घरं उपलब्ध आहेत, लोकांना ती हवीही आहेत, पण घरांच्या खरेदीविक्रीला मात्र उठाव नाही, ही स्थिती आहे, घरबांधणी उद्योगाची. मंदीच्या सावटाखाली असलेल्या या क्षेत्रात नेमकं काय चाललंय याचा आमच्या राज्यभरातल्या वार्ताहरांनी घेतलेला आढावा-

एके काळी राज्यात मुंबई, पुणे व नागपूरनंतर औद्योगिकदृष्टय़ा चौथ्या स्थानावर राहिलेल्या सोलापूरची ओळख नंतर ‘मोठे खेडेगाव’ म्हणून होऊ लागली खरी; परंतु एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे सोलापूरने विकासाच्या दिशेने आता मोठी झेप घ्यायला सुरुवात केली आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत देशात नवव्या क्रमांकावर आलेल्या सोलापूरचा प्रवास ओळख ‘खेडेगावा’तून ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने होऊ लागला आहे. स्मार्ट सिटीच्या बाजूला दुसरीकडे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांमुळे ‘आध्यात्मिक राजधानी’ म्हणूनही सोलापूरची ख्याती निर्माण आहे. रेल्वेसह राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारत असताना सोलापूरच्या विकासाला नैसर्गिकरीत्या चालना मिळण्यास मोठा वाव आहे. यात येथील रीअल  इस्टेटचे भवितव्य निश्चितच विकासाला पोषक राहणार आहे. दहा लाख लोकसंख्येच्या सोलापुरात सर्वच दिशांनी गृहप्रकल्पांची व्याप्ती वाढल्याचे दिसून येते. बंद पडलेल्या कापड गिरण्या व सूतगिरण्यांच्या जागांवर भव्य गृहप्रकल्प उभारले जात आहेत. येत्या पाच-दहा वर्षांत होणाऱ्या विकासाचा विचार करता रीअल इस्टेटला खरोखर ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे लक्षात येईल.

सोलापूर शहराची हद्दवाढ २३ वर्षांपूर्वी झाली. हद्दवाढ भागातील अकरा गावांमध्ये गृहप्रकल्पांसाठी जागा उपलब्ध झाल्या. जुळे सोलापूरसह होटगी रस्ता व विजापूर रस्त्यावर वसाहती विशेषत्वाने वाढल्या. त्यानंतर तुलनेने दुर्लक्षित अशा पुणे रस्ता, अक्कलकोट रस्ता, हैदराबाद रस्ता व मंगळवेढा रस्त्यावरही अलीकडे निवासी व व्यापारी संकुलांची बांधकामे होऊ लागली आहेत. आजमितीला शहर व परिसरात तीनशेपेक्षा अधिक गृहप्रकल्पांची उभारणी होत आहे. यात काही परदेशी कंपन्यांच्या सहकार्यानेही बांधकामे होत आहेत. प्रिसिजन कॅम्शाफ्टस् कंपनीचे अध्वर्यू यतीन शहा यांनी युरोपातील सीबीआरए या बांधकाम क्षेत्रातील प्रख्यात कंपनीच्या सहकार्याने हाती घेतलेल्या ‘लॅन्ड मार्क’ या गृहप्रकल्पावरून सोलापूरच्या रीअल इस्टेटच्या भवितव्याची कल्पना येऊ शकेल.

शहर व परिसरात बांधकाम व्यावसायिकांची विश्वासार्हता प्राप्त केलेल्या क्रेडाईसारख्या संघटनेचे ७५ सदस्य आहेत. या बांधकाम व्यावसायिकांनी हाती घेतलेल्या विविध गृहप्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. दिवंगत ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अनिल पंधे यांनी बांधकाम क्षेत्रात मोठा लौकिक मिळवून दिला असून त्यांच्या प्रयत्नांनी पुणे रस्त्यावर अवंतीनगरी, वसंत विहार, अभिमानश्री, गायत्रीनगर आदी एकापेक्षा एक सरस गृहप्रकल्पांनी त्या भागाला नवीन ओळख निर्माण झाली आहे. अंकुर पंधे यांनी पित्याचा वारसा समर्थपणे चालविला आहे. सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यापूर्वी पंधे यांच्या सहकार्याने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने यापूर्वी अक्कलकोट रस्त्यावर कंभारी येथे तब्बल दहा हजार महिला विडी कामगारांसाठी गोदूताई परुळेकर गृहप्रकल्प यशस्वीपणे उभारला होता. केंद्र, तसंच राज्य शासन आणि स्वत: लाभार्थी कामगार असे प्रत्येकी २० हजार घालून अवघ्या ६० हजार रुपयांत घरकुलाचे स्वप्न साकार झाले होते. या पाश्र्वभूमीवर मिळालेल्या अनुभवातून आडम मास्तर यांनी कुंभारी परिसरात अल्पसंख्याक महिला, दलित व कामगारांसाठी तबल ३० हजार घरकुलांचा प्रकल्प हाती घेतला आहे. अर्थातच, त्यासाठी अनेक वर्षांपासून चाललेल्या पाठपुराव्यामुळे हा भव्य घरकुलांचा प्रकल्प लवकरच दृष्टिक्षेपास येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने साकार होणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभार्थी सभासदांना प्रत्येकी ४५० चौरस फुटांचे घरकुल मिळणार आहे. या घरकुलाची किंमत सुमारे पाच लाखांच्या घरात असेल. हा प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या ऐतिहासिक घरकुल प्रकल्पांची जबाबदारी पंधे कन्स्ट्रक्शनचे अंकुर पंधे यांनी घेतली आहे.

शहरात मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांसाठी मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्पांची उभारणी होत असताना त्यात बंद पडलेल्या लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या जागेवर आपटे ग्रुपने हाती घेतलेला ‘इंद्रधनू’ गृहप्रकल्प मैलाचा दगड ठरावा. रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात येत असलेल्या या ‘इंद्रधनू’च्या माध्यमातून सोलापुरात प्रथमच १४ मजलांच्या १३ इमारती आहेत. वन बीएचकेपासून दोन बीएचके, अडीच बीएचके, पेन्ट हाऊस अशा विविध स्वरूपांत एकूण १२०० गृहवास्तूंची उभारणी होत आहे. यापैकी आतापर्यंत ११२ गृहवास्तूंचा ताबा ग्राहकांना देण्यात आला आहे. नजीकच्या काळात तब्बल २२ मजली गृहप्रकल्पाची उभारणी करण्याचा संकल्प सोडल्याचे ‘इंद्रधनू’चे नितीन आपटे सांगतात. सध्या शहरात गृहसंकुले जास्तीत जास्त सात मजल्यांपर्यंतची आहेत. त्यांनी विकास कोळी यांच्या भागीदारीत सुरू केलेल्या इंद्रधनूने १४ मजल्यांच्या गृहसंकुलांची उभारणी करत पुढे २२ मजल्यांपर्यंत गृहसंकुलांची उभारणी केल्यास तो सोलापूरसाठी आकाशाला गवसणी घालणारा प्रकल्प ठरेल, यात संशय नाही. इंद्रधनूने उभारलेल्या गृहसंकुलांना इमारत म्हणून पाहता वास्तुशिल्प म्हणून पाहिले पाहिजे. गृहप्रकल्पाच्या माध्यमातून स्वतंत्र जीवनशैली अनुभवास येते. सांस्कृतिक श्रीमंतीचेही दर्शन होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, लेखक अच्युत गोडबोले आदींच्या सहवासात इंद्रधनूमध्ये रंगलेला ‘सांस्कृतिक गप्पां’चा कार्यक्रम असो वा दिवाळीत आयोजिलेला ‘पहाटगाणी’चा सुंदर कार्यक्रम असो, त्यातून इंद्रधनूविषयीचा अभिमान नकळतपणे प्रकट होतो.

सोलापुरात सध्या रोजगाराभिमुख फारसे उद्योग व्यवसाय अजून तरी उपलब्ध नसले तरी पगारदार नोकर, बागायतदार शेतकरी, व्यापारी हा या सर्व गृहप्रकल्पांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. येत्या एक-दोन वर्षांत सोलापूरजवळ एनटीपीसीचा औष्णिक वीजनिर्मितीचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यापाठोपाठ पाण्याची पूरक व्यवस्था झाल्यास सोलापूरमध्ये आणखी बरेच उद्योग प्रकल्प येण्याची आशा आहे.

सध्या सोलापुरात जवळपास १५ अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यातून शिकून बाहेर पडणारी मुले पुणे, बंगळुरू, हैदराबादला नोकरी-व्यवसायासाठी जातात. ही स्थिती नजीकच्या काळात बदलू शकेल, कारण स्मार्ट सिटीच्या मिळालेल्या दर्जामुळे सोलापूरचा निकास नैसर्गिक स्वरूपात, परंतु झपाटय़ाने होण्यास वाव आहे. त्यातच भर म्हणून सोलापूर व परिसरात रस्तेविकासासाठी तब्बल २७ हजार कोटी खर्चाची कामे सुरू होणार आहेत.

सध्या सोलापूर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. सोलापूर-हैदराबाद (संगारेड्डी) महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामालाही गती मिळाली आहे. सोलापूर-पुणे व सोलापूर-गुलबर्गा-गुंटकलपर्यंतच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण होत आहे. देशात सर्वाधिक दोन कोटी मेट्रिक टनापर्यंत ऊस उत्पादन  करणारा व त्या माध्यमातून साखरेचा जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, विजापूर आदी धार्मिक व पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी तब्बल दोन कोटी पर्यटक तथा भाविक सोलापुरात येतात. शिक्षण व वैद्यकीय शिक्षणाची उपलब्धता आहे. सोलापूरची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना रीअल इस्टेटसाठीही येथे पोषक वातावरण आहे.
एजाजहुसेन मुजावर – response.lokprabha@expressindia.com