सुनिता कुलकर्णी

साक्षात सुपरस्टार अमिताभ बच्चन ज्याचे वडील आहेत, विश्वसुंदरी एश्वर्या राय ज्याची बायको आहे, त्या अभिषेक बच्चनचा अनेकांना हेवा वाटत असतो. त्याच्यासारखं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्याचा हेवा वाटणं साहजिकच आहे. त्याच्याजागी मी का नाही? असं वाटणं ही भावनाही समजण्यासारखी आहे. पण काही लोकांना त्याचा नुसता हेवाच वाटत नाही तर त्याच्याबद्दल असूया वाटते, द्वेष वाटतो.

खरं तर हेही समजण्यासारखं आहे. पण त्यातली काही मंडळी तेवढ्यावरच थांबत नाहीत. सोशल मीडियाची कुऱ्हाड छोट्या वॉशिंग्टनसारखी दिसेल तिकडे चालवत सुटतात. आपल्या हातात असलेलं समाजमाध्यम आपण हवं तसं वापरू शकतो, ज्याला हवं त्याला हवं ते सुनावू शकतो असं त्यांना वाटतं.

अभिषेक बच्चन सोशल मीडियावर उपलब्ध आहे तर त्याला आपण हवं बोलू शकतो या अविर्भावातून ही मंडळी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर जाऊन वेडंवाकडं काहीही लिहितात. असं अनेक वेळा झालं आहे. पण अशा मंडळींना न टाळता, वेडंवाकडं उत्तर न देता, ब्लॉक न करता अभिषेक बच्चन ज्या पद्धतीने उत्तर देतात ते बघितलं की अभिषेक बच्चन होणं सोपं नाही हेच लक्षात येतं.

अगदी अलिकडचीच गोष्ट. १५ ऑक्टोबर पासून थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार आहेत, ही बातमी आल्यानंतर अभिषेक बच्चनने ट्वीट केलं, ‘ही तर या आठवड्यातली सगळ्यात चांगली बातमी.’ त्याच्या या ट्विटवर कॅटनीप असं टोपणनाव धारण करणाऱ्या एका महाभागाने ट्विट केलं, ‘तुला त्यात काय एवढं खूष होण्यासारखं…? तुझ्याकडे कुठे कामं आहेत? तू तर बेकारच असणार आहेस.’

एखाद्याला किती राग येईल या गोष्टीचा. पण अभिषेक बच्चनने शांतपणे उत्तर दिलं आहे की ते तर तुमच्यासारख्या प्रेक्षकांच्याच हातात आहे. तुम्हाला जर आमचं काम आवडलं नाही, तर आम्हाला पुढचं काम मिळणार नाही. तेव्हा आम्ही आम्हाला जितकं करता येईल तितकं चांगलं काम करतो आणि बाकी सगळं चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करतो.

याआधीही अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन कोविड संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा पारूल कौशिकने ट्विट केलं होतं, ‘तुझे वडील रुग्णालयात दाखल झाले आहेत. आता तुला कोण खायला घालणार? कोण तुझं पोट भरणार?’

अभिषेक बच्चनने तिची फिरकी घेत उत्तर दिलं होतं, ‘फिलहाल तो लेट के खा रहे है दोनो एकसाथ अस्पताल मे…’

पारुलने पुन्हा ट्विट केलं, ‘प्रत्येकाच्या नशिबात कुठे असं आयतं खाणं असतं?’

यावर अभिषेकचं उत्तर होतं, ‘तुमच्यावर अशी आमच्यासारखी वेळ येऊ नये, तुमचं आरोग्य नीट रहावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’
एकदा एकाने ट्विट केलं होतं, ‘डोन्ट फील बॅड अबाऊट युवर लाईफ. अभिषेक बच्चनकडे बघा, त्याला तर अजूनही आईवडिलांबरोबर रहावं लागतंय. (थोडक्यात अर्थ – आईबापांच्या जीवावर जगतोय)’ अभिषेकनेही शांतपणे लिहिलं, ‘होय. मला याचा अभिमान आहे की आम्ही एकमेकांबरोबर राहतो आणि एकमेकांसाठी आहोत. तुम्हीही राहून बघा, तुम्हालाही बरं वाटेल.’

एका ट्रोलने मीम तयार केलं होतं, की द्रोणा, झूम बराबर झूम हे अभिषेकचे सिनेमे आराध्या बघेल तेव्हा ऐश्वर्याला नक्की विचारेल की तू याच्याशी का लग्न केलंस? एवढी काय गरज पडली होती?

अभिषेकने त्या ट्रोलरला शांतपणे उत्तर दिलं होतं, ‘झाला जीव शांत…?’

या उत्तरानंतर त्या ट्रोलरने अभिषेकला माफी मागत सांगितलं, ‘मला तुझे सिनेमे आवडत नाहीत म्हणून मी असं लिहिलं.’ यावर अभिषेक लिहितो, ‘माझे सिनेमे आवडत नाहीत हे समजण्यासारखं आहे. पण म्हणून यात माझ्या लहान मुलीला आणणं चुकीचं आहे.’

असं दर काही काळाने अभिषेक बच्चनला टोकलं जातं. कधी त्याला अभिनय येत नाही असं म्हणत तर कधी तो काही कमवतच नाही असं म्हणत. पण अभिषेक बच्चनचा पारा सहसा चढत नाही. तो शांतपणे उत्तरं देत राहतो. घरात तीन तीन मोठे ब्रॅण्ड असताना आपल्याला तेवढं यश मिळालं नाही असं फस्ट्रेशन तो कसं पचवत असेल असाही अनेकांचा प्रश्न असतो. पण अभिषेक बच्चन होणं वाटतं तितकं सोपं नाही, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे.