोधक करीत आहेत. या कृषी संशोधन प्रकल्पासाठी सातारा येथील डॉ. विजय होनकळसकर आणि अहमदनगर येथील निखिलेश बागडे हे ‘आयआयटीयन्स’ संशोधक संस्थेला साहाय्य करतात. कृषी क्षेत्रातील समस्यांची प्रभावी उकल करण्याच्या उद्देशाने यवतमाळजवळ निळोणा येथे कृषी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. जलभूमी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून केळापूर तालुक्यात पाथरी येथे निरुपयोगी बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. सेंद्रिय शेती प्रकल्प आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ दिले जात आहे, अशी माहिती सचिव विजय कद्रे यांनी दिली.

अपराधीपणाचा शिक्का बसलेल्या पारधी समाजाच्या प्रगतीसाठी संस्था १९९७ पासून म्हणजे स्थापनेच्या काळापासूनच काम करीत आहे. पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने विवेकानंद विद्यार्थी वसतिगृह सुरू केले आहे. दुर्गम भागातील बेडय़ावर राहणाऱ्या पारधी समाजातील लोकांना आरोग्य सेवा पुरवता यावी, यासाठी संस्था फिरते रुग्णालय चालवते. तसेच, मुलांसाठी बालसंस्कार केंद्र, आरोग्य शिबीर, रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा आदी उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. पारधी समाजातील केवळ पाच विद्यार्थ्यांना घेऊन भाडय़ाच्या खोलीत विवेकानंद छात्रावास उघडण्यात आले होते. आज या छात्रावासाची स्वत:ची इमारत उभी आहे. मात्र, पारधी समाजातील शिक्षणाची जागृती लक्षात घेता किमान १०० विद्यार्थ्यांसाठी मोठी इमारत आवश्यक आहे. व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे, असे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी सांगितले. संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शेतकरी तसंच पारध्यांसंदर्भातील कामासाठी संस्थेला समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.

पारधी समाजातील केवळ पाच विद्यार्थ्यांना घेऊन भाडय़ाच्या खोलीत विवेकानंद छात्रावास उघडण्यात आले होते. आज या छात्रावासाची स्वत:ची इमारत उभी झाली आहे. मात्र, पारधी समाजात होत असलेली शिक्षणाची जागृती लक्षात घेता किमान १०० विद्यार्थ्यांसाठी मोठी इमारत आवश्यक झाली आहे. सोबत व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ

यवतमाळ ते गोधनी मार्गावरून पुढे गेल्यानंतर निळोणा तलावाजवळ, मातोश्री वृद्धाश्रमाच्या बाजूला संस्थेच्या दीनदयाल प्रबोधिनीची इमारत आहे.

विशेष मुलांची ‘अक्षर’वाट!

विश्वास पवार

विशेष मुलांच्या गरजा, मर्यादा आणि क्षमता ओळखून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मोठे आव्हान असते. वाईतील ‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’ गेल्या ३६ वर्षांपासून हे आव्हान पेलते आहे.

