– अर्जुन नलवडे

साधारणपणे वीस वर्षांपूर्वी आलेला ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट युवकांना जास्त भावलेला होता. त्यामध्ये आर. माधवनचा अभिनय लोकांना लक्षात राहिला. त्या चित्रपटातील एक गाणे जास्त हीट झालेले ते म्हणजे ‘सच कह रहा हैं दीवाना, दिल दिल ना किसी से लगाना’. आजही ते गाणे युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाते. मध्यंतरीच्या काळात अनेक नवोदित गायकांनी नव्या ढंगात ते गाणे गायले आणि प्रेक्षकांनीही त्या गाण्याला मोठा प्रतिसाद दिला. सध्या हेच गाणे चार दिवसांपासून युट्यूब ट्रेंडिगच्या तिसऱ्या स्थानावर आहे आणि ते प्रेक्षकांकडून पुनःपुन्हा ऐकले जात आहे. याचं कारण म्हणजे हे गाणे पुन्हा एकदा नव्या आवेगात, नव्या जोशमध्ये आणि नव्या ढंगात गायले गेले आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक बी प्राक म्हणजेच प्रतीक बच्चनने गायले आहे. यापूर्वी बी प्राकने केसरी चित्रपटातल्या ”तेरी मिट्टी मैं मिल जावां’ या गण्याने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे खेचले होते.

बी प्राकने युट्यूबवर ‘२१ मे’ला ‘सच कह रहा हैं दीवाना, दिल दिल ना किसीसे लगाना’ हे स्वतः गायलेले गाणे अपलोड केले आणि पहिल्याच दिवशी १० लाख प्रेक्षकांनी त्याच्या गाण्याला पसंती दर्शविली. सध्या २१ लाखांहून जास्त प्रेक्षकांनी हे ऐकले आहे आणि पाहिले आहे. २०११ साली रिलीज झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातील मूळ गाणेच लोकांना इतकं भावलेले की, आर. माधवनला या गाण्यामुळे वेगळी ओळख मिळाली. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या या गाण्याला बाजूला करून नव्या ढंगातील लोकांच्या पसंतीस उतरविणे तसे अवघड आहे. मात्र, बी प्राकचा हा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे. गाण्याचे मूळचे बोल आणि चाल लक्षात घेऊन नव्या आवेगात हे गाणे बी प्राक गायले आहे आणि प्रेक्षकांनाही मोठ्या प्रमाणात ते पसंत पडले आहे.

नव्या गाण्याची वैशिष्ट्ये असे की, गाण्याचे सुरुवातीचे बोल म्हणजेच पहिलेच कडवे बी प्राकने गायलेले आहे. संगीतसाधनांचा कोणताही अतिरेक न करता केवळ आपल्या आवाजाच्या आणि नव्या ढंगातील गायकीच्या जोरावर २ मिनिटांच्या या गाण्याला लाखो प्रेक्षकांनी पसंत केले आहे. गाण्यातील विरहाला कोणताही धक्का न लावता बी प्राकने मूळच्या गाण्याचा प्रभाव कमी करून प्रेक्षकांच्या मनावर नव्या गाण्याची चाल आणि सूर बिंबविले आहे. बी प्राक हा पंजाब इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्रीमधला आघाडीचा गायक आहे. त्याचे खरे नाव प्रतिक बच्चन आहे. अक्षय कुमारचा नुकताच येऊन गेलेल्या केसरी चित्रपटातील ‘ते मिट्टी मैं मील जावां’ हे गाणंदेखील बी प्राकने गायलेले आहे. प्रेक्षकांकडून सर्वात जास्त पसंती या गाण्याला मिळालेली आहे. हिंदी, पंजाबी, तेलगू , अशा अनेक भाषांमध्ये त्याने गाणी गायलेली आहेत.