09 March 2021

News Flash

शोध महिषासुरमर्दनीचा!

भारतातील अनेक भागांत शक्तीची उपासना करण्यासाठी देवीच्या दुर्गा या रूपाची पूजा केली जाते.

00-navratri-logo-lpभारतातील अनेक भागांत शक्तीची उपासना करण्यासाठी देवीच्या दुर्गा या रूपाची पूजा केली जाते. महिषासुरमर्दनिी, भवानी, कात्यायनी इत्यादी नावांनी लोकप्रिय असलेल्या या देवतेच्या मूर्तीच्या उगमाचा आणि विकासाचा पुरातत्त्वीय पुरावे, प्राचीन साहित्य, नाणी, शिलालेख आणि मूर्तीशास्त्र यांच्या आधारे घेतलेला हा वेध.

प्रागतिहासिक काळापासून मानव विविध रूपातील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची, स्त्रीरूपातील देवतांची पूजा करायला सुरुवात केली असावी. जगभर मिळणाऱ्या प्रागतिहासिक काळातील मातृदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्ती याची साक्ष देतात. ऑस्ट्रिया आणि चेक रिपब्लिक येथे सापडलेल्या मातीच्या व दगडी प्रतिमा तीस ते अठ्ठावीस हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या प्रतिमांना आता व्हीनस म्हणून ओळखले जाते. शताल हुउक (तुर्कस्थान), टेपे सरब (इराण), टेपे गवरा (इराक), मुंडिगाक (अफगाणिस्तान) इत्यादी ठिकाणांबरोबरच भारत व विद्यमान पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीच्या स्थळांमध्ये मातृदेवतांच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत. या मूर्ती साधारणपणे आठ ते चार हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. अर्थातच या मूर्ती वरील प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जात होत्या हे सांगणे शक्य नाही. पण संशोधक त्यांना मातृदेवता असे संबोधतात. दक्षिण भारतात आदिचन्नलूर येथे लोहयुग संस्कृतीतील मातृदेवतेची तांब्याची मूर्ती सापडली आहे. पुणे जिल्ह्यतील इनामगाव येथे झालेल्या उत्खननात एका मातीच्या छोटय़ा पेटीसारख्या आवरणात ठेवलेली स्त्रीदेवतेची मूर्ती सापडली होती. सुरुवातीला अत्यंत साध्या असणाऱ्या मातृदेवतांच्या या भाजक्या मातीच्या मूर्ती मौर्य, शुंग, कुशाण राजांच्या काळात इसवी सनापूर्वी तिसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक विविध अलंकारांनी सजलेल्या अशा देखण्या बनवल्या जाऊ लागल्या. याच काळातील स्थानिक स्त्रीदेवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या यक्षींच्या दगडी मूर्ती विदिशा, बारहूत, मथुरा, सांची येथे आढळल्या आहेत.

02-devi-lp

भारतात कुशाण राजांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर देवतांच्या पाषाणाच्या प्रतिमा निर्माण होऊ लागल्या होत्या. सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या ब्रह्मा, विष्णू, आणि महेशाशी संबंधित देवतांच्या प्राचीन प्रतिमा उत्तरभारतात सर्वत्र आढळतात. विशेषत शैव आणि शाक्त पंथाशी संबंधित दुर्गा या देवीच्या अनेकविध प्रतिमा सापडतात. आगमग्रंथांनुसार तिची नऊ रूपे आहेत. त्याव्यतिरिक्त देवीचे महिषासुरमर्दनिी हे रूप भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीचा उदय आणि आतापर्यंत झालेला प्रवास जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.

प्राचीन संस्कृत साहित्यातील संदर्भ

या दुर्गादेवीचे लिखित पुराव्यातील प्राचीनत्व शोधण्यासाठी भारतातील सर्वात प्राचीन वैदिक साहित्याचा संदर्भ तपासावा लागतो. ऋग्वेद व अथर्ववेद संहितांतील देवतांमध्ये इंद्र, मित्र, वरुण, अग्नि इत्यादी पुरुषदेवतांचे प्राबल्य आहे. याशिवाय अदिती, पृथ्वी, वाक्, श्री, यमी, उषा इत्यादी स्त्रीदेवता वेदांमध्ये आढळतात. परंतु कात्यायनी, पार्वती, उमा याची नावे या वेदांमध्ये येत नाहीत. कृष्ण यजुर्वेदाच्या तत्तिरीय आरण्यकात रुद्राच्या पत्नी म्हणून अंबिका आणि उमा यांचा उल्लेख येतो. याच तत्तिरीय आरण्यकात कात्यायनी, कन्याकुमारी, दुर्गी यांना एकाच देवीची नावे म्हणून संबोधले आहे. तसेच वरदा, वेदमाता इत्यादी स्त्रीदेवतांचाही उल्लेख केला आहे. परंतु या स्त्रीदेवतांचे महत्त्व काय होते हे सांगता येत नाही.

केनोपनिषदात रुद्रपत्नी उमेचा उल्लेख हैमवती म्हणजे हिमवत पर्वतातील मुलगी असा आढळतो. रुद्र या पर्वताशी संबंधित देव असल्यामुळे त्याची पत्नी हिमवत पर्वताशी संबंधित असणे साहजिकच आहे. उत्तर वैद्री काळातील हिरण्यकेशी गृह्य़सूत्र या ग्रंथामध्ये भवानी, दुर्गा, भद्रकाली या देवींची नावे येतात. तर बौधायन गृह्य़सुत्रात दुर्गाकल्पच आढळते. पारस्कर गृह्य़सूत्रातील ‘शूलगव’ यज्ञाच्या विधीत आहुती देताना शर्वाणी, भवानी इत्यादी देवशक्तींना आहुती द्यावी, असे वर्णन आढळते.

इसवीसनापूर्वी पाचव्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनी याने रचलेल्या अष्टाध्यायी या ग्रंथात भवानी, शर्वाणी, रुद्राणी आणि मृडाणी यांचा उल्लेख आहे. शिवाच्या भव, शर्व, रुद्र आणि मृड या चार रूपांच्या शक्ती म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. अर्थात या काळात त्यांचे किती महत्त्व होते ते मात्र कळत नाही.

03-devi-lp

इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नगराच्या मध्यभागी इतर देवतांबरोबरच मदिरा नावाच्या देवीचे मंदिर उभारावे असे सांगितले आहे. काही संशोधकांच्या मते मदिरा ही कृषीदेवता होती, तर काहींच्या मते ही दुर्गा असावी. या अर्थशास्त्र ग्रंथातच एके ठिकाणी तळघरांच्या दाराच्या चौकटीवर देवी प्रतिमा काढावी असे सांगितले आहे.

रामायणामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमेच्या काही उल्लेखांव्यतिरिक्त शक्तीपूजनाचे संदर्भ आढळत नाहीत. महाभारताच्या विराट आणि भीष्म पर्वात देवीचे स्तवन सापडते. महाभारतात ती विन्ध्यवासिनीच्या स्वरूपात येते.

भास या प्रसिद्ध संस्कृत नाटककाराच्या नाटकांत कात्यायनी, दुर्गा इत्यादी देवींचे उल्लेख येतात. ‘स्वप्नवासवदत्त’ या भासाच्या प्रसिद्ध संस्कृत नाटकात पाटलीपुत्र येथे कात्यायनीचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे. तसेच कात्यायनीने शुंभ, निशुंभ, महिष यांचा वध केल्याचे वर्णन येते. शुद्रकाने लिहिलेल्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकातील नायक चारुदत्त याला मारणाऱ्या चांडाळाची कुलदेवता म्हणून दुग्रेचा उल्लेख आहे. दन्डीने लिहिलेल्या ‘दशकुमारचरित’ या संस्कृत ग्रंथात दुग्रेचा उल्लेख ‘विन्ध्यवासिनी दुर्गा’  म्हणून अनेकदा येतो. तिच्या आशीर्वादाने एका राजाला अपत्यप्राप्ती झाल्याचा उल्लेख आहे तसेच तिचे मंदिर असल्याचाही उल्लेख या ग्रंथात येतो.

