सागर साठे – सिडनी, ऑस्ट्रेलिया

सिडनी आज २०१८मध्ये जगातल्या अत्यंत विकसित शहरांपैकी एक शहर मानलं जातं. ऑस्ट्रेलियाची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक देश म्हणून पारंपरिक दृष्टीने असणारी प्रतिमा एका हॉलिडे डेस्टिनेशनची आहे. कारण ऑस्ट्रेलियातील स्थानिक नागरिक असोत किंवा आंतरराष्ट्रीय व्हिसाधारक असोत, त्यांनी ‘वर्क लाइफ बॅलन्स’ सांभाळून इथला नावलौकिक जपलेला दिसतो. या जीवनशैलीतील माझ्या वास्तव्याची जणू एक लघुकथाच आहे..

मी इथे हायस्कूलच्या वयात असताना राहायला आलो. त्यामुळे माझ्या भावाला आणि मला इथे स्थिरस्थावर होणं तुलनेनं सोपं गेलं. इथल्या तरुणाईविषयी थोडक्यात सांगायचं तर आपल्यापेक्षा काही गोष्टींत मोठ्ठा फरक जाणवतो. इथल्या मुलांचं ध्येय खेळ आणि आऊ टडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज हे असतं. ऑस्ट्रेलियामध्ये एक टर्म खूपच प्रचलित आहे. ती म्हणजे ‘इट इज अप टु यू’. अर्थातच, ‘काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा’. काही जणांचं ध्येय अभ्यास आणि उच्चशिक्षण हेच असतं. अर्थातच त्याही सोयीसुविधा इथे आहेतच. पण अधिकांश प्रमाणात ऑस्ट्रेलियन तरुणाई ही एक्स्प्लोर करणं, खेळणं, स्वयंसेवक वृत्तीने कार्य करणं आणि भोवतालच्या जगाचा अनुभव घेणं या सगळ्या गोष्टींना अधिकांशी प्राधान्य देताना दिसते.

मी गेल्या काही जॉब मध्येही पाहिलं आहे की, अगदी नोकरी करणारे लोकही ऐन आठवडय़ाच्या मध्यावरती फुटी किंवा रग्बी, सॉकर किंवा तेव्हा जो काही सीझन असेल त्याप्रमाणे खेळात सहभागी होतात, तेही आपापलं काम व्यवस्थित सांभाळून. त्यामुळे तिथल्या भारतीयांना या एक्स्ट्रा अ‍ॅक्टिव्हिटीजबद्दल, मनोरंजन आणि सामाजिक संकेतांबद्दल अधिकाधिक माहिती मिळते, त्यांचं बदलतं स्वरूप कळतं आणि मग ऑस्ट्रेलियन तरुणाईसोबत वेळ व्यतीत करताना, त्यांच्यात मिसळताना तुलनेने सहजता येते. याचा अजून एक फायदा म्हणजे सोशल डिनर किंवा नेटवर्किंग सेशन्सच्या निमित्ताने नवीन लोक भेटतात तेव्हा आपण आणि त्यांच्यातला परकेपणा नाहीसा होण्यासाठी कोणत्या समान आवडीच्या विषयांवर गप्पा माराव्यात, हेही एका परीनं कळतं. ऑस्ट्रेलियन अ‍ॅक्सेंट आणि तिथल्या औपचारिक टर्म हे शिकायला मिळणं आणि त्यांचं योग्य तिथे उपयोजन करणं ही सामाजिक पर्यावरणाच्या दृष्टीने एक आवश्यक गोष्ट ठरते. ‘जीआय डे मेट’ हे शब्द जगभरात कुठेही उच्चारलेत किंवा म्हणालात तर तुम्ही ऑसी किंवा ऑस्ट्रेलियन आहात, असंच ओळखलं जातं.

