वैष्णवी वैद्य

पाउलो कोएलो हे नाव ‘अलकेमिस्ट’ या पुस्तकामुळे तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. मूळत: ब्राझीलियन असलेला हा लेखक त्याच्या वैशिष्टय़पूर्ण कथानकाने तरुण वाचकांना आकर्षित करतो.

या लेखकाचे कथानक सातत्याने अद्भुत शक्ती, अंतर्मन अशा विविध वलयांकित विषयांवर असते. त्याचा मूळ गाभा कोणा एका व्यक्तीवर असतो आणि त्याला पावलोपावली वेगवेगळ्या रूपात भेटणारा, सज्ञान करणारा गुरू असतो. हेच या लेखकाच्या लेखनशैलीचे वैशिष्टय़ आहे आणि तरुण वाचकांना आकर्षित करणारा केंद्रबिंदू आहे.

‘ब्रिडा’ या कादंबरीत ब्रिडा नावाच्या एका तरुण आयरीश मुलीची कथा आहे, जिला जादू शिकायची इच्छा असते. ही वयात आलेली मुलगी अनेक प्रश्नांचे जाळे मनात ठेवून ते शोधण्याच्या ध्यासात असते. हे प्रश्न सामान्य नसतात. गूढ शक्ती, जीवनाचे मागचे आणि पुढचे दाखले असे अनेक अनुत्तरित मानले जाणारे प्रश्न असतात. हे असे प्रश्न तिला का पडतात, हेसुद्धा एक गूढच आहे. तिच्या मनात असे अनेक अंत:क लह असतात, खूप गोष्टींची भीती असते, खूप गोष्टींचे कुतूहल असते. कदाचित यासाठीच तिला जादू किंवा अशी एखादी शक्ती शिकायची असते, जी या सगळ्यावर हावी होईल. या कथेच्या नायिकेला लेखकाने खूप सुंदर रेखाटले आहे. तिचे वय, चिकित्सक बोलणे, नवीन गोष्टी शिकण्याचा अट्टहास या छटा सामान्य तरुण वाचकाशी सहजपणे जुळतात आणि ब्रिडा आपलीशी वाटू लागते. ब्रिडा सुंदर आहे असे म्हणत आपण तिचे चित्र मनात तयार करतो.

हा लेखक फारशा कथा पात्रात अडकत नाही. याच्या कथेत कमीत कमी पात्रे असतात. कथेत तो नेहमीच कुठल्या तरी अद्भुत ज्ञान किंवा शक्तीसंवर्धनाचे काम करीत असतो. हे वेगळेपण तरुणांना जास्त भावते. प्रेमकथा असो, रहस्य असो, संघर्ष असो, त्यामध्ये एक प्रकारची अद्भुतता असते. निसर्गात एक काल्पनिक व्यापक शक्ती आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातल्या आणि आजूबाजूच्या घटना घडत असतात, हेच लेखक सातत्याने सांगत असतो. ब्रिडा ही जादूटोणा, धर्म, अध्यात्म, पुनर्जन्म अशा गोष्टींची सरमिसळ आहे. लेखकाचे वलयांकित विषय म्हणजे हेच! हे विषय लेखनाच्या दृष्टिकोनातून कथेत उतरू शकतात हीच किमया आहे. ‘अलकेमिस्ट’मध्ये ज्ञानगुरू होता, पण ब्रिडामध्ये सोलमेट आहे. ब्रिडाला तिच्या गुरूमध्ये तिची प्रिय व्यक्ती सापडते. त्याच्या शिकवणीच्या पद्धतीत ब्रिडा प्रेमात पडते. आधी तिला गूढ शक्तींबद्दल कुतूहलता होते, पण गुरूला भेटल्यावर ब्रिडाने या विषयाचा ध्यासच घेतला. या शक्तीमार्फत तिला त्याच्याजवळ पोहोचणे, त्याला अधिक जाणून घेणे सोपे होते असे तिला वाटू लागले.

या कथेच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो, जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक, जी काही तरी तयार करणारी किंवा बांधणारी (टू बिल्ड) आणि दुसरी, काही तरी पेरणारी (टू प्लान्ट). जी फक्त मनोरा बांधतात त्यांना माहीत असते कधी तरी आपले काम संपणार आहे. मनोरा बांधून संपणार आहे. पण जे काही तरी पेरत असतात ते आयुष्यभर पेरतच असतात. कारण पेरणे कधी संपत नाही. पेरून उगवते आणि ते बहरत राहते. त्याची काळजी आपण सतत घेतच राहतो. म्हणून काही तरी पेरण्यात जास्त समाधान आहे. त्याप्रमाणे ही कथासुद्धा त्याने पेरली आहे. यातून प्रत्येकाला काही तरी नवीन दिसत असते, किंबहुना जितक्या वेळा वाचू तितक्या वेळा काही तरी नवीन सापडत असते.

या कथेत दोन पद्धतीने हे अद्भुत ज्ञानसंवर्धन आहे. चंद्र परंपरा आणि सूर्य परंपरा. चंद्र परंपरा काळाच्या पलीकडे जाऊन दूरदृष्टी देते. सूर्य परंपरा आजूबाजूच्या घटनांमधून ज्ञानसंवर्धन शिकवते. ब्रिडाला दोन्ही परंपरा शिकायच्या असतात, पण चंद्र परंपरेत अनेक गूढ गुपिते असतात. तिचा प्रेमरूपी गुरू तिला सूर्य परंपरा शिकवायला तयार होतो. त्यासाठी तिला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. अनपेक्षित भीती आणि संघर्षांचा सामना करावा लागतो. पण ती या सगळ्यातून तरून निघते. तिचा ध्यास त्या शिक्षकाला प्रभावित करतो. तोही तिच्या प्रेमात पडतोय असे त्याला वाटत असते. पण ते दोघे ज्या वाटेवर असतात ती वाट सोपी नसते. त्या वाटेत खऱ्या-खोटय़ाची पारख करणेच कठीण असते. पुढेही अनेक वळणे येतात, जिथे त्या दोघांनाही अवघड पर्याय निवडावे लागतात.

पाउलोने अशा नव्या पद्धतीच्या लेखनाची जणू नांदीच केली आहे. या विविध अनोख्या विषयांवरचे लेखन तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. प्रत्येक लेखकाची शैली असते. ती कधी त्याच त्याच प्रकारच्या पद्धतीमुळे कंटाळवाणी होऊ शकते. पण पाउलो त्याला अपवाद आहे. त्याचा एक विशिष्ट वाचक वर्ग निर्माण झाला आहे. या कथेत किंवा या लेखनशैलीत कुठेही कल्पनाशक्तीचा विपर्यास आणि अतिशयोक्ती वाटत नाही. या पद्धतीत कथानकाला धरून राहणे कठीण असते, जे पाउलोने जमवले आहे. तरुण वाचकांसाठी पाउलोचे साहित्य हा नवीन अभ्यासाचा विषय आहे.

viva@expressindia.com