वाईसारख्या छोटय़ाशा शहरात १९८२ साली ‘वाई अक्षर इन्स्टिटय़ूट’ या नावाने त्या वेळी हे कार्य सुरू झाले. डॉ. पंडित आणि उषा या टापरे दाम्पत्याला १९७५ साली झालेला मुलगा उमेश हा जन्मत:च गतिमंद होता. त्याच्या दैनंदिन गोष्टींसाठी आई-वडील झटत होते. पण, पुढे त्याच्या शिक्षणाचा प्रश्न आला आणि या दाम्पत्याची अस्वस्थता आणखी वाढली. अशा विशेष मुलांसाठी त्या काळी स्वतंत्र शिक्षणाची सोयही नव्हती. दरम्यान, टापरे दाम्पत्याचा प्रा. विजयकुमार फरांदे यांच्याशी संपर्क झाला. मग, त्यांच्या प्रेरणेतून अशा मुलांच्या पालकांसाठी वाईत एक मेळावा घेण्याचे ठरले. त्यासाठी आधी गतिमंद मुलांचा शोध सुरू झाला. त्यात वाई परिसरात अशी ४५ मुले आढळली. या मुलांच्या पालकांसाठी वाईत १९८१ मध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विशेष मुलांच्या विकासासाठी धडपडीचे हे पहिले पाऊल होते. यातून या मुलांच्या पालकांची संघटना तयार झाली आणि त्यांच्या शिक्षणासाठीच्या प्रयत्नांना गती आली. पालक एकत्र आले, त्यांनी हे काम सुरू करण्याचेही ठरवले. पण पहिलाच प्रश्न उभा राहिला, या मुलांना शिकवणार कोण आणि शिकवायचे कसे? गतिमंदांसाठी अहमदाबादला काम करणाऱ्या आशुतोष पंडित यांनी सुचवले की या मुलांच्या पालकांनीच मुलांना शिकवावे. त्यासाठी पालकांना शिक्षण-प्रशिक्षण दिले गेले. यातून तयार झालेल्या पालकांच्या आधारे ४ मार्च १९८२ रोजी या अशा विशेष मुलांसाठीच्या शाळेचा पहिला वर्ग वाईत एका मंदिरात भरू लागला.

आज शाळेत शंभर गतिमंद विद्यार्थी आहेत. त्यांना स्वावलंबन, भाषा विकास, बौद्धिक विकास, वाचन, लेखन, संख्याज्ञान, हिशेब, सामान्यज्ञान, गृहकौशल्य  इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जाते. या मुलांमध्ये अतिशय तीव्र गतिमंदत्व असलेली, अतिचंचल (हायपर अ‍ॅक्टिव्ह), स्वमग्न अशी मुले आहेत. या सर्वाबरोबर शिक्षकांना सहनशीलतेने वागावे लागते. १९८९ पासून संस्थेने प्रौढ गतिमंदांसाठी कार्यशाळा सुरू केली. तिथे सध्या ५६ प्रौढ गतिमंद आहेत. त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात.  संस्थेतर्फे गतिमंद मुलांच्या गरजा व क्षमता यावर आधारित ‘अक्षर समायोजित वर्तन परिमाण’ ही बौद्धिक चाचणी तयार केली आहे. गतिमंदांच्या विषयावरील अनेक पुस्तके संस्थेतर्फे प्रकाशित केलेली आहेत. हा प्रकल्प सुरू झाला त्या वेळी ‘वेडय़ांची शाळा’ म्हणून हिणवले जायचे. गतिमंद वगरे संकल्पना समजून घेण्यात आजही समाज कमी पडतो. या शाळेत येणारी मुले ही वाई परिसरातील ४५ गावांमधून येत. या मुलांना शाळेत येताना अन्य मुलांकडून त्रास व्हायचा.  अखेर काही दानशूरांच्या मदतीने या मुलांसाठी बस घेण्यात आल्या. या बसमधून ही मुले आणि प्रौढ सुरक्षितपणे शाळेत येऊ लागली.

दरम्यान, १९८२ साली ज्या इमारतीतून संस्थेचे कार्य सुरू झाले, ती जुनी झाली होती. छत गळू लागले होते, भिंतींना भेगा पडल्या होत्या, पावसाळय़ात इमारतीत पाणी साचायचे. मग मुलांना घरी पाठवावे लागायचे. २००६ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे पुतणे आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव जोशी यांनी संस्थेला भेट दिली. शाळेची ही दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांनी संस्थेला नवीन इमारत बांधून देण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. संस्थेने कृतज्ञता म्हणून त्यांची नात आणि नातवाच्या नावाची संस्थेच्या नावात भर घालून ‘रिव्हका साहिल अक्षर इस्टिटय़ूट’ असे संस्थेचे नामकरण केले. ही संस्था आजही अनेक अडचणी, आव्हानांचा सामना करीत निरंतर कार्य करते आहे. संस्थेत २८ कर्मचारी आहेत. यातील अनेक जण तुटपुंज्या पगारावर काम करतात. दैनंदिन खर्च, मुलांसाठी बसचा खर्च आदी भागवण्यासाठी संस्थेला मदतीची गरज आहे. या मुलांच्या रोजगारासाठी नवनव्या योजना उभ्या करणे गरजेचे आहे. पण निधीअभावी या योजना कागदावरच आहेत. समाजाकडून मदतीचा हात मिळाला तर या मुलांचे आयुष्य प्रकाशमान होऊ शकेल.

