13 August 2020

News Flash

फाइन डाइन: जेवणाची सुरुवात : अमेरिकन स्टाइल

अमेरिकन डायनिंग स्टाइलने टेबल सेटिंग आणि काटा-चमचा-सुरी वापरायची पद्धत थोडी वेगळी असते.

चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट शिकवणारे सदर. अमेरिकन डायनिंग स्टाइलचं जेवण घेताना काय कटलरी, कशी आणि कुठे वापरावी याची माहिती.. थोडक्यात अमेरिकन जेवणातले डावे-उजवे..

गेल्या आठवडय़ात आपण कॉन्टिनेंटल स्टाइलचे डायनिंग एटिकेट पाहिले. अमेरिकन डायनिंग स्टाइलने टेबल सेटिंग आणि काटा-चमचा-सुरी वापरायची पद्धत थोडी वेगळी असते. टेबल सेटिंगमध्ये साइड प्लेट काटय़ाच्या डाव्या बाजूला नसून वरच्या बाजूला असते. साइड प्लेटवर बटर नाइफ उभी न ठेवता आडवी किंवा थोडी तिरकी ठेवली जाते. तसंच काही वेळा कॉफीसाठी कप-बशीसुद्धा सर्वात बाहेरच्या सुरीच्या उजव्या बाजूला ठेवली जाते. या इथे लक्ष देण्याची बाब म्हणजे उजवी व डावी बाजू.
अमेरिकन स्टाइल आणि कॉन्टिनेंटल स्टाइलमधला फरक जेवताना काटा-सुरीच्या वापरत दिसून येतो. याच फरकाचा आढावा घेण्यासाठी आता जाणून घेऊ या जेवणाची अमेरिकन पद्धत. अमेरिकन स्टाइलमध्ये काटा डाव्या हातात धरून पदार्थावर रोखून ठेवला जातो. त्यानंतर उजव्या हातात सुरी धरून पदार्थाचा थोडा भाग खाण्यासाठी कापला जातो. पदार्थाचा तुकडा काटय़ावर आल्यावर उजव्या हातातली सुरी प्लेटमध्ये ठेवली जाते आणि तो कापलेल्या पदार्थाचा तुकडा असलेला काटा उजव्या हातात घेऊन तो पदार्थ खाल्ला जातो. संपूर्ण जेवण असं सुरी डाव्या हातातून उजव्या हातात घेऊनच खाल्लं जातं. या स्टाइलला ‘झिग-झॅग’ (zig-zag) स्टाइल असंही म्हणतात.
त्यानंतरचा फरक येतो तो जेवण संपल्यावर काटा-सुरी ठेवण्याच्या पद्धतीत. कॉन्टिनेंटल स्टाइलमध्ये जेवण संपल्यावर काटा-सुरी सरळ उभे ठेवले जातात; अमेरिकन पद्धतीत ते जोडीने तिरके ठेवले जातात- म्हणजेच १०:२०( दहा वाजून वीस मिनिटे) किंवा ३: ५० (तीन वाजून पन्नास मिनिटे) या पोझिशनमध्ये ठेवले जातात.
अमेरिकन पद्धतीत जेवणाच्या शेवटी जी कॉफी सव्‍‌र्ह केली जाते, तो कप सहसा थोडा मोठा असतो. तुलनेने कॉन्टिनेंटल स्टाइलमध्ये कप खूपच छोटा असतो; अगदी भातुकलीतल्या कपाहून थोडा मोठा म्हणावा इतका. याला ‘देमी-तास’ (फ्रेंच भाषेत- अर्धा कप) असं म्हणतात.
जेवण्याच्या या दोन्ही पद्धती जवळपास समांतरच आहेत. कोणतीही एक पद्धत दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानली जात नाही. आपण मात्र साधारणत आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा अंदाज घेऊन त्या विशिष्ट पद्धतीने जेवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:01 am

Web Title: american food and dining table etiquettes
टॅग Viva
Next Stories
1 सस्टेनेबल फॅशन
2 प्लास्टिक कचऱ्यातून कलेची जादू
3 बाईमाणूस आणि भाईमाणूस
Just Now!
X