सिडनी हे शहर गेल्या दहा वर्षांत विशेषत: फारच झपाटय़ाने बदललं आहे. मग ते लोकवस्ती असो, नोकऱ्या असोत किंवा आर्थिक सुधारणा आणि मालमत्तेतली वाढ असो. या घटकांच्या वाढत्या मागणीमुळे व्हिसा मान्य होणं आणि एकूणच त्यासंबंधीचे र्निबध वाढले आहेत. तरीही अलीकडे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार असं आढळून आलं की इतर देशांपेक्षा ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय स्थलांतरितांचं प्रमाण पाहिल्या क्रमांकावर आहे. सिडनीच्या हवामानाला काही लोक बारामाही समर मानतात, कारण अगदी थंडीतही इथलं तापमान १० अंशांच्या खाली फारच क्वचित वेळा जातं. हवासा सूर्यप्रकाश, समुद्रकिनारे, आल्हाददायक हवामान आणि आऊ टडोअर जीवनपद्धती या सगळ्या भारी ठरणाऱ्या गोष्टींमुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचंही सिडने हे सर्वाधिक पसंत पडणारं शहर बनलं आहे.

सिडनीमध्ये विशेषत: सांगायचं झालं तर ‘द ग्लोबल इंडियन’ ही संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वीकारली गेली आहे. त्यासंदर्भात एक उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय तरुणाई आज खूप जास्त प्रमाणात मोठमोठय़ा ऑस्ट्रेलियन बँका आणि अर्थसंस्थांमध्ये काम करते आहे. कस्टमर सव्‍‌र्हिस असो किंवा अकाऊं टिंग डिपार्टमेंट असो, ऑस्ट्रेलियाची सगळ्यात मोठी बँक ‘कॉमनवेल्थ बँक’ या संस्थेमध्ये काम करणाऱ्यांपैकी जवळपास एकचतुर्थाश लोक भारतीय आहेत. त्यामुळे कॉमनवेल्थ बँकेने फक्त भारतीय लोकांसाठी आणि भारतीय ग्राहकांसाठी कॉमनवेल्थ बँकच्या वेबसाइटवर (www.commonwealthbank.com.au/hindi) असा हिंदी भाषेचा पर्यायही उपलब्ध केला आहे. तिथे ‘बँकिंग के बारे किसी से अपनी भाषा में बातचीत करें।’ ही अक्षरं झळकलेली दिसतात. या सुविधेचा लाभ ऑस्ट्रेलियातील भारतीय ग्राहकांना घेता येऊ  शकतो आहे.

या एका उदाहरणाखेरीज आणखी किती तरी पैलू असे दाखवता येतील, ज्यात भारतीयांनी त्यांचं मूळ आणि संस्कृती यांचं जतन व संवर्धन ऑस्ट्रेलियन संस्कृतीत राहूनही केलं आहे. अलीकडेच प्रसारित झालेल्या ‘ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ’ या टीव्ही शोमधला पहिला विजेता हा सशी चेलिया हा भारतीय वंशाचा आहे. भारतीय / सबकॉन्टिनेंटल पद्धतीच्या पदार्थाचं वैशिष्टय़ ऑस्ट्रेलियन परीक्षकांच्या मनावर ठसेल, अशा रीतीने त्याने ऑस्ट्रेलियन टीव्हीवर आपली पाककला सादर केली. त्यामुळे भारतीय पद्धतीच्या पाकक्रियेला ऑस्ट्रेलियामध्ये अधिकच लोकप्रियता मिळेल आणि आणखीन काही भारतीय रेस्तराँ त्यामुळे सुरू होतील, असा माझा कयास आहे.

आज माझं वय २८ र्वष आहे. माझ्या आयुष्यातली जवळपास १५ र्वष इथे गेली आहेत. या काळात खूपसे चांगले आणि काही कटू अनुभवही वाटय़ाला आले आहेत. इथल्या पद्धतीनुसार वयाच्या अवघ्या विशीतच मी पूर्णवेळ काम करू लागलो आणि माझं पुढचं शिक्षण स्वत:च्या हिमतीवर पूर्ण केलं. आज या भूतकाळाकडे वळून बघताना मला आणि माझ्या बायकोला वाटतं की, मी असा लवकर काम करायला लागलो नसतो तर कदाचित आमची गाठभेटच झाली नसती आणि हे रेशीमबंध जुळले नसते. मी एका भारतीय कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत होतो, तेव्हा बॅकस्टेजला आमची भेट झाली आणि पुढे हव्याशा वाटणाऱ्या एकत्र प्रवासाची सुरुवात झाली. म्हणूनच भारतीयांना एकूणच समाज आणि जीवनपद्धतीचं महत्त्व अद्यापही वाटतं. कारण ऑस्ट्रेलियात स्थिरावताना आपल्या वाटय़ाला आलेला अनुभव कदाचित आपल्या मैत्री किंवा नात्यातला समान धागा होऊ  शकतात आणि ही नाती पुढं कायम राहतात.

पण सर्वात मोठा बदल म्हणून मला एका गोष्टीची नोंद आवर्जून करावीशी वाटते की, ऑस्ट्रेलियन जीवनशैलीमुळे आपल्याला चांगल्या गोष्टींची निवड करायची सवय लागते आणि आपण स्वावलंबी व स्वतंत्र आयुष्य जगू शकतो. भारतामधल्या आपल्या जगण्यावर अनेकदा बऱ्याच गोष्टींचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जाणवत असतो. लोकांना तुम्ही काय काम करता, कुठं आणि काय शिकलात वगैरे गोष्टींविषयी फार कुतूहल वाटतं आणि त्या अनुषंगानेच त्यांची मानसिकता व विचारशक्ती काम करत असते. पण इथे ऑस्ट्रेलियामध्ये बघितलंत तर गुणवैविध्याला आणि सर्जनाला कामाच्या ठिकाणी कायमच प्रोत्साहन दिलं जातं. आपल्या कामात, उत्पादनक्षमतेत वाढ करण्याची ताकद तुमच्यात असेल तर मग त्यात तुम्ही तरबेज व्हायला हवं. अशा वेळी दुसऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालणं किंवा त्यांनी सांगितलेले सल्ले मानणं हे आवश्यकतेनुसार टाळायला हवं. हा तसा वादाचा मुद्दा ठरू शकतो. म्हटलं तर या वरकरणी पाहता नेहमीच्याच पण तितक्याच महत्त्वाच्या विषयामध्ये आपली विचारशक्ती बदलण्याची मोठीच क्षमता ऑस्ट्रेलियन जीवनशैलीत आहे.

म्हणूनच इथे येण्याचा एक मोठा फायदा असा की, ऑस्ट्रेलियन जीवनशैलीत तुम्ही स्वत:ला रुजवलंत तर तुमच्या आयुष्यात खूपच मोठा बदल होईल. त्यासाठी चांगले पर्याय निवडायला मदत करणं आणि ते उपलब्ध करून देणं हीच तर इथल्या जीवनशैलीची खासियत आहे. समजा, या सगळ्यात एखादं अपयश तुमच्या पदरी पडलं तरीही तुमच्याकडं कुणी बोट दाखवून हसणार नाही किंवा तुम्हाला कुणी दुखावणार नाही. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणं ते सगळं तुमच्या हातात आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. यामध्येही प्रत्येकाची साधकबाधक मतं असतीलच. पण माझ्या मते, ऑस्ट्रेलियन जीवनशैलीचा अनुभव घ्यायची आणि ती जगण्याची संधी तुम्हाला लहान वयातच मिळाली तर मग तरुणाईला त्यांच्या आयुष्याबद्दलचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आणि करिअरचे चांगले पर्याय उपलब्ध होऊ  शकतील. एका परीने हे स्वानुभवाचेच बोल आहेत.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com