पुढील योजना

संस्थेसाठी स्वतंत्र जागा घेऊन तिथे रोजगारनिर्मितीसाठी एक औद्योगिक केंद्र, शेतीशी निगडित प्रकल्प राबवण्याचा संस्थेचा संकल्प आहे. विशेष मुलांसाठी कायमस्वरूपी समुपदेशन केंद्र सुरू करायचे आहे. गतिमंदांच्या क्षेत्रातील वाङ्मय मराठीत तयार करण्याची संस्थेची योजना आहे. सध्या संस्थेत २८ कर्मचारी आहेत. यातील अनेक जण तुटपुंज्या वेतनावर काम करतात. त्यांच्या वेतनवाढीबरोबरच आगामी प्रकल्पपूर्तीसाठी संस्थेला निधीची गरज आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट

पुण्यापासून ८५ किलोमीटरवर वाई आहे. वाई शहरातील कन्या शाळेजवळ ही संस्था आहे. शहरात पोहोचल्यावर खासगी वाहन किंवा रिक्षाने संस्थेपर्यंत पोहोचता येते.

अपंगांचा आधारवड

दयानंद लिपारे

अपंगत्वावर मात करत आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आहे तो कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेने! स्वत:च्या अपंगत्वावर मात करून हजारो अपंगांना उभारी देण्यासाठी पुढाकार घेतला तो नसीमा हुरजूक यांनी. या संस्थेत त्यांना ‘दीदी’ नावाने ओळखले जाते.

दीदींना आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली ती बाबुकाका ऊर्फ एस. एन. दिवाण यांनी. पदवी प्राप्त केल्यानंतर दीदींना केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नोकरी पत्करली. येथूनच त्यांनी अपंगांना विविध स्वरूपात मदत करण्यास सुरुवात केली. गेली पाच दशके नसीमा दीदींनी हजारो अपंगांना शिक्षण, प्रशिक्षण, व्यवसाय यामध्ये मार्गदर्शन केले. त्यातून त्यांच्यात आत्मसन्मान जागवले गेले आणि ते स्वबळावर उभे राहू लागले.

अपंग अपत्याची जबाबदारी टाळण्याच्या अमानुष घटना पाहून दीदी अस्वस्थ व्हायच्या. आणि मग त्यातून अपंगांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय ‘हेल्पर्स’ने घेतला. अपंगांची जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांच्या जीवनशैलीला अनुसरून वसतिगृह उभारले पाहिजे, असे संस्थेने ठरवले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून दोन एकर जागा मिळवली. शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या उचगाव गावातील जागेत संस्थेचे पहिले रोपटे लावले गेले ते ‘घरौंदा’ वसतिगृहाच्या नावाने. पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना येथे प्रवेश दिला जातो. अपंगांच्या सर्वागीण पुनर्वसनाचे कार्य केले जाते. या वसतिगृहाने आजवर पाच हजारांहून अधिक मुलांना आधार दिला आहे. येथे प्रवेशितांची शारीरिक तपासणी करून त्यांना कृत्रिम साधने पुरवली जातात. गरजेप्रमाणे शस्त्रक्रिया केल्या जातात. संस्थेने २ हजार ३३३ अपंगांना ५५ लाख ८९ हजार रुपयांची कृत्रिम साधने, उपकरणे दिली आहेत, तर केंद्र सरकारच्या अनुदानातून १३५ लाभार्थ्यांना २ लाख ६० हजारांची उपकरणे दिली आहेत.

यानंतर नसीमा दीदींनी संस्थेची स्वतंत्र शाळा हे नवे आव्हान स्वीकारले. त्यातूनच आता उभे राहिले आहे, बालवाडी ते दहावीपर्यंतचे अपंग आणि सुदृढ यांना एकत्रित शिक्षण देणारे- समर्थ विद्यामंदिर!

‘घरौंदा’मध्ये अपंगांना स्वबळावर उभे करणारे वेगवेगळे प्रकल्प आहेत. त्याची जबाबदारी विभागून दिली आहे. ‘हॅण्डिहेल्प वेल्फेअर फाऊंडेशन’ या माध्यमातून अपंग विद्यार्थ्यांना कपडे शिवण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण, तर ‘हॅण्डिहेल्प वेल्फेअर फाऊंडेशन’द्वारा अपंग व्यक्तींना लागणारी सर्व कृत्रिम साधने बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अपंगांना परवडेल अशा दरात कृत्रिम साधने पुरवली जातात. सरकारी सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना कृत्रिम साधने याच संस्थेकडून घ्यावीत असे महाराष्ट्र शासनाने अध्यादेशात म्हटले आहे.

सन २००० साली सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात माणगावकर कुटुंबीयांनी बक्षीसपत्राने संस्थेला साडेबारा एकर जमीन दिली. पायवाट नसलेल्या जंगलात ‘हेल्पर्स’च्या अपंग पथकाने जमीन साफ करण्यापासून काम सुरू केले. येथे काजू बी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. आठ-दहा अपंगांना सोबत घेऊन सुरुवात केलेल्या प्रकल्पात आज दीडशे लोकांना रोजगार मिळाला आहे. ७५ टक्के अपंग व त्यात ६० टक्के महिला आहेत. ११ टन काजू बियांवर पहिल्या वर्षी प्रक्रिया केली. या वर्षी ४०० टन काजू प्रक्रिया केली गेली. आता हा प्रकल्प ६०० टन काजू प्रक्रिया करणारा आणि २०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा असा विस्तारायचा आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या निधी संकलनाचे काम सुरू असून दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

आता परिपूर्ण ‘स्वप्ननगरी’ उभारण्याचे  ‘हेल्पर्स’चे स्वप्न आहे. त्यात अपंगांसाठी रोजगार, स्वमालकीचे घरकुल उभारले जाणार असून ते बऱ्याच अंशी प्रत्यक्षात उतरले आहे. या स्वप्ननगरीत सिमेंट ब्लॉक बनवणे, शेती व दूध प्रकल्प सुरू केला आहे. अपंगांनाही त्यांच्या परीने वैवाहिक जीवन जगायचे असते ही गरज ओळखून ‘हेल्पर्स’ने अपंग-सुदृढ असे अनेक विवाह करून दिले असून या सर्वाना अव्यंग अपत्ये झाली आहेत. पाच अपंगांनी स्वत:च्या घरकुलासाठी २-३ गुंठे जागा खरेदी केली आहे. या उपक्रमात आणखीही अपंग सहभागी होतील. त्यांचे जीवन आणि भवितव्याची सुरक्षा संस्थेमुळे मिळाली आहे. मात्र, या प्रवासात अपंगांना समाजातील दानशूरांची साथ हवी आहे.