‘हर्षचरित’ या बाणाभट्ट लिखित गद्यपद्यमिश्रित संस्कृत काव्यात हर्षांच्या दरबारात जाताना वाटेतील एका मल्लकूट गावाच्या बाहेर ‘चंडी कानन’ म्हणजे चंडीचे अरण्य असल्याचा उल्लेख येतो. या अरण्यातील झाडांवर कात्यायनी देवीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या व वाटसरू या प्रतिमांना वंदन करत असे वर्णन बाणाभट्ट याने केले आहे. बाण याने लिहिलेल्या ‘कादंबरी’ या संस्कृत ग्रंथात एक चंडीचे देऊळ असल्याचा व तेथे एक द्रविड पुजारी असल्याचा उल्लेख आहे. याच ग्रंथात राणी अपत्यप्राप्तीसाठी चंडिकेची उपासतापास करून आराधना करते असे दर्शविले आहे.

याशिवाय विविध पुराणातून दुग्रेची तसेच महिषासुरमर्दनिीची महती वर्णिलेली आहे. वामन पुराणात महिषासुराची वधाची कथा येते. या कथेनुसार महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला. अर्थात नंतरच्या काही पुराणातून ही कथा बरीच बदललेली दिसते. पण या कथेचे शुंभनिशुंभ वधकथेशी खूप साम्य आहे. त्यावरून पुराणनिर्मितीच्या काळात शुंभनिशुंभांचा वध करणारी विंध्यवासिनी कौशिकी देवी आणि महिषासुर मर्दनिी यांचे एकीकरण करण्यात आले असावे कारण त्यानंतर महिषासुरमर्दिनीला देखील विन्ध्यवासिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्राचीन साहित्यिक उल्लेखांवरून दुर्गा महिषासुरमर्दिनीचा नुसता उल्लेख ते तिच्या पराक्रम कथा यांचा आलेख मिळतो.

प्राचीन कोरीव लेखांमधील दुर्गा

भारतात सापडणाऱ्या कोरीव लेखांतून विविध प्रकारची तत्कालीन माहिती आपल्याला मिळते. अर्थातच त्यातून भारताच्या वेगवेगळ्या भागातील धार्मिक माहितीदेखील मिळते. देवीपुजेच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या काही शिलालेखांचा उल्लेख इथे केला पाहिजे राजस्थानातील ‘होटी सादडी’ या गावातील भवरमाता मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर इसवीसनाच्या सहाव्या शतकातील एक शिलालेख आहे. त्यात आरंभी तीक्ष्ण शूल हातात घेऊन असुराचा वध करणाऱ्या देवीला नमन केले आहे. ही देवी उग्र सिंहांच्या रथात बसलेली असून ती भक्तांचे कल्याण करते, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. येथे देवीचे वर्णन करताना ती शिवाची अर्धागी असल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वर्णनावरून येथे सिंहवाहिनी दुर्गा अपेक्षित असावी यात शंकाच नाही. या शिलालेखाचा उद्देश राजाने देवीचा उत्तम प्रासाद (मंदिर) बांधला होता हे नोंदवण्याचा होता.

04-devi-lp

याशिवाय बिहारमधील नागार्जुनी टेकडय़ांमधील सहाव्या शतकातील अनंतवर्मन राजाच्या दोन लेखांमध्ये देवीचा उल्लेख आहे. यातील एका लेखात भूतपती आणि देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना केली होती असा उल्लेख आहे. भूतपती हे शिवाचेच एक नाव आहे, त्यामुळे ही देवी शिवशक्ती दुर्गा असावी. तर दुसऱ्या शिलालेखात महिषासुराच्या शिरावर देवीने ठेवलेल्या पायाला भक्तीभावाने नमन करून राजाने ‘अद्भुत विन्ध्य भूधर गुहे’मध्ये कात्यायनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली असे नमूद केले आहे. याच शिलालेखात भवानी देवीसाठी राजाने एक गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. गुहेत स्थापन केलेल्या कात्यायनी देवीच्या पूजेअच्रेसाठी या गावातील उत्पन्नाचा वापर व्हावा हे उद्दिष्ट होते. महिषासुरमर्दनिी, कात्यायनी व भवानी या देवीच्या तीनही रूपांचा उल्लेख हे या शिलालेखाचे वैशिष्टय़ आहे.

