25 February 2021

News Flash

गणिताची केमिस्ट्री

'शकुंतला देवी' हा सिनेमा गणिताशी संबंधित

सुनिता कुलकर्णी

गेली काही वर्षे सातत्याने बायोपिकची निर्मिती होतं आहे. सर्वसामान्य प्रेक्षकाला बघायला आवडेल अशा व्यक्तिमत्वांवर बायोपिक तयार होतात तेव्हा त्यामागचं व्यवसायाचं गणित समजण्यासारखं असतं. पण गणित हा कुठल्या सर्वसामान्य माणसाचा आवडता विषय असतो हो?

उलट अनेकांची तर ती लहानपणीच्या आठवणींची दुखरी नस असते. गणिताचा तास, गणिताच्या बाई, गणिताचा पेपर हे सगळं बालपणी आपल्या आयुष्यात नसतं तर आपण आयुष्यात खूप प्रगती केली असती असं अनेकांना आयुष्याच्या शेवटपर्यंत वाटत असतं. अनेकांना तर निवृत्तीनंतरही गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला काहीही येत नाहीये असं स्वप्नं पडत असतं.

तर अशा गणिताला मध्यवर्ती ठेवून कुणी सिनेमा काढतं का? पण ‘लंडन’, ‘पॅरिस’, ‘न्यूयॉर्क’ असे सिनेमे दिग्दर्शित करणाऱ्या अनू मेननचा ‘शकुंतला देवी’ हा चक्क गणिताशी संबंधित सिनेमा येतोय आणि तो बघणं तर भाग आहे. कारण विद्या बालन या हिरोनं त्यात मुख्य भूमिका केली आहे.

होय, विद्या बालन या हिरोने… एरव्ही भारतीय सिनेमे फक्त पुरूषांनाच डोळ्यासमोर ठेवून काढले जात असताना आपण फक्त स्त्रीकेंद्री सिनेमातच काम करणार असा आग्रह धरणाऱ्या विद्या बालनने स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. तिच्या सिनेमाची हिरॉइन ती असतेच, पण तिच्या सिनेमाचा हिरोदेखील तीच असते. त्यामुळे ‘तुम्हारी सुलु’ या तिच्या २०१७ मधल्या सिनेमानंतर तीन वर्षांनी तिचा ‘शकुंतला देवी’ हा सिनेमा येत असल्यामुळे तो बघण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. येत्या ३१ तारखेला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होत असलेला ‘शकुंतला देवी’ हा सिनेमा घरबसल्या बघता येणार आहे.

हा सिनेमा आहे मानवी संगणक म्हणून ओळखल्या गेलेल्या शकुंतला देवी यांच्यावर. कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना शकुंतलादेवी वयाच्या तिसऱ्या वर्षीच कोणतीही आकडेमोड झटक्यात आणि बिनचूक करू शकायच्या. त्यांच्या या कौशल्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. गणिताचे जाहीर कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी जगभर दौरे केले होते. गणिताचं त्यांचं कौशल्य पाहून भलेभले अचंबित होत. त्यांनी गणितावर, ज्याोतिषशास्त्रावर पुस्तकं लिहिली. समलैंगिकतेविषयीचं भारतामधलं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. २०१३ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

आधीच स्त्रियांना गणितामधलं काही येत-समजत नाही असं मानलं जातं. अशा गणितात माहीर शकुंतला देवी. त्यांच्यावर सिनेमा येणं, स्त्रीप्रधान भूमिकांनाच प्राधान्य देणाऱ्या विद्या बाललने तो करणं हे सगळं गणित जुळवणाऱ्यांना प्रेक्षकांची केमिस्ट्री चांगलीच माहीत असणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 1:07 pm

Web Title: the chemistry of mathematics in shakuntala devi aau 85
Next Stories
1 वाट पाहा २५ जुलैची.. स्वत:साठी!
2 अपारदर्शी मास्कमुळे त्यांची …. होतेय अडचण!
3 चंदनतस्कर वीरप्पनची लेक काय करतेय पाहा!
Just Now!
X