संस्थेने येथे आठ-दहा अपंगांना सोबत घेऊन सुरुवात केलेल्या काजू बी प्रक्रिया प्रकल्पात आज दीडशे लोकांना रोजगार मिळाला आहे. ११ टन काजू बियांवर पहिल्या वर्षी प्रक्रिया केली.  आता हा प्रकल्प ६०० टन काजू प्रक्रिया करणारा आणि २०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा असा विस्तारायचा आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या निधी संकलनाचे काम सुरू असून दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड

कोल्हापूर-हुपरी मार्गाने सरळ गडमुडिशगी कमानीपर्यंत जावे. कमानीतून आत प्रवेश केल्यावर पहिल्या डाव्या वळणाने सरळ येताच आपण संस्थेच्या समर्थ विद्यामंदिर या शाळेत पोहोचतो. घरौंदा अपंगार्थ वसतिगृह व प्रशिक्षण केंद्र शाळेलगतच आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून हे अंतर सात किलोमीटर आहे.

आनंदाचे घर!

महेश सरलष्कर

बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनची नोंदणी पुण्यातली. संस्था जम्मूबरोबरच काश्मीर भागात अनंतनाग, श्रीनगर, बिरवा आणि कुपवाडा अशा पाच ठिकाणी बालिकाश्रम चालवते. प्रत्येक केंद्रात सुमारे ५०, अशा पाच केंद्रांत  २५० हून अधिक मुलींच्या राहण्याची, शिक्षणाची व्यवस्था ‘बॉर्डरलेस’ करते. इथे आलेल्या प्रत्येक मुलीला जम्मू-काश्मीरमधील धुमश्चक्रीचा फटका बसला आहे. कोणाला आई नाही, वडील नाहीत. कोणा मुलीचे आई-वडील दोघेही मारले गेले आहेत. वडील गेल्यानंतर आईने दुसरे लग्न केल्यामुळे मुलगी बेघर झाली आहे. या मुलींना ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या रूपात आधार सापडला आहे.

मूळच्या अहमदनगरचा असलेल्या अधिक कदमने २००२ मध्ये जम्मू-काश्मीरच्या आपत्तीग्रस्त भागांमधील मुलींना चांगले आयुष्य जगण्याची संधी देणारी ‘बॉर्डरलेस’ ही संस्था सुरू केली. प्रत्येक मुलीच्या राहण्याचा, कपडय़ालत्त्यांचा, वह्य़ा-पुस्तकांचा, शाळेच्या शुल्काचा खर्च संस्थेकडूनच केला जातो. त्यासाठी प्रत्येक मुलीवर वर्षांकाठी ६० हजार रुपये म्हणजे सर्व मुलींवर मिळून किमान दीड कोटी रुपयांचा खर्च होतो. हा सगळा खर्च संस्था उचलते. दोन वर्षांच्या चिमुकलीपासून अठरा वर्षांपर्यंतच्या मुली या केंद्रात राहतात. काही मुली बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, नाशिक, बंगळूरु, हैदराबाद, कन्याकुमारी अशा शहरांमध्ये गेल्या आहेत. त्यांचाही खर्च संस्थेने उचललेला आहे. कुपवाडय़ाच्या केंद्रात छोटेखानी उद्योग केंद्रही चालवले जाते. सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणे, कपडय़ांवर एम्ब्रॉयडरी करणे यांसारखे प्रकल्पही चालवले जातात. त्यातून खूप पैसा उभा राहत नाही, पण ते मुलींमध्ये स्वतच्या पायावर उभे राहण्याची मानसिकता जरूर निर्माण करतात. सध्या ‘बॉर्डरलेस’कडे स्वत:ची जागा नाही. त्यांचे प्रत्येक केंद्र भाडय़ाने घेतलेल्या जागेमध्ये कार्यरत आहे. ही केंद्रे सुरूच राहणार आहेत, पण संस्थेला स्थिरस्थावर व्हायचे असेल तर हक्काच्या घराची नितांत गरज आहे. जम्मू शहरात ‘बॉर्डरलेस’चे हक्काचे घर हळूहळू आकार घेऊ लागले आहे. एका वेळी किमान अडीचशे मुली राहू शकतील असे निवासस्थान बनवण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची गरज आहे. आत्तापर्यंत दीड कोटी रुपये संस्थेला जमवता आले आहेत. हे घर झाल्यावर शेजारीच शाळाही बांधण्याचा इरादा आहे.

बरीच वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये काम करताना अधिकच्या लक्षात आले की, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) निव्वळ सीमेवर तैनात नाही, हे दल सीमेलगतच्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर समाजसेवा करते. सीमेपलीकडून पाकिस्तानी सैनिक गोळीबार करतात. बॉम्बगोळे फेकतात. त्यात गावकरी जखमी होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ‘बीएसएफ’कडे डॉक्टर वगैरे वैद्यकीय यंत्रणा असली तरी ‘तातडीची वैद्यकीय सेवा’ पुरवणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स नव्हत्या. ‘बॉर्डरलेस’ने जम्मू भागात चार आणि काश्मीर भागात सहा अशा दहा अ‍ॅम्ब्युलन्स पुरवल्या आहेत. जम्मू भागात ‘बीएसएफ’ला अ‍ॅम्ब्युलन्स दिल्यानंतर वर्षभरात एका अ‍ॅम्ब्युलन्सने ४६८ लोकांचे प्राण वाचवले. २०१६ मध्ये काश्मीर खोऱ्यात संचारबंदीच्या काळात पाच महिन्यांत तीन अ‍ॅम्ब्युलन्सने ४७०० लोकांना मदत पुरवण्यात आली. ‘बॉर्डरलेस’ला आणखी अ‍ॅम्ब्युलन्सासाठी निधी उभा करायचा आहे.

२०१६ मध्ये श्रीनगरमध्ये काश्मिरी तरुणांनी रस्त्यावर येऊन  दगडफेक केली होती. त्यांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर झाला होता. त्यात शेकडो तरुणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. या तरुणांवर वेळीच उपचार केले नाहीत तर ते कायमचे अंध होतील म्हणून अधिकने मुंबईतील विख्यात नेत्रतज्ज्ञ नटराजन आणि त्यांच्या टीमला बोलावले. जवळजवळ १२०० तरुणांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे वाचवले गेले.

‘बॉर्डरलेस’ ही संस्था उद्ध्वस्त झालेल्या मुलींना केवळ आश्रय देत नाही, ती शांततेने जगण्याची आस असलेली नवी पिढी घडवते. ही संस्था ‘बीएसएफ’ला अ‍ॅम्ब्युलन्स पुरवण्यासाठी प्रयत्न करते, त्यामागे देशाची सीमा सुरक्षित राखण्याचाच प्रामुख्याने विचार आहे. हिंसाचारग्रस्त काश्मिरी मुलींना सावरत एक मराठी तरुण हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीने जाण्याची परंपरा पुढे नेतो आहे. आपणही आर्थिक मदत करून त्याला हातभार लावायला हवा.

आगामी प्रकल्प

जम्मू शहरात २५० मुलींसाठी निवासस्थान उभारण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे.

याच निवासस्थानाशेजारी शाळा बांधण्याचाही संस्थेचा विचार आहे. त्यामुळे बालवाडीपासून बारावीपर्यंत मुली एकाच ठिकाणी शिक्षण घेऊ शकतील.

बारावीनंतर मुलींना इतर शहरांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये पाठवण्याचे नियोजन आहे.

जम्मू भागात ‘बीएसएफ’ला  दहा रुग्णवाहिका पुरवल्या जाणार आहेत.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल? बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन

पुण्यातील टिळक रोडवरील अभिनव कला महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या निखिल प्राइड फेज- २ या इमारतीतील ब्लॉक एफमध्ये संस्थेचे कार्यालय आहे.

धनादेश येथे पाठवा…

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८,अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय
संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/ २४५१९०७

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३०१ उत्तर प्रदेश    ०१२०- २०६६५१५००
response.lokprabha@expressindia.com