बसंतगढ (राजस्थान) येथील खिमेलमाता मंदिरापाशी सापडलेला इसवीसनाच्या सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलालेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाच्या आरंभी दुर्गा आणि क्षेमकरी क्षेमार्या यांना आवाहन केले आहे. तसेच या लेखात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. त्यात श्रीमातेच्या एका गणिकेचे नावही नमूद केले आहे. विविध आगमग्रंथानुसार नवदुर्गामध्ये गणले जाणारे क्षेमंकरी हे दुग्रेचेच कल्याणकारी रूप आहे. येथील देवीचे सध्याचे खिमेलमाता हे नाव क्षेमार्या या संस्कृत नावाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश आहे.

भरमोर (हिमाचल प्रदेश) येथील इसवीसनाच्या सातव्या शतकातील लक्षणा देवीच्या पितळी मूर्तीच्या पीठावर एक कोरीव लेख आहे. या लेखात राजाने पुण्यप्राप्तीकरिता लक्षणा देवीची स्थापना केली तसेच गुग्ग याने देवीची ही प्रतिमा घडवली असा उल्लेख केला आहे. प्रस्तुत लक्षणादेवीची मूर्ती महिषासुरमर्दनिीचीच आहे.

प्रतापगढ (राजस्थान) येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील दानलेखाच्या आरंभी महिषासुराला मारणाऱ्या दुग्रेचे स्तवन केले आहे. याच लेखात कात्यायनी देवीचाही उल्लेख येतो.

या सर्व पुराव्यान्संदर्भात अमरकोश या संस्कृत कोशात येणारी दुग्रेची नावे बघणे आवश्यक ठरते. अमरकोशात तिची खालील नावे दिलेली आहेत.

उमा कात्यायनी गौरी काली हैमवतीश्वरी॥

शिवा भवानी रुद्राणी शर्वाणी सर्वमंगला।

अपर्णा पार्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका॥

आर्या दाक्षायणी चव गिरिजा मेनकात्मजा।

आत्तापर्यंत आपण बघितलेली विविध ग्रंथातील व कोरीव लेखांतील नावे म्हणजे शैव अगर शाक्त पंथातील दुग्रेची विविध रूपे मानली जात होती हे अमरकोशातील या नोंदीवरून स्पष्ट होते.

प्राचीन नाण्यांवरील सिंहवाहिनी देवी

प्राचीन अफगाणिस्तानात नना या नावाची इराणी देवता प्रसिद्ध होती. कुशाण राजांच्या नाण्यावर ती आपल्याला दिसते. ही नना सिंहावर बसलेली दाखवली जाते. कुशाण राजांच्या कंदाहार ते पटनापर्यंत पसरलेल्या साम्राज्यात त्यांनी अनेक स्थानिक देवदेवतांना नाण्यावर स्थान दिले होते. अफगाणिस्तानातील रोबाटक या ठिकाणी सापडलेल्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील कुशाण राजांच्या अधिकाऱ्याच्या शिलालेखात इतर देवतांबरोबर याच नना आणि उमा यांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख केला आहे. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कुशाण राजा हुविष्क याच्या नाण्यांवर सिंहवाहिनी नना व सिंहवाहिनी उमादेखील दिसते. हेच ननाचे व उमेचे सिंहवाहिनी रूप नंतर दुग्रेला प्राप्त होते.

या कुशाण राजांच्या नंतर उत्तर भारतात आलेल्या गुप्त राजांनी देखील अत्यंत सुंदर नाणी पाडली होती. चंद्रगुप्त या गुप्त घराण्यातील राजाच्या नाण्यावर एक सिंहवाहिनी देवी आहे. तिच्या एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात निधीश्रुंग घेतलेले आहे. काही संशोधक या देवीला सिंहवाहिनी दुर्गा मानतात. अशा प्रकारे सिंह हे वाहन दुग्रेच्या प्रतिमेत येते.

प्राचीन शिल्पातील दुर्गा महिषासुरमर्दनी

तामलुक (पश्चिम बंगाल) येथे सापडलेली शुंग काळातील एक छोटय़ा उठावातील मृण्मूर्ती उल्लेखनीय आहे. ही स्त्री मूर्ती सालंकृत असून तिचा केशसंभारही फार मोठा दाखवलेला आहे. तिच्या केशसंभारात पाच छोटी आयुधे दागिन्यांसारखी दाखवण्यात आलेली आहेत. ही आयुधे म्हणजे अंकुश, त्रिशूळ, परशु, वज्र आणि ध्वज ही आयुधे नंतरच्या काळात देवीच्या मूर्तीमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे काही संशोधक या मृण्मूर्तीला दुग्रेची आद्य प्रतिमा मानतात अर्थातच ही आयुधे शौर्य आणि राजवैभव दर्शवत असल्यामुळे ही स्त्रीदेवता महत्त्वाची असणार हे नक्की.

कुशाण काळात (इसवीसनाचे पहिले ते तिसरे शतक) या काळातील काही महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. ही चतुर्भुज देवीची मूर्ती दोन हातांनी एका महिषाला पकडून मारते आहे. अशा आविर्भावातील आहे. देवीचे मागचे दोन्ही हात आता दिसत नाहीत. तिने कानात जड कुंडले घातली आहेत. कुशाण काळातील अशा काही मूर्ती उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सापडल्या आहेत.

गुप्तकालात (इसवीसनाचे चौथे ते पाचवे शतक) ज्याप्रमाणे अनेक देवीदेवतांच्या मूर्तीची मानके बनली तशीच ती दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीचीही बनली. उदयगिरी मध्य प्रदेश येथील लेण्यामध्ये गुप्त काळातील एक सुंदर द्वादशभुजांची महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. तिने हातामध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, भाला, घंटा इत्यादी घेतले आहे. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे तर हातातील त्रिशुळाने त्याचा वध करते आहे.

बदामीच्या चालुक्यांच्या काळात (सहावे ते आठवे शतक) निर्माण झालेल्या ऐहोळे येथील दुग्रेच्या प्रतिमेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ऐहोळे येथील दुर्गामंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या मंदिराच्या बाहय़भागावर एक महिषासुरमर्दनिीची अत्यंत मनमोहक मूर्ती आहे.

वर उल्लेख केलेल्या भारमोर हिमाचल प्रदेश येथील शिलालेखात उल्लेखलेली लक्षणादेवी ही देखील महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. जवजवळ चार फूट उंचीची ही पितळी मूर्ती सातव्या शतकातील आहे. या चतुर्भुजी देवीच्या हातात त्रिशूळ खड्ग आणि घंटा आहे. एका हाताने तिने जमिनीवर पडलेल्या महिषाची शेपटी पकडली आहे आणि हातातील त्रिशुळाने ती महिषाचा वध करीत आहे.

महाराष्ट्रात वेरुळ येथील लेण्यामधेही महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. वेरुळ येथील कैलास मंदिरात सिंहावर आरूढ झालेली देवी महिषासुराचा वध करते आहे असे चित्रण केले आहे. पल्लवराजांच्या काळात निर्माण झालेल्या महाबलीपुरम येथील एका रथमंदिरात सिंहावर आरूढ झालेल्या देवीचे अंकन आहे. येथे देवी तिच्या सेनेसह महिषासुराशी युद्ध करताना दाखवली आहे. इथे महिषासुर मानवी रूपात दाखवलेला असून त्याचे मुख मात्र महिषाचे आहे.

पाल राजांच्या काळात बंगाल, ओरिसा या प्रदेशात दुग्रेच्या उपासनेचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेला होता. या भागात अनेक भुजांच्या महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. या प्रतिमांचा अभ्यास करताना असे दिसून येते की सुरुवातीला सिंह हा फक्त देवीचे लांच्छन म्हणून मूर्तीमध्ये येतो, पण नंतर तो देवीला महिषासुराला मारण्यात मदत करताना दाखवला जातो. तसेच इसवीसनाच्या सातव्या शतकांनंतरच्या मूर्तीत महिषाच्या कापलेल्या मानेतून असुर बाहेर येतांना दाखवण्यात येऊ लागला.

भारताबाहेरील दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा

भारताबाहेरही अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जावा, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती सापडतात. अफगाणिस्तानातील गझनी येथील टेपे सरदार या ठिकाणी एक महिषासुरमर्दिनीची भंगलेली भव्य मूर्ती मिळाली आहे ती काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती.

कंबोडिया येथील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीमध्ये चोल मंदिरातील मूर्तीचा प्रभाव पडलेला आहे. या महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीच्या पीठावर महिषमुखाचे रेखाचित्र कोरलेले असते त्यावरून या प्रतिमेची ओळख आपल्याला पटते.

अवघ्या भारतभर आणि अफगाणिस्तानपासून ते इंडोनेशियापर्यंत आढळणाऱ्या या दुर्गा महिषासुरमर्दनिीचे आपल्या महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपकी एक असलेल्या जगदंबा तुळजाभवानीची प्रतिमा महिषासुरमर्दनिी या स्वरूपातीलच आहे. पंधराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महिकावतीची बखर’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गद्यपद्यमिश्रित बखरीत श्रीदेवी आद्यशक्ती जगदंबिका महाराष्ट्राधर्मरक्षिका असा तिचा उल्लेख येतो. तर सोळाव्या शतकातील सुलतानशाहीने गांजलेल्या अवस्थेत संत एकनाथांनी

नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तूं साकार

घेऊनि दहा अवतार, करिसी दुष्टांचा संहार

दार उघड, बया दार उघड

अशा आळवणीनंतर म्लेंच्छांचा संहार करण्यासाठी तिची प्रार्थना केली होती.

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करून अलौकिक असा इतिहास रचला. तसेच तिची नित्य पूजा व्हावी म्हणून प्रतापगडावर भवानी देवीची प्रतिष्ठापना करून तिचे मंदिरही बांधले होते.

एकोणिसाव्या शतकात बंगालमधील दुर्गापूजनाचा प्रभाव बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ या गीतावर पडलेला दिसून येतो. इंग्रजांच्या पारतंत्र्यात अडकलेल्या भारतमातेला आदिशक्तीच्या रूपात कल्पून तिचा महिमा त्यांनी पुढील ओळींत वर्णन केला आहे.

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदलविहारिणी

वाणी विद्यादायिनी

नमानि त्वां

नमामि कमलां अमलां अतुलां

सुजलाम् सुफलाम् मातरम्॥

अशा रीतीने आदिशक्तीच्या दशभुजा दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही रूपांत मातृभूमीचे वर्णन करून बंकिमचन्द्रांनी प्राचीन भारतीय परंपरेशी आपली नाळ जोडली.

अशा या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या विविध प्रतिमांचा, तिच्या संदर्भातील पुरातत्वीय पुराव्यांचा, शिलालेखांचा व तिच्या उपासनेच्या मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येणारी महत्त्वाची बाब म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी व शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तिची वीरांकडून केली जाणारी आराधना. प्राचीन काळापासून देवीच्या इतर रूपांपेक्षा दुर्गा महिषासुरमर्दनिी रूपात देवीची आराधना विशेषत वीरपुरुषांनी का केली असावी याचा बोध दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेल्या ‘महिषान्तकरी येन पूजिता स जगत्प्रभु’ (ज्याने महिषासुरमर्दनिीला पूजिले तो जगाचा स्वामी होतो) या वाक्यावरून होतो.
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:31 am

Web Title: mahishasura mardini
Next Stories
1 शाक्त तंत्रमार्ग आणि चौसष्ठ योगिनी
2 शक्ती- शाक्त संप्रदायातील!
3 माझी माय सरसोती
Just